आमच्या कुळातला
कोण पापी माणूस मुतलाय खळखळ झऱ्यात
म्हणून आम्हाला
स्वच्छ वाहतं पाणी नजरेलाही पडत नाहीय
नदीची खणा-नारळानी
ओटी भरत राहिलो
नदीही येत राहिली
माहेरवाशीण लेकीसारखी,
अंगावर तरंग खेळणारं
तुडुंब पाणी नांदलंच नाही कधी
तळ्याला मोजपट्टय़ा लागल्या
नदीची वाळूसुद्धा उपसून नेली
धनदांडग्यांनी,
उपचाराच्या शोधात
जखमी माणसाला खांद्यावर घेऊन
फिरल्यासारखे
रिकामे हंडे घेऊन
पाण्याच्या शोधात अनवाणी पाय
ज्यांच्यात काही विकत घेण्याची
ताकदच निर्माण होऊ शकली नाही
त्यांनी पाच रुपयाला
हंडाभरून पिण्याचं पाणी विकत घ्यावं
हे एकेक दिवस जिवंत राहण्याची
परवानगी घेतल्यासारखं
विहिरीतल्या चिमूटभर
पाण्याभोवती वळवळणारे पोहरे
दगडी शस्त्र हातात घेऊन
शिकारीमागं पळणारा
नंगा माणूसच आवृत्त होतोय
टॅंकरमागं पळणाऱ्या माणसाच्या निमित्तानं
लागू नयेत मुंग्या म्हणून
कोरडय़ाठण्ण डोळ्याने
धरून ठेवलेली ओल
त्यात तडफडतायत
हे अभागी दिवस

 दासू वैद्य
(आगामी संग्रहातून)

Story img Loader