गावं आता पूर्वी गोष्टीच्या पुस्तकात सांगत किंवा कवितागाण्यांमधून रंगवली जात तशी सुट्टीतल्या मौजेसाठी रम्य वगैरे उरली नाहीत. ती ना व्यवस्थित शहरं झाली आहेत, ना त्यांचं गावपण शिल्लक आहे. बकालीकरण झालेली वस्ती म्हणजे गाव, असं चित्र आहे. आख्ख्या राज्यभरच नाही, तर देशभर सारी हीच परिस्थिती. या बदलकाळाच्या सांध्यावर बसून उतरवलेल्या नोंदी…

इथून तिथवर चिमूटभर पसरलेलं गाव. दोन बाजूंनी वेशींची खिंडारं. वेशीच्या बाहेर उपेक्षितांच्या दोन बारीकशा वस्त्या- चित्रात असते तशी, उतरत्या पत्र्याचं छत असलेली जिल्हा परिषदेची शाळा. गावाच्या मध्यावर एक इतिहास माहीत नसलेली बुलंद गढी. तिच्या बुरुजावर चढून पाहिलं की सबंध गावाचा ‘एरिअल व्ह्यू’ दिसे. दुपारी ओसरीत खेळणाऱ्या पोरींनी मांडलेला खेळ दिसावा तशी लहानलहान बारकीबारकी घरं. त्यांच्यावरचे पत्रे, माळवदं, जागजागचे आड-हापसे आणि तिथे पाणी शेंदणाऱ्या बाया, गल्ल्यांमधून असलेले प्रचंड चिरंतन जुनाट पिंपळ. मधूनमधून दिसणारी कडुलिंबाची हिरवीगार झाडं. एक देऊळ, एक मशीद. गावाच्या दोन बाजूंनी स्मशानं. गावाला लगटून लहानसा ओढा. तिथं काठावर एक बारीकसं दगडी बांधणीचं महादेवाचं मंदिर. एवढा गावाचा पसारा.

Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

हेही वाचा : चित्रसंस्कार, दृश्यश्रीमंती आणि सांस्कृतिक अवकाश

आणि गावातून बाहेर रानामाळाकडे गेलेल्या नागमोडी पायवाटा. गावालगतून एक अरुंद धुळकट डांबरी सडक. दिवसभरात फारतर दोनपाच वाहनं त्या सडकेवरून इकडून तिकडे जायची. बाकी सगळा सन्नाटा.
‘गाव’ म्हटल्यावर अजूनही हेच चित्र माझ्या डोळ्यांसमोर येतं आणि चित्रपटातल्या दृश्यासारखं संथपणे विरून जातं. काळ फार सरलेला नाहीय. विरती दृश्यं ही अवघ्या पंचवीसेक वर्षांआधीची गोष्ट आहे.
आणि गाव म्हणजे नुसती गावातली घरं, रस्ते, झाडं एवढंच नसतं. गाव माणसांनी वसवलेलं असतं. म्हणून मग गावातली माणसंही दिसायला लागतात.
आरभाट आणि आडदांड माणसं! स्वत: पान-तंबाखूचे तोबरे भरलेले असले तरी गावभरच्या पोरांवर करडी नजर ठेवणारे.
पोरांना गावातल्या ओळखीच्या लोकांचा बेहाय धाक वाटायचा. आणि ‘ओळखीचे लोक’ ही गोष्ट संकुचित नव्हती. गावातला प्रत्येकजणच प्रत्येकाला ओळखणारा. बाहेर एखादी भानगड केलेला पोरगा तासाभराने घरी परत जायच्या आधीच त्याच्या करामतीची गोष्ट साग्रसंगीत त्याच्या घरी पोहचलेली असे. लहान पोरांची तर फारच पंचाईत असे यात. कुणीही बाई किंवा माणूस कुणाही पोराला हाक मारून दुकानातून चहापत्ती आणायला किंवा दळणाचा डबा गिरणीत ठेवायला सांगू शकत. कामं सांगायला पोरगं आपलंच असण्याची काही गरज नसे.
शिवाय शाळेतले ‘गुरुजी’ नावाचे कर्दनकाळ गावातच राहत त्यावेळी. शहरात राहून खेड्यातल्या शाळेत पाट्या टाकायला जाण्याची प्रथा नव्हती. या मास्तरांना, ‘आमचं पोरगं दिसंल तिथं हाणा..’ अशी ‘खुली छूट’ देणारे कैक बाप तेव्हा गावात असत.

हेही वाचा : महागडी पुस्तके आपण मुलांच्या हाती केव्हा देणार?

पोराची काही चूक असो की नसो! दिसला की हाणा! पोरं गुरुजींना टरकत नसती, तरच नवल होतं. काही काही शिक्षकांना पोरांचे खुद्द बापसुद्धा टरकून असत.
आता शाळांचं बाजारीकरण आणि शिक्षकांचं कंत्राटीकरण झालेल्या काळात कुणालाच काही किंमत उरलेली असल्याचं दिसत नाही.
आता नावापुरता उरलेला ओढा तेव्हा जिवंत सळसळता होता. वर्षातले निदान सहा-आठ महिने वाहता. पहाटे काही देवभोळे लोक तिथल्या एखाद्या डोहात डुबकी मारून ओल्या अंगाने थडथडत गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या देवळात जात. चुकार पोरे ओढ्यावर येत. कंबरभर पाण्यात बुचकुळ्या मारून पोहण्याचं सुख लुटत. वावरात निघालेला बैलबारदाणाही ओढ्यातून ढबाक ढबाक चालत पार व्हायचा. दुपारी धुण्याच्या गाठोड्यासोबत मनातल्याही गाठी एकमेकींशी उकलत तिथं खडकावर बसलेल्या कुणीकुणी बाया.
ओढा काठावरच्या वावरांनाही पाणी देई बऱ्याचदा. गाईम्हशी-बैलाशेरडांची तहान भागवी, ओढ्यात मासे-खेकडे असत. काठावर झाडझाडोरा. त्यात ससे, होले, लाव्हरं असत. ओढा आणि ओढ्याचा काठ ही एकदम डोळ्यात भरत नसली तरी जिवंत वस्ती असे.
मागच्या पंधरावीस वर्षांत सगळ्यात वाईट काय झालं असेल, तर गावशिवारातलं पाणी ओढ्यासकट मरून गेलं. आधी शिवारभर विहिरी असत. त्यातल्या बऱ्याचशा ओढ्याच्या काठाकाठांवर. नगदी पिकांचा सोस जरासा कमी होता. पाण्याची फार उधळमाधळ होत नसे. ज्वारी, बाजरी, तुरी, भुईमुग आणि माळवंटाळवं एवढ्यात कुणबीक संपे. कुणी ऊस लावतं, पण ते काही फारसं मोठं नसे.

ओढा, विहिरीतल्या पाण्यावर गाव तरून जाई.
पावसाळ्यानंतर पोरांच्या पोहण्यातल्या मुटक्यांनी विहिरी चौफेर लाटांनी उधाणून येत. कधी एखादी सासुरवाशीण जगण्यातला उन्हाळा असह्य होऊन एखाद्या विहिरीच्या कुशीत जगण्याचं दान देऊन टाकी. खुद्द विहिरी तेव्हा हळव्या होऊन रडल्यासारख्या दिसत. सबंध गावाच्या जगण्यापासून कुणा एकीच्या मरण्यापर्यंत विहिरींना गावात जागा होती.
प्यायच्या पाण्यासाठी चारसहा आड आणि तेवढेच हापसे. काही घरांतही आड असत. सगळ्या आडांवर सकाळ-संध्याकाळ बायाबापड्यांची जाम वर्दळ असे. हापशांचे दांडे खणखणत मधूनमधून. आडा-हापशांच्या वाटांवर घागरीतून डचमळून सांडलेल्या पाण्याने भर उन्हात वळिवाचा गंध उमलत राही.
आता यातलं बरंचसं शिल्लक राहिलेलं नाही. गावाशिवारातली सबंध ओल सरून गेली आहे.
एकाएकी खरं तर काहीच सरत नसतं. ओढा-विहिरी, आड आणि हापशे क्रमश: कोरडे होत गेले हे माझ्या पिढीच्या डोळ्यांसमोर घडलेलं अवस्थांतर आहे.
प्रचंड विपरीत पद्धतीने बदलेलं ऋतुमान हे एक आणि पाण्याला क्रूरपणे वापरलं हे दुसरं कारण. नगदी पिकांच्या लागवडी करणं गैर नाहीच, पण बदल्यात आपण केवढं पाणी जिरवतोय याचं भान आपण राखलं नाही. दिवसरात्र मोटारी लावून जमिनीच्या पोटातून प्राणतत्त्व उपसलं. विहिरी आटल्या तशा शिवारभर बोअरिंग मशीन चालवल्या आणि भुईच्या छाताडाची चाळणी करून टाकली. सहाशे-आठशे फुटांपर्यंत पहारी खुपसून पाणी बाहेर काढायला लागल्यावर शिवारात ओल राहील कशी?
गावातले आड आता इतिहासजमा झाले आहेत आणि पराभूत हापशे मोडून गेलेले. नळयोजनेच्या नावाखाली गावोगावच्या पुढाऱ्यांनी आपली घरं भरून घेतली त्यावरही आता वर्षे उलटून गेली. नळांतून पाण्याच्या ऐवजी केवळ अशक्त हवेचे सुस्कारे ऐकू येतात. धरणीचं काळीज भेदणाऱ्या अजस्रा पोलादी पहारी शिवारातून गावात आल्या, गावातून घराघरांत आल्या. भुईला आपण भोकांवर भोकं पाडत गेलो. नुसतं आपलं भागलं एवढ्यावर सुख नाही, आपलं भागून उरलेलं पाणी आपण विकतो चक्क शेजाऱ्यांना. किंवा आता शहरी वळणावर गेलेले लोक त्यावर गाड्या धुतात भरमसाट. पंचवीस वर्षांआधी सायकलीला महाग असलेल्या गावात आता शेकडो फटफट्या आणि शे-पन्नास चारचाकी गाड्या असतील. एरवी दिवसभर पायीपायी हिंडणारी ठणठणीत माणसं या गाड्यांमुळे बसल्याजागी अंगावर चरबी साठवायला लागली आणि कधी बघायला न मिळणारे ‘बीपी-शुगर’सारखे शहरी रोग गावठाणात वस्तीला आले.

हेही वाचा : नवा दृश्यसंसार… ग्राफिक नॉव्हेलच्या जगात…

रस्त्यावरून आल्यागेल्या कुणालाही पाणी द्यावं, पुण्य मिळतं अशी संस्कृती सांगणारे आपण पाण्याचा वीस रुपयांत सौदा करण्याइतके बेईमान झालो. भुईत ओल टिकवून ठेवणाऱ्या झाडांचा विध्वंस करत राहिलो वर्षानुवर्षे आणि आता गावं इतकी आटून गेली की आपल्याशी सोयरसुतकाचा कसलाही संबंध नसलेले सिनेमातले लोक येऊन आपल्या गावात पाण्याची पेरणी करण्यासाठी तळतळून बोलू लागले. आपल्याच शिवारात पाणी खेळावं म्हणून आपल्याला बक्षिसांचं आमिष द्यावं लागावं? आपलं गाव, शिवार, शेत ही आपली मायपांढर असते असं म्हणत पिढ्या गेलेल्या आपल्याला, कुणी सिनेमातल्या नटाने स्पर्धा घेतल्या तरच जाग यावी, हे चित्र अमानुष आहे. आणि मधल्या काळात गावांवर बाजाराचं घनघोर आक्रमण झालं. पूर्वी आठवड्यातून एक दिवस बाजाराचा असे. आता सगळं गावच बाजारात रूपांतरित झालं. जागतिकीकरण नावाच्या अजस्रा यंत्राने गावांचं ‘अर्धवट गाव आणि अर्धवट शहर’ असं काहीतरी विचित्र कडबोळं तयार केलं.
तंत्रवैज्ञानिक काळ आहे, असं म्हणतात, त्याचं प्रत्यंतर फक्त लोकांच्या बुडाखालच्या गाड्या आणि हातातले स्मार्टफोन एवढ्याच गोष्टींमधून येतं. पाचव्या-सातव्या वेतन आयोगामुळे बाजारात वर्दळ वाढून लोकांकडे रोख पैसा यायला लागला, तो कशात खर्चायचा? तर कार-लोन वगैरे घेऊन बँका दारातच उभ्या असतात नोकरीपेशा लोकांच्या. शिवाय स्मार्ट फोनचं अतोनात लोकशाहीकरण झालेलं असल्यामुळे त्यांच्या स्वस्त आवृत्त्या तीन-पाच हजारांतही मिळूच शकतात. आणि रोज दोन जीबी डेटा जवळजवळ फुकटात मिळतो. या डेटाक्रांतीमुळे जगण्यातल्या मूलभूत प्रश्नांनी सतावणं बंद झालं आहे. किंबहुना ते लक्षातच येत नाहीत कुणाच्या. फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि आता ओटीटी नावाची तळहाताएवढी थिएटरं, हेच सगळं युनिव्हर्स झालेलं. भोवतालाशी नाळ तुटलेल्या आभासी युनिव्हर्समध्ये राहायला लागलेले विशेषत: तरुण लोक, हा एक गंभीरपणे चिंता करावी असा विषय झालेला आहे.
कुटुंबाच्या शाखा विस्तारत गेल्यामुळे रानाचे तुकडे होत गेले. आणि मूळचे दणकट शेतकरी क्रमाक्रमाने ‘अल्पभूधारक’ होत गेले. गावात पिढीजात घरांत राहायला जागा पुरेशी न उरल्यामुळे गावालगतच्या शेतांमधून प्लॉटिंगच्या धंद्याला बरकत आली. ‘रोड-टच’ जमिनी सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीसारख्या ठरल्या. त्यातून गावागावात नव-श्रीमंतीची सूज अवतरली.

हेही वाचा : पडसाद: भारताने लोकशाहीच्या मार्गाने जाणेच श्रेयस्कर

शरद जोशींच्या काळातली ‘भारत आणि इंडिया’ ही आर्थिक विषमतेची फरक-रेषा आता अधिकच ठसठशीत झाली आहे. पैशांतून पैसा निर्माण करत अधिक श्रीमंत होत चाललेला एक लहानसा समूह आणि पीकविम्याच्या पैशांची, ‘शेतकरी सन्मान’ या भरघोस नावाखाली दर चार महिन्यांनी खालचीवरची सरकारे देतात त्या दोन दोन हजारांची वाट पाहत काळ कंठणारी बहुसंख्य माणसं. असं एकंदरीत चित्र आहे.
स्मरणरंजनात रमावं एवढं अर्थातच माझं वय नाहीय. तरीही पिढ्यान् पिढ्या चालत आलेला सवयीचा भोवताल अवघ्या पंचवीसभर वर्षांत किती नि कसा बदलून गेला हे आठवलं की आपण अकाली म्हातारे झालोय की काय अशी शंका येत राहते. शतकानुशतके एका स्थिर अवस्थेत असलेलं जग मागच्या शे-चारशे वर्षांत वेगाने बदलत गेलं आणि अलीकडच्या पंचवीस-पन्नास वर्षांत तर हा वेग अतितीव्र झाला आहे. कालचा माणूस, कालचं गाव, धर्म, जाती, पाणवठे, हंगाम, बाजार, गाणं, विसावे, कालची झाडे आणि कालचे ऋतूही आज उरलेले दिसत नाहीत. त्यातल्या प्रत्येकाची ‘वीण’ संकरीत झाली आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ ही ओळ आता फक्त कल्पनाविलासाचा अद्भुतरम्य नमुना झाली आहे.
बदलांना नकार देण्याचा अर्थातच मुद्दा नाहीय. या बदलांनी माणूस आणि त्याचा भोवताल किती नि कसा बदलत गेला, या वावटळी-वादळात नेमके काय उभे राहिले, कशाची वाताहत झाली हे तपासून पाहण्याचा प्रयत्न केला की एकीकडे ज्ञान-विज्ञानाची झालेली अफाट प्रगती पाहून अचंबित व्हायला होतं आणि समांतरपणेच या प्रगतीने माणसांमध्ये किंवा गावांमध्ये काय काय उन्नत किंवा अवनत झालं याचा हिशोब करताना हाती येणाऱ्या विफलतेनं अस्वस्थ व्हायला होतं.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माझ्या आयुष्यातील रजतयोग!

जातींच्या तलवारी अस्मितांच्या धारदार पात्यांनी अधिक हिंस्रा झाल्या आहेत. चावडी आधीच संपली होती, मागच्या दहा-वीस वर्षांत पारही उठून गेले. फेसबुकच्या-व्हॉट्सअॅपच्या पारावर बसून जगाच्या दुसऱ्या टोकावरच्या माणसाशी गप्पा मारतानाच शेजारच्याशी संपलेल्या संवादाचं दु:ख उरलेलं नाही. निर्विष सप्त्या-पारायणांनी गाव जागा राहण्याचे दिवस संपून बाजारू कीर्तनकारांचे करमणुकीचे कार्यक्रम चालू झाले. हुरडा खाण्यातलं प्रेम संपून रस्त्याकडेला हुरड्यापार्ट्यांची दुकाने लागली. गावात वीज आली आणि लोडशेडिंगच्या नावाखाली निघूनही गेली, त्यावर आता दोन दशकांचा काळ उलटून गेला. गावाचा अवकाश अजूनही बहुतेक वेळा अंधारानेच व्यापलेला असतो. एखादं दारूचं दुकान असायचं तिथं किमान चारसहा परमिट रूम्स आणि तेवढेच गावठी ढाबे रात्रीचा दिवस घडवू लागले. वेतन आयोगांनी या ढाब्या-परमिट रूम्ससाठी घाऊक क्रयशक्ती असलेला ग्राहक उपलब्ध करून दिला. कधी न ऐकलेल्या, पाहिलेल्या जागतिकीकरणाच्या दालनात देशाचा प्रवेश झाला आणि प्रचंड आक्रमकपणे बाजारयंत्रणा घरात घुसल्या. टीव्ही चॅनेल्समधून प्रचंड हिंसा आणि बीभत्स लैंगिक आविष्कार घराघरांत घुसले. ऐन भूपाळीच्या वेळी आता ‘मुन्नी बदनाम हुई’ लागू शकतं टीव्हीवर. मोबाइल्सच्या आणि इंटरनेटच्या निमित्ताने जग मुठीत आल्याची भावना निर्माण झाली. भामट्या उद्याोगपतींना आणि यच्चयावत भ्रष्टाचारी राजकारण्यांना हजारो कोटींसाठी मुक्तद्वार देणाऱ्या बँका पेरणीसाठी लागणाऱ्या दहापाच हजारांसाठीही शेतकऱ्यांना जवळ येऊ देत नाहीत. दोन खोल्यांची आनंदी शाळा होती तिथे खाजगी संस्थांची पेवे फुटली आणि पदवीचं शिक्षण घेणाऱ्या पोरांना अगदी लिहिता-वाचताही येत नाही, हे विदारक चित्र निर्माण झालं. राजकारणाने गावात दुफळ्या माजवल्याचा काळही उलटून गेला, आता घरातल्या घरात चारचार पार्ट्या असतात. गुराख्याच्या काखेतला रेडिओ गेला आणि त्याच्या खिशातल्या स्मार्टफोनमधून ‘चिकनी चमेली’ जवानीचे जलवे शिवारभर दाखवू लागली. बहुसंख्य गावांमध्ये वाचनालये चुकूनही दिसत नाहीत.
बदल ही अपरिहार्यच गोष्ट असते, त्यामुळे झालं ते चांगलं की वाईट हे याक्षणी नीटसं ठरवता येत नाहीय, पण ‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ हे चित्र चांगलं वाटत नाही, एवढं नक्की.
majhegaane@gmail.com

Story img Loader