रोहित पाटील
राज कपूर म्हटलं की त्यांचे वैविध्यपूर्ण चित्रपट डोळय़ासमोर येतात. भारतीय सिनेविश्वातले शोमॅन म्हणूनच त्यांना ओळखले जाते. राज कपूर हे चित्रपटसृष्टीतील दृश्यात्म कथनाची कला अवगत असलेले अष्टपैलू दिग्दर्शक – निर्माते. अलीकडेच राहुल रवैल यांचं ‘राज कपूर दि मास्टर अॅट वर्क’ हे प्रणिका शर्मा यांनी शब्दांकन केलेलं पुस्तक मराठीत आलं. मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. या पुस्तकामध्ये राज कपूर यांची चित्रपट तयार करण्याची कला, त्यासाठी केलेला संघर्ष याची गोष्ट वाचायला मिळते. त्याचसोबत लेखकाच्या जडणघडणीत राज कपूर यांचा किती मोलाचा वाटा आहे ही कथाही रंजक आहे. खरं तर राज कपूरसारख्या दिग्गज गुणी प्रतिभासंपन्न कलाकाराचे चित्रपट सृष्टीतील योगदान एका पुस्तकात शब्दबद्ध करता येणे अशक्यच, पण राहुल रवैल यांनी ती किमया साधली आहे.
राज कपूर यांची चित्रपट बनवण्याची खास शैली होती. चित्रपट बनवताना ते पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर न करता आधुनिक तंत्रज्ञान वापरून चित्रपट बनवण्यावर भर देत. अर्थातच ते चित्रपट बनवताना काळाचा पुढचा विचार करून बनवत असत अन् ते त्यांच्या चित्रपटांतून दिसून येई. लेखकाने या पुस्तकाच्या प्रारंभी राज कपूर यांच्याशी त्यांचे असलेले घरगुती संबंध याबद्दल सांगितले आहे. तसेच त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश कसा झाला- तेही वयाच्या अवघ्या १५- १६ व्या वर्षी- अन् राज कपूर यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र उतरण्यासाठी करावी लागलेली मेहनत याबद्दल सांगितले आहे. सोबतच आर.के स्टुडिओची जागा ठरवण्यासाठी राज कपूर यांनी केलेली धडपड, सहकलाकार, तंत्रज्ञ यांना एकसंध बांधून ठेवण्याची त्यांची शैली, कुठे कोण चुकलं तर त्याच्यावर रागवणं, कोणी चांगलं काम केलं तर त्याची स्तुती करणं, त्यांचा हट्टीपणा असे त्यांच्यातील गुण- दोष विशद केले आहेत. त्यांच्या आयुष्यात ब्लॅक लेबल, जॉनी वॉकर यांसारख्या नामांकित मद्य ब्रँडची असलेली आवडही रसभरून वाचायला मिळते. त्यांनी केलेली ‘बॉबी’ या चित्रपटाची निर्मिती, जडणघडण आणि त्या चित्रपटाला आलेलं अभूतपूर्व यश हा अध्याय गुंगवून टाकतो.
शेवटी लेखकाने राज कपूर यांच्या छत्रछायेखाली शिकून झाल्यावर ८० च्या दशकात दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचा थोडक्यात लेखाजोखा आणि या चित्रपटांना राज कपूर यांचे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष कसे सहकार्य लाभले याची माहिती मिळते. तुम्ही राज कपूर यांचे फॅन असाल तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची प्रतिभा, चित्रपट शैली, कलागुणांची इत्यंभूत माहिती मिळेल. लेखक राहुल रवैल यांनी त्यांच्या सोबत केलेल्या दीर्घ सहवासातील प्रत्येक प्रसंगांची शब्दरुपात अप्रतिम मांडणी केली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पैलूंमध्ये राज कपूर यांचा प्रभाव होता, तसेच ते एक कठोर, पण उत्कृष्ट शिक्षक होते हे लेखकाने अनुभवले आहे. नवोदित चित्रपट निर्माते आणि चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक वाचनीय आणि प्रेरणादायी ठरेल असे आहे.
‘राज कपूर दि मास्टर अॅट वर्क’, – राहुल रवैल, शब्दांकन- प्रणिका शर्मा, अनुवाद- मिलिंद चंपानेरकर, रोहन प्रकाशन, पाने- ३२३, किंमत- ५९५ रुपये.