‘‘थट्टीफस्ट सण मोठा
नाही आनंदा तोटा’..
आमच्या येथे दरवर्षी ३१ डिसेंबरला थट्टीफस्टचा सण साजरा करतात. त्या दिवशी आमचे सोसायटीमध्ये मोठी पार्टी असते. पार्टीला माझा व कोकाकोला व वेफर व चॉकलेट असतात. कधी कधी केकपण कापतात. तसेच लहान मुलांना कागदाच्या रंगीत टोप्या आणतात. पण त्या मोठी माणसेच घालतात. पार्टीला डिजेपण लावतात. त्याच्यावर सगळे नाचतात. मम्मीपण उलालावर नाचते. पण सोसायटीतली हेतल म्हणते- मम्मी गरबा खेळते. हेतल डफ्फर आहे. आमचे डैडी व चव्हाणंकल व लेलेअंकल व पाटीलंकल व शर्माअंकल सगळे पार्टीमधून गुपचूप टेरेसवर जातात. तेथे त्यांची सेप्रेट पार्टी असते व लहान मुलांना त्यांच्यात घेत नाहीत. मी मोठा झाल्यावर रोज सेप्रेट पार्टी करणार आहे..’’
तुम्हांस सांगतो, वाचवले नाही हो पुढे! अरे, यास काय निबंध म्हणावयाचा? शाळांमध्ये चालते कसे हे म्हणतो मी? आणि थट्टीफस्टचा हा सण कोणी केला? उदईक तुम्ही वेलंटाइन डेला सण म्हणाल! परवा सारी डेला गुढय़ा उभारा म्हणाल! आधीच का आपल्या इकडे सण कमी आहेत? आणि आपण करतोच ना नववर्ष साजरे डोंबोलीत- गुढीपाडव्याला? मग त्यात ही आणखी ग्रेगोरियन शके २०१२, डिसेंबर कृ. ३१ ची भर कशाला?
पण मग मनी आले- लोकांस जर क्यालेंडर बदलल्याचा आनंद होत असेल व ते तो रस्त्यावर बुढ्ढा जाळून व टेरेसवर व हाटेलांत जाऊन साजरा करीत असतील तर आपण नाहक का असा प्रश्निपगा घालावा? त्या एका रात्री तिन्ही लोक आनंदाने भरून जात असतील तर त्यात आपण कशाकरिता पारंपरिक मिठाचा खडा टाकावा? आपणास ते सहन होत नसेल व सांगताही येत नसेल तर आपण खुशाल आपुल्या गृही गप्प बसावे. आम्ही तेच करतो.
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो, आता आपणापासून काय लपवावयाचे? हल्ली वयपरत्वे फार जागरण सहन होत नाही. बरे, असे थट्टीफस्ट वगरे साजरे केले की दुसऱ्या दिवशी सक्काळी सणकून डोके दुखते, हमखास आम्लपित्त होते व मग ‘सौभाग्यवतीची तब्बेत अचानक बिघडली आहे. कान्ट कम टू ऑफिस..’ असा एसेमेस करावा लागतो. तेव्हा साल-दो सालांपासून आम्ही आपुल्याच घरी खाटेवर पडून नववर्षांचे स्वागत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आता तुम्ही पुसाल- ते कसे? तर- आम्ही नुसतेच पडत नाही, तर पडल्या पडल्या मराठी वाहिन्यांवरील नववर्ष स्वागताचे रंगारंग काय्रेक्रमही (स्वतच्या जबाबदारीवर) पाहतो!
काही काही लोकांस मात्र हे कार्यक्रम आवडत नाहीत. आमुचे परमस्नेही रा. रा. लेले हे तर या काय्रेक्रमांचे कट्टर टीकाकार. त्यांचा सवाल असा, की वर्षभरातील रतीबाचे काय्रेक्रम व हे नववर्ष स्वागताचे काय्रेक्रम यांच्यात तपशील व आशयदृष्टय़ा काय बरे फरक असतो? व तसा फरक नसेल, तर कशासाठी बरे आमुच्या मराठी चित्रवाणीवाहिन्या असे काय्रेक्रम सादर करीत असतील? म्हणजे त्यांना कोणी असे सांगितलेले असते का, की वर्षांन्ती असा प्रोग्राम सादर करावाच लागतो; नाही तर तो ताजीराते िहद दफा तीनसोदोचा गुन्हा होतो?
हे अगदी खरे, की िहदी-मराठी वाहिन्यांवरील थट्टीफस्टचे रंगारंग काय्रेक्रम पाहून असंख्य मायबाप प्रेक्षकांस आपले चर्मचक्षू फोडून घेण्याची अनावर इच्छा होते. पण यंदा ही बाब केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. म्हणूनच या मंत्रालयाने सरकारी ज्ञान व मनोरंजन वाहिनी- जी की दूरदर्शन- तिला थट्टीफस्टचा अत्यंत मनोरंजक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. (गेल्याच महिन्यात दूरदर्शनने या काय्रेक्रमाच्या निविदा मंजूर केल्या. आहात कुठे!)
तर या रंगारंग कार्यक्रमाचे प्रोमो नुकतेच आमुच्या दृष्टीस आले. आणि काय वर्तावे वाचकहो, ते पाहून आमचे नेत्र अगदी निवनिवनिवले! अहाहा! कित्ती छान, कित्ती मनोरंजक, कित्ती ज्ञानवर्धक असा तो काय्रेक्रम होता!
या अनवट कार्यक्रमाची नांदी झाली ती त्यागमूर्ती माँ सोनियाजींच्या स्तवनाने. अहमदभाईंच्या वाद्यवृंदाने सादर केलेल्या या स्तवनास महाराष्ट्रवादी नेते शरदरावजी पवारजी व त्यांच्या पार्टीने पदराआडून ‘स्वबळावर लढू, स्वबळावर लढू..’ असा कोरस दिला होता, हे विशेष!
त्यात ‘आधार’ नावाचे एक इटुकले विनोदी स्किटही होते. आम आदमीच्या बँक खात्यात कसे थेट पसे येतात व त्यास ते कसे समजतच नाही, तरीही तो कशी मते देतो, असे त्याचे कथानक होते. त्यात राहुलजी गांधीजी व पीजी चिदंबरमजी यांनी आम आदमीची जी भूमिका रंगविली, ती अफलातूनच!
भाजपमधील कसलेल्या अभि-नेत्यांनी सादर केलेला ‘बाजारात तुरी..’ या नाटुकल्याचा एक प्रवेशही अतिबहारदार होता. त्यात भाग घेतला होता- लालकृष्णजी अडवाणी (नेहमीचे यशस्वी!), अरुणजी जेटली, सुषमाजी स्वराजजी आणि नरेंद्रभाई मोदीजी यांनी. सुषमाताई व मोदीभाई यांच्या कर्कश अभिनयाने या प्रवेशास चार कमळे लावली!
‘बिग बॉस’ या अभिजात वास्तवदर्शी कार्यक्रमाचा लोकमानसावर किती प्रभाव आहे, याचा प्रत्यय तर या प्रोमोतूनही आला. येथेही बिग बॉसचे घर होते. पण त्यात सदस्य म्हणून होत्या त्या सुश्री मायावतीजी, सुश्री ममताजी, लालूजी आणि दिग्विजयजी. बिग बॉसने त्यांना एफडीआय आणून घर चालवणे, सीबीआयपासून आ-रक्षण मागणे अशी रंजक कामे दिली होती. ते सर्व पाहणे हा एक अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता. याशिवाय गुजरात काँग्रेसने सादर केलेली ‘दुर्दशा पण झाली, दिशा पण गेली’ ही शोकांतिका मनास चटका लावणारी होती. महाराष्ट्र काँग्रेसचा ‘आदर्श सिंचन चौकशीचा पोवाडा’ हा या प्रोमोमधला सर्वाधिक रोमांचक भाग होता.
दूरदर्शनवरून आणखी आठ दिसांनी हा तासाभराचा कार्यक्रम सादर होणार आहे. विशेष म्हणजे तो साल-दरसाल चालूच राहणार आहे.
थट्टीफस्ट आला काय अन् गेला काय, आपुले जीवन असेच मागील पानावरून पुढे चालू राहणार आहे, असा संदेश देणारा हा कार्यक्रम मायबाप मतदारांनो, चुकवू नये असाच आहे. तुम्ही तो शांतचित्ताने पाहाल, याची बरीक आम्हांस पहिल्यापासूनच खात्री आहे!
थट्टीफस्ट!
‘‘थट्टीफस्ट सण मोठा नाही आनंदा तोटा’.. आमच्या येथे दरवर्षी ३१ डिसेंबरला थट्टीफस्टचा सण साजरा करतात. त्या दिवशी आमचे सोसायटीमध्ये मोठी पार्टी असते. पार्टीला माझा व कोकाकोला व वेफर व चॉकलेट असतात. कधी कधी केकपण कापतात. तसेच लहान मुलांना कागदाच्या रंगीत टोप्या आणतात.

First published on: 23-12-2012 at 12:04 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirty first celebration