रघुनंदन गोखले
विचार करायला लावणारा आणि मेंदूपेशींना ताण देणारा, अशी बुद्धिबळाची ओळख. पण डोळ्यांवर पट्टी बांधून या ताणात आणखी भर पाडून विश्वविक्रम करणारे थोडे नाहीत. कुणाला प्रतिस्पध्र्याकडे पाठ करून त्याला नमवण्यात सुख लाभते. कुणी सायकल चालवता चालवता वर डोळे बंद करून हा खेळ अतिसोपा असल्याचे सांगू पाहतो. शेकडो वर्षांपासून देशोदेशी चालत आलेल्या बुद्धिबळातल्या या ‘आंधळ्या कोशिंबीरी’चे कित्येक मासले..
आधीच्या लेखात आपण एक खेळाडू अनेक खेळाडूंशी खेळलेल्या प्रदर्शनीय सामन्यांविषयी वाचलं. आज आपण बघू या डोळय़ावर पट्टी बांधून खेळल्या जाणाऱ्या प्रदर्शनीय सामन्याविषयी! हे प्रदर्शनीय सामने वेगवेगळय़ा प्रकारे खेळले जातात. कधी कधी हा खेळाडू वेगळय़ा खोलीत बसतो आणि स्वत: प्रतिस्पर्धी अथवा एखादा स्वयंसेवक त्याच्याकडे जाऊन स्वत:ची चाल सांगून त्याचे उत्तर घेऊन परत येतो. रेक्स स्टाउट नावाच्या अमेरिकन रहस्यकथा लेखकानं त्याच्या ‘गँबिट’ नावाच्या कादंबरीत अशा प्रदर्शनीय सामन्याची पार्श्वभूमी घेतलेली आहे.
दुसरा प्रकार आहे तो जास्त प्रसिद्ध आहे. खेळाडू प्रेक्षकांच्या समोर डोळय़ावर पट्टी बांधून बसतो. काही शंका राहू नये म्हणून तो मास्टर (अथवा ग्रँडमास्टर) त्याच्या प्रतिस्पर्धी गटाकडे पाठ करून बसतो. युटय़ुबवर जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनचा व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामध्ये मॅग्नसनं एका वेळी १० खेळाडूंना स्वत:च्या डोळय़ावर पट्टी बांधून पराभूत केलं आहे. वाचकांनी तो जरूर बघावा आणि त्याचा आनंद घ्यावा.
भारतात सर्वात गाजलेले असे प्रदर्शनीय सामने अमेरिकन ग्रँडमास्टर तिमुर गॅरेयेव यानं मुंबईत खेळले होते. जानेवारी २०१८ ला एका प्रदर्शनीय सामन्यात गॅरेएवनं एका वेळी १२ जणांना डोळय़ावर पट्टी बांधून पराभूत केलं होतं- आणि तेही व्यायामाची सायकल चालवताना! त्यानं १२ जणांना पराभूत करताना २२ किलोमीटर्स सायकल चालवली होती. परंतु मजा म्हणजे, सोव्हिएत संघराज्यानं १९३० साली या प्रकारावर बंदी घातली होती, कारण यामुळे आपल्या मनावर अति ताण येतो असं त्या वेळी मानसशास्त्रज्ञांचं मत होतं. गंमत म्हणजे, माजी विश्वविजेत्या मिखाईल बॉटविनिकचाही त्याला दुजोरा होता. कालानुरूप हळूहळू त्यांनी त्यावरची बंधनं कमी केली आणि आज डोळय़ावर पट्टी बांधून खेळणं हा एक राजमान्य प्रकार झाला आहे.
आपल्याला अभिमानास्पद वाटावी अशी एक माहिती देतो. भारताचा (आणि महाराष्ट्राचा) अव्वल खेळाडू आणि ग्रँडमास्टर विदित गुजराथी या प्रकारात खूप तरबेज आहे. समोर पट नसताना बुद्धिबळातील कठीण कूटप्रश्न तो लीलया सोडवतो. सामान्य खेळाडूला समोर पट असताना जे कठीण जाते ते विदित आपल्या अफाट स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर करू शकतो.
जगात एक स्पर्धा अनेक वर्षे खेळली गेली- जिच्यामध्ये एक भाग होता जलदगती बुद्धिबळाचा. नंतर प्रत्येकाला त्याच प्रतिस्पध्र्याशी मोहरा न वापरता लढत द्यायची असे. फक्त येथे डोळय़ावर पट्टी न बांधता संगणकासमोर बसून खेळायचं! त्या संगणकावर रिकामा बुद्धिबळ पट समोर असायचा आणि फक्त प्रतिस्पध्र्याची शेवटची खेळी खेळाडूला दिसायची. मोनॅकोमध्ये व्हॉन ऊस्टरॉम नावाचा अब्जाधीश बुद्धिबळप्रेमी आपली मुलगी मेलडी अंबर हिच्या नावानं ही स्पर्धा आयोजित करायचा आणि खेळाडूंच्या ऐषारामाची बडदास्त ठेवायचा. १९९२ ते २०११ पर्यंत दर वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचं निमंत्रण यावं म्हणून जगातले अव्वल खेळाडू देव पाण्यात बुडवून असायचे. भारताचा मानिबदू असणाऱ्या विश्वनाथन आनंदनं ५ वेळा ही स्पर्धा जिंकली. त्यात त्याच्या पटाकडं न बघता खेळण्याच्या कसबाचा मोठा वाटा होता.
आता आपण बघू या अचाट विक्रमाकडे! असं मानलं जातं की, सैद बिन जुबेर (जन्म इ. स. ६६५ मृत्यू इ. स. ७१४) नावाच्या खेळाडूनं मध्य-पूर्वेत पहिल्यांदा असा प्रयत्न केला होता. पण त्याची अधिक माहिती उपलब्ध नाही. १७७३ साली फ्रेंच खेळाडू फिलिडोर यानं डोळय़ावर पट्टी बांधून एका वेळी ३ खेळाडूंशी लढत दिली होती. त्या वेळी फ्रेंच वर्तमानपत्रांनी त्याची चांगलीच दखल घेतली होती. पण अमेरिकन पॉल मॉर्फी यानं पॅरिसमध्ये १८५८ मध्ये तब्बल ८ उत्तम खेळाडूंशी डोळय़ावर पट्टी बांधून लढत दिली आणि त्यानं खरी खळबळ उडवून दिली होती. मॉर्फी ८ पैकी ६ जिंकला आणि २ सामन्यांमध्ये त्याला बरोबरी स्वीकारावी लागली.
नंतर अनेक खेळाडूंनी डोळय़ावर पट्टी बांधून खेळणं हे आपल्या उत्पन्नाचं साधन बनवलं. मॉर्फीशी सामना हरलेला पॉलसन हा प्रख्यात खेळाडू असो किंवा इंग्लिश खेळाडू ब्लॅकबर्न असो, या प्रकारात नावाजलेले होते. २० वं शतक उजाडलं आणि एकाहून एक विक्रम करायची चढाओढ सुरू झाली. १९२५ साली अलेखिननं २८ जणांशी एका वेळी लढत दिली आणि नवा विश्वविक्रम केला. पुढच्याच वर्षी ग्रँडमास्टर रिचर्ड रेटी यानं २९ खेळाडूंशी खेळून अलेखिनला मागे टाकलं. गंमत म्हणजे डोळय़ावर पट्टी बांधून २९ डाव डोक्यात ठेवणारा रिचर्ड रेटी हॉटेल सोडताना आपली बॅग विसरला. त्यावर त्यानं ‘माझी स्मरणशक्ती कमजोर आहे,’ असं उत्तर दिलं.
१९३४ साली शिकागो येथे जगज्जेत्ता अलेक्झांडर अलेखिननं ३२ डाव न बघता खेळून नवीन विश्वविक्रम रचला. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डस्ने जॉर्ज कोल्टनोवस्कीचा ३४ खेळाडूंशी खेळलेला विक्रम अधिकृत मानला आणि नॅजदॉर्फच्या ४० खेळाडूंशी खेळल्या गेलेल्या विक्रमला मान्यता दिली नाही. परंतु १९३९ च्या नॅजदॉर्फच्या विक्रमाचा उद्देश वेगळाच होता. पोलंडतर्फे अर्जेटिनामधील ऑलिम्पियाडमध्ये खेळणाऱ्या या ग्रॅण्डमास्टरला हिटलरनं ताब्यात घेतलेल्या मायदेशातील आपल्या कुटुंबीयांना आपण सुखरूप आहोत असं कळवायचं काम या विक्रमानं केलं. दुर्दैवानं दुसऱ्या महायुद्धानं नॅजदॉर्फ आणि कुटुंबीयांची कायमची ताटातूट केली.
आणखी एक विक्रम असाच वेगळय़ा कारणानं केला गेल्याची दंतकथा आहे. यानोस फ्लेच या हंगेरीच्या खेळाडूला १९५९ साली कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलं आणि त्याला कोणीतरी असं सांगितलं की, त्यानं आपल्या शरीर आणि मनाला क्लेश दिले तर त्याचा कर्करोग बरा होईल. आपल्या मनाला क्लेश देण्यासाठी त्यानं बुडापेस्टमध्ये एक वर्षभर पटाकडे न बघता एका पबमध्ये रोज खेळण्यास सुरुवात केली. त्यानं १९६० साली ५२ जणांशी डोळय़ावर पट्टी बांधून लढत दिली आणि त्यामधले ३१ सामने जिंकले. जरी या प्रदर्शनाचा व्हिडीओ उपलब्ध असला तरी यानोसला अधिकृत रेकॉर्डचा मान मिळाला नाही. कारण या सामन्यात अनेक प्रतिस्पर्धी कंटाळून डाव सोडून गेले होते. फ्लेचला १९६३ साली आंतर राष्ट्रीय मास्टर किताब आणि १९८० साली ग्रँडमास्टर किताबानं गौरवण्यात आलं. १९८३ साली मोटार अपघातात मृत्यू होईपर्यंत जगलेल्या फ्लेचचा बुद्धिबळामुळे आपला कर्करोग बरा झाल्याच्या गोष्टीवर विश्वास होता.
आता आपण महिला खेळाडूंकडे वळू. पोल्गर भगिनी आणि त्यांच्या अचाट कामगिरीमुळे प्रेरित होऊन जगभरातील अनेक मुलींनी बुद्धिबळाकडे मोर्चा वळवला आहे. पटाकडे न बघता बुद्धिबळ खेळणं हा पोल्गर भगिनींच्या सरावाचा एक मोठा भाग होता. १९८६ साली ९ वर्षांच्या ज्युडिथच्या कौशल्यावर फिदा होऊन न्यू यॉर्क टाइम्सनं ‘THE GIRL WHO BEATS YOU WITH HER EYES CLOSED’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. १९८७ साली बीएल (स्वित्र्झलड) येथून टेलिव्हिजनवर १० वर्षांची ज्युडिथ आणि ११ वर्षांची सोफीया या पोल्गर भगिनींचा एक प्रदर्शनीय सामना ठेवला गेला. अवघ्या ५ मिनिटांत या मुलींनी कमालीचा खेळ करून सर्व प्रेक्षकांना थक्कं केलं होतं. मेलडी अंबर स्पर्धेमध्ये ज्युडीथनं माजी विश्वविजेत्या अनातोली कार्पोवला डोळे बांधून खेळताना पराभूत केलं होतं.
सध्याचा विश्वविक्रम तिमूर गॅरेयेवच्या नावावर आहे. त्याचा उल्लेख आपण वर केलेला आहेच. २०१६ साली त्यानं ४८ जणांशी डोळय़ावर पट्टी बांधून लढत देऊन आपलं नाव अजरामर केलं आहे. ग्रँडमास्टर गॅरेएवला आज ब्लाइंडफोल्ड किंग या नावानं ओळखलं जातं.
या विषयावर लिहिण्यासारखं भरपूर आहे आणि ते मनोरंजकही आहे. टायग्रेन (Tigran)) पेट्रोसिअन या जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरवण्यासाठी बोरिस स्पास्की आणि मिखाईल ताल यांच्यात १९६५ साली लढत झाली होती. त्याचा सराव स्पास्कीनं ८ चांगल्या खेळाडूंशी डोळय़ावर पट्टी बांधून केला होता. ताल वरील स्पास्कीच्या विजयाचं श्रेय स्पास्कीचा प्रशिक्षक ग्रँडमास्टर बॉण्डरेवस्की या सरावालाच देत असे.
ऊठसूट सर्वाना उपदेश न केला तर तो प्रशिक्षक कसा? त्यामुळे आता मी नवख्या खेळाडूंसाठी (आणि त्यांच्या प्रशिक्षकांसाठी) एक टीप देतो- जेणेकरून त्यांना स्वत:च्या खेळात आणि पर्यायानं शालेय निकालांमध्ये सुधारणा करता येईल. पटावर एखाद्या प्रख्यात खेळाडूनं खेळलेला डाव लावा. जेथे त्या डावाला कलाटणी मिळाली आहे त्या खेळीपर्यंत डाव आणा आणि तीच परिस्थिती दुसऱ्या पटावर लावायचा प्रयत्न करा. त्यानंतर दोन्ही पट ताडून पाहा. जर दोन्ही पटांवर एकच स्थिती असेल तर स्वत:ची पाठ थोपटून घ्या. पुढची पायरी म्हणजे, तोच डाव पुस्तकात बघून पटावर लावून बघा आणि नंतर पुस्तकात न बघता तोच संपूर्ण डाव पटावर लावायचा प्रयत्न करा. या प्रकारे सराव केलात तर तुमची कल्पनाशक्ती वाढेल आणि तुमची स्मरणशक्ती वाढून नुसत्या बुद्धिबळातच नव्हे, तर अभ्यासातही त्याचा उपयोग होईल. बघा हा प्रयोग करून आणि कळवा मला त्याचा उपयोग झाला की ते!
gokhale.chess@gmail.com