प्रशांत दामले
गेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ हे बिरुद प्रशांत दामले यांच्या नावापुढे सार्थपणे लावलं जातं. नाटक कोणतंही असो, ते प्रशांतच्या नावावर चालणारच, ही खात्री निर्मात्याला असतेच असते. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले. येत्या ६ नोव्हेंबरला मुंबईत षण्मुखानंद सभागृहातील प्रयोगात ते १२,५०० व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठणार आहेत. एका कलाकाराने इतके प्रयोग करण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असावं. या सुंदर प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दांत..
‘नमस्कार! मी प्रशांत दामले.. सविनय सादर करीत आहे..’ या उद्घोषणेसह तुम्ही माझं नाव ऐकलं असेल. मोरू, माधव, मन्या, केशव, डॉ. पुंडलिक, बहरूपी, राजा, फाल्गुनराव अशा कितीतरी भूमिकांमध्ये तुम्ही मला पाहिलं असेल. तुम्हाला ‘निखळ आनंदाचे तीन तास’ देणारा कलाकार म्हणून कदाचित तुम्ही मला ओळखत असाल. त्यामुळे हा माणूस आज लेखणी घेऊन का बसलाय, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल! अहो, मी असं काय लिहिणार? मी गोष्टी सांगणारा कलाकार आहे. तेव्हा लिहितोय यापेक्षा गप्पाच मारतोय असं म्हणू या! मुळात सिंहावलोकन किंवा नव्या पिढीला उपदेशाचे चमचा चमचा डोस वगैरे पाजायचे मी ठरवलेच, तरी कुणाला ते खरं वाटणार नाही. कारण विदूषकाचा मुखवटा इतका एकजीव झाला आहे माझ्यात!
तर निमित्त आहे- येत्या काही दिवसांतल्या माझ्या १२,५०० व्या प्रयोगाचं! लोक मला विचारतात, ‘या टप्प्यावर मागे वळून बघताना कसं वाटतंय..?’ वगैरे वगैरे. पण खरं सांगतो, हे एवढे प्रयोग कधी, कसे झाले, मला कळलंच नाही. मला नाटक करायचं आहे, लोकांना नाटक दाखवायचं आहे एवढंच मला कळत होतं.तसा ‘नाटकवाला’ होण्याला घरून विरोधच होता. तेव्हा संगीत नाटकांचा भर ओसरत चालला होता. त्यामुळे ‘आता नाटकाचं कसं होणार?’ ही चर्चाही सुरू झाली होती. पण तुम्हाला म्हणून सांगतो- ही चर्चा सतत होतच असते. परंतु नाटक आजवर काही थांबलेलं नाही. काळानुसार फक्त ते बदलत गेलं. आणि हे जो जाणून असतो, तो खरा नाटकवाला!
तर मुद्दा असा की, नाटक हा छंद आणि पैशांसाठी नोकरी हे गणित माझ्याच काय, घरच्यांच्याही डोक्यात पक्कं होतं. पुरुषोत्तम बेर्डेनी ‘टूरटूर’मध्ये मला घेतलं आणि नोकरी चालू असतानाच मी खऱ्या अर्थाने नाटय़-व्यवसायात ओढला गेलो. तोपर्यंत सतीश पुळेकरच्या नाटकाच्या ग्रूपमध्ये मी छान रमलो होतो. ‘टूरटूर’मध्ये हा ग्रूप होताच; शिवाय लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशींसारखे थोर वेडे लोकही होते. त्यांच्याकडून खूप खूप शिकत गेलो. त्या जोरावर सुधीर भट आणि ‘सुयोग’नं मला संधी दिली. ‘मोरूची मावशी’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’ अशी नाटकं मिळत गेली. एक गंमतीची गोष्ट म्हणजे ‘ब्रह्मचारी’ हे गाजलेलं नाटक करायच्या वर्षभर आधी माझं आणि गौरीचं लग्न झालं होतं! त्यावेळी सगळी नाटकं इतकी धडाक्यात चालू होती की हनिमूनला सुट्टी वगैरे चैन मला शक्यच नव्हती! नाटकाच्या कोल्हापूर दौऱ्यालाच मी गौरीला घेऊन गेलो आणि मिळेल तेवढा वेळ आम्ही एकत्र घालवला!
नाटकात जसा ऑन स्टेज – बॅक स्टेजचा ताळमेळ जुळावा लागतो, तशी संसारातही कामांची घडी बसावी लागते. आपलं एका ‘नाटकवाल्या’शी लग्न झालंय हे समजून गौरीने माझ्या नट म्हणून आयुष्याचं बॅक स्टेज उत्तमरीत्या निभावलं. तिच्या आधारानेच १९९२ साली मी पूर्णवेळ नाटक करण्याचा धाडसी निर्णय घेतला! नाटकावर प्रेम असलं तरी हा काही भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नव्हता. नाटय़व्यवसाय नीट केला तर नाटकावरही आपण जगू शकतो, ही शक्यता मला दिसत होती. तोपर्यंत मी सात-आठ नाटकं केली होती. प्रेक्षकांचं प्रेम मिळत होतं.
एक छोटा प्रसंग आठवतो.. ‘सुंदर मी होणार’ या नाटकात मी एक लहानसा रोल करायचो. डॉ. श्रीराम लागू, वंदना गुप्ते यांच्यासह काम करणं ही मोठीच पर्वणी होती. काही प्रयोग झाल्यावर डॉ. लागू सुधीर भटांना म्हणाले, ‘प्रशांत टाळ्या घेतो आहे.. दाद मिळवतो आहे. चांगलं करतोय काम. आता जाहिरातीत ‘आणि प्रशांत दामले’ लिहा!’ त्याकाळी त्यांनी इतरांच्या कामाची दखल घेणं, आवर्जून लक्ष देणं ही खूप मोठी गोष्ट होती. हा त्यांचा मोठेपणा मला खूप शिकवून गेला. ही अशी उदाहरणं पुढे असल्यानेच पूर्ण पाटी कोरी असूनही मी फक्त नट नाही, तर ‘कलाकार’ असणं काय असतं, हे शिकत गेलो. अर्थात सांगतोय तितकं हे सगळं सहज, सोपं नव्हतं.. नसतंच. पण शिकायची जिद्द होती, त्यामुळे तरून गेलो. पुढे ‘गेला माधव कुणीकडे’, ‘एका लग्नाची गोष्ट’ ही नाटकं हातात आली. माझी माझी अभिनयाची एक पद्धत अंगात भिनू लागली.
आणि मग तो दिवस आला..
१८ जानेवारी २००१ हा दिवस मी कधीच विसरणार नाही. या एकाच दिवसात मी तीन नाटकांचे पाच प्रयोग केले.प्रयोगाआधीची ती धावपळ, सहकलाकारांसोबतची जुगलबंदी आणि प्रेक्षकांची दाद या हव्याहव्याशा गोष्टी एकाच दिवसात पाच वेळा मिळाल्यावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हे विचारायलाच नको! वेगळीच धमाल होती ती! एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगात जाताना त्याचे संवाद आणि विनोद आठवत जायचो! हे स्मरणशक्तीसाठी अवघड होतंच, पण शरीरासाठीही होतं. रंगमंचावरचा प्रकाश आणि रसिकांच्या टाळ्या यानेच ते पेलण्याची ऊर्जा दिली. मात्र, हा दिवस लक्षात आहे असं मी म्हणालो ते यासाठी नाही. हा एकच दिवस पुढची अडीच-तीन वर्षांची अशांतता घेऊन आला. सगळीकडे नाव होत होतं, अभिनंदनाचा वर्षांव होत होता.. पण मी अस्वस्थ होतो.
एका दिवसात इतक्या वेळा घशाला ताण दिल्याने त्याला सूज आली होती. तोंडातून शब्द फुटणं मुश्किल झालं होतं. आवाज ही कोणत्याही नटाची सर्वात जमेची बाजू असते. विनोदी अभिनेत्याला तर आवाजाचा हुकमी वापर करावा लागतो. मात्र, त्या दिवसानंतर आता परत रंगमंचावर उभं राहता येईल असं वाटेनासं झालं होतं. म्हणाल ते उपचार केले. दर वेळी एखादा उपचार सुरू केला की आशा वाटायची. नाटकाचा तो जिवंत अनुभव परत घेता येईल असं वाटायचं. आणि मग निराशाच पदरी यायची. आयुर्वेदाच्या उपचारांनी हळूहळू जरा आवाज फुटू लागला. मी माझ्या आरोग्याबाबत सतर्क झालो. मला माहीत होतं, मी सगळ्यात आनंदी, चिंतामुक्त असतो ते स्टेजवर! ते परत मिळवायचं असेल तर आधी स्वत:ची काळजी घ्यावी लागणार होती. मी प्राणायाम, सूर्यनमस्कार घालणं सुरू केलं. हा खूप मोठा धडा होता. कलाकार म्हणून तुम्ही सतत लोकांना दिसावं लागतं.. तुमची विश्वासार्हता टिकवावी, वाढवावी लागते. याचं महत्त्व या काळात जाणवलं. एक विश्वविक्रम मला खूप काही शिकवून गेला.
एक चालणारं नाटक हाती असण्याइतकी आनंददायक गोष्ट नाही! असं घडताच त्याचा मी व माझ्या टीमनेही उपयोग करून घेतला पाहिजे! मी कधीच नाईट वाढवून मागितली नाही. कारण कलाकार म्हणून आपली किंमत मागून मिळत नाही. पण माझं महिन्याचं आर्थिक गणित तर बसवायचं असायचं. मग मी जास्त प्रयोग करू लागलो. कारण त्यामुळेच नव्या लोकांपुढे जाता येतं, शिकता येतं, स्वत:ला सुधारता येतं! नाटकात आपल्याला कधी काय सापडेल हे सांगता येत नाही. आता ‘गेला माधव कुणीकडे’मधला ‘अरे, हाय काय अन् नाय काय’ हा संवाद मला १०० व्या प्रयोगाला सापडलेला आहे. तो त्या पात्राला इतका चपखल बसला, की आधीच्या ९९ प्रयोगांत तो नव्हता, हे कोणाला सांगूनही पटणार नाही!
‘गेला माधव कुणीकडे’चीच अजून एक गंमत सांगतो. पहिल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी रंगीत तालीम पाहून निर्माते मोहन तोंडवळकरांना हे नाटक फार काही चालेल असं वाटलं नव्हतं. ते म्हणाले होते, ‘ठरले आहेत तेवढे प्रयोग करा आणि नाटक बंद करा!’ तेव्हा प्रयोग ठरले होते फक्त सहा! खरं सांगू का? त्यांची चूक नव्हती. वसंत सबनीसांनी नाटक इतकं अप्रतिम लिहिलं होतं, की पहिल्या अंकातलं एखादं वाक्य आणि त्याचा तिसऱ्या अंकातल्या एखाद्या घटनेशी असणारा संबंध समजायलाच आम्हाला २५ प्रयोग गेले. पण शुभारंभाचा प्रयोगच असा वाजला की नाटकाचे पुढे चक्क १८२२ प्रयोग झाले! लोक नाटक जगवतात म्हणतात ते असं खरं ठरतं. लोकांच्या निवडीची ही शक्ती फार लवकरच लक्षात आल्याने असेल, पण मी कायम लोकांचा विचार करू लागलो. घरी जेवायला बोलावलेल्या पाहुण्याला नसेल आवडत एखादी भाजी, तर ती मुद्दाम कोणी त्याच्या पानात वाढतं का? तसंच प्रेक्षकांना त्यांच्या घरातली गोष्ट किंवा ओळखीची माणसं नाटकात दिसतात की नाही हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. दरम्यान, ‘गेला माधव कुणीकडे’च्या वेळी महाराष्ट्रभरातील दौऱ्यांचे हिशोब सांभाळायचा अनुभव गाठीशी होता. त्यातूनच मग निर्माता व्हायचं ठरवलं.
नाटकाचं व्यवस्थापन हे एक महत्त्वाचं अंग आहे. ‘रंगदेवतेची सेवा’ याची माझी व्याख्या आहे- तीन तास तुम्ही जे सादर कराल ते चोखपणे करा. म्हणजे मग रंगदेवता आणि प्रेक्षकही तुम्हाला पुन्हा रंगमंचावर उभं राहायची संधी देतात. सादरीकरण करताना स्वच्छ मनानं आणि प्रामाणिकपणे करा. आपण कुठली जागा घेतोय, कुठे प्रतिसाद मिळतोय, कुठे मिळत नाही, हे लक्षात ठेवून पुढच्या वेळेस नक्की सुधारणा करा. अनेकदा आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही, हेच कलाकारांना कळत नाही. ते समजतं तेव्हाच कलाकार म्हणून नाटकाचा प्रत्येक प्रयोग खऱ्या अर्थानं तुम्हाला खूप काही शिकवून जातो. आणि या शिकण्यातून आपण घडत राहतो. त्याचबरोबर नाटक आपण प्रेक्षकांसाठी करतोय हे कधीही विसरू नका. ते तिकीट काढून, प्रवास करून तुम्हाला बघायला येतात, त्यांचा हिरमोड करू नका. कलाकार म्हणून आपण त्यांचा सन्मान राखणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती पार पाडली तरच प्रेक्षक विश्वासानं पुन्हा पुन्हा येतात.
तरीदेखील बदलत्या काळानुसार प्रेक्षकांना नाटकापर्यंत आणणं हे एक आव्हान होतंच. म्हणून २००८ साली भारतात पहिल्यांदा मी नाटकाचं ऑनलाईन बुकिंग हा प्रकार सुरू केला. पुढे सोशल मीडियाच्या वापरावरही भर दिला.माझ्यातला निर्माता जसा सजग होता तसंच अभिनेत्यानंही सजग असणं गरजेचं होतं. इंग्रजीमध्ये ‘रिलेव्हंट’ असा शब्द आहे. ‘आपण कालसुसंगत आहोत का?’ याचं भान अभिनेत्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच स्वत:च्या प्रतिमेत न अडकता तुम्ही अधिकाधिक काम करू शकता. संकर्षण कऱ्हाडे, अद्वैत दादरकरसारख्या नव्या पिढीच्या कलाकारांसोबत काम करणं मला यासाठी महत्त्वाचं वाटतं. ठराविक वय झाल्यानंतर आता तरुण नायकाचे रोल आपण करू शकत नाही, हे जाणवल्यावर ‘कार्टी काळजात घुसली’सारखं नाटक करायचं मी ठरवलं. त्यात एका तरुण मुलीच्या वडिलांची भूमिका मी केली. एक वडील म्हणून लोकांनी मला स्वीकारायची सुरुवात या नाटकाने झाली. मग ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘सारखं काहीतरी होतंय’ असा प्रवास होत गेला.मला माहितीये- जरा भूतकाळात गेलो की, हे नाटक, ते नाटक अशाच आठवणी निघू लागतात. पण काय करू? जे काय शिकलोय ते त्या लाकडी रंगमंचावरच्या पिवळ्या प्रकाशात उभं राहूनच! आता मी पुढच्या एका विक्रमाच्या पायथ्याशी उभा आहे. मागच्या विश्वविक्रमावेळी असलेला अतिउत्साह आता नाही.. पण ऊर्जा मात्र तीच आहे!
लग्न ठरताना ‘एका लग्नाची गोष्ट’ पाहिलेली मंडळी जेव्हा ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला मुलांना घेऊन येतात तेव्हा काही पिढय़ांपर्यंत तरी आपण मराठी नाटकातला आनंद पोहोचवू शकलो या समाधानाने मन भरून येतं. लोक म्हणतात, ‘तुम्ही नाटक सर्वत्र पोहोचवलंत’ वगैरे. मला मात्र ते माझं श्रेय कधीच वाटत नाही. नाटकावर प्रेम करणारी, एकमेकांच्या चांगल्या गोष्टी खुलवणारी आणि चुका झाकणारी ‘टीम’ उभी राहिली की नाटक होतं! या विक्रमाच्या निमित्ताने ‘आपण मराठी नाटक जगवलं की तेही आपल्याला जगवतं’ हा विश्वास नव्या पोरांना मिळाला तरी सारं काही मिळालं!हा १२,५०० वा प्रयोग माझ्यासाठी ‘नवा प्रयोग’च असणार आहे. १२,५०० व्यांदा मी तिकिटांची चौकशी करेन, नाटय़गृहाची व्यवस्था पाहीन, चेहऱ्याला रंग लावून सहकलाकारांसह बंद पडद्यामागे उभा असेन, तेव्हा दीर्घ अनुभव गाठीशी घेऊनही नव्या ताजेपणाने, उत्सुकतेने मी उभा असेन! मग तिसरी घंटा होईल. पडदा उघडेल. समोर तुम्ही असाल. आणि तुमच्या डोळ्यांत तसंच कौतुक असेल. हा दर प्रयोगाला नव्याने गोष्ट सांगण्याचा, लोकांना हसवण्याचा ताजेपणा अखंड जागृत राहो, हीच रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना!
शब्दांकन : मुक्ता बाम