– शिल्पा बल्लाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्नाळू व्यक्तीच्या डॉक्युमेण्ट्री बनविण्याच्या ध्यासाची ही गोष्ट. समाजसेवेचे रीतसर शिक्षण घेऊन ते व्रत असल्यासारखे काम माहितीपट क्षेत्रात करून दाखविले. त्यामुळे वैविध्यपूर्ण विषयांचा माग त्यांतून काढता आला… पोपटराव पवारांच्या हिवरे बाजार…. भीमाशंकरजवळचा निसर्गरम्य आदिवासी भाग… छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये चालणाऱ्या बांबूच्या शाळा… नर्मदा आंदोलन… असा डॉक्युमेण्ट्री निर्मितीचा प्रवास..

लहानपणी मला एक खोड होती. जे काही ऐकलं, वाचलं, त्या गोष्टीत आपण आहोत असं स्वप्न बघायचं. जागेपणीच. म्हणजे शिवाजीबद्दल वाचलं, तेव्हा मी दोरावरून गड चढणारा मावळा असायचे. तर कधी हडप्पामध्ये राहणारी मुलगी, जी तिथल्या मोठ्या विहिरीत पोहायची किंवा तिथल्या दगडी मण्यांची माळ गळ्यात घालून, शेजारच्याच मोहेंजोदरोच्या शाळेत जायची. स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांपासून लपून क्रांतिकारकांसोबत एका तळघरात लपलेली मी किंवा माझ्या आजोळच्या जवळच्या पातालकोट या खोल दरीत राहणाऱ्या आदिवासींबरोबर शिकारीला गेलेली. मी जेव्हा मोठी झाले, तेव्हा तरी ही स्वप्न संपावीत ना, पण तोवर स्त्री- पुरुष समानतेचा किडा चावला होता आणि ‘एमएसडब्ल्यू’ला (समाजसेवा विषयात मास्टर्स) प्रवेश मिळाला होता.

हेही वाचा – निरंकुश सत्ताधाऱ्यांचा धांडोळा

घरातल्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडल्यावर, समाजातल्या वास्तवानं चांगलेच चटके दिले. ‘बर्न्स’ वॉर्डमध्ये काम करताना बाईच्या आयुष्याचं भीषण सत्य, बडोद्याजवळच्या खेडेगावात प्लेसमेंट असताना बघितलेलं जात वास्तव, हे भिडतच होते. १६ वर्षांची असताना बाबरी मशिदीच्या पाडलेल्या ढांच्यावर भगवा ध्वज फडकवण्याचं स्वप्न बघणारी मी, ‘एमएसडब्ल्यू’ संपताच मुस्लीम मुलाच्या प्रेमात देखील पडले होते. २००२ च्या गुजरातमध्ये राहताना गांधी, आंबेडकर, बुद्ध हे सारखे स्वत:कडे ओढत होते. विचारांनी संपूर्ण गिरकी घेतली होती आणि आता समानतेवर आधारलेल्या समाजाची स्वप्न बघणं सुरू केलं होतं. भुजच्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या जामनगरमध्ये काम करायला आलेल्या ‘ब्रिटिश रेड क्रॉस’मध्ये मी काम करणं सुरू केलं. भरघोस पगार, मोठी टीम, एकटीनं घर भाड्यानं घेऊन राहण्याची स्वतंत्र जीवनशैली, माझं आनंदात सुरू असताना, मला लहानपणी बघितलेलं स्वप्न आठवलं. फिल्म बनवण्याचं!

‘‘असं नसतं, मनात आलेली प्रत्येक गोष्ट करायची नसते.’’ मला ‘बघायला’ आलेल्या एका मुलानं, नकाराची संधी मला आयतीच आणून दिली. आता हट्टानं मी हेच स्वप्न बघणार होते! फिल्म मेकर होण्याचं. पण म्हणजे कसं? सगळ्यांचे नातेवाईक पुण्यात असतात तसे माझेही होते. एका भावाच्या मित्रामार्फत एक संपर्क मिळाला – सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर यांचा. आणि मराठीत म्हणतात ना- ‘रेस्ट इज हिस्टरी!’ माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला तेव्हा सुरुवात झाली. ‘बाधा’ फिल्मच्या सेटवर तिसावा आणि पुण्यातला पहिला वाढदिवस झाला आणि मी पुण्याची झाले. त्याला आता २० वर्षे झालेत. पुण्यात जन्मलेल्या आणि त्यामुळं सगळं सहजगत्या मिळालेल्या पुणेकरांना जेव्हा मी पुण्याबद्दल कुरबुर करताना बघते, तेव्हा वाटतं – ‘इन दो अक्षरों के शहर की कीमत तुम क्या जानों पुणेरी बाबू….!’

भावे – सुकथनकर द्वयीसोबत ‘बाधा’ आणि ‘नितळ’ या दोन चित्रपटांना दिग्दर्शन साहाय्यक म्हणून काम करताना शिकलेलं तंत्र आणि तोवर घालवलेल्या आयुष्याचे अनुभव घेऊन माझा ‘डॉक्युमेण्ट्री’ बनवण्याचा प्रवास सुरू झाला. समीर शिपूरकर या मित्रासोबत सुरुवातीला विज्ञान आश्रम या संस्थेच्या कामाबद्दलचा माहितीपट बनवणं ही स्व-शिक्षणाची सुरुवात होती. फीचर फिल्म बनवणं वेगळं आणि माहितीपट बनवणं हे संपूर्ण वेगळं. त्यातही माझ्यासारख्या, प्रशिक्षित समाजसेवा पदवीधर व्यक्तीला तर दोरीवरची कसरत. आपण नेमके कोण आहोत? समाजसेवक की फिल्म मेकर? कार्यकर्ते की कलाकारा? ‘स्व’ चा शोध लावता आला तरच समाजातल्या वास्तवाचा शोध घेता येईल. काही संस्था, व्यक्ती भेटल्या, ज्यांना त्यांच्या कामावर फिल्म बनवून हवी होती. काहींना काही विषय इतरांपर्यंत पोचवण्यासाठी फिल्म्स या गोष्टीचं महत्त्वं लक्षात येत होतं. त्यांच्यासाठी १०- १२ फिल्म्स बनवल्या. भीमाशंकरजवळच्या निसर्गरम्य आदिवासी भागात महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांच्या कामावर केलेल्या फिल्मच्या शूटिंगच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. हिरवेगार डोंगर, नितळ पाणी, पांढरेशुभ्र आणि पाऊस पडताच लाल होऊन वाहणारे धबधबे, छोट्याशा होडीत बसून मासे पकडणारे आदिवासी, हॉस्टेलमधल्या हुशार मुली, हसऱ्या बायका, मध, हिरडा, चारोळी गोळा करणारी माणसं, शेतात एकत्र पेरणी करताना गाणी म्हणत, भाताची खाचरं हिरवीशार करून टाकणारे शेतकरी, देवराईत उंच टोकावरून उड्या मारणारं शेकरू, विस्तीर्ण पसरलेल्या कोकणकड्याला आपल्या मिठीत घेणारे ढग, सगळंच अद्भुत, पण सर्वात विलक्षण होतं ते विजांच्या कडकडाटात बघितलेलं रात्रीचं इंद्रधनुष्य!!! आयुष्याला असतात तशा सर्व ग्रे शेडस असलेलं – रात्रीचं इंद्रधनुष्य!!!

असीम आणि रमा सरोदे हे खूप जवळचे मित्र. त्यांच्या कामावर केलेली ‘न्याय निवारा’ ही डॉक्युमेण्ट्री फिल्म करताना माझं अर्धवट राहिलेलं ‘वकील बनण्याचं स्वप्न’ जगता आलं खून, बलात्कार, कौटुंबिक हिंसा, बाल मजुरी, चुकीच्या शिक्षा हे इतर वेळी बरेच लांबचे विषय वाटतात, पण एकेक केस ऐकताना आपल्या समाजातल्या अन्यायाबद्दल चीड येत राहायची. पोलीस, न्यायालय या व्यवस्था किती खिळखिळ्या झालेल्या आहेत, हाती पैसा आणि सत्ता नसलेला माणूस हा नागरिक तर दूर, साधा माणूस म्हणूनदेखील खिजगणतीत नसतो हे खूप अस्वस्थ करणारं होतं. होऊ घातलेले वकील आणि त्यांनी संवेदनशील असावं यासाठी असीम – रमाची सुरू असलेली धडपड हा या डॉक्युमेण्ट्रीचा एक मुख्य धागा होता. मानवी हक्क आणि त्याबद्दल सामान्य माणसाची जागृती हा उद्देश ठेवून केलेली ही फिल्म नंतर या वकिलांनी बरीच उपयोगात आणली.

ज्योती मुंगसे ही स्वत: हृदय रोगासोबत जगणारी मुलगी, जन्मजात हृदय रोग असणाऱ्या बाळांवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यासाठी काम करत होती. हृदय ज्योत ही तिची संस्था. शरीरानं बरीच अशक्त पण मनाच्या ताकदीनं खूपच शक्तिवान असणाऱ्या ज्योतीनं फिल्म करण्याचा ध्यास घेतला. मी फक्त माध्यम होते. पैसे उभे करणं, निवेदन लिहिणं, इतर पेशंटच्या भेटी घेऊन त्यांच्या शूटिंगची तयारी करणं, दीनानाथ मंगेशकरसारख्या मोठ्या दवाखान्यात शूटिंगसाठी परवानगी घेणं, हे सगळं ज्योती स्वत: करत होती. ‘‘काही दुखलं तर आपण जिवंत आहोत याची प्रचीती येते’’ असं म्हणणारी ज्योती, खूप ठिकाणी तिच्या ‘हृदयाची गोष्ट’ दाखवत, जनजागृती करत हिंडत होती. अखेर इतकं मोठं हृदय असणं तिच्या शरीराला झेपलं नाही. तिनं तीन वर्षांपूर्वी इथला निरोप घेतला. कितीही कठीण आव्हानं असली तरी त्याला हसतच सामोरं जायचं, हे मी ज्योतीकडून शिकले.

‘बाएआयएफ’साठी बचत गटावर केलेल्या तीन फिल्म्सची मालिका असो किंवा पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारावर, त्यांच्या सोबत संपूर्ण गाव फिरत शूट केलेली फिल्म, ‘बचपन बनाओ’ या संस्थेच्या मदतीनं युनिसेफसाठी छत्तीसगढच्या दंतेवाडा मध्ये चालणाऱ्या बांबूच्या शाळांवर, मनाला घरं पाडणाऱ्या सत्याला सामोरं जात केलेलं शूटिंग असो (दंतेवाडामध्ये शूटिंग या शब्दाला खूप वेगळा अर्थ असतो), किंवा मागे समीर सोबत ग. प्र. प्रधान आणि डॉ. अनिल सद्गोपाल यांचे घेतलेले तासनतास मोठे इंटरव्ह्यू आणि नंतर त्यांचं केलेलं संपादन हे सगळं खूप समृद्ध करत होतं. जगण्याला हवी त्यापेक्षा जास्त ऊर्जा देणारं होतं.

हेही वाचा – ‘रजनी’च्या पुनर्शोधासाठी ‘रजिया’चा लढा

मग आलं नर्मदेचं बोलावणं! मेधा पाटकर या माझ्या अत्यंत लाडक्या व्यक्ती. आस्तिक लोकांसाठी काशी, मक्का, अमृतसर, वॅटिकन जितक्या महत्त्वाचं असेल तितकं, किंवा त्याहून अधिक जवळचं मला नर्मदेचं खोरं आहे. तीच माझी काशी, तोच माझा मक्का! नर्मदा बचाओ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी लेकरांसाठी सुरू केलेल्या जीवनशाळेच्या शिक्षकांसाठी मी प्रशिक्षण घ्यावं असं मला विजया चौहान यांनी सुचवलं. तेव्हा मी विदर्भातल्या ताडोबा अभयारण्या जवळच्या चार सरकारी शाळांमध्ये शिक्षक प्रशिक्षण घेत होते, हे मेधा ताईंच्या कानावर पडलं आणि त्यांनी मला बोलावलं. नास्तिक असल्यामुळे नशीब, दैव याला मानत नसल्यामुळे हे माझं कर्तव्यच आहे, म्हणून मी तिकडे धावा घेतला. पावसाळा होता, मणिबेलीच्या संघर्षाला २५ वर्ष झाले, त्यामुळे आंदोलनाचे कार्यकर्ते आणि मेधाताई, देशभरातल्या आम्हा पन्नास एक माणसांना घेऊन, मणिबेली दाखवायला निघाल्या. मोठी नाव होती. आम्ही घोषणांमध्ये शक्य तेव्हढं सामील होत, प्रश्न विचारत नावेत बसून होतो. अतिशय मोठ्या जलाशयाच्या मध्यभागी पोचल्यावर मेधाताई म्हणाल्या ‘‘आपण आत्ता ज्या पाण्यावरून जात आहोत, त्याच्या खाली जलसिंधी हे गाव होतं, आणि तिकडे चिमलखेडी!’’ मी आजही त्या धक्क्यातून सावरले नाहीये. म्हणजे मी बडोद्याला ज्या समाजसेवेचं उच्च शिक्षण घेत होते, त्याच्या इतक्या शेजारी, समाजसेवेचं मूर्तिमंत साक्षात रूप असलेल्या या बाई, लाखो आदिवासी आंदोलकांसोबत अहिंसक संघर्ष करत होत्या. स्वत:चं आयुष्य, घरदार पणाला लाऊन इथल्या लोकांना घरं आणि आयुष्य मिळवून देण्यासाठी खस्ता खात होत्या त्याबद्दल या डोंगरपलीकडे असलेल्या समाजाला काहीच देणघेणं नाही? मला लगेच लक्षात आलं की या उच्च मानवी मूल्य असलेल्या आदिवासी समाजातल्या शिक्षकांना प्रशिक्षण द्यावं इतकी माझी लायकी नाही. मी तेव्हाच ठरवलं – आपण यावर फिल्म करायची. १९९४ साली आनंद पटवर्धन यांनी केलेली ‘नर्मदा डायरीज’ बघितली होतीच. नर्मदेचा हा लढा मागची ३५ वर्ष सुरू होता, अजून बरंच काम उरलं होतं, पण खूप मोठं काम या संघर्षातून उभं राहिलं होतं. तीन पिढ्या यातून तावूनसुलाखून निर्माणाचं काम करत होत्या, ते मला बाहेरच्या समाजाला दाखवायचं होतं. मी आता नर्मदेची होते, आंदोलनाची साथी होते. ‘आमु आखा एक से’ म्हणताना कंठ दाटून येत होता. किडे, मुंगी, झाडं, पाचोळा, पक्षी, नदी, माती, माणूस, प्राणी, दगड, आकाश – आपण सगळे एक आहोत असं समजणारा आदिवासी समाज किती मोठा आहे, ही माणसं किती प्रगल्भ आहेत हे जाणवलं. इतर माणसं आदिवासींच्या समजुतीपर्यंत, त्यांच्या माणूसपणापर्यंत कधी पोचतील काय माहीत. या प्रेरणेतून तयार झाला – ‘लकीर के इस तरफ’. माझी एक माणशी टीम. कॅमेरा, संकलन, निवेदन, दिग्दर्शन, ध्वनी सगळंच एकहाती. पण तयार झालेली फिल्म माझी उरली नाही, ती नर्मदेची होती, तिथल्या आंदोलकांची होती. संघर्षाची होती. मेधाताईंची होती. याच मेधा पाटकरांवर खोटे आरोप करून, त्यांना बंदिस्त करण्याचे मनसुबे रचणारं आजचं सरकार कुठल्या तोंडानं स्वत:ला लोकाभिमुख म्हणू शकेल? लोकशाहीवादी म्हणू शकेल? महाराष्ट्राच्या समाजशास्त्र पुस्तकात सामाजिक आंदोलन या विषयाला आधार म्हणून ‘लकीर के इस तरफ फिल्म’ चा उल्लेख आहे याचं समाधान वाटतं.
त्यांनंतर वर्धा – गोपुरीला तयार होणारी सेंद्रिय खादी, त्याची पिकापासून, कापड बनण्यापर्यंतची प्रक्रिया याबद्दल एक फिल्म केली आहे. पुढची फिल्म सुरू आहे ‘पितृसत्ता’ या विषयावर! भारताच्या १६ राज्यांमध्ये शूट करून, सावित्रीबाईंच्या जन्मदिनी ३ जानेवारीला ही फिल्म प्रदर्शित करावी असा मानस आहे.

मनाच्या खूप जवळ असलेल्या शेजारच्या पाकिस्तानमधल्या हडप्पाला अजून जाता आलं नाहीये, पण भारतात असलेल्या सिंधू घाटी सभ्यतेचे काही धागे अजून शिल्लक आहेत, त्यातलं एक म्हणजे तिथल्या दगडी मण्यांच्या माळा, ज्यांची स्वप्न मला लहानपणी पडायची, त्यावर एक फिल्म करणं सुरू आहे. आताचं स्वप्न आहे – इतर जगांची ओळख सुखासीन समाजाला करून देणं. कितीही कठीण वाटली, कुणी अशक्य म्हटलं तरी स्वप्नं बघत राहावीत. कारण कवी पाश यांनी म्हटलंच आहे – सबसे खतरनाक होता है, सपनों का मर जाना!

shilpballal@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is the story of a dreamer obsession with making a documentary ssb
Show comments