वरुण सुखराज
उत्तरेकडील राज्यांतील अनेक शेतकरी २०२०च्या नोव्हेंबर महिन्यात दिल्लीच्या सीमेवर धडकले. तीन कृषि-कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीत शिरण्यापासून रोखले गेल्याने ते शहराच्या सीमांवरच ठिय्या देऊन बसले. राष्ट्रीय वृत्तचक्रांत त्याबाबत चालणाऱ्या बातम्या पाहून आंदोलकांबाबत अपसमजांतून उमटलेल्या मित्रांच्या प्रक्षोभक प्रतिक्रिया ऐकून महाराष्ट्रातला एक तरुण हादरून गेला. कॅमेरा सोबत घेऊन त्याने दिल्ली गाठली. पुढल्या काही दिवसांत आंदोलक शेतकऱ्यांच्या संवेदनांना वाचा फोडणारा ‘टू मच डेमोक्रसी’ हा माहितीपट तयार झाला. जगभरातील महोत्सवांमध्ये नावाजल्या गेलेल्या या माहितीपटाची पुढील महिन्याच्या आरंभी होणाऱ्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने या दिग्दर्शकाने या ‘डॉक्युमेण्ट्री’च्या निर्मितीपासून आलेल्या अनुभवांचा उभा केलेला शब्दपट..
३० जून २०२३, इटली
फ्लॉरेन्सपासून साधारण १४ किमीवर असलेल्या ‘पोंतासिएव्हे’ नावाच्या ‘कम्युन’मध्ये रात्री ९ वाजता आमच्या फिल्मचं स्क्रीनिंग झालं. आजूबाजूच्या परिसरातील अनेक तरुण शेतकरी मुलं दाटीवाटीनं बसली होती. ९० मिनिटांची फिल्म संपली आणि त्यानंतर फिल्म आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली. ती चर्चा चांगली रात्री १.३० वाजेपर्यंत रंगली. अनेक तरुणांनी त्यात हिरिरीने भाग घेतला, आणि या चर्चेचं नेतृत्व करत होत्या आयोजक आणि मानववंशशास्त्राच्या अभ्यासक लॉरा बेलुची. चर्चा संपल्यावर सगळी मंडळी उठली आणि त्यातला एक तरुण शेतकरी पुढे आला आणि लॉराला म्हणाला, ‘‘थँक्यू सो मच!’’
३ ऑगस्ट २०२२, नाशिक
‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’मध्ये सुरू असलेल फिल्मचं स्क्रीनिंग संपलं. नाशिकमधील काही ज्येष्ठ मित्रांबरोबर गप्पा सुरू होत्या. तेवढय़ात तिथे एक अगदी साध्या वेशातले काका आले. माझा हात हातात घेतला आणि एक शंभरची नोट ठेवून क्षणात वळून गर्दीत दिसेनासे झाले. त्यांचा चेहरा मला अजिबातच लक्षात नाही, पण त्यांच्या डोळय़ात पाणी तरळत होतं हे नक्की आठवतंय. तसंच ती नोट बघताना माझ्याही डोळय़ात तरळलं. त्या नोटेवरले ‘बापू’ माझ्याकडे बघून हसत होते.
२ जुलै २०२२, पुणे</p>
फिल्मचा शो संपल्यानंतर आम्ही काही मित्र गप्पा मारत उभे होतो. एक फोन आला म्हणून मी बाजूला गेलो. तर तिथे एक ५५-६० वर्षांचे काका माझ्या जवळ आले आणि म्हणाले, ‘‘सॉरी बरं का!’’ मी चमकून विचारलं, ‘‘का?’’ तर म्हणाले, ‘‘कुणाला तरी म्हणायलाच हवं, तुम्हाला म्हणतोय!’’
२३ मे २०२२, इटली
टय़ुरिन विद्यापीठातील फिल्मच्या शोला बरेच विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार जमले होते. फिल्म सुरू व्हायला थोडा अवकाश होता, इतक्यात काही भारतीय विद्यार्थ्यांचा घोळका आत शिरला आणि जोरदार घोषणाबाजी करू लागला. या अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने आयोजकही थोडे गोंधळले. त्यांनी त्या मुलांना विचारलं की, ‘‘नक्की काय अडचण आहे?’’ ‘‘ही फिल्म आमच्या देशाची बदनामी करणारी आहे,’’ असं त्यांचं उत्तर. आयोजकांनी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही फिल्म बघा आणि मग आपण चर्चा करू. फिल्म संपली. एक इटालियन प्राध्यापक बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘आम्हाला भारतीयांचा अभिमान वाटतो.’’ त्या विद्यार्थ्यांचा घोळका निघाला आणि जाता जाता वर ‘‘तुम्हाला ‘खरा भारत’ पाहायचा असेल तर ‘कश्मीर फाईल्स’ सिनेमा बघा.’’ अशी सूचनादेखील त्यातला एक जण देऊन गेला.
‘खरा भारत’.. या मृगजळाच्या शोधात मी गेली कितीतरी वर्ष आहे. अनेकदा तुकडय़ा-तुकडय़ांत मला तो भेटतोच, पण माझ्या आयुष्यात त्याचं झगझगीत, लख्ख असं दर्शन झालं ते या फिल्मच्या निमित्तानं.. किंवा ही फिल्म झाली ती त्या दर्शनाच्या ओढीनंच, असं म्हणू हवं तर!
‘टू मच डेमोक्रसी!’ गेली २-३ वर्ष माझं आयुष्य व्यापून टाकणारी ही फिल्म. भारतासह अनेक देशांत बघितली-दाखवली जाते आहे. प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं भरभरून प्रेम आणि कौतुक आमच्या टीमच्या वाटय़ाला येतंय. खरं तर अजूनही ही फिल्म महत्त्वाच्या ‘फिल्म फेस्टिव्हल्स’मध्ये जायची आहे, पण त्यापूर्वीच वर उल्लेखलेले (आणि असे इतर अनेक) ‘पुरस्कार’ आमच्या वाटय़ाला आलेत. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ‘स्क्रीनिंग’नंतर पुढे किमान दोन तास तरी चर्चा चालते. अनेक प्रश्न, त्यांची उत्तरं आणि त्यातून तयार होणारे आणखी प्रश्न.. त्यात सगळय़ात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे, ‘‘ही फिल्म का करावीशी वाटली?’’
त्याचं झालं असं की, २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात उत्तर भारतातील अनेक शेतकरी, भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडकले. भारत सरकारने नव्याने आणलेल्या तीन कृषि-कायद्यांविरोधात त्यांनी आपलं आंदोलन छेडलं होतं, त्यांना दिल्लीत शिरण्यापासून रोखल्यानं ते दिल्लीच्या सीमांवरच ठिय्या देऊन बसले होते. त्या आंदोलनाच्या बातम्या वाचत होतो. टीव्हीवर कायद्यांविषयी सखोल चर्चा आणि ऊहापोह चालूच होता. पण आधीच कोरोनानं कंबरडं मोडलेलं. ‘आपलंच झालंय थोडं..’ अशी एकंदरीत परिस्थिती. देशातल्या करोडो नागरिकांप्रमाणेच दुरून सगळं पाहत-ऐकत होतो. मग एक दिवस एका छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी, माझी पत्नी स्नेहा आणि मुलगी शक्ती, असे आम्ही एके ठिकाणी गेलो होतो. मुलांचा दंगा चालू होता आणि मोठय़ांच्या गप्पा. गप्पांचा ओघ फिरत-फिरत शेतकरी आंदोलनावर आला आणि माझा एक सॉफ्टवेअर इंजिनीयर मित्र पटकन बोलला, ‘‘साला.. गोली मार देना चाहिये इन सबको!’’ दुसरा एक मराठी मित्र म्हणाला, ‘‘हो नं, म्हातारे-कोतारेच तर आहेत जास्त, १०-२० जणांचे पाय तोडले तर बाकीचे आपोआप परत जातील, गावठी स्क्राउंड्रल्स साले!’’ तिसऱ्या मित्रानं होकारार्थी मान हलवत काजू तोंडात टाकले आणि म्हणाला, ‘‘शेतकरी कसले, आतंकवादी आहेत सगळे!’’ मी दीर्घ श्वास घेत या चर्चेतलं माझं गुदमरणं सहन करत होतो.
ती संपूर्ण रात्र मी झोपू शकलो नाही. म्हणजे मी काही ‘जनतेचा कैवार घेणारा’ कोणी मोठा पुढारी वगैरे नाही. तसं म्हणाल तर मी ‘व्यापारी कुटुंबात’ जन्मलेला. त्यामुळे ‘शेती’शी थेट असा संबंधसुद्धा उरलेला नाही. कदाचित हे सर्व कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे असतीलही, त्यांना ते कळत नसेल कदाचित, पण तरीही ‘आम्हाला हे नकोय’ असं म्हणणाऱ्या एका मोठय़ा समूहाचे हात-पाय तोडून टाकायचा विचार आपल्या मनात कसा काय येऊ शकतो? शेतकरी नसलो तरी अन्नावर जगणारा माणूस आहेच मी. त्यातच काही वर्षांपूर्वी एका डॉक्यु-सीरिजच्या निमित्तानं महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांना, काही दुर्दैवी शेतकऱ्यांच्या विधवांना आणि त्यांच्या मुलांना भेटलोय. त्यांचं जगणं किती कठीण आहे आणि त्यांचं ‘असणं’ हे आपल्यासाठी किती गरजेचं आहे हे अनुभवलंय.
बरं, आज शेतकरी आहेत! उद्या अजून कोणी असेल, परवा कदाचित ‘आपणच’ असू.. ‘मला हे मान्य नाही’ हे म्हणायचा अधिकार देणाऱ्या या लोकशाहीच्या जोरावर चालणाऱ्या आपल्या देशातील प्रश्न विचारणाऱ्या काही म्हाताऱ्यांना गोळय़ा घालाव्यात असं कसं वाटू शकतं आपल्याला? या देशाने जिवापाड प्रेम केलेल्या अशाच एका ‘म्हाताऱ्या’ला आपल्याच देशाच्या एका नागरिकानं गोळय़ा घालून ठार केलंय. सात दशकांनंतर अजूनही आपण विचार करतोय ‘गोळय़ा’ घालायचाच? त्याहीपलीकडे जाऊन, ‘गोळय़ा घाला’ हा विचार अगदी सहज ज्याच्या मनात येतो, तो माझा ‘मित्र’ आहे, त्याच्याच मुलांसोबत माझी मुलगी खेळतेय, त्याला मी ‘आपला’ वाटतो या विचारानं मी दडपून गेलो होतो.
या देशात गेल्या ७५ वर्षांत अनेक आंदोलनं झालीत. आंदोलन हा लोकशाहीचा लखलखता दागिना आहे. या आधीच्या प्रत्येक सरकारांनी आंदोलकांना तोंड दिलंय आणि प्रसंगी काहींनी ते दडपण्याचा प्रयत्नही केलाय. पण ते कायमच ‘सरकार’ विरुद्ध ‘आंदोलक’ असं समीकरण राहिलंय. ते तसं असायलाही हवं, पण ‘आंदोलक विरुद्ध उर्वरित जनता’ हे चित्र नवीन आणि घाबरवणारं होतं. घाबरवणारं अशासाठी की, भारतासारख्या बहुरंगी देशात एखाद्या सरकारनं घेतलेले निर्णय सर्वानाच मान्य होतील असं नाही. भविष्यातही हे ‘न पटणं’ असेलच. पण उद्या मला किंवा त्यानंतर माझ्या मुलीला न पटणारं असं काही तेव्हाचं सरकार लादू पाहील आणि ते तिला मान्य नसल्यास त्याला नकार द्यायला ती पुढे आली तर मला सरकारपेक्षा भीती या ‘गोळय़ा घाला’ म्हणणाऱ्या मित्राचीच वाटेल. आणि त्याच भीतीने मी जागा होतो.
पहाटे कधीतरी ‘स्नेहाला’ जाग आली. मला जागं पाहून तिनं कारण विचारलं आणि मी भडाभडा सगळं बोलू लागलो. तिनं शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मला म्हणाली, ‘‘तू लोकांना बदलू शकत नाहीस, त्यांच्यापर्यंत जे पोहोचतंय तशाच त्यांच्या प्रतिक्रिया असणार. पण तू एक करू शकतोस, आपल्यापुरतं तरी जे खरं आहे ते बघून येऊ शकतोस. उद्याच दिल्लीला जा!’’
सकाळी पुन्हा बोलणं झालं. खर्चाचा मुद्दा काढल्यावर म्हणाली, ‘‘आजची (कोरोनामुळं उद्भवलेली) ‘आर्थिक स्थिती’ उद्या बदलेलच, पण हा असा पायंडा जर पडला तर? उद्या मोठी झाल्यावर आपली मुलगी आपल्याला विचारेल ‘तुम्ही तेव्हा काय करत होतात?’ त्यावेळी तिच्या डोळय़ात बघून आपल्याला उत्तर देता यायला हवं! जमल्यास सोबत कॅमेरा घेऊन जा. तुला जी दिसेल ती खरी गोष्ट तिच्यासाठी रेकॉर्ड कर.’’
दिल्लीतील हिवाळय़ाची कुडकुडती सकाळ. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथे मोठ्ठाल्या हायवेवर पसरलेलं धुक्यात गुरफटलेले असंख्य तंबू आणि ट्रॅक्टर्स. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक अशा देशाच्या विविध राज्यांतून आलेले असंख्य शेतकरी झोपून उठलेत आणि आवरतायत.. कोणी झकास अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून हायवेच्या डिव्हायडरवर पेपर वाचत बसलंय, एका लंगरवाल्या तंबूत सकाळचा कडक चहा बनतोय. मी एका तंबूसमोर चहा घेत उभा आहे, एवढय़ात आर्थिक परिस्थिती बरी असलेली दिल्लीतील एक बाई लगबगीनं येऊन त्या तंबूत भाजी चिरायला बसतेय.. तिच्यासोबत तिची छोटी मुलगी बसलीय अभ्यास करत.. तेवढय़ात तिथे एक ६० वर्षांची पंजाबी आजी येऊन बसते आणि कांदे चिरायला घेते. आजूबाजूला भाज्यांचे ढीगच्या ढीग रचून ठेवलेत. मी त्या तंबूत शिरतो.
माझ्यासोबत एक तरुण मुलगा आहे. यानं मला सकाळीच हटकलं आणि ‘तुमच्याकडे गूगल पे आहे का?’ असं विचारलं, त्याच्याकडे स्मार्टफोन नव्हता. मी ‘हो आहे’ असं म्हणताच ‘‘तुम्हाला कोणी २००० रुपये पाठवले तर मला तुम्ही इथे रोख द्याल का?’’ मी विचारलं ‘‘कोण पाठवतंय?’’, तर म्हणाला, ‘‘गावी भावाला सांगतो. तुमचा नंबर द्या.’’ बराच वेळ होऊनही पैसे काही आले नव्हते, म्हणून मीच म्हणालो, ‘‘आत्ता पैसे घेऊन जा. मला येतील तेव्हा येतील.’’ तर म्हणाला, ‘‘नहीं.. आने दो पहले, फिर आप मुझे दे देना.’’ तीन तास झालेत तो सकाळपासून सोबतच फिरतोय. आता तर माझ्या कॅमेरामॅनलाही मदत करायला लागलाय. त्यानंच मग त्या आजींच्या दुपट्टय़ाला लेपल माईक लावला आणि शांतपणे माझ्याकडेला येऊन बसला. मी आजींना माझ्या मनात घोळणारा पहिलाच प्रश्न विचारला, ‘‘क्या आप आतंकवादी है?’’ तर त्या टोपलीतले कांदे दाखवत म्हणाल्या, ‘‘हां जी. ये देखो बम बना रहें है।’’ एक क्षण शांतता आणि एकदम तो सोबतचा मुलगा जोरजोरात हसू लागला.
तंबूतले सगळेच खळखळून हसायला लागले. सोबतच्या दिल्लीहून आलेल्या त्या बाई शेतकरी नव्हत्या, पण लंगरमध्ये भाजी चिरण्याची सेवा द्यायला रोज यायच्या. त्यांच्या मुलीची शाळा बुडते म्हणून तिथेच तिचा अभ्यास घ्यायच्या. त्या गावाहून आलेल्या आजींची नातही तिला अभ्यासात मदत करायची.
छान गप्पा चालू असताना अचानक भरल्या डोळय़ांनी त्या मुलाकडे बघत आजी म्हणाल्या, ‘‘याच्याच वयाचा आहे माझा नातू, शेतावर काम आहे म्हणून गावाकडे परत गेलाय. बाकीचे सगळे इकडे आहेत, म्हणून चार जणांचं काम तो एकटा करतोय. त्याला आतंकवादी म्हणाल का?’’
सगळे एकदम शांत झाले. मी आवंढा गिळला. तेवढय़ात मोबाइल फोनवर नोटिफिकेशन वाजलं. कुणा हरिवदरकडून २००० रुपये आले होते. त्या मुलाला मी हसतच दोन हजारांची नोट दिली. ‘‘थँक यू सो मच!’’ म्हणाला आणि निघून गेला. मी पुढच्या तंबूत जायला उठलो..
आंदोलन संपून आता वर्ष उलटलीत. आज हे सगळं आठवून लिहितोय कारण परवाच्याच ३० जूनला इटलीच्या एका गावातील मला पूर्णपणे अनोळखी असलेल्या एका तरुणानं आमची फिल्म दाखवली म्हणून स्क्रीिनगच्या आयोजक असलेल्या लॉराला असंच ‘थँक यू सो मच’ म्हटलं! हे सांगणारा लॉराचा तो मेसेज वाचून हरिवदरचा भाऊ आठवला. त्या आजीचा नातू, तो पंजाबी मुलगा, तो इटालियन तरुण मुलगा, इटलीतीलच ती भारतीय मुले, नाशिकमधील ते १०० रुपये बक्षीस देणारे काका.. या सगळय़ांचा एकमेकांशी काय संबंध? असला तर एकच की, या एका फिल्मच्या निमित्तानं हे सगळे माझ्या आयुष्याचा भाग बनले.
स्नेहाशी बोलणं झाल्यावर पहिला फोन केला तो पराग पाटील सरांना. ‘‘सर, दिल्लीला जातोय सोबत कॅमेरासुद्धा नेतोय. लोकांना कळेल तरी तिथे नेमकं काय चाललंय ते.’’ त्यांचा पहिला प्रश्न, ‘‘खर्चाचं काय?’’ मी ‘‘बघू!’’ असं म्हटल्यावर त्याच दिवशीच मला भेटले. ‘‘खर्चाची चिंता नको, आपण करू काही तरी, पण जा. हा महत्त्वाचा दस्तावेज गोळा कर.’’ त्यांच्यातला हाडाचा पत्रकार बोलला. पुढच्या दोनच दिवसात मी कॅमेरा घेऊन दिल्लीत दाखल झालो.
आंदोलक शेतकऱ्यांबद्दल टीव्हीवर, सोशल मीडियावर गरळ ओकली जात होती. दिल्लीच्या सीमांवर जणू लाखो आतंकवादी जमा झालेत असंच चित्र देशासमोर उभं झालं होतं. पहिल्याच दिवशी ‘महाराष्ट्र सदना’त तर एका स्टाफ मेम्बरनं मला सांगितलं की, ‘‘कॅमेरा घेऊन जाऊ नका, सटक आहेत, फोडून टाकतील.’’
मी म्हटलं, ‘‘बघूया जाऊन, आधी गप्पा मारू, समजून घेऊ आणि मग विचारूनच कॅमेरा काढू.’’ असं ठरलं. मनात शेकडो प्रश्न, शंका आणि उत्सुकता घेऊन दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर आम्ही पोहोचलो. पोहोचेपर्यंत दुपार झाली होती. एका तंबूत, फोनवर ज्यांच्याशी भेट ठरली होती ते शेतकरी नेत्यांचे ‘मीडिया प्रभारी’ भेटले. आजूबाजूला एकंदरीत लग्न घरात असावं तसं वातावरण होतं. मोठय़ा मांडवात गाद्या टाकलेल्या, लोक गप्पा मारत होते. काहीजण मध्ये ‘हुक्का’ घेऊन बसले होते. आम्हाला पहिला प्रश्न आला, ‘‘दाल चावल खाओगे? पकोडे बन रहे है गरमागरम.’’ आम्ही उत्तर द्यायच्या आतच समोर डाळ-भात आणि चविष्ट भजी आग्रह करून वाढली जात होती. मी प्रश्न विचारला. ‘‘कॅमेरा यूज कर सकते है?’’ ते म्हणाले, ‘‘क्यों नही.. अरे हम दिल्ली के बॉर्डर पर है, पाकिस्तान के नहीं.’’ शूटिंगचा पहिला दिवस आटोपून आम्ही परत निघालो. येताना टॅक्सी ड्रायव्हर चौकशी करत होता, ‘‘कसं आहे ‘तिकडे’ सगळं? आम्ही ऐकलंय, आत सगळे काळे धंदे चालतात. पाकिस्तान्यांचाच अड्डा आहे म्हणे तिकडे आत!’’ मी फक्त हसलो.
१५ मार्च २०२१, मुंबई</p>
आत्तापर्यंतचं मिळालेलं फुटेज पाहताना मनात एक ट्रीटमेंट घोळत होती. गेली अनेक वर्ष मनात घर करून राहिलेलं लाडक्या चार्ली चॅप्लिनचं ‘द ग्रेट डिक्टेटर’मधलं शेवटचं भाषण सतत या काळात कानात वाजत होतं.. ‘लेट अस ऑल युनाईट!’ या आंदोलनाची दृश्यं चार्लीच्या त्या अजरामर भाषणावर कशी दिसतील? एक रात्र बसून चार्लीच्या त्या भाषणावर काही शॉट्स चिकटवले, चांगले वाटत होते. आता आपण हा ‘टीझर’ म्हणून टाकू, असं ठरलं. रात्री काय मनात आलं.. म्हटलं आधी या चार्लीचं भाषण वापरायची परवानगी मिळते का ते बघू. पॅरिसमधील ‘चॅप्लिन फाऊंडेशन’ला ई-मेलवर संपर्क केला. सोबत व्हिडीओ पाठवला. रिप्लाय आला, ‘चॅप्लिन परिवारातल्या सर्वाची परवानगी घ्यावी लागेल.’ आम्ही आशा जवळपास सोडूनच दिली. अचानक एके रात्री उशिरा ई-मेल आला, ‘चॅप्लिन परिवारातील सर्वानी व्हिडीओ पाहिलाय आणि त्यांना फिल्म आवडली आहे. त्यांची हरकत नाही.’ आम्ही सारे अक्षरश: थरारून गेलो. टीझर पूर्ण करून आम्ही समाजमाध्यमांवर टाकला आणि जगभरातून फिल्मबद्दल विचारणा होऊ लागली. दूर देशातल्या गोष्टी आम्हाला दाखवून हसवणाऱ्या-रडवणाऱ्या-हेलावून टाकणाऱ्या आणि वेड लावणाऱ्या चार्लीनं आमची ही येऊ घातलेली फिल्म सातासमुद्रापार पोहोचवली होती. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अधिकृत समाजमाध्यमांवरूनही हा टीझर झळकला. दोनच दिवसांत हा टीझर १० लाख लोकांनी पाहिला आणि त्याचं भरभरून कौतुक होऊ लागलं. वेगवेगळय़ा देशांतून काही पत्रकारांचे फोन येतायत- ‘‘आम्हाला भारतातल्या आंदोलनाविषयी सांगा.’’ आपलं म्हणणं आता जगभरातले लोक ऐकतायत (अर्थात चार्लीमुळे) हा विश्वास आणि त्याचं नवीनच दडपण आलंय. माझ्यासारखंच प्रेक्षकांना त्या टीझरच्या शेवटच्या प्रश्नाने पार झपाटून टाकलंय.. ‘‘क्या आप आतंकवादी है?’’ या प्रश्नाचं उत्तर शोधायला आम्ही नव्यानं कामाला लागलोय.
११ फेब्रुवारी २०२१
‘पिलर नंबर २७६’ चा पत्ता शोधत मी निघालो होतो. हे मेट्रोचे पिलरच दिल्लीजवळच्या ‘टिकरी बॉर्डर’वर बसणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांचे पत्ते झाले होते. तिथे पत्रंसुद्धा येत होती. मी पिलर नंबर २६०च्या आसपास कुठं तरी होतो. तर डावीकडे मला एक सुंदर दृश्य दिसलं. काही ट्रॉलीज् मागच्या बाजूनं अशा गोलाकार लावल्या होत्या, जणू घराचे दरवाजे असावेत आणि त्याच्यामध्ये एक सुंदर अंगण तयार झालेलं. खरं तर तो एक रुक्ष हायवे होता. वरून मेट्रो जात होती. पण त्या हायवेवर जणू घरच्या अंगणात बसावं अशा त्या ६०-७० वर्षांच्या आज्या बसल्या होत्या. कुणी धान्य पाखडत होत्या. कोणी नातवांना खेळवत होत्या. बाजूलाच घोडे बांधले होते. एकीकडे अगरबत्तीचा तर एकीकडे खरपूस भाकरीचा वास. आपण हायवेवर नाही तर कुठल्यातरी सुंदर टुमदार गावातल्या एका घराच्या अंगणातच आहोत की काय असं वाटत होतं. २६ जानेवारीचा भयावह प्रसंग होऊन गेल्याला महिनाही उलटला नव्हता. परंतु मला या दृश्यात राग, कटुता, चीड यांपेक्षा गोड, प्रेमळ, हळवं असं काही तरी जाणवत होतं. मला इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं एकदम आठवलं, पूर्वी राजे लढायांवर जायचे तेव्हा ही अशीच गावंच्या गावं त्या लढायांच्या ठिकाणी वसायची. तीच ही पद्धत. पण इथे कुठेही िहसा-द्वेष याचा लवलेशही नव्हता. वाहात होतं ते फक्त प्रेम. वर्षांनुवर्ष लढाया अनुभवणाऱ्या या कुरुक्षेत्राच्या आसपासच्या प्रदेशात ही शांतता, हे प्रेम कसं बरं झिरपलं असेल? ‘मोहनदास करमचंद गांधी’ हे त्याचं उत्तर. या माणसानं या समाजाच्या अंतरंगात हे सत्याग्रह, ही अहिंसा, हे प्रेम झिरपवलं त्याची ही फळं. मुळात लढवय्ये शीख लोक, जाट लोक आणि प्रचंड प्रमाणात तरुण असूनही इथे जी सुरक्षित शांतता अनुभवायला मिळतेय त्याचं श्रेय बापूंच्या शिकवणीला आणि तिला स्मरून या रणांगणात अंगण थाटणाऱ्या या आया-आज्ज्यांना जातं. इथून पुढचा माझा प्रवास हा केवळ हे आंदोलन बघण्याचा नसून, या देशाच्या रक्तात, मातीत उतरलेला तो गांधी शोधण्याचा सुरू झाला. आमची ही फिल्म त्या आंदोलनाच्या निमित्तानं ते प्रेम शोधते. त्या महात्म्याला शोधते आणि तोही आम्हाला ठायी ठायी गवसतोच.
टय़ूरिन विद्यापीठातील त्या भारतीय विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेला ‘खरा भारत’ कोणता असेल हे त्यांचं त्यांना ठाऊक, पण दिल्लीच्या सीमांवर आम्हाला वर्षभर दिसलेल्या खऱ्या भारताचं चित्रण आम्ही जगासमोर ठेवतोय आणि पाहणाऱ्यांनाही ते आवडतंय, याचा आनंद आहे. ही फिल्म कुठल्याही पक्षाच्या किंवा सरकारच्या विरोधात नसून प्रेमाच्या बाजूने उभी राहणारी आहे. पुण्यातल्या त्या शहरी मध्यमवर्गीय काकांना ‘सॉरी’ म्हणावंसं वाटलं आणि इटलीतल्या त्या शेतकरी तरुणाला थँक्यू म्हणावंसं वाटलं, ही आमच्या कामाची सर्वात मोठी पोचपावती आहे. माझ्या मुलीसाठी- शक्तीसाठी म्हणून मी सुरू केलेला हा प्रवास किती कमालीच्या माणसांना जोडत गेला! कोरोना काळातही जीव तोडून काम करणारी माझी टीम आणि संपूर्ण फिल्मचं आपणहून इटालियन भाषांतर करणारी पत्रकार डॅनिएला बेझी असो, किंवा ही फिल्म गावोगावी दाखवण्याचा ध्यास घेतलेले अनेक मित्र आणि या फिल्ममध्ये व्यक्त झालेले पी. साईनाथ, व्ही. के. त्रिपाठी, संजय हेगडे, अजित अंजुम, अनंत बागाईतकर, अनघा तेंडुलकर असे अनेक मान्यवर असोत, अशा आम्हा सर्वानी मिळून मागितलेलं ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असं म्हणणारं हे ‘पसायदान’ आहे.
शक्ती मोठी होईल तेव्हादेखील लोकशाही असेलच, आंदोलनं तेव्हासुद्धा होतीलच, त्यावेळीही ‘गोळय़ा घाला’ म्हणणारे तिचे काही मित्र असतीलच. त्यावेळी तिलाही खरी गोष्ट पाहण्याची आणि दाखवण्याची इच्छा झाली तर हे पसायदान आम्हाला फळेल. गळय़ात ‘कोणत्याही’ पक्षाचा गमछा नसलेल्या लोकांच्या हातातच या देशाचं भविष्य सुरक्षित आहे.
office.varrun@gmail.com