रघुनंदन गोखले
दीडशे वर्षांपूर्वी युरोपचा दौरा करून सगळय़ांना पाणी पाजत बुद्धिबळातील जगज्जेता बनलेल्या पॉल मॉर्फीची ही अधुरी कहाणी. आपल्याला प्रतिस्पर्धी उरला नसल्यामुळे आपण बुद्धिबळातून निवृत्त होत असल्याची घोषणा त्यानं एकाएकी केली; आणि या खेळावरच्या प्रतिष्ठेतून अमाप पैसे मिळवण्याची संधी चालून आली असताना ती लाथाडून यशस्वी वकील बनण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पुढे अध्र्याहून अधिक आयुष्य त्यानं काहीही न करता घालवलं.
एखाद्या खेळाडूनं ऑपेराच्या मध्यंतरात खेळलेल्या एका डावानं दीडशे वर्षे बुद्धिबळ प्रेमींच्या हृदयात कायमचं स्थान मिळवलं, असं कोणा सामान्य माणसाला सांगितलं तर त्याचा विश्वास बसणार नाही. रशियन बुद्धिबळ प्रशिक्षक मिखाइल व्हॅसिलीएव हे तर पार पुढे जाऊन म्हणतात की, जर तुम्हाला मॉर्फी विरुद्ध डय़ूक हा डाव माहिती नसेल तर तुम्ही बुद्धिबळ खेळाडू होण्यास पात्र नाही.कोण होता हा मॉर्फी? सुमारे दीडशे वर्षांपूर्वी त्यानं युरोपचा दौरा करून सगळय़ांना पाणी पाजलं होतं आणि जगज्जेत्याचा ‘अनभिषिक्त’ किताब मिळवला होता. बुद्धिबळावर पैसे मिळवणं म्हणजे जुगारात पैसे मिळण्यासारखं आहे असं त्याचं मत होतं.
बुद्धिबळावर अमाप पैसे मिळवण्याची संधी चालून आली असताना ती लाथाडून यशस्वी वकील बनण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या पॉल मॉर्फीचं अध्र्याहून अधिक आयुष्य वेळ फुकट घालवण्यात गेलं. एका शापित यक्षाप्रमाणे तो आयुष्यभर एकाकी राहिला आणि स्नानगृहात हृदयविकाराचा झटका येऊन त्याचं निधन झालं. त्या वेळी ४७ वर्षांचा मॉर्फी एकाकीच होता.पॉल मॉर्फीचा जन्म अमेरिकेत न्यू ओर्लिन्स या शहरात १८३७ साली एका धनाढय़ कुटुंबात झाला. त्याचे वडील आधी यशस्वी वकील आणि नंतर लुसियाना राज्याच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. वयाच्या चौथ्या वर्षी बुद्धिबळात चमक दाखवणाऱ्या पॉलनं नवव्या वर्षीच न्यू ओर्लिन्सचा सर्वोत्तम खेळाडू होण्याचा मान मिळवला होता.
पॉल मॉर्फी बारा वर्षांचा असताना प्रख्यात हंगेरियन खेळाडू जोहान लोवेनथाल अमेरिकेत आला होता आणि प्रत्येक शहरात जाऊन तेथील आघाडीच्या खेळाडूंना पराभूत करत होता. न्यू ओर्लिन्समध्ये आल्यावर त्याला सांगण्यात आलं की १२ वर्षांचा पॉल तेथील सर्वोत्तम खेळाडू आहे, तेव्हा त्याचा विश्वास बसेना. नाखुशीनं लोवेनथालनं छोटय़ा पॉलशी ३ डावाचा सामना खेळण्याची तयारी दर्शवली. पॉलचे काका एर्नेस्ट मॉर्फी यांनी या सामन्याचं मजेदार वर्णन केलं आहे. लोवेनथालच्या सुरुवातीसच लक्षात आलं की हे पाणी काही वेगळंच आहे. पॉलच्या प्रत्येक खेळीनंतर लोवेनथालच्या भुवया विनोदी पद्धतीनं उंचावल्या जायच्या. हळूहळू त्याची परिस्थिती बिकट होत होती आणि अनुभवी लोवेनथालला घाम फुटला होता. थोडय़ा वेळात त्यानं पराभव मान्य केला. दुसऱ्या डावात कसोशीनं प्रयत्न केले; परंतु आपला पराभव तो टाळू शकला नाही. तिसऱ्या डावात बरोबरी झाली असं मानलं जातं. पण काहींच्या मते, पॉलनं हाही डाव जिंकला होता. माझ्या मते, पाहुण्यांची अगदीच नाचक्की होऊ नये म्हणून पॉलनं आपल्या हंगेरियन पाहुण्यांशी बरोबरी मान्य केली असावी.
या सामन्यानंतर पॉल मॉर्फीनं आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं आणि वयाच्या १८ व्या वर्षी त्यानं गणित आणि तत्त्वज्ञान या विषयांत पदवी मिळवली. कायद्याचा अभ्यास म्हणजे तल्लख बुद्धीच्या पॉलच्या दृष्टीनं डाव्या हातचा मळ होता. १८५७ मध्ये कायद्याची पदवी मिळवताना लुसियानातील परीक्षकांना त्यानं थक्कं केलं. पॉल मॉर्फीनं एका वर्षांत अभ्यास करताना सगळे कायदे तोंडपाठ करून टाकले होते.२० वर्षांच्या पॉलला वकिली करायला सनद २१ वर्षे होईपर्यंत मिळणार नव्हती. त्यामुळे त्यानं एक वर्ष बुद्धिबळासाठी देण्याचं ठरवलं. याच वर्षी संपूर्ण अमेरिकेच्या अजिंक्यपदासाठी पहिल्यांदाच न्यू यॉर्कमध्ये एक मोठी स्पर्धा घेण्याचं ठरलं. सुरुवातीला पॉलनं त्याचं आमंत्रण नाकारलं. परंतु आपले काका एर्नेस्ट यांच्या विनंतीला मान देऊन त्यानं भाग घेण्याचं ठरवलं आणि अमेरिकेच्या (आणि जगाच्या) बुद्धिबळ इतिहासात एका सुवर्णयुगाचा आरंभ झाला.
पॉल मॉर्फीच्या झंझावातापुढे कोणाचाही निभाव लागेना. उपान्त्य सामन्यात त्यानं जर्मन मास्टर लिचटेंहाईन याचा आणि अंतिम सामन्यात लुई पॉल्सन यांचा पराभव केला. असं म्हणतात की, पॉल्सन तर इतके निराश झाले की त्यांनी मधेच एक दिवस विश्रांतीसाठी सामना पुढे ढकलला. परंतु बुद्धिबळप्रेमी पॉल्सन यांना राहवेना आणि त्यांनी न्यू यॉर्कच्या क्लबमध्ये जाऊन एका वेळी अनेक खेळाडूंशी प्रदर्शनीय सामना खेळला. ‘‘हीच माझी विश्रांती,’’ असं ते म्हणाले!अचानक मिळालेल्या यशामुळे पॉलला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. न्यू यॉर्क मधल्या आपल्या ३ महिन्यांच्या वास्तव्यात त्यानं तब्बल २६१ डाव खेळले. आता सगळय़ांचं मत होतं की, खरे चांगले खेळाडू युरोपमध्ये आहेत. आता पॉलनं युरोपमध्ये गेल्यानंतरच त्याच्या खेळाचा खरा कस लागेल. मुख्य म्हणजे त्याला हॉवर्ड स्टॉनटन या युरोपिअन विजेत्यांशी दोन हात करता येतील असा सर्वाचा अंदाज होता.
अखेर पॉल इंग्लंडला पोहोचला १८५८ साली स्वत:चा आत्मविश्वास गमावलेल्या स्टॉनटननं अनेक कारणं सांगून पॉल विरुद्ध सामना खेळणं टाळलं आणि इंग्लिश खाडी ओलांडून पॉल मॉर्फी फ्रान्समध्ये दाखल झाला. राजधानी पॅरिसमधील ‘कॅफे डे ला रिजन्सी’ म्हणजे बुद्धिबळपटूंचा अड्डा होता. तेथला सर्वात चांगला आणि पेशानं बुद्धिबळपटू असणाऱ्या डॅनियल हारविट्झला पराभूत करून पॉलनं आपण युरोप जिंकायला आल्याची नांदी केली. दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी डोळय़ावर पट्टी बांधून पॉल मॉर्फीनं ८ चांगल्या खेळाडूंशी एका वेळी लढत दिली आणि सर्वाचा पराभव केला. वर्तमानपत्रांनी या विक्रमाची जोरदार दखल घेतली. २० डिसेंबर १८५८ रोजी जर्मन मास्टर आणि युरोपचा अनभिषिक्त अव्वल खेळाडू अडोल्फ अँडरसन याच्याशी पॅरिसमध्ये सामना ठरला. ऐन वेळी पॉल मॉर्फीला गॅस्ट्रोची बाधा झाली आणि त्या वेळच्या वैद्यकीय शिरस्त्याप्रमाणे पॉलवर जळवा लावून उपचार करण्यात आला. जळवांनी रक्त शोषून घेतल्यामुळे बिचाऱ्या पॉलला उभं राहण्याचीही ताकद नव्हती, पण त्यानं तशा परिस्थितीतही सामना खेळण्याचं ठरवलं.
११ डावांच्या या सामन्यात अँडरसन फक्त २ डाव जिंकला, तर २ बरोबरीत सोडवले; आणि आपल्या २१ वर्षीय प्रतिस्पध्र्याशी तो ७ डाव हरला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना या महान जर्मन खेळाडूनं आपल्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन देऊन पॉलचं कौतुक केलं. ‘‘मला गेले कित्येक दिवस सराव नव्हता, पण माझ्या तरुण प्रतिस्पध्र्याचा खेळ बघता मी कितीही सराव केला असता तरी फरक पडला नसता.’’ या शब्दात अँडरसननं पॉलचं कौतुक केलं. त्यानं पुढे जाऊन ‘पॉल मॉर्फी हा आतापर्यंतचा जगातील सर्वोत्तम खेळाडू असेल,’ असे गौरवोद्गार काढले. यावरून मला माजी जगज्जेत्ता अलेक्झांडर अलेखाइनच्या एका वक्तव्याची आठवण येते. ‘‘मी अजून पूर्णपणे तंदुरुस्त खेळाडूला हरवलेले नाही,’’ अलेखाइन मिश्कीलपणे म्हणाला होता. हरणारा प्रत्येक खेळाडू ‘आज आपली तब्येत बरी नव्हती’ असे रडगाणे गातो असेच या माजी जगज्जेत्याला सुचवायचं असेल.
पॅरिसमधील पॉलच्या विजयानं त्याची कीर्ती संपूर्ण युरोपात पसरली. एक दिवस अचानक त्याच्या समोर रशियाचा राजपुत्र निकोलाय गलीतझीन उभा राहिला. ‘‘मला मॉर्फीला भेटायचं आहे,’’ त्यानं सांगितलं. पॉल पुढे आला आणि त्यानं स्वत:ची ओळख करून दिली. ‘‘अशक्य !’’ राजपुत्र उद्गारला. ‘‘एवढा पराक्रमी खेळाडू इतका लहान कसा असेल?’’ राजपुत्रानं पॉलचा गौरव केला आणि म्हणाला, ‘‘मी सैबेरियामध्ये माझ्या हॉटेलमध्ये असताना मला एका मासिकात तुझा डाव बघायला मिळाला आणि इतका सुंदर खेळणारा खेळाडू बघायची उत्सुकता असल्यानं मी तडक इथे आलो.’’ यावरून वाचकांना पॉल मॉर्फीच्या लोकप्रियतेची कल्पना आली असेल.
पॅरिसहून आता पॉलची निघायची वेळ झाली होती. अनेक प्रदर्शनीय सामन्यात आपली चमक दाखवूनही यश डोक्यात न गेलेला हा अमेरिकन युवक संपूर्ण युरोपचा लाडका नाही झाला तरच नवल! त्याच्या सन्मानार्थ दिलेल्या एका मेजवानीत ‘जगातील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. त्याच मेजवानीत पॅरिसमधील ठिकठिकाणी अप्रतिम पुतळे उभारणाऱ्या युजीन लुई लॅक्वेन्सनं केलेल्या पॉल मॉर्फीच्या पुतळय़ाच्या डोक्यावर फुलांचा मुकुट घातला गेला. लंडनमधेही पॉलच्या एका वेळी अनेक जणांशी (काही वेळा तर डोळे बांधून) खेळण्याच्या कौशल्यावर सगळे फिदा झाले. आजचा जगज्जेता या किताबानं त्याचा गौरव झाला.
अमेरिकेत परत आल्यावर आपल्या न्यू ओर्लिन्सला जायच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक शहरात पॉलचे सामने आणि सत्कार झाले. न्यू यॉर्कला तर अमेरिकेचे आठवे राष्ट्रपती मार्टिन व्हॅन बुरेन यांनी आपल्या मुलाला पॉलच्या स्वागताला पाठवले होते. पॉलची लोकप्रियता इतकी शिगेला गेली होती की त्याच्यावर जाहिरातीसाठी अनेक कंपन्यांनी आर्जवं केली. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉलच्या एका संघानं आपलं नाव मॉर्फी ठेवलं. असं म्हणतात की, न्यू यॉर्क टाइम्सनं पॉलला सदर लिहिण्यासाठी एका लेखासाठी एक हजार डॉलर देऊ केले होते.
आपल्याला प्रतिस्पर्धी उरला नसल्यामुळे आपण बुद्धिबळातून निवृत्त होत असल्याची घोषणा पॉलनं घरी आल्या आल्या केली आणि चाहत्यांना निराश केलं. त्यानं आपल्या वकिलीला सुरुवात केली, पण १८६१ साली सुरू झालेल्या अमेरिकेच्या गृहयुद्धानं सगळीकडे मंदी आली. त्यात जे अशील त्याच्याकडे यायचे त्यांना त्याच्याशी बुद्धिबळ खेळणं अथवा त्यावर बोलणं यातच जास्त रस असायचा. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या पॉलला पैशाची ददात नव्हती. त्यामुळे त्यानं उर्वरित आयुष्य काहीही न करता घालवलं.दैवानं दिलेली महान बुद्धिमत्तेची देणगी फुकट घालवणारा पॉल मॉर्फी आजही त्याच्या चमकदार डावांमुळे आपल्यात आहे आणि सगळय़ा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे, असं मी मानतो.