कार्टून्स किंवा व्यंगचित्रं हा कलाप्रकार जगभरात लोकप्रिय आहे. त्याचे अनेक उपप्रकार आहेत आणि ते आपापल्या वैशिष्ट्यांसह वाचकांपर्यंत पोहोचत असतात. उदाहरणार्थ, दैनंदिन राजकीय किंवा सामाजिक घडामोडींवर आधारित राजकीय भाष्य करणारी व्यंगचित्रं. बिगरराजकीय किंवा विशिष्ट घटनेवर आधारित नसलेली चित्रं ही ‘सोशल कार्टून्स’ किंवा निखळ हास्यचित्रं या प्रकारात ओळखली जातात. त्याखेरीज अर्कचित्र, कॉमिक्स स्ट्रिप्स, विनोदी रेखाटन याही व्यंगचित्रकलेच्या स्वतंत्र शाखा आहेतच. हास्यचित्र म्हणजे खेळकरपणे स्वत:च्या जीवनाकडे बघायला लावणारी चित्रं. ती कधी खळखळून हसवतात तर कधी अंतर्मुख करतात. या हास्यचित्रकलेचं महाराष्ट्रातील स्थान याबद्दल थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दिवाळी अंकातून येणारी मराठी हास्यचित्रं आणि त्यांचं वैविध्य हे देशातील सर्वोत्तम म्हणावं असं आहे.

बातमीवर आधारित राजकीय व्यंगचित्रं म्हणजे ‘नाशवंत माल’असं त्याचं यथार्थ वर्णन आहे. बातमी विसरली गेली की राजकीय व्यंगचित्रांचा आस्वाद घेणं कठीण होऊन बसतं. कारण प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्ती हे सारेच विस्मरणात गेलेले असतात. त्यामानाने सामाजिक व्यंगचित्रं (म्हणजे थोडक्यात आपल्याकडील दिवाळी अंकातील हास्यचित्रं ) यांचं आयुष्य बऱ्यापैकी जास्त असतं किंवा जास्त असणं अपेक्षित असतं. म्हणून तर शंकरराव किर्लोस्कर, हरिश्चंद्र लचके, शि.द.फडणीस, वसंत सरवटे, प्रभाकर ठोकळ, गवाणकर यांच्या साठ-सत्तर वर्षांपूर्वी काढलेल्या हास्यचित्रांचा आस्वाद आपण आजही घेऊ शकतो. म्हणूनच बातमीवर आधारित व्यंगचित्रांपेक्षा दीर्घकाळ टिकणारी सामाजिक हास्यचित्र काढणं फार आव्हानात्मक! (अर्थात दररोज किंवा नियमाने राजकीय व्यंगचित्रं काढणं हे एक वेगळ्या प्रकारचं आव्हान आहे, हेही तितकंच खरं आणि तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.)

suspense thriller movies on ott
OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Bride Tuji Navari song dance
“काय नाचतेय ही…”, ‘ब्राईड तुझी नवरी’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
two friends chickens joke
हास्यतरंग :  खांद्यावर…
Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
Aankhon mein kajra balon mein gajra song village woman danced on Video viral on social Media
गावच्या महिलेचा ‘आंखों में कजरा बालों में गजरा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप; VIDEO एकदा बघाच
Rohit Shetty Singham Again movie Circus of entertainment news
मनोरंजनाची सर्कस
Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

एकूणच व्यंगचित्रकलेविषयीची उत्सुकता गेल्या शतकाच्या सुरुवातीस वाढू लागली. पण त्याला खूप मर्यादा होत्या. तथापि एखाद्या क्षेत्राबद्दल, कलेबद्दल, नव्या विचाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची असेल, अभिरुची वाढवायची असेल तर ते काम संपादक अधिक चांगल्या रीतीने करू शकतात. चांगला संपादक हा एक प्रकारे समाज सुधारकच असतो. हे काम शंकरराव किर्लोस्कर (शंवाकि) यांनी शंभर टक्के केलं. शंकररावांनी व्यंगचित्रकलेचं नेमकं मर्म जाणलं आणि ‘किर्लोस्कर खबर’ हे मासिक (१९१६) निघू लागलं. म्हणूनच ‘शंवाकि’ यांना आद्या व्यंगचित्रकार असं म्हणतात !

शंकरराव हे स्वत: उत्तम चित्रकार होते. संपादक तर ते होतेच होते. जग पाहिलेले होते, अंगी धडाडी होती, कल्पकता होती. त्यांनी अनेक चित्रकारांना अंकांसाठी कायमस्वरूपी काम देऊ केलं. व्यंगचित्रांच्या स्पर्धा घेतल्या, नवीन व्यंगचित्रकार हेरले. त्यांना जरूर ते मार्गदर्शन करून त्यांची चित्रं छापून प्रोत्साहन दिलं. मराठी व्यंगचित्रकलेतील हा फार महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.

हेही वाचा – बालरहस्यकथांचा प्रयोग

शंकररावांनी राजकीय व्यंगचित्रांव्यतिरिक्त सामाजिक सुधारणांवरही भरपूर चित्रं काढली. तथापि हास्यचित्रकलेच्या बाबतीत त्यांचा ‘लग्न मंडपातील विनोद’ हा संग्रह म्हणजे हसत खेळत मर्मभेद करणारा संग्रह आहे. तत्कालीन मध्यमवर्गीयांच्या लग्न पद्धतीतील अनेक गोष्टींवर काढलेली ही हास्यचित्रं हसवतात आणि विचारही करायला लावतात. ही हास्यचित्रं म्हणजे मराठी हास्यचित्रकलेची एकप्रकारे मुहूर्तमेढच म्हणावी लागेल.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्साहाचं, नवचैतन्याचं वातावरण सर्व क्षेत्रात पसरलं. तो काळ धडपडण्याचा होता, स्थिरस्थावर होण्याचा होता. पुढे भाषावार प्रांतरचनेमुळे प्रादेशिक, सांस्कृतिक अस्मिता फुलू लागल्या. वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, ललित साहित्यिक पुस्तकं इत्यादीमध्ये नव्या बदलांचे वारे वाहू लागले. अर्थात त्या वाऱ्यात नवे काही निर्माण झाले तर जुने बरेचसे आपसूकच कालबाह्य ठरले व हवेत विरून गेले.

मराठी कथा, कविता, नाटक, चित्रपट, नाट्यसंगीत, भावगीत, वृत्तपत्र इतकंच नव्हे तर कुटुंबव्यवस्था, राजकारण, समाजकारण, सहकार चळवळ, शासन व्यवस्था, चळवळी यातही निश्चित बदल होऊ लागला. या साऱ्याबरोबरच मराठी हास्यचित्रकलेतही कालानुरूप बदल हळूहळू होत होता. दीनानाथ दलाल हे अधूनमधून ब्रशने राजकीय, सामाजिक फटकारे मारत असत. मासिकातून चौकोनातील हास्यचित्रांची संख्या वाढत होती.
उदंड प्रमाणात मासिकं असणारा तो काळ होता. या मासिकातून प्रामुख्याने कथा, कविता, कादंबऱ्या, ललित लेखन, प्रवासवर्णन याबरोबरच हास्यचित्रांनाही प्राधान्य असायचं. महिन्यातून एकदा प्रकाशन असल्यामुळे संपादकांना थोडा निवांतपणा असायचा. स्वत:ची अभिरुची सांभाळून येणाऱ्या मजकुराची पारख करणं व जमल्यास चर्चा करून त्यात गुणवत्तेची भर टाकणं यासाठी पुरेसा वेळ होता. एकूणच मासिकाचा दर्जा काटेकोर असावा यासाठी संपादक दक्ष असत. व्यंगचित्रकारांनाही स्वत:च्या वाचनासाठी, चर्चेसाठी आणि कामामध्ये सुधारणा करण्यासाठी भरपूर वेळ असायचा आणि मुख्य म्हणजे बहुतेकांची त्यासाठी तशी तयारी असायची. त्या काळात श्री. पु. भागवत, राम पटवर्धन, केशवराव कोठावळे, माजगावकर, विजय तेंडुलकर, अनंत अंतरकर, मधुकर पाटकर, उमाकांत ठोमरे इत्यादी अनेक संपादकांना या माध्यमाची जाण होती. वास्तविक छपाई तंत्रज्ञान आजच्या तुलनेत खूपच मागास किंवा प्राथमिक अवस्थेत होतं; तरीही उभयतांमध्ये नवोन्मेषी उत्साह होता, हौस होती.

या पार्श्वभूमीवर हास्यचित्रकलेमध्ये फार मोठा बदल हळूहळू होत होता. एकाच चित्राच्या खाली दोन व्यक्तिरेखांचे संवाद हा प्रकार जवळपास संपुष्टात आला होता. एखादा विनोद इलस्ट्रेट करणे हा प्रकार थोडा बहुत सुरू होता. पण हे दृश्य माध्यम आहे, यात चित्र अधिक बोललं पाहिजे ही समज हळूहळू येत होती. युरोप, अमेरिकन मासिकातून प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्राचा प्रभाव पडू लागला. त्यांचा अभ्यास होऊ लागला. हे एक प्रकारचं ‘डिस्टन्स एज्युकेशन’च म्हणावं लागेल !

असो , झटकन हसू येईल अशी हास्यचित्रं मराठी मासिकातून धमाल उडवू लागली. तशातच एकच हास्यचित्र देण्यापेक्षा एक विशिष्ट विषय घेऊन त्या अनुषंगाने सात-आठ हास्यचित्रं देण्याचा प्रयोग सुरू झाला आणि मराठी हास्यचित्रकला धावू लागली. त्याकाळी जेमतेम तिशी, पस्तिशी, चाळिशीतले असलेले हे तरुण म्हणजे दीनानाथ दलाल, हरिश्चंद्र लचके, गवाणकर, प्रभाकर ठोकळ, वसंत सरवटे, शि.द.फडणीस इत्यादी आणि त्यानंतर थोड्या कालावधीने आलेले मनोहर सप्रे, श्याम जोशी, मंगेश तेंडुलकर, वसंत हळबे, चंद्रशेखर पत्की, विकास सबनीस, ज्ञानेश सोनार, खलील खान, विजय पराडकर, यशवंत सरदेसाई… असे अनेक !

या नवोन्मेषी वातावरणात या वाकड्या रेषेवर अनेकांनी सरळ मनाने प्रेम केलं आणि तिला हवं तसं वाकवून आपल्यातील सर्जनशीलतेचा प्रत्यय दिला आणि मराठी रसिकांच्या चेहऱ्यावर आश्चर्ययुक्त आनंदाची स्मितरेषा फुलवली.

नेहमीच्या आजूबाजूच्या घटनांवर व्यक्तिरेखांवर बेतलेले प्रसंग हा बहुतेकांच्या हास्यचित्रांचा विषय असायचा. मध्यमवर्गीय मराठी माणूस हा केंद्रबिंदू होता. व्यंगचित्रकार, व्यंगचित्रामधला माणूस आणि वाचक हे सारेच मराठी मध्यमवर्गीय. त्यामुळे ही चित्रं सहज अपील होणारी होती. विषयही अगदी साधे व नेहमीचे असायचे . लग्न, सरकारी कचेरी, शाळा, विविध सण, पोस्टमन, डॉक्टर, फोटोग्राफर, मंत्री, लहान मुलं, गवळी, पोलीस, हमाल, शेजारी असे असायचे. यातला विनोद हा निर्विष होता, खेळकर होता आणि खुदकन हसायला लावणारा होता.

चित्रांमधल्या पात्रातूनही त्या वेळेचा काळ ओळखता येतो. सरकारी कर्मचारी धोतर नेसून ‘हापिसात’ जात, नऊवारी पातळ हे मध्यमवर्गीय स्त्रिया नेसत. तरुण मुली पाचवारी साडी आणि लहान मुली परकर पोलके घालत. तरुण पुरुष मात्र विजारी किंवा ‘प्यांट’ घालत. घराच्या सजावटीत व्हॉल्वचा रेडियो दिसायचा. फुलाफुलांचे पडदे दिसत. रस्त्यावरती क्वचित मोटारगाड्या, भरपूर सायकली , बैलगाड्या वगैरे दिसत. या कालखंडातील चित्रकारांचे विषय जरी तुलनेने एक समान असले तरी प्रत्येकाची शैली निराळी होती.

हरिश्चंद्र लचके हे खऱ्या अर्थाने पहिले प्रचंड काम केलेले असे हास्यचित्रकार होते. सुबक रेखाटन, मध्यमवर्गीय वातावरण, निर्भेळ विनोद यामुळे ते लोकप्रिय ठरले. नागपूरचे नागेश आर्डे, मुंबईचे बाळ राणे हे याच गोष्टींसाठी लोकप्रिय ठरले. प्रभाकर ठोकळ यांची चित्रशैली एकदमच वेगळी. रेखाटन एकदम साधंसुधं, स्केचपेनने काढल्यासारखं. मोठे डोळे, बुटकी माणसं, पायजमा, शर्ट घातलेले पुरुष, फुलाफुलांच्या साड्या नेसलेल्या तरुणी व नाटक ,कथा-कविता या अनुषंगाने फुललेला खुसखुशीत विनोद यामुळे ठोकळ यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

शि. द. फडणीस यांच्या चित्रांनी मराठी व्यंगचित्रकलेला एक वेगळंच परिमाण दिलं. ‘मासिकाच्या मुखपृष्ठावर हास्यचित्र’ या धाडसी कल्पनेमुळे संपादक अनंत अंतरकर आणि व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी मराठी वाचकांची अभिरुची वर्धिष्णू केली . ‘आवाज’सारख्या दिवाळी अंकाने तर ‘खिडकी चित्र’ हा वेगळाच प्रकार आणून धमाल उडवून दिली. त्याचे अनुकरण पुढे अनेक दिवाळी अंकांनी केलं.

गवाणकर यांनीही मराठी हास्यचित्रकारांमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. सहज म्हणून बोलल्या जाणाऱ्या शब्दातून वेगळाच अर्थ निघावा आणि त्याची परिणती हास्यस्फोटात व्हावी असा त्यांचा विनोद. अर्थात त्याच्या जोडीला त्यांनी स्वत:च्या चित्रशैलीचा ठसा निर्माण केला. याच कालखंडात कल्पनेच्या आणि शैलीच्या बाबतीत वसंत हळबे ( इकडे तिकडे चोहीकडे ) आणि श्याम जोशी ( कांदेपोहे) यांनी हास्यचित्रमालिकांत स्वत:ची वेगळी ओळख अधोरेखित केली. दोघेही चित्रकलेचे विद्यार्थी असल्याने चित्रात सफाईदारपणा होता. मनोहर सप्रे यांनीही रोजच्या जगण्यातले विषय घेऊन लक्ष वेधून घेणारी चित्रं काढली. लगबगीने केलेले रेखाटन, दोन किंवा तीन पात्रं, प्रसंग कुठे घडतोय त्याचं जुजबी चित्रीकरण आणि जबरदस्त विनोदी कॉमेंट ! सप्रे यांच्या विविध रसग्रहणात्मक लेखांनीही मराठी व्यंगचित्रकला समृद्ध झाली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे प्रामुख्याने राजकीय व्यंगचित्रकार असले तरी त्यांचे मार्मिकमधील ‘रविवारची जत्रा’ हे साप्ताहिक सदर अनेकदा हास्यचित्रकलेच्या अंगाने जात असे. रेषेबरोबरच मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व हे अनेकदा त्यातून दिसत असे. मराठी हास्यचित्रकलेला एक बौद्धिक दर्जा जर कोणी दिला असेल तर तो वसंत सरवटे यांनी. सुरुवातीपासूनच आपल्याला लोकांना केवळ हसवायचं नसून त्याला इतरही अनेक कलात्मक बाबी शिकवायच्या आहेत असाच जणू त्यांचा दृष्टिकोन असावा! लौकिक अर्थाने सुबक भासणाऱ्या चित्रकलेच्या संकल्पनांची त्यांनी सहज मोडतोड केली आणि गंभीर, गूढ, अतर्क्य, हास्यप्रेरक, विसंगतीपूर्ण, अद्भुत अशा आशयाकडे वाचकांचं लक्ष वळवलं. व्यंगचित्र मालिका हा प्रकार सरवटे यांनी मराठीत आणला. एकाच विषयाची अनेक ‘डेरिव्हेटिव्ह’ कशी मांडता येतात याचा हा एक विलक्षण प्रयोग होता. सरवटे यांची ‘ललित’ दिवाळी अंकांची मुखपृष्ठं ही गंभीर आशय व्यक्त करणारी हास्यचित्रच होती. व्यंगचित्रकलेचं मर्म समजावून सांगणाऱ्या त्यांच्या अनेक लेखांनी मराठी वाचकांचा दृष्टिकोन विस्तारला. सरवटे यांच्या योगदानामुळे धावणाऱ्या मराठी व्यंगचित्रकलेने एकदमच मोठी झेप घेतली असं म्हणणं योग्य ठरेल.

१९८०-८५ नंतर मात्र समाजात सावकाशपणे पण निश्चितपणे मोठे बदल होऊ लागले. शांत जीवन गतिमान होऊ लागलं. अर्थकारण बदललं. जनतेच्या अभिरुची बदलू लागल्या. शिक्षणाचं माध्यम बदलले. रेडिओच्या बरोबरीने दूरदर्शनने आणि नंतर हजारो खासगी वाहिन्यांनी जीवनात प्रवेश केला. कुटुंबव्यवस्था संकुचित होत गेली. शिक्षण, कला यात आवडीपेक्षा व्यावसायिकतेला महत्त्व येऊ लागलं. राजकारण आक्रमक व हिंसाप्रधान होऊ लागलं. भावगीतांचा जमाना संपत चालला. नाटक तीन अंकावरून दोन अंकी झालं . साक्षरतेबरोबरच बेकारी वाढू लागली. जनतेमध्ये असलेल्या आशेची जागा असंतोषाने आणि क्वचित वैफल्यानेही घेतली. तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्व कला शाखांवर होताना दिसू लागला. मासिकं बंद झालीच होती, पण गंभीर वैचारिक साप्ताहिकंही हळूहळू बंद होत गेली. त्यामुळे एखादं सर्वकालीन टिकणारं हास्यचित्र किंवा मालिका सुचली तर ती छापली जाण्यासाठी दिवाळी अंकांची वाट पाहणे नशिबी आलं. मात्र दैनिकांच्या आणि त्यांच्या पुरवण्यांच्या संख्येत वाढ होत होती. सामाजिक, राजकीय साप्ताहिकं वाढू लागली. याचाच परिणाम म्हणजे खुसखुशीत किंवा वैचारिक हास्यचित्राऐवजी ताज्या घडामोडींवर आधारित चटपटीत, राजकीय, सामाजिक व्यंगचित्रांची मागणी वाढू लागली. संपूर्ण व्यंगचित्रकलेला त्यामुळे वृत्तपत्रीय व्यंगचित्रकलेचं एकारलेलं स्वरूप आलं. मात्र या काळात समाजातील हा बदल दिवाळी अंकात हास्यचित्रं काढणाऱ्या चित्रकाराने टिपला नसता तरच नवल. निव्वळ दैनंदिन राजकारणातील घडामोडी टिपणं हे तुलनेने सोपे काम आहे .पण त्याहीपेक्षा थोडी दूरवर नजर टाकून संपूर्ण समाजाचं हे बदलणार रूप पाहणे हे समाजशास्त्रज्ञांचे काम काही मोजक्या व्यंगचित्रकारांनी केलं आहे हे अभिमानाने नमूद करावं असं आहे. या अद्भुत कलेविषयी सातत्याने लेखन करणाऱ्यांचाही उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. सुप्रसिद्ध लेखक मधुकर धर्मापुरीकर, प्रा.प्रकाश चव्हाण, शकुंतला फडणीस यांचे योगदान मोलाचे आहे.

पुढे दिवाळी अंकांची संख्या भरमसाट वाढली. ज्येष्ठ व्यंगचित्रकारांची संख्या वयपरत्वे कमी झाली. व्यंगचित्रकार आणि संपादक यांच्यातील बौद्धिक संवाद कमी कमी होऊ लागला. आपलं नेमकं सामर्थ्य काय याबाबत खुद्द काही व्यंगचित्रकारांमध्येच गोंधळ उडाला. अलीकडच्या दिवाळी अंकातील हास्यचित्रं ही काही सन्माननीय अपवाद वगळता, निष्प्रभ ठरू लागली आहेत. काही वेळेस तर हास्यचित्रांमुळे हसू येण्याऐवजी त्याचं हसं होऊ लागलं. वाचकांच्या समोर दिवाळी अंकांचे गठ्ठे येऊन पडू लागले. नेमकं काय वाचायचं, पाहायचं, बौद्धिक कलात्मक आनंद कसा घ्यायचा यावरून त्यांचाही गोंधळ उडाला आणि एकूणच नव्या जीवनशैलीमुळे वाचकांचा अंकातील रसही कमी होऊ लागला.

हेही वाचा – अद्भुतरस गेला कुठे?

या साऱ्याचा परिणाम म्हणजे निखळ विनोदी, भाषेशी खेळणारी, रेषेशी खिळवून ठेवणारी, तत्त्वज्ञान सांगणारी , गूढपणे मनात घर करणारी, आशयगर्भ, अद्भुतता दाखवणारी इत्यादी अनेक प्रकारची व्यंगचित्रकला जवळपास संपुष्टात आली आणि साहजिकच अशा प्रकारची व्यंगचित्रं न समजणाऱ्या वाचकांच्या एक, दोन नव्या पिढ्यांना आपण जन्म दिला. वास्तविक पत्रकारांमध्ये किंवा संपादकीय विभागात व्यंगचित्रकलेविषयी अज्ञान असण हा ‘जर्नेलिस्टिक क्राइम’ मानला गेला पाहिजे इतकं हे प्रभावी माध्यम आहे. हे टाळायचं असेल तर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातच व्यंगचित्रकला या विषयाला महत्त्व दिले पाहिजे. महाविद्यालयातून व्यंगचित्रकला विषयक कार्यशाळा, स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. साहित्यविषयक काम करणाऱ्या संस्थांनी आवर्जून व्यंगचित्रांची प्रदर्शनं भरवावीत. ज्येष्ठ व्यंगचित्रकारांशी संवाद साधणाऱ्या जाहीर मुलाखती आयोजित कराव्यात. त्यांना जीवन गौरव पुरस्कार द्यावेत. दरवर्षी काही दिवाळी अंकांनी हास्यचित्रांच्या स्पर्धा घ्याव्यात. त्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांना परीक्षक नेमावं. कारण यापूर्वी अशा स्पर्धांतून अनेक नवोदित मंडळींनी बक्षिसं मिळवली ज्यानी पुढे जाऊन या क्षेत्रासाठी महत्त्वाचं काम केलं. आज राज्यात मराठी व्यंगचित्रकलेचं म्युझियम किंवा कायमस्वरूपी गॅलरी असण्याची नितांत गरज आहे.

निव्वळ अशा प्रकारच्या उपक्रमातून भरपूर, उत्तम व्यंगचित्रकार निर्माण होतील हा भ्रम अजिबात नाही. कारण हे सर्जनशील क्षेत्र आहे याची जाणीव आहे. पण यातून या कलेचे उत्तम समजूतदार वाचक तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. कुणी सांगावं, उद्या अशा हजारो वाचकांतून एखाददुसरा व्यंगचित्रकार तयारही होईल ! हास्यचित्रकलेचं मराठी वळण जपायचं असेल तर संपादक, व्यंगचित्रकार आणि अर्थातच वाचक यांच्या सक्रिय सहभागाने ते शक्य होईल. पुढील कालखंड हा सर्जनशील व्यंगचित्रकारांचा आणि दाद देणाऱ्या रसिक वाचकांचा व्हावा असं वाटत असेल तर इतकं तरी करावं लागेल. हे सगळं झालं तर सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे देशभरातील सर्वोत्तम हास्यचित्रं मराठीतच निर्माण होतील आणि या कलेची आज दुष्प्राप्य वाटणारी अवघड रेषा नक्की वश होईल.