-केशव वाघमारे
मी बीड जिल्ह्यातील ज्या खेडेगावातून येतो त्यामध्ये तीस वर्षांपूर्वी बौद्धवाड्यांत बुद्धविहारसुद्धा नव्हता. पन्नास घरांची दलित वस्ती असलेल्या माझ्या गावात अर्धी घरं पत्र्याची तर अर्धी घरं पाचोटा टाकलेल्या ओसरीची होती. या वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला आणि त्या निळ्या झेंड्याखाली अख्खा बौद्धवाडा एकत्र येऊन बसायचा. जवळच्या कुठल्या तालुका अथवा जिल्ह्याच्या गावांत भीमगीत गायनपार्टी आलेली असायची. थोड्या अंतरावर एक वाढलेलं पिंपळाचं झाड होतं. वाऱ्यानिशी त्याची पानं हालून जणू पाऊस पडत असल्याचा ताल पार्श्वभागी सुरू असायचा. त्या काळात अर्थातच कोणाच्याही घरी टीव्ही नावाची गोष्ट नसायची. स्वाभाविकच रात्री नऊनंतर गावात चिडीचूप शांतता असे. हे रात्रीचे नऊ म्हणजे जसं काही मध्यरात्र असल्यागत भासायची. निळ्या झेंड्याखाली एक पिवळा बल्ब लटकलेला आणि बाजूच्या मोडकळीस अवस्थेत आलेल्या घरांच्या एकमेकांवर, रस्ताभर लांब लांब पसरलेल्या सावल्या. गावाच्या चारही बाजूंनी अंधार आणि आकाशात ताऱ्यांचा एक ठिगळ, आणि तो पौर्णिमेचा चंद्र. पिंपळाच्या पानांचा सळसळणारा तो आवाज आणि अशातच सगळं गाव झोपी असताना गावाच्या पल्याड एका कोपऱ्यात वसलेल्या वस्तीतून, शेतांतून मजुरी करून थकूनभागून आलेल्या आयाबाया… ‘भीम राजा की जय! बुद्ध भगवान की जय!’ म्हणत आणि मग बुद्ध, भीमगीताला सुरुवात करत; तेव्हा त्या गीताची पहिलीच ओळ अंगावर काटा फुलवीत जायची.
तो माहोल मनात भिनून जायचा. हेच आमचं विद्यापीठ होतं. येथेच गाण्याच्या ओळीओळींत साठलेले बुद्ध, भीम आम्हाला मिळाले. तेव्हा आमच्यापाशी साहित्य पोहोचलेलं नव्हतं, पुस्तकं पोहोचलेली नव्हती, ना माध्यमं, ना मला फार काही समज… एका कोपऱ्यात भिंतीला पाठ लावून गप ऐकत बसायचो. पण साहित्याची कमी भरून काढली या गीतांनी, आमच्या आयाबायांनी. मोठ्या ताकदीने भीम आमच्यापर्यंत पोहोचवला. इतक्या जबरदस्त क्षमतेने की, आमच्या मनाच्या सांदिकोपऱ्यातून गौतम बुद्ध, भीमराव हलणं, हलवणं सहजी शक्य होणार नाही!
खूप देणं लागतो आम्ही त्या ज्ञात-अज्ञात लोकांचं- ज्यांनी मुख्य प्रवाहाच्या माध्यमांच्या रेट्यांना न जुमानता आपल्याला लोकसंस्कृतीतून लाभलेल्या ‘ज्ञान-वाहिनी’चा पर्याय कायम ठेवला आणि आपली अस्मिता, आपल्या अस्तित्व-रक्षकांना सदैव जिवंत ठेवलं! त्यांनीच आमच्या नकळत्या वयाच्या मेंदूत न्याय, समतेची मूल्यं रुजवून, दलित-वंचितांची आत्मसन्मानाची भावना, स्वप्न जागृत ठेवली. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाची प्रेरणा सतत पुढे नेली- पुढच्या पिढीकडे प्रवाही करण्यासाठी… समूहमन घडत गेलं आणि काही अंशी समाजमनही! भीम नावाची मातृभूमी शाबूत राहिली!
आणखी वाचा-आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
आंबेडकर पुस्तकातून कळण्यापूर्वीच मला हार्मोनियम, ढोलकी घेऊन गावोगावी गाणी गात फिरणारे शाहीर रायरंद या आंबेडकरी शाहिराकडून प्रथम समजले. महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर, गोलमेज परिषद, पुणे करार, गांधींबरोबरचा संघर्ष या महत्त्वाच्या घटना आणि राज्यघटना या घटनाचे उल्लेख आणि संदर्भ आधीच माझ्या कानावर पोहोचले होते. ही लोकसंस्कृती आणि असे गायन प्रकार सर्वसाधारण वाचकांना माहीत आहेत का? अभ्यासकांना ते इतक्या वर्षांत सखोलतेने जाणून घेण्याची गरज वाटली का? आपल्याच लोकसंस्कृतीतील तळागाळातल्या लोकांचं भावविश्व, त्यांच्या समस्या, त्यांचे आदर्श, त्यांची स्वप्नं, त्यांचे संघर्ष, त्यांची जीवनप्रणाली वेगळी आहे हे त्यांना जाणवत असलं, तरीदेखील ती तशी का आहे, अशा प्रश्नापासून ते हजारो कोस दूर असल्याचं प्रकर्षानं जाणवतं.
खेड्यांच्या वेशीबाहेर व शहरांच्या ओसरीवर पसरणाऱ्या झोपडपट्ट्यात डांबलेले लाखो दलित-वंचित, त्या वस्त्यांत घडणाऱ्या घडामोडी, त्यांची स्पंदनं, त्यांच्या व्यथा-वेदना यांची काही एक जाणीव कळण्यासाठी चैत्यभूमीवरचा ६ डिसेंबरचा अनुभव घेतला पाहिजे. आज हे सर्व इंटरनेटवर उपलब्ध नाही. कारण या साधनहीन कलाकारांच्या कृतीचं, चळवळीचं साहित्य म्हणून दस्तावेजीकरण कधी झालंच नाही. पण १९५०-६०च्या दशकात अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्यांच्या साहित्यातून ग्रामीण भागांचं दर्शन घडलं, तेव्हा प्रस्थापित साहित्यिकांनी त्यांच्या साहित्याची प्रचारकी साहित्य म्हणून संभावना केली आणि हो, १९६०-७०च्या दशकात दलित पँथरच्या चळवळीच्या माध्यमातून, नामदेव ढसाळ यांच्यासारख्यांच्या विद्रोही काव्यातून शहरी दलिताच्या जीवनाच्या विरूपाचं दर्शन साहित्यातून घडलं, तेव्हा अवघं सभ्य मराठी साहित्य-विश्व हादरून गेलं.
मराठी भाषेत एक म्हण आहे – ‘बामना घरी लिहनं, कुनब्या घरी दानं अन् मांगा-महाराघरी गानं’ – ब्राह्मणी संस्कृतीत ज्ञान, श्रम, आणि कला-संगीताची अशी जातीनिहाय विभागणी झालेली होती. त्या सामाजिक व्यवस्थेत गाणं-बजावणं हे अस्पृश्य ठरवलेल्या जातींचं एकप्रकारे उदरनिर्वाहाचं महत्त्वाचं साधन ठरत होतं. महाराष्ट्रात प्रत्येक जात-समूहाची स्वत:ची अशी संगीत वाद्यां आहेत- जी त्यांच्या विधी आणि सांस्कृतिक जीवनात वापरली जातात. मांग हलगी वाजवतात, डक्कलवार किंगरी, धनगर गजे ढोल, आराधी चोंडकं, गोसावी डमरू, तर महार ढोलकी, तुणतुणे आणि एकतारी वाजवतात अशी साहचर्य मानली गेली.
आणखी वाचा-प्रगल्भ महाराष्ट्राच्या आठवणी
अशा सांगीतिक साधनांतून दलितांनी शतकानुशतकांच्या दमन आणि भेदभावाला तोंड देत आपला इतिहास, शौर्य, वेदना, आनंद, आपलं तत्त्वज्ञान हे सर्व जात्यावरच्या ओव्या, मौखिक कथा, गाणी लोकसंगीताच्या रूपात पिढ्यांन् पिढ्या जोपासले. त्यांच्या जीवन संघर्षाचा इतिहास त्यांनी या सांगीतिक साधनातून आणि त्यावरच्या गाण्यातून पिढीजात जतन केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय चळवळीत उदय होण्यापूर्वी दलित लोक कबीराचे दोहे, विठ्ठलाची भक्ती आणि ईश्वराची आराधना करणारी भजने एकतारी वर गात असायचे. एकतारी परंपरा आजही दलितांच्या आणि खास करून अस्पृश्य मानल्या गेलेल्या समूहांच्या घरांत दिसून येते. आजही प्रामुख्याने याच जातसमूहांत तिचा उपयोग केला जातो. मृत्यूनंतरच्या कार्यक्रमात एकतारीवर भजन म्हटले जाते. जीवनाचं साफल्य, जीवनविश्वाची अभिव्यक्ती, चांगल्या कर्माचे महत्त्व आणि शेवटी मृत्यूची अटळता हे कबीरपंथीय तत्त्वज्ञानाचे गूढ सांगणारी ही गाणी महार मांग जातसमूहाकडून एकतारीवर गायली जायची.
कबीराची सर्व भजनं एकतारीवर म्हटली गेली. या एकतारी भजनात जीवन. मृत्यू, श्रम यांचे जीवनानुभव गायले आहेत. जीवनाच्या तत्वज्ञानाची सोप्या आणि लोक भाषेत मांडणी ही एकतारीच्या भजनांमध्ये दिसते. शोषित, पिडल्या गेलेल्या सर्वच जातसमूहांचा कबीर हा आध्यात्मिक व सांगीतिक हुंकार आहे. तो हुंकार इथल्या भटक्या शोषित जातसमूहाने एकतारी सोबत घेऊन भारतभर पोहोचवला.
या एकतारी भजनाबरोबरच जात्यावरची गाणी, ओव्या आणि तमाशा दलितांच्या सांस्कृतिक जीवनाचा अतूट असा भाग राहिला होता. या पारंपरिक तमाशामध्ये विनोद होता, तसाच माफक उपदेशही, पण विनोद अश्लील आणि उपदेश धार्मिक व व्यवहारी होता- त्याचा प्रबोधनाशी संबंध नव्हता. १९२० नंतर डॉ. आंबेडकरांचा दलितांच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. त्यांनी प्रबोधनाची चळवळ सुरू केली. तळागाळातील लोकापर्यंत प्रबोधनकारी संदेश जाण्याची गरज होती.
यासाठी भाषणं, सभा या माध्यमांपेक्षा अशिक्षित सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्यासाठी ग्रामीण व सोप्या भाषेत करमणुकीच्या स्वरूपातले माध्यम आवश्यक होतं. पण जनता नादलुब्ध असल्याने त्यांना सभा, मिटिंग यांपेक्षा मनोरंजन आवडायचे. ते तमाशांना प्रचंड गर्दी करत. या प्रेरणेतून आर. एच.आंडगले, के. के. साळवे, जगताप, भालेराव या तरुण कार्यकर्त्यांनी ‘आंबेडकरी जलसे’ सुरू केले. या कार्यकर्त्यांनी तमाशाला प्रबोधनाचं हत्यार बनवलं. पारंपरिक गण, गौळण, राजराणीच्या कथा वगैरे बाजूला सारून त्या तमाशात जनजागृतीचा क्रांतिकारी आशय भरून नवा तमाशा उभा केला. यांच्या तमाशात लाखो लोकांना खिळवून ठेवण्याची क्षमता होती. त्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका या कलाकार आणि कलावंतांनी निभावली. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीच्या आधारे समाजात होणारी स्थित्यंतरे, क्षणोक्षणी घडणाऱ्या नव्या घटना, डॉ. आंबेडकरांची भूमिका, त्यांचे संदेश, त्यांचा संघर्ष आणि एकूणच त्यांचे जीवन, अशिक्षित आणि अडाणी समाजाला समजेल अशा प्रभावी आणि प्रवाही भाषेत कलाकारांनी समजून सांगितले.
आणखी वाचा-कुमारजींचा सांगीतिक विचार
द्याव मती आम्हा तव गुण गाया किंवा वंदितो डॉक्टर आंबेडकरांना! आमच्या कुलदेवाना महामं फुल्यांना! छत्रपती शाहू महाराजांना अशी जलश्यांची सुरुवात होत असे. आंबेडकरी जलसेकारांनी वीस-पंचवीस वर्षं गावोगावी व दलितवस्त्यांमधून जलसे करून समाज ढवळून काढला. अनेक अडचणींचा सामना करत, आपल्या घरादाराची पर्वा न करत अत्यंत निष्ठेने आंबेडकरी आंदोलन लोकांपर्यंत पोहचवले. आंबेडकर आणि जनता यांमधला ते दुवा बनले होते. शाहीर भीमराव कर्डक आणि कलाकारांचा जलसा खुद्द डॉ. आंबेडकरांनी मुंबईच्या नायगाव येथील वेलफेअर मैदानावर पाहिला तेव्हा त्यांनी जे विधान केलं होतं ते प्रसिद्ध आहे. ते म्हणाले होते, ‘‘माझ्या दहा सभा आणि कर्डक मंडळीचा एक जलसा बरोबर आहे.’’ एका कार्यक्रमात शाहीर घेगडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुढ्यातच नाशिकच्या काळाराम मंदिर सत्यागृहावेळी जे गाणं गायलं होतं, ते असं होतं –
कडाडली वीज आली चमकत
श्रीरामाच्या पडली डोक्यात
सीतामाईची तुटली नथ
लक्ष्मणाचा उजवा हात
धक्का बसला कळसाला
बंधूनो! चला जाऊ हो सत्याग्रहाला! यावरून हे लक्षात येते की, डॉ. आंबेडकर यांच्या प्रबोधन चळवळीची लाटच दलितांमध्ये आली होती. के. के. साळवे, केरूजी घेगडे, दीनानाथ भिकाजी भोसले, दादासाहेब पगारे, जगताप, भालेराव, भीमराव कर्डक या मंडळीचे जलसे त्यात प्रमुख होते. आंबेडकर यांच्या कालखंडात दामोदर अहिरे, गोविंद आबाजी अहिरे ऊर्फ दलितानंद, वामन कर्डक, कवी लक्ष्मण केदार, गायक श्रावण यशवंते, राजानंद गडपायले, कवी श्रीधर होवाळ, मराठी कवाल्लीचा बादशहा गोविंद म्हशीलकर, हृदयनाथ सिन्नरकर, नागोराव पाटणकर, उत्तम मुळे आणि डाव्या विचारांचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अशा अनेकांचा त्या दलित शाहिरांमध्ये समावेश होतो.
आंबेडकरपश्चात काळात प्रल्हाद शिंदे, कृष्णा शिंदे, मधुकर पाठक, कुंदन कांबळे, प्रभाकर पोखरीकर, प्रतापसिंग बोदडे, नवनीत खरे, विठ्ठल उमप, काशीनाथ शितोले, आत्माराम साळवे, किसन खरात, गोपचंद, रंजना शिंदे, सुमन रोहम, शकीलाबानू पुनवी, शिलादेवी खरे आणि त्याचप्रमाणे विलास घोगरे, विरा साथीदार यांसह अनेक ज्ञात-अज्ञात कवी गायकांनी दलित-बहुजनांच्या मनात घर केलं, चळवळींना, संघर्षांना आत्मबळ दिलं. कोरले भीमा तुझे हृदयावर नाव तुझेच गीत गाईन फिरुनी गावोगाव असं म्हणत त्यांनी डॉ. आंबेडकर यांचं सामाजिक क्रांतीचं तत्त्वज्ञान व विचार आपल्या गीत आणि काव्यातून गावागावांत पोहचवले. ‘अस्तित्व आणि अस्मिता’ याची जाणीव त्यांनी त्यांच्या शाहिरीतून आणि कलेतून जागवण्याचा यज्ञ केला.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
कला आणि साहित्य मानसिक परिवर्तनात काय महत्त्वाची भूमिका बजावतात? हे जर संपूर्ण भारतात बघायचे असेल तर आपण या भीमशाहिराकडे पाहू शकतो. ग्रामीण भागात, आडबाजूला राहणाऱ्या दलितांसाठी हेच विद्यापीठ होतं. या गीतांच्या शब्दाशब्दांतून बुद्ध आणि आंबेडकर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले, ते कसे त्याची चर्चा वर आलीच आहे. त्यांचे तत्त्वज्ञान अनेक पिढ्यांच्या सचेत मेंदूत उतरवले गेले आणि तिथून ते लयाला जाणे शक्यच नव्हते. एक सबंध पिढीची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चेतना या शाहिरांनी घडवली. अनेक शाहिरांची ही निर्मिती आजही सर्वदूर विखुरलेली आहे. त्या अर्थाने आंबेडकरी शाहिरी ही केवळ कला नाही. तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीचे ‘चरित्र आणि चारित्र्य’ही आहे!
कोणत्याही चळवळीसाठी तिची ‘जनचेतना’ महत्त्वाची असते आणि ग्रामीण जनतेत दीर्घ काल टिकून राहील अशी जनचेतना निर्माण करण्याचे काम या शाहिरांनी केलं. दलित चळवळीने अनेक चढ-उतार पाहिले. १९९० नंतर विशेष करून चळवळ बरीच उतरणीला लागली. मात्र तरीही जेव्हा कधी चळवळ उसळी घेते तेव्हा ही पूर्वी रुजवलेली जनचेतना पुन्हा जागृत होते, हेसुद्धा अनेक वेळा दिसून आलेलं आहे.
पूर्वीची स्वरचित गाणी, साहित्य कोणाही प्रकाशकांनी प्रकाशित केलेले दिसून येत नाही; अथवा त्यांची कला, गाणी आणि त्यांची वाद्यां आणि कलाकार तथाकथित मुख्य प्रवाहातील संगीत चर्चाविश्वात दिसून येत नाहीत. या शाहिरांना तथाकथित अभिजनांच्या मुख्य प्रवाहात कधी जागाच मिळाली नाही. त्यांचा इतिहास, ग्रंथ, कला आणि वाद्यां या सांगीतिक चर्चा विश्वातून वगळण्यात आली, तरीही आजही त्यांची स्वरचित हजारो गाणी लोकांच्या ‘सामूहिक चेतने’त जिवंत आहेत. लोक ती गाणी कायम लढे-आंदोलनात पुन:पुन्हा गाताना आढळून येतात.
keshavwaghmare14@ Gmail .com
(लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)