जगभरातील स्वच्छतागृहांच्या उत्क्रांतीची साक्ष देणारे ‘सुलभ टॉयलेट म्युझियम’ दिल्लीत उभारण्यात आले आहे. सध्या देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाच्या पाश्र्वभूमीवर या आगळ्या संग्रहालयाविषयी..

सकाळी उठल्यावर आपल्या नैसर्गिक हाकेला ‘ओ’ देण्याची रूढी आदिमकाळापासून रूढ आहे.  मानवी जीवन जसजसे उत्क्रांत झाले तसतशी निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची पद्धती बदलली; उत्क्रांत झाली. या उत्क्रांतीचे साक्षीदार आहे दिल्लीस्थित ‘सुलभ टॉयलेट मुझियम!’ दिल्लीच्या ल्यूटन्स झोनमधील सत्ताधुंद वातावरण व चाँदनी चौकातल्या लजीज खाद्यपदार्थाच्या घमघमाटापासून दूर, परंतु अत्यंत गजबजलेल्या महावीर एन्क्लेव्ह परिसरात हे म्युझियम आहे. कधीकाळी गावोगावचे पाणवठे जातिव्यवस्थेचे प्रतीक होते, त्याचप्रमाणे शौचालयांनाही वर्गसंघर्षांचा इतिहास आहे.  त्याला आर्थिक संघर्षांची वर्चस्ववादी किनारही आहे. आपल्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग असलेल्या शौचालयाचे भूत, भविष्य व वर्तमान या संग्रहालयात चितारलेले आहे.

water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
Uttar Pradesh Sambhal Excavation
Uttar Pradesh Sambhal Excavation : उत्तर प्रदेशातील संभलमध्‍ये उत्खननावेळी आढळली १५० वर्षे जुनी पायऱ्या असलेली विहीर
Women Worli agitation toilets, Mumbai,
मुंबई : वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा; सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर

दोन युरोपीय समुदायांतील संघर्ष शौचालयाच्या उत्क्रांतीतही उमटलेला दिसतो. ब्रिटिशांच्या वर्चस्वाला तोंड देण्यासाठी फ्रेंच लोकांनी आगळी शक्कल लढविली. त्यांनी चक्क शेक्सपीअरच्या पुस्तकांच्या प्रतिकृतीचेच टॉयलेट बनवले व त्याचा वापरही केला. अर्थात त्यामुळे शेक्सपीअरचे महत्त्व कमी झाले नाही; पण ब्रिटिशांमुळे आलेल्या न्यूनगंडावर मात करण्याचे समाधान तेवढे फ्रेंच लोकांना मिळाले. फ्रेंचांनी वापरलेल्या शेक्सपीअरच्या ‘मॅक्बेथ’च्या टॉयलेटची प्रतिकृती या संग्रहालयात पाहायला मिळते.

मानवी वस्तीच्या सर्वात पुरातन खुणा हडप्पा संस्कृतीत सापडतात. हडप्पा संस्कृतीत मल व जलनि:सारणाचे सुयोग्य व्यवस्थापन होते. शौचाला जाताना पाण्याचा वापर करणारी पहिली संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती अशी नोंद संग्रहालयातील दस्तावेजामध्ये आढळते. तशीच रचना पुढे इजिप्तमध्येही आढळून आली. भारतीय शैलीनुसार इजिप्तचे लोक शौचाला बसत असत. त्यामुळे हडप्पा व इजिप्तमध्ये परस्पर-व्यवसाय होत होता, असा निष्कर्ष काढता येतो.

साधारण १२ व्या- १३ व्या शतकात युरोपमध्ये रस्त्यावर मैला फेकत असत. या मैल्यामुळे युरोपमध्ये संसर्गजन्य रोग पसरले.  कसाबसा युरोपने त्यातून नंतर मार्ग काढला. शौचालयाचा शोध तोपर्यंत लागला नव्हता. पण मलविसर्जनासाठी मानवी वस्तीपासून दूर गेले पाहिजे, हा धडा युरोपने या रोगराईतून घेतला. सहाव्या-सातव्या शतकात ऑस्ट्रियात सामूहिक मनोरंजनासाठी जत्रा व मेळावे भरत. या मेळाव्यांमध्ये नैसर्गिक विधी उरकण्यासाठी महिलांच्या मदतीला ‘बकेटवूमन’, तर पुरुषांसाठी ‘बकेटमॅन’ धावून येत. या बकेटमॅन/ वूमनकडे एक बादली आणि माणूस झाकला जाईल इतके मोठे कापड असे. डोक्यावरून सबंध अंग झाकून या बादलीवर बसायचे व विधी उरकायचा. या बादलीची विल्हेवाट लावण्याचे काम बकेटमॅन/ वूमन करीत. त्यासाठी त्यांना आर्थिक मोबदला दिला जाई.

संग्रहालयात ब्रिटिशांचे बहुपयोगी टॉयलेट आहे. वरून दिसताना टेबल आणि वरची फळी बाजूला केल्यावर टॉयलेटचा पॉट, त्याखाली बादली. हे टेबल शिकारीला जाताना वापरत असत. टेबलावर बुद्धिबळ खेळा, जेवण करा व जेवणानंतर ‘प्रेशर’ वाढले तर त्यावरच बसा! आधुनिक म्हणता येईल असे हे टेबल.

चैन करणारे लाजतील असे एक टॉयलेट या संग्रहालयात आहे. १४ व्या लुईसच्या सिंहासनाची प्रतिकृती! ही प्रतिकृती मिळवण्यासाठी बरेच कष्ट पडल्याचे गाइड राजू सिंह सांगतात. तर.. १४ वा लुईस! राजा लुईस कोणताही निर्णय घेण्यास बराचसा वेळ लावे. अगदी शौचालाही. दीड- दोन तास खर्ची घातल्याशिवाय त्याला मोकळे वाटत नसे. बरं, राजा असो वा रंक- या गोष्टीवर कुणाचेच नियंत्रण नसते. वेळ, काळ, जागा कशाचेच बंधन नाही. त्यामुळे फक्त सकाळीच नाही, तर केव्हाही निसर्गाने ‘साद’ घातल्यावर राजा या ब्रह्मानंदी मैफलीत तासन् तास रमत असे. त्यामुळे दरबाऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी राजाने एक शक्कल लढवली. त्याने त्याच्या सिंहासनालाच टॉयलेटचा पॉट बसवून घेतला. सिंहासनाच्या खाली एक पाइप सोडलेला असे. त्या पाइपाखाली एक भांडे ठेवण्यात येई. सिंहासनाभोवती आच्छादन घालून लुईस नैसर्गिक विधी उरकत असे. १४ व्या लुईसची त्याकाळची ‘अत्याधुनिक’ सिंहासनाची प्रतिकृती या संग्रहालयात आहे. lr14lr02आज आपण जे पारंपरिक, आधुनिक, अत्याधुनिक टॉयलेट पॉट पाहतो, त्याचा मूळ जनक आहे जॉन हेरिंग्टन. हेरिंग्टन हे एलिझाबेथ राणीच्या दरबारात कामाला होते. त्यांनी साधारण इ. स. १५९६ मध्ये बंदिस्त जागेत वापरता येईल असे टॉयलेट तयार केले. जगातील पहिले ‘डब्ल्यूसी टॉयलेट’ असे त्याचे वर्णन केले जाते. म्हणजे आजच्या टॉयलेट पॉटची पहिली प्रतिकृती. पण थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल १८२ वर्षे हे टॉयलेट फारसे लोकप्रिय झाले नाही. त्यानंतर जोसेफ ब्राहम यांनी इ. स. १७१८ मध्ये या टॉयलेटला एक फ्लश जोडला. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर युरोपीय लोकांनी तर टॉयलेट्स  हिऱ्यामोत्यांनी सजवले. त्याकाळी म्हणे तिथल्या लोकांकडे पैसाही भरपूर होता. म्हणून काय टॉयलेटवर खर्च? आपल्याकडे केंद्रीय नियोजन आयोगाच्या टॉयलेट्सवरून किती गहजब माजवला होता प्रसारमाध्यमांनी. तरी बरं, त्याकाळी प्रसारमाध्यमे नव्हती. टॉयलेट म्हणण्यापेक्षा त्यास स्वच्छतागृह म्हटलेले अधिक उत्तम. कारण वॉश बेसीन, टॉयलेट पॉट वगैरेंवरही युरोपीय लोक नक्षी काढत असत. या संग्रहालयाचे संचालक डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या दाव्यानुसार, १८९० पासून टॉयलेटमध्ये फारसे तांत्रिक बदल झालेले नाहीत. झाले ते फक्त रंग व पाण्याच्या कमी-जास्त वापरासाठीचे आवश्यक बदल. भारतात पहिल्यांदा मुघलांनी सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू केल्याचा उल्लेख संग्रहालयात आहे.  कच्छजवळ धौलवीराजवळ उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून साधारण पाच हजार वर्षांपूर्वी तेथील मानवी वस्तीत सांडपाणी व्यवस्थापन होत असल्याचे दस्तावेज उपलब्ध आहेत. टेराकोटा- म्हणायला माती, परंतु त्यावर पाणी आणि अग्नीची प्रक्रिया केल्यास सिमेंटपेक्षाही टणक- अशा पाइप्सचे भग्न अवशेष तिथे मिळाले. या पाइपांमधून दूपर्यंत पाणी वाहून नेण्यात येत असे. मनुस्मृतीमध्येही शौच-मुखमार्जन विधीचा उल्लेख आहे. ज्यात जलस्रोतापासून लघुशंकेसाठी दहा पावले, तर शौचाला जाण्यासाठी शंभर पावले दूर जावे, तसेच मंदिरापासून चारशे पावलांवर हे विधी उरकण्याचे संकेत आहेत. घरात वा बंदिस्त जागेत शौच-मुखमार्जनाचा उल्लेख नसल्याची माहिती येथील गाईड सांगतात. त्यामुळे उघडय़ावर प्रातर्विधी करण्याचे मूळ यात असल्याचा दावा हे गाईड करतात.

जयपूरच्या आमेर किल्ल्यात एकाच वेळी आठ सैनिकांना वापरता येईल अशी शौचालयांची रचना होती. त्यामुळे सैनिकांचा वेळ वाचत असे. अशीच काहीशी रचना अकबराच्या फतेहपूर सिक्रीमध्येही आहे. त्याची माहिती फतेहपूरचा स्थानिक गाईड कधीही देत नाही. कारण येणाऱ्यांना त्यात रस नसतो. ही आपली इतिहासाबद्दलची उदासीनता असल्याची खंत राजू सिंह व्यक्त करतात. संग्रहालयाची ही सफर रंजक ठरते तिथल्या वैविध्यपूर्ण व काहीशा चमत्कारिक वाटणाऱ्या माहितीमुळे.  

नासाने रशियाकडून १९ मिलियन डॉलर्स खर्च करून स्पेस टॉयलेट बनवून घेतले; ज्याचा वापर अंतराळात केला जाईल. ज्यात पाण्याची वाफ होईल व मैल्याचे रूपांतर रासायनिक प्रक्रिया करून धुलीकणांमध्ये होईल. युरोपात तर खास प्रेमिकांसाठी ‘ट्विन टॉयलेट्स’ डिझाइन करण्यात आली आहेत. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेतील सरंजामशाहीची कहाणी सांगणाऱ्या दुमजली टॉयलेटची प्रतिकृती या संग्रहालयात आहे. कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे  टॉयलेट बनविण्यात आले. स्वच्छतागृहाच्या रचनेत काहीही बदल झाला नसला तरी मालकी हक्क दाखविण्यासाठी वरच्या भागात मालकांची, तर खालच्या भागात चाकरांची सोय केलेली असे. जंगलात सफरीला गेलात तर टेन्ट टॉयलेट असतात. छोटय़ाशा तंबूत टॉयलेट. त्यात एक झिपलॉकची रिसायकल होणारी पिशवी.. ज्यात मैला भरून फेकायचा. पिशवीसकट तो मैला (विष्ठा) निसर्गात मिसळतो- पर्यावरणाची हानी न करता. दक्षिण अफ्रिक्रेत एक टॉयलेट बनविण्यात आले.    विजेवर चालणारे. म्हणजे ते वापरल्यावर मानवी विष्ठेचे रूपांतर राखेत होईल. ती राख फेका किंवा रोपांना खत म्हणून वापरा. पण त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वीज लागणार. मानवी विष्ठेपासून वीज निर्माण होऊ शकेल असेही एक आधुनिक टॉयलेट या संग्रहालयात आहे. जपानच्या टोटा कंपनीचे टॉयलेट जणू आळससम्राटांसाठी बनविण्यात आले. यावर शौचाला बसल्यावर फक्त एका बोटाचा वापर बटण दाबण्यासाठी. बटण दाबा अन् टॉयलेटरूपी मशीनचा चमत्कार पाहा. अर्थात निसर्गाची साद हवीच हवी. तिथे कृत्रिमता उपयोगाची नाही.अजून एक गंमत आहे. गंमत म्हणण्यापेक्षा शास्त्र म्हणा हवं तर. कोरियाच्या डॉ. सर पार्क यांनी हे शास्त्र विकसित केले. व्यग्रतेच्या कारणास्तव निसर्गाच्या हाकेला ‘ओ’ देऊ न शकणाऱ्यांना ते नक्कीच आवडेल. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताच्या नखांनी घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने (अ‍ॅन्टी क्लॉकवाइज) फिरवायचे. असे दोन ते तीन मिनिटे केल्यावर अर्धा तास तुम्ही काहीही ‘रोखून’ धरू शकता. पण हे करताना काळजी घ्यायची. चुकूनही हे तंत्र चुकीच्या पद्धतीने वापरले तर मग परिस्थिती हाताबाहेर गेलीच म्हणून समजा!

‘सुलभ इंटरनॅशनल’च्या माध्यमातून हे संग्रहालय उभे राहिले आहे. टॉयलेटच्या उत्क्रांतीचा इतिहास उभारणे सोपे नव्हते. पण ‘सुलभ’चे जनक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी हे आव्हान सहजपणे पेलले. १९९२ मध्ये हे संग्रहालय उभे राहिले. गावोगावी मानवी जीवनातील ही महत्त्वाची नैसर्गिक क्रिया ‘सुलभ’ करणाऱ्या डॉ. पाठक यांना आपला देश शौचालययुक्त व्हावा असे वाटते. त्यासाठी ते मनापासून झटत आहेत. आज ‘सुलभ’च्या नावावर एक मोठा विक्रम जमा आहे. जगातील सर्वात मोठे सार्वजनिक स्वच्छतागृह शिर्डीजवळ त्यांनी उभारले आहे.  

या संग्रहालयाच्या आवारात तीन पुतळे आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात संविधानाची प्रत असलेला एक पुतळा, मध्यभागी गांधीजी व त्यांच्या शेजारी एक भारतीय ग्रामीण महिला.. डोक्यावर मैला वाहणारी!  तीनही पुतळे धवलवर्णी आहेत. या ठिकाणी नतमस्तक व्हावे आणि मनातील मैला झटकून संग्रहालयात प्रवेश करावा. आजही ग्रामीण भागात माता-भगिनी, वृद्धांना शौचासाठी सकाळी उठून दूरवर जावे लागते. आपल्यासाठी ही सार्वजनिक शरमेची बाब आहे, याचे स्मरण संग्रहालयात एकदा तरी होतेच होते. हे संग्रहालय पाहताना ‘हर हर शौचालय.. घर घर शौचालय’ ही भावना मनात घर करून राहते. स्वातंत्र्याची पन्नाशी उलटल्यावर का होईना, आपण डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा हद्दपार करू शकलो. आता त्यापुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. स्वातंत्र्याच्या शंभरीत जन्माला येणाऱ्यांना शौचालययुक्त भारतात जन्मल्याचे सुख लाभो, ही ‘सुलभ’ सदिच्छा ‘टॉयलेट’ संग्रहालयातून बाहेर पडताना मनात नकळतपणे येते!   

Story img Loader