डॉ. शंतनु अभ्यंकर

‘बोल रे बोल! तू नास्तिक आहेस का?’ असा प्रश्न विचारत जेव्हा जल्पकांच्या झुंडी एखाद्या राजकीय नेत्याच्या मागे लागतात; तेव्हा नास्तिकांना चार्वाकापासूनचे पूर्वज आठवतात. ‘होय, आहे मी नास्तिक’ असं म्हणण्याची सोय चार्वाक, जैन आणि बुद्ध परंपरा सांगणाऱ्या आपल्या देशात ओसरत चालली आहे. राजकारण धुरंधरांना आणि समाजधुरीणांना ती तशी नव्हतीच. पण सामान्यांची तरी राहावी, म्हणून की काय आज (१८ डिसेंबर) पुण्यात ‘ब्राइट्स’तर्फे नास्तिक मेळावा होत आहे. यानिमित्त ‘आम्हाला समजून घ्या’ एवढेच नास्तिकांचे मागणे आहे..

aaditya thackeray on rss bjp maharashtra election
Aaditya Thackeray: “मला RSS ला प्रश्न विचारायचा आहे की..”, आदित्य ठाकरेंचा सवाल; भाजपाच्या सत्तेतील वाट्याचं मांडलं गणित!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
Riteish Deshmukh Speech
Riteish Deshmukh Speech: धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षावर रितेश देशमुखची ‘लय भारी’ टीका; म्हणाला, ‘सरकार येणार तर महाविकास आघाडीचेच’
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”

आस्तिक-नास्तिक हा वाद सनातन आहे. ‘विज्ञान आणि अध्यात्म हे आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत,’ असं कंठरवाने सांगणारा आणि श्रोत्यांतील दोन्ही पक्षांच्या टाळय़ा घेणारा एक वर्ग असतो. यांचा उत्साह लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाच्या वरताण असतो. धर्म आणि विज्ञान या दोन वेगवेगळय़ा गोष्टी आहेत हे खरंच. पण त्या समान महत्त्वाच्या, समान आवाक्याच्या, समतुल्य वकुबाने सृष्टीचा अर्थ लावणाऱ्या आहेत, असं कावेबाज गृहीतक यामागे आहे. उभयपक्षांनी आपापली क्षेत्रं राखावीत असं ठरलं तरी प्रत्यक्षात धर्मशास्त्र आपली मर्यादा सोडून सतत सृष्टीची रीती (पाप वाढल्याने कोविड आला), नीती (गरोदरपणी ग्रहण पाळावे) वगैरेबाबत चोंबडेपणा करत असते.

धर्मक्षेत्रानं कुरुक्षेत्रावर आक्रमण केल्याची तर किती तरी उदाहरणं आहेत. धर्मप्रसारासाठी तलवार हाती धरा, खुशाल नरसंहार करा, असे मुळी कनवाळू देवाचे स्पष्ट आदेशच आहेत. ते आदेश शिरसावंद्य मानणारेही आहेत. नास्तिक बिचारे मवाळ आणि पापभीरू असतात. त्यांनी कुणाला पाव देऊन, शाळा-दवाखान्याच्या व्यूहात भुलवून बाटवलेले नाही. ‘होताय नास्तिक का उपटू डोळे? काढू नखे? आणि करू तुमची खांडोळी?’ अशा आविर्भावात कोण्या नास्तिकानं मतप्रसार केल्याची इतिहासात नोंद नाही. पोलपॉट, स्टॅलिन वगैरे नास्तिकांनी अत्याचार केले, पण त्यामागे नास्तिकत्वाचा प्रचार हे कारण नव्हते. तेव्हा हिंसेच्या एका महत्त्वाच्या सार्वत्रिक, सर्वव्यापी प्रेरणेपासून नास्तिक दूर आहेत. तरीही नास्तिक नापसंत आहेत.
नास्तिक मंडळी एकूणच जगापासून दूर आणि जगण्यापासून फटकून वागणारी, रागीट, भावनाशून्य, कोरडी वगैरे असतात अशी जनभावना आहे. वास्तविक इतर जनतेत जे स्वभावदोष आढळतात तेच कमीअधिक प्रमाणात नास्तिकांत आढळतात. खरं तर आसपासच्या बहुसंख्य, आग्रही आस्तिक समाजात नास्तिकांची कुचंबणाच होत असते. घरगुती अथवा सार्वजनिक धार्मिक कार्यात त्यांना बऱ्याचदा मन मारून सामील व्हावे लागते. पण लक्षात कोण घेतो?

नास्तिक आढय़तेखोर आणि उर्मट असतात असाही अपसमज दिसतो. बहुतेकदा भांडण हे धर्माला काही कळतं की नाही यावर होतं. धर्माचं राहू द्या. शाळेत दोन मुलींत भूगोलाबद्दल भांडण आहे असं समजा. आता मला सांगा, ज्ञानाच्या या शाखेत, ‘मला सर्व सत्य समजलं आहे, सर्व ज्ञान झालं आहे,’ असं म्हणणारी उद्दाम; का ‘मला सर्व समजलेलं नाही’ असं म्हणणारी? अर्थातच अज्ञानाची शक्यता मान्य असणारी विनम्र आहे हे उघड आहे. मग सृष्टीच्या रीतीपासून ते समाजाच्या नीतीपर्यंत अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणारे उर्मट? का हा दावा धाडसाचा आहे असं म्हणणारे? विज्ञान असं मानतं की अंतिम सत्य अशी काही भानगड नसते. आसपासच्या सृष्टीचे सत्यतर ज्ञान करून घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे विज्ञान. यात अहंकार कुठे आला? हा तर विनम्रभाव आहे. नास्तिक उर्मट वाटतात कारण ते लोकांच्या श्रद्धा निर्वेधपणे स्वीकारत नाहीत. अर्थातच नि:शंक मनानं जिथे लीनमात्र व्हायचे अशा श्रद्धास्थानाबद्दल थोडीशी शंकादेखील ज्वालाग्राही ठरते. पण कालच्या कित्येक श्रद्धा या आजच्या अंधश्रद्धा आहेत आणि ही जाणीव सतत शंका आणि प्रश्न विचारण्याचा परिपाक आहे.

नास्तिक अरसिक, भावनाशून्य आणि कोरडे असतात असाही एक समज आहे. हा तर सगळय़ात हास्यास्पद गैरसमज. आज रोजी महाराष्ट्रातले सर्वात प्रसिद्ध नास्तिक म्हणजे पु. ल. देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू. आता यांच्या रसिकतेची आणि सर्जनशीलतेची तरफदारी करणारा मी कोण? काव्य-शास्त्र-विनोदाचा आस्वाद घेण्यात नास्तिक अजिबात कमी पडत नाहीत. ‘काढ सखे गळय़ातील तुझे चांदण्याचे हात’ यातील सखीचे हात हाडामांसाचेच आहेत, पण ते चांदण्याचे भासतात आणि विकता विकता त्यांनी बाजारात विकायला आणलेला सूर्य, तो ‘तो’ नव्हे हे नास्तिकांनाही कळतं. मोहक आणि दाहक असे भाव त्यांनाही जाणवतात. शेवटी शब्दार्थ किंवा लक्ष्यार्थ, कधी लक्षात घ्यायचा याचंही (भाषा)शास्त्र असतंय ते! तेवढं नास्तिकांना कळतं.
नास्तिकांना नीतिमूल्यांची चाड नसते असाही एक गोड गैरसमज आहे. नास्तिकता दुराचार शिकवत नाही. नास्तिकता हाच दुराचार अशी बहुतेक धर्मात मांडणी असते ती गोष्ट वेगळी. तशी ती परधर्म हा दुराचार अशीही असते. पण नास्तिकांची नीतिमूल्ये सद्सद्विवेकातून आणि कायद्यातून येतात. आस्तिक नाव धर्मग्रंथाचे घेतात, पण त्यातील सोयीचा तेवढाच भाग आत्मसात करतात. बारकाईनं विचार केला तर असं लक्षात येईल की, तंतोतंत आपापल्या धर्मग्रंथानुसार जगणं कोणालाच शक्य नाही आणि त्यातील ग्रा तत्त्वे उमगण्यासाठी आणि आचरण्यासाठी धर्मग्रंथांची आवश्यकता नाही. विद्यमान नीतिमूल्ये थेट धर्मग्रंथातून आलेली नसतात. धर्मग्रंथ जणू एक प्रचंड शोरूम आहे आणि कालमान- समाज- प्रकृतीनुसार सारे समाज त्यातून हवे ते वेचून घेत असतात.

नास्तिकांना जगणे निरर्थक, हेतुशून्य वाटत असते अशीही आस्तिक भावना आहे. या विश्वाचा ना कोणी निर्माता आहे, ना त्राता. सभोवतीचा हा सारा खेळ कोण्या विशिष्ट हेतूनं आहे असंही नाही. नास्तिकांची अशी रोखठोक भूमिका असते हे खरं. पण ‘को हम्?’ ‘या असण्याचा हेतू काय?’ असे सुंदर प्रश्न मानवी मनाला पडतातच. ‘हीचहाइकर्स गाईड टु द गॅलॅक्सी’मध्ये दोन आंतर-आकाशगंगीय तत्त्वज्ञ, ‘डीप थॉट’ नावाच्या महासंगणकापुढे काही प्रश्न ठेवतात.

‘मी कोण? माझ्या आयुष्याचा हेतू काय? मी उद्या उठून कामाला नाही गेलो तर या ब्रह्मांडात काय असा फरक पडणार आहे?’
साडेसात मिलियन वर्ष विचार करून ‘डीप थॉट’ आज उत्तर देणार असतो. त्या दोघांचे वंशज श्वास रोखून उत्तर ऐकायला सज्ज असतात.. आणि शांत धीरगंभीर आवाजात उत्तर येतं- ‘बेचाळीस!’
‘बेचाळीस? हे काय उत्तर आहे?’
‘बे-चा-ळी-स!!!’
‘साडेसात कोटी वर्षांनी उत्तर काय दिलं तर म्हणे बेचाळीस! बेचाळीस म्हणजे काय समजायचे आम्ही?’
‘मला असं वाटतं,’ महासंगणक शांतपणे उत्तरला, ‘मुळात प्रश्न काय आहे हेच तुम्हाला समजलेले नाहीये. एकदा प्रश्न नीट समजला की उत्तरही समजेल. पण उत्तर बरोब्बर आहे, बेचाळीस!!’
गोष्टीचा मथितार्थ एवढाच की, या प्रश्नाकडे आपल्याला दोन दृष्टीने बघता येते. एक तर असल्या प्रश्नांचीच निरर्थक म्हणून वासलात लावून टाकायची. मग बेचाळीस हे उत्तरही तितकेच निरर्थक आणि म्हणून बरोब्बर म्हणता येईल!
पण हा ‘को हम्?’चा अनाहत नाद असा पाठलाग सोडणारा नाही. म्हणूनच हे जगणं अर्थपूर्ण करण्यासाठी आपलं आपणच काही करणं भाग आहे हे नास्तिकांना पटलेलं असतं. सृष्टीला वा जीवनाला देवानं लपवलेला काही गूढ अर्थ आहे असं नाही. आपण देऊ तोच आयुष्याचा अर्थ आणि रंग. तगणं आणि प्रसवणं या प्राथमिक जैविक प्रेरणा तर आहेतच, पण जगणं कृतार्थ करणाऱ्या इतरही कित्येक प्रेरणा आहेत. नास्तिक अशा प्रेरणांचा शोध सतत स्वयंस्फूर्तीनं आणि स्वयंप्रज्ञेनं घेत असतात. मुळात या सृष्टीचे काही नियम का आहेत? निर्जीव रसायनांतून सजीव, जाणता जीव कसा निर्माण होतो? या अथांग सृष्टीचा वाटणारा विस्मय आणि असा विस्मय आपल्याला वाटतो याचा विस्मय; ही काही उदाहरणे मात्र. या साऱ्याची संगती लावताना नास्तिक देवाला जमेस धरत नाहीत. अज्ञाताचा आणि गूढाचा आनंदसंग आणि चिकित्सा त्यांना मान्य आहे; पण अज्ञाताची आणि गूढाची उपासना त्यांना अमान्य आहे.

धर्माच्या मते, सृष्टी ही नैसर्गिक आणि अतिनैसर्गिक अशी विभागली गेलेली आहे. आसपासची सृष्टी बिनमहत्त्वाची/ माया असून पारलौकिक जग हेच अंतिम सत्य आहे आणि लौकिक तसेच पारलौकिक जगाचे ज्ञान होण्याचा मार्ग म्हणजे धर्मग्रंथ. आश्चर्य म्हणजे प्रत्येक धर्माचे ज्ञान भिन्न भिन्न आहे. अंतिम सत्यही भिन्न आहे, पापपुण्याच्या कल्पना, स्वर्ग-नरकातील शिक्षा आणि सुखेही भिन्न भिन्न आहेत. एकाचा मेळ दुसऱ्याशी नाही. वर हे सर्व देवानंच लिहून ठेवलं आहे म्हणे! जर फुटकळ थापाच ऐकून घ्यायच्या असतील तर मग जगातल्या प्रत्येक सूक्ष्म कणावर एक एक परीराणी बसली आहे आणि ती त्या सूक्ष्म कणाची हालचाल नियंत्रित करते आहे; आणि इतर सर्व परीराण्यांशी तिचा सातत्यपूर्ण संपर्क चालू आहे. या सगळय़ा परीराण्या एकमेकींशी संवाद साधत या सृष्टीची रचना आणि तोल सांभाळत आहेत, असं गृहीत धरल्यानं तरी काय फरक पडतो? धर्म आणि धर्मग्रंथ आपल्याला असल्या भाकडकथांवर आंधळा विश्वास ठेवायला शिकवतात. याउलट नास्तिक विचाराचे अनेक फायदे आहेत. ही सृष्टी देवानं निर्माण केली आहे या भ्रमात राहण्यापेक्षा, सृष्टीची उत्पत्ती- स्थिती- लय आदी विभ्रम समजावून घेण्यासाठी डोकं वापरण्याची आच निर्माण होते.एकदा तनानं पंचतत्वात विलीन झाल्यावर आपण मनानं, आत्म्यानं वगैरे शिल्लक राहत नाही अशी खात्री असल्यामुळे, पुढच्या जन्माची तयारी किंवा मागच्या जन्मीचे उतराई असला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे पुण्यसंचय आणि पापक्षय याचीही क्षिती नाही. बराच वेळ, पैसा, दगदग आणि तगमग आपोआपच वाचते.

आयुष्याचं जे काय बरंवाईट करायचंय, जे निर्णय घ्यायचे, त्याला नास्तिक मंडळी स्वत:ला जबाबदार समजतात. आयुष्याच्या सारिपाटावर मनाजोगे दान पडावे अशी नास्तिकांचीही इच्छा असतेच की! परिस्थिती आणि अनेकानेक ज्ञातअज्ञात, परिहार्य आणि अपरिहार्य घटक त्यांच्याही जीवनावर प्रभाव टाकतच असतात. पण त्यासाठी कोणत्याही परातत्त्वाची प्रार्थना करायला ते उद्युक्त होत नाहीत. देवाला, देवस्थानाला वा प्रतिनिधींना दान देत- जणू लाच, अडत, हुंडी, वचनचिठ्ठी, तारण, दलाली, गहाणखत असले व्यवहार करत देवावर हवाला ठेवून नास्तिक स्वत:चे नुकसान करून घेत नाहीत.
खरं तर आपला देव वगळता जगातल्या इतर देवांवर आपली श्रद्धा नसतेच. म्हणजे अल्लाच्या बाबतीत हिंदू माणूस नास्तिक असतो आणि इन्का लोकांच्या देवाचा भारतातल्या सिरियन ख्रिश्चनांस पत्ता नसतो. इन्कांच्या देवाला तरी यांचा पत्ता आहे का ते त्यालाच ठाऊक! ‘इतर सर्व देवांवर आपण का बरं विश्वास ठेवत नाही?’ असा विचार केला की संस्कार, संस्कृती, सामाजिक दबाव असे घटक लक्षात येऊ लागतात. धर्म आणि धर्मग्रंथातील वैय्यर्थ जाणवायला लागते. सार्वजनिक धर्मपालनाच्या कर्णकटू कोलाहलाबद्दल उदासी दाटून येते. आपल्या देवावर आपण का विश्वास ठेवावा, असा प्रश्न पडू लागतो. नास्तिकतेकडे प्रस्थान ठेवले जाते.

पण एक वेळ देव आणि धर्म नाकारता येईल, पण संस्कृती? ती कशी नाकारणार? आणि का नाकारावी? रिचर्ड डॉकिन्ससारखे काही, आपण ‘ख्रिश्चन नास्तिक’ असल्याचे सांगतात. समाजधारणा, सामाजिक अभिसरण, संस्कृती, भाषा, रूढी-परंपरा अशा साऱ्यावर धर्माचा गोड काळिमा झाकोळलेला असतो. मानवी संस्कृतीच्या जळात पाय सोडून बसलेला हा असला देवा-धर्माचा औदुंबर, त्याच्या पानाफांद्यांतून खाली ऊनसावली जाळी विणत असते. त्यातील धर्माची कृष्णछाया वगळून विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे आलोकपान म्हणजे नास्तिक्य.
.. तेव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठं? बरी असतात ही मंडळी!
shantanusabhyankar@hotmail.com