गेली साठहून अधिक वर्षे मराठी रंगभूमी जवळून न्याहाळणाऱ्या, काही काळ निरनिराळ्या नात्यांनी स्वत:ही तिचा अविभाज्य भाग असलेल्या एका सजग रंगकर्मीला आलेले चित्रविचित्र अनुभव, त्याने पाहिलेले तालेवार कलावंत, तसंच जाणते-अजाणतेपणी रंगभूमीला काहीएक वळण देणाऱ्या घटना-प्रसंगांची त्यांच्या मन:पटलावरून दिडदा दिडदा करत जाणारी भूतकालीन आगीनगाडी..
तशी ती उभी-आडवी. थोराडच. लांब-रूंद. आजच्या टॉवर्सच्या जमान्यात तिला उंच म्हणता येणं कठीणच. पण ठेंगणी-ठुसकीही नाही. मुख्य रस्त्याला आडवी होऊन गल्लीत वळणारी.. तिठय़ावरचीच म्हणा ना- चाळ! तीन मजल्यांची. अध्र्या शतकाची. तळमजला धरून चार धरायला हरकत नाही. प्रत्येक मजली तेरा बिऱ्हाडं. आठ डबलरूमी. पाच सिंगल रूमी. प्रत्येक डबलरूमीत किमान दहा ऐवज. सिंगलमध्ये किमान पाच. एकूण मजली शंभर-सव्वाशे माणसं. तीन अधिक तळमजला धरून पाचशे असामींना मरण नाही. खरं तर मुद्दा लोकसंख्येचा नाहीच आहे! (आपल्या देशाला तरी तो कुठं आहे?) मुद्दा आहे तो या पाचशेंवर छत्र धरणाऱ्या गच्चीचा. जशी चाळ तशी तिची गच्ची. ऐसपैस, आलिशान. आडवी पसरलेली. आणि हा- आता येतो तो कळीचा मुद्दा! या गच्चीवर गेली कित्येक वर्षे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या दोन-दिवसीय नाटय़महोत्सवाचा! दिवाळीनंतर लगोलग येणाऱ्या शनिवार-रविवारच्या चाळीय रंगमहोत्सवाचा! आदल्या दिवशी आपापल्या मुलांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांचे बाप नाटक. प्रौढ नाटकाइतकंच बालनाटय़ालाही महत्त्व. बालनाटय़ाचं महत्त्व अध्र्या शतकापूर्वीच या चाळीला पटलं होतं. नव्हे, तिनं ते प्रत्यक्षात आणलं होतं. तर ते असो! नाटक महत्त्वाचं!
आमच्या चाळीत कुणी वेडय़ासारखं वागायला लागलं की म्हणायचे, ‘याला ‘नाटक’ झालंय.’ मराठी माणसाला नाटकाचं वेड असतं, हेही प्रथम आमच्याच चाळीनं सिद्ध केलं.
दिवाळीचं नाटक म्हणजे सगळेच वेडेपिसे व्हायचे. येथे नाटक म्हणजे अस्सल संपूर्ण तीन अंकी नाटक. एकांकिका, दीर्घाक, दोन अंकी ‘सब झूट है’, तीन अंकी ठणठणीत नाटक! नाटककारही लुंगेसुंगे नाही चालायचे. वि. वा. शिरवाडकर, तारा वनारसे, वसंत कानेटकर, मामा वरेरकर, आचार्य अत्रे, बाळ कोल्हटकर.. ‘दूरचे दिवे’, ‘करीन ती पूर्व’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘कवडीचुंबक’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?’.. एकाहून एक सरस, सही नाटकं. प्रायोगिक- व्यावसायिक हा भेद चाळकरी रंगकर्मीनी कधीच मानला नाही. नाटकाचा प्रकार कोणताही असो. त्या नाटकाचं छापील पुस्तक मात्र हवं. ज्या नाटकाचं छापील पुस्तक नाही ते नाटकच नव्हे, ही ठाम ‘चाळ’जाण!
चाळीतले महान दिग्दर्शक मा. जयवंत (‘मा.’ म्हणजे माननीय की मास्टर? कुणास ठाऊक!) यांनी एकदाचं नाटकाचं नाव घोषित केलं, की तेच अंतिम सत्य. चर्चा नाही, वादविवाद नाही. नाटकाची धाव चाळीतून आयडियल बुक डेपोकडे! कसं कुणास ठाऊक; पण त्यांना चाळीच्या अगोदरच नाटकाचं नाव ज्ञात असायचं. चाळकरी पोचायच्या आत काऊंटरवर तीन पुस्तकांचा गठ्ठा आणि नाटकातल्या पात्रांइतका वह्य़ांचा गठ्ठा बांधून तयार असायचा. त्या वर्षांची ही नेरूरकरांची चाळीला पहिली भेटवस्तू. (उगाच नाही त्यांचं दुकान इतकी र्वष पुस्तकं धरून आहे!) गच्चीवर शंभरचा ग्लोब पेटला की भाडेकरू समजायचे- नाटकाची पुस्तकं आली आहेत. ग्लोबच्या शंभर नंबरी प्रकाशात रंगकार्य सुरू व्हायचं. कठडय़ाला टेकून अंथरलेल्या दोन चटयांवर व एका सतरंजीवर बैठका बसायच्या. दोन पुस्तकं दोघांच्या समोर. त्यांच्या हातातल्या लांबडय़ा पेन्सिलने एकजण पान नंबर एकवर रेघोटी ओढायचा, तर दुसरा पान नंबर दोनवर. दोन्ही पुस्तकं एका एका बाजूंनी रेघेळून जायची. मग ते दोघे हातात कात्री घ्यायचे. प्रत्येक पात्राचं नाव लिहून वह्य़ा अगोदरच मांडून ठेवलेल्या असत. पात्राचा संवाद कापून त्याच्या त्याच्या वहीवर चिकटवला जायचा. नाटक कापण्याचे प्राथमिक शिक्षण अशा तऱ्हेनं आमच्या चाळीतच प्रथम घेतले गेले. त्यातूनच पुढे संकलक-दिग्दर्शक निर्माण झाले. नाटकाला कात्री लावण्याचं हे शिक्षण आजच्या नाटय़-विद्यापीठांत दिलं जात नसल्यामुळे नाटक कुठं कापावं व कसं कापावं याबाबतीत विद्यार्थी कायम अज्ञानी राहतात आणि रंगभूमीची हानी होते. त्या काळात प्रत्येक नटाला नाटकाचं पुस्तक विकत घेऊन देण्याचं वा त्यानं स्वत: विकत घेण्याची चैन परवडण्यासारखी नव्हती. चंगळवादाची चाल चाळीत चालण्याजोगी नव्हती. नाटकाच्या पुस्तकाची शिल्लक तिसरी प्रत प्रॉिम्प्टगसाठी आणि दिग्दर्शकासाठी. दिग्दर्शकाच्या घरी आजही चाळीच्या गच्चीवर झालेल्या नाटकांची पुस्तकं नवीकोरी वाटावीत अशी ठेवलेली आढळतात. दिग्दर्शकानं नाटकाच्या पुस्तकावर कसल्याही खुणा करणं म्हणजे नाटय़वस्तूवर अत्याचार करण्यासारखं आहे अशी त्यांची धारणा होती. त्याचमुळे नाटकाचं पुस्तक ते बहुधा वाचतही नसावेत. तालमीला गच्चीवर निघताना आणि तालमीहून आल्यावर ते पुस्तक डोक्याला तीन वेळा लावून ते तोंडानं काहीतरी पुटपुटायचे. पूर्वी ती त्यांची चुंबनक्रिया वाटायची. पण तो त्यांचा नाटय़धर्म असायचा.
गच्चीवर मग रात्रौ नऊ वाजल्यापासून तालमी सुरू व्हायच्या. ज्या ग्लोबच्या प्रकाशात नाटक फाडलं जाई, त्याच प्रकाशात ते उभं करायचं शिक्षण दिलं जायचं. शल्यक्रियेनंतरची फिजिओथेरपी सुरू व्हायची. नाटक कुठलंही असलं तरी तीन भूमिका कायम असत. वृद्धाची, सासऱ्याची, बापाची भूमिका म्हणजे दुसऱ्या मजल्यावरचा श्रीरामच. आपल्याला ‘श्रीराम’ अशीच हाक मारावी असा त्याचा आग्रह असायचा. ‘तुझ्या खांद्यावर धनुष्य नाही, तर मग तुला श्रीराम का म्हणायचे?,’ या प्रश्नाला त्याचे उत्तर असायचे- ‘मग राम साकारताना माझ्या अंगावर काय तुम्हाला वल्कले दिसतात?’ धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्याच्याशी कुणी वाद घालत नसत. पण ‘आपल्याला रथयात्रेचं खास निमंत्रण होतं,’ असं तो अजूनही सांगतो. हा श्रीराम वर्षभर गच्चीवर होणाऱ्या नाटकाच्या टेन्शनमध्येच वावरायचा. नाटकाचं नाव कळताच ताबडतोब त्याची पाठांतराला सुरुवात व्हायची. सगळ्यात अगोदर सगळं भाषण पाठ असणारा तोच एक श्रीराम! पण इतकी मेहनत घेऊनही प्रत्यक्ष प्रयोगात मात्र तो भाषण विसरायचा तरी, किंवा वाक्यं उलटीसुलटी तरी करायचा. हे राम!
नाटकातल्या नायकाची भूमिका अर्थातच दिग्दर्शक मा. जयवंत यांचीच. ते कुठल्यातरी ख्यातनाम नटसम्राटांचे शिष्य होते. गेली बरीच र्वष ते तरुणच भूमिका करायचे. ते कधीच म्हातारे होत नसत. सदैव हिरवेगार! म्हणूनच वाटतं, त्यांचं नाव ‘मास्टर जयवंत’ असावं! त्याचप्रमाणे जणू मूळ नाटककारानंच लिहून ठेवल्यासारखी विनोदी भूमिका कायम कमलाकरचीच! तो स्वत:ला शंकर घाणेकर समजायचा. त्यानं शंकर घाणेकरांच्या एका नाटकात काम केलं होतं म्हणे! चाळीतला हा ‘कमलाकर शंकर’ अधूनमधूनच तालमीला उगवायचा. पाठांतराच्या नावाने बोंब! विचारलं तर- ‘हूँ.. त्यात काय?’ असं फुशारायचा. प्रयोगाच्या आदल्या दिवशी गच्चीवर शतपावली घालीत तो आपले संवाद पाठ करायचा. मात्र, प्रत्यक्ष प्रयोगात तो नाटकात नसलेलंच अधिक बोलायचा. पदरची वाक्यं घातल्याशिवाय उत्तम विनोदी नट होता येत नाही, असं त्याला कुणीतरी सांगितलं होतं.
नाटकात काम करण्यासाठी मुली मिळण्याच्या बाबतीत चाळीत आनंदच होता. त्यात आणखीन चाळीतल्याच मुलीला नाटकात काम मिळणार, असा दंडक असल्याने बाहेरून चाळीत येणाऱ्या मुलींचा काही उपयोग नव्हता. एका वर्षी तर कुठचीच मुलगी नाटकात काम करायला तयार होईना, अशी कठीण परिस्थिती ओढवली. पण चाळीतले नाटकवाले असल्या क्षुल्लक संकटाने घाबरणारे नव्हते. अखेरीस मराठी रंगभूमीची परंपरा त्यांच्या हाती होती ना! दोघे तयार झाले. आणि त्यावर्षीच्या नाटकात प्रेक्षकांनी स्त्रीपार्टी नटांचे दर्शन घेतले. चाळीने रंगभूमीचा इतिहास वर्तमानात आणला. अशा स्त्रीपार्टी भूमिका पुन्हा होणार नाहीत, असंच सर्वाचं मत पडलं. त्या स्त्रीपार्टी पाहून चाळीतल्या मुलींनी एवढा धसका घेतला, की नंतरच्या वर्षांपासून त्या स्वत:हून नाटकात काम करायला तयार झाल्या. मराठी रंगभूमीने पाहिलेले ते अखेरचे स्त्रीपार्टी असावेत. काटय़ाने काटा काढला म्हणतात तो हा असा!
आमच्या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर रामू मुदलियार नावाचा मद्रदेशीय तरुण त्याच्या आई-वडलांबरोबर राहायचा. बरीच र्वष. घरातल्या फक्त त्यानेच लुंगी सोडली होती. तसाच फिरायचा- पॅन्टी घालून. मराठी अस्खलित बोलायचा.. ‘आई, थोर तुझे उपकार’ व ‘खबरदार, जर टाच मारूनी’ या कविता जोरात म्हणायचा. फक्त ‘खबरदार’च्याच ओळीला ‘चिंधडय़ा’ जोडायचा आणि ‘साल्या’ शिवी घातल्यासारखा ‘चिंधडय़ा’ उच्चारायचा. त्याची चूक दुरुस्त केली तर म्हणायचा, ‘तसं केल्याशिवाय कवितेत जोर येत नाही.’ सहिष्णुता या उपजत चाळस्वभावामुळे त्याचं मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या दक्षिणींविरोधातील आंदोलनाच्या वेळी हा ‘राम मुंदलगी’ या नावाने वावरायचा. चाळीतल्या नाटकाच्या पडद्याची दोरी कायम वर्षांनुवषेर्ं त्याच्याच हातात असायची. नाटकात कधीतरी दोन ओळीचं तरी काम मिळावं या आशेनं तो ती दोरी धरून असायचा. रंगभूमीवरचं प्रेम.. कुणाचं कसं, कुणास कसं!
गच्चीवर नाटकाच्या तालमी रात्री सुरू झाल्या की तालमीच्या जागेच्या खालच्या बिऱ्हाडांतली बाळं झोपेतून अंग काढायची, ओरडत जागी व्हायची. (कुणी मुलगा मधेच केव्हातरी ओरडला तर आई-बाबा त्याला विचारायचे, ‘तुला झोपेत तालीम दिसली काय?’) लहान बाळांना त्रास होऊ नये म्हणून आया आपल्या बाळांना तालमीपासून लांब असलेल्या बिऱ्हाडात झोपवायच्या आणि मग आपल्या घरात येऊन शांत एकांत करायच्या. नाटकवाल्यांकडे काही बायका सारख्या चौकशा करीत असत- तालमी केव्हा सुरू होणार, याची. नाटक करणाऱ्यांना त्यामुळे भरून यायचं. ते मनात म्हणायचे, ‘किती हे चाळकऱ्यांचं नाटकावरचं प्रेम!’ चाळकरी नाटकाशी असे प्रेमरज्जूंनी बांधले गेले होते. किती र्वष चाळीत नाटक होतंय. पण नाटकाच्या वेळी चाळीत बाळं नाहीत असं कधी झालं नाही.
अभिनव नाटय़शास्त्राप्रमाणे कुठच्याही नाटकाचे मुख्यत: दोन विभाग धरले जातात. पहिला विभाग हा संहितेचा असतो, तर दुसरा प्रयोगाचा!
सत्यघटनेवर आधारित या चाळनाटय़ाच्या प्रत्यक्ष प्रयोगाविषयी बरेच काही.. पुढील लेखी.