टॉकिजमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याची मजा काही औरच असते. परंतु गेल्या काही वर्षांत टॉकिजमध्ये जाऊन मी सिनेमा पाहिलेला नाही. आता २४ तास चॅनेलवर सिनेमा सुरू असतो आणि हातात रिमोट कंट्रोल. सìफग करीत या चॅनेलवरून त्या चॅनेलवर असे सिनेमा अलीकडे पाहत असतो. सिनेमा पाहिल्याशिवाय दिवस मावळत नाही; पण आपण आज कोणता सिनेमा पाहिला, ते आताशा नीट सांगता येत नाही. आता सिनेमाचं स्वरूपच खूप बदललं आहे. सिनेमा नको तेवढा टेक्निकल झाला आहे. त्यामुळे तो आता मनात रुतून बसत नाही. सिनेमा आपली शंभरी साजरी करतोय, तर सिनेमा बघण्याची आम्ही पन्नाशी साजरी करतोय. गेली ५० वषर्ं सिनेमाने आमच्यावर वर्चस्व गाजवलंय.
मी पहिल्यांदा सिनेमा पाहिला तो ‘भक्त प्रल्हाद.’ तो दिवस आजही लख्ख आठवतो. विदर्भातलं यवतमाळ जिल्ह्य़ातलं माहुरजवळचं पोहुंडूळ हे माझं छोटंसं गाव. गावात वीजही आलेली नव्हती तेव्हाचे दिवस. आमच्या गावापासून तीन-चार कि. मी. अंतरावर धनोडा हे गाव. या धनोडय़ात उन्हाळ्यात टूिरग टॉकिज यायची आणि गावात एकच कल्लोळ उडायचा. १९६३-६४ साल. तेव्हा मी चौथीतून पाचवीत गेलेलो होतो. गावचे आम्ही पांडे. आणि त्यातही वडील पटवारी. पंचक्रोशीत वडलांचा दरारा होता. ‘जमीन मोजून घ्यावी ती तात्यासाहेबांकडून!’ असं लोक मानायचे. म्हणून वडिलांना गावागावांतून जमीन मोजून घेण्यासाठी लोक घेऊन जायचे. त्यामूळे वडिलांना सर्वत्र मान असायचा. पण वडील मात्र भलतेच रागीट. त्यामुळे आम्ही भावंडं त्यांना टरकून असायचो. मग सिनेमाला जाऊ का, विचारणे तर दूरच. उन्हाळ्याचे दिवस. सुट्टय़ा लागलेल्या असायच्या. घरात वाचायला भरपूर पुस्तके असायची. त्यामुळे वाचनाचे आपसूकच वेड लागले. या दिवसात अचानक कधीतरी दुपारी एक सायकलवाला पोरगा गावात यायचा. सायकलच्या दोन्ही बाजूला सिनेमाच्या जाहिरातीचे मोठाले रंगीन पोस्टर्स लावलेले असायचे. आणि तोंडाला भोंगा लावून तो भसाडय़ा आवाजात ओरडायचा- ‘पुणे, मुंबई गाजवून ‘भक्त प्रल्हाद’ आपल्या गावात. दररोज फक्त एकच खेळ. आपल्या आवडत्या टूिरग टॉकिजमध्ये पाहायला विसरू नका. भक्त प्रल्हाद.. भक्त प्रल्हाद.. भक्त प्रल्हाद..’ गावात हा पोरगा गल्लीबोळांतून ओरडत फिरायचा. आम्ही पोरंही त्याच्यामागे पळत असू.  हा पोरगा निघून गेला की आमचा जीव टांगणीला लागे. सिनेमा पाहायची इच्छा व्हायची. पण जायचं कसं? मग आम्ही भावंडं आमच्या आईच्या पाठीमागे लागायचो. मग आई वडिलांचा मूड पाहून जेवताना विषय काढायची. आणि हो-नाही करता करता वडील परवानगी द्यायचे. त्यानंतर उत्सवच सुरू व्हायचा. गडी गाडी सजवायचा. आधी तडव. नंतर त्यात गाद्या. आजूबाजूला तक्के. थंडगार पाण्यानं भरलेल्या सुरया. आम्ही भावंडं आणि आई संध्याकाळी ७.३० ला निघायचो. गावात मिट्ट काळोख पसरलेला असायचा. समोर एक गडी कंदील घेऊन चालत असायचा. घरातून बाहेर पडल्यावर थोडय़ा वेळाने आमच्या घरी काम करणारी बाई आमच्यात सामील व्हायची. आईला ती सतत सोबत लागे. पण वडिलांना सांगायची सोय नाही. मग आई एक युक्ती करी.. ‘तू पुढे हो आणि गावाबाहेर पडलो की आमच्यात सामील हो.’ तसं ती करायची. थंडगार वारा सुटलेला असायचा. मिट्ट काळोखात आमचा कारवॉं चालत असायचा. घुंगरांच्या आवाजानं साऱ्या आसमंतात एक चतन्य पसरलेलं असायचं. एक-दोन कि. मी. अंतरावर आलं की धनोडा गावाची चाहूल लागे. जत्रेतले विजेचे दिवे लुकलुकत असायचे. हळूहळू वाऱ्याबरोबर लाऊडस्पीकरवरची गाणी ऐकू यायची, तसं मन अधिकच प्रसन्न व्हायचं. जत्रेचा काय थाट वर्णावा! भल्यामोठय़ा वावरात टूिरग टॉकिजचा मुक्काम असे. आजूबाजूला वेगवेगळी दुकानं आणि हॉटेलांची रेलचेल असे. त्यावेळी चार आणे तिकीट असायचं. तिकीट काढून गडी यायचा आणि कनातीच्या दारातून आम्ही आत जायचो. इथे मात्र आईची आणि आमची ताटातूट व्हायची. पडद्याच्या डाव्या बाजूला बायका बसायच्या, तर उजव्या बाजूला गडीमाणसं. काळी किनार लावलेल्या पांढऱ्या भव्य पडद्याकडे आम्ही काही काळ बघत बसायचो. आणि मग सिनेमा सुरू व्हायचा. काही वेळा मध्यंतरात आईकडे जाऊन यायचो तेव्हा प्रतिमा उलटय़ा दिसायच्या आणि मोठी गंमत वाटे. सिनेमाशी आम्ही समरसून जायचो. भक्त प्रल्हादला उकळत्या तेलात टाकताना टॉकिजमध्ये हुंदके ऐकू यायचे. पण भक्त प्रल्हाद अलगद त्यातून बाहेर पडला की जोरजोराने टाळ्या पिटल्या जात.
रात्री घरी कधी आलो, ते कळायचेही नाही. दुसऱ्या दिवशी सिनेमा पाहिल्याचं कौतुक साऱ्या गावाला माहीत व्हायचं. १९६४ ला आई गेली. टूिरग टॉकिजचे दिवस संपले, आणि ती मजाही. नंतर वेगवेगळ्या शहरांत शिकायला गेलो. तिथल्या टॉकिजमध्ये खूप सिनेमे पाहिले. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी मजाही लुटली. पण टूिरग टॉकिजची मजा काही औरच.
दारव्ह्य़ाला पहिल्यांदा वर्षां टॉकिजमध्ये सिनेमा पाहिला. टूिरग टॉकिजसारखं इथे नव्हत्ं. सर्व लोक एकाच बाजूला बसायचे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि बाल्कनी असे विभाग होते. समाजातली दरी पहिल्यांदाच इथे जाणवली. फर्स्ट क्लास बायकांसाठी राखीव होता. बाल्कनीचे तिकीट एक रुपया होतं. ऐपत असणारी गावातली प्रतिष्ठित मंडळी तिथे बसत. बाकी सारे सेकंड आणि थर्ड क्लासमध्ये. या क्लासमधून डायलॉग आणि गाण्याच्या वेळी शिटय़ाच शिटय़ा ऐकू यायच्या. त्यामुळे थर्ड क्लासमध्ये बसणे म्हणजे काहीतरी विचित्रच वाटायचं. वर्षां टॉकिजमध्ये दोन खेळ व्हायचे. सहा वाजता ‘ओम् जय जगदीश हरे’ हे गाणं सुरू व्हायचं. सिनेमाची तिकीट विक्री सुरू झाल्याची ही खूण असायची. मग तीन-चार वेगवेगळी गाणी झाली की शेवटी ‘ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो..’ सिनेमा सुरू झाल्याची ही खूण असे.
याच टॉकिजमध्ये राजेंद्रकुमारचे खूप सिनेमे पाहिले. तेव्हा तो ज्युबिली स्टार होता. त्याचे सिनेमे खूप गाजायचे आणि चालायचे. या काळात राजेंद्रकुमारचा आमच्यावर खूप प्रभाव होता.
यवतमाळला अप्सरा, श्याम आणि सरोज अशा तीन छान टॉकिज होत्या. सरोज टॉकिज ही व्ही. शांताराम यांची होती. शांतारामांनी आपले सिनेमे दाखविण्याकरिता विदर्भात अनेक ठिकाणी टॉकिज विकत घेतल्या, असे लोक सांगायचे.
खऱ्या अर्थाने सिनेमाचे पर्व माझ्या जीवनात सुरू झालं ते औरंगाबादेत. १९७४ ला इथे मी शिकायला आलो. गावापासून दूर. औरंगाबादमध्ये फारसं ओळखीचं कुणी नाही. आणि त्यात मी  एकटा. मग दिवसभर करायचं काय, असा प्रश्न पडे. कॉलेज सकाळी ६ ते ११ पर्यंत असायचं. कॉलेज संपल्यावर काठियावाड लॉजमध्ये जेवायचं. जवळच सादिया टॉकिज होती. १२ वाजता सादियात मॅटिनी शो बघायचा. नंतर ३ वाजता गुलजार टॉकिजमध्ये शिरायचो. त्यानंतर ६ ला रिगल टॉकिज. आणि रात्री स्टेटला ९ चा सिनेमा.. असे दिवसाला तीन-तीन सिनेमे बघायचो. घरून बऱ्यापकी पसा येत असे. त्यामुळे ती अडचण नव्हती. आणि बोलायलाही कोणी नव्हते. ७४ ते ८० यादरम्यान मी खूप सिनेमे पाहिले. खास आवडनिवड अशी काही नव्हती. दारासिंगचा असो की राजेश खन्नाचा; ज्यावेळी जो असेल, तो. मग त्यात स्टंट पिक्चरही आला, मराठीही आला आणि इंग्लिशही. इंग्लिश पिक्चर पाहून आलो की त्यावेळी लोक संशयाने बघायचे. पुढे मला त्याचं रहस्य कळलं. आंबटशौकीन लोक असे सिनेमे बघतात असा समज तेव्हा प्रचलित होता.
चित्रपट नट-नटय़ांनी सिनेमा बघणाऱ्यांच्या आयुष्यात चतन्य निर्माण केलं होतं. दिलीपकुमार मला खूप आवडायचा. त्याचा ‘सगीना महातो’ हा सिनेमा कितीतरी वेळा मी बघितला. रेल्वेगाडीसोबत त्याचं पळणं मला खूप भावायचं. राजेश खन्ना तर आमच्या पिढीचा सुपरस्टारच. त्याच्या ‘आराधना’मधली गाणी आम्ही गात हुंदडत असू. पँट आणि मनिला घालणारा मी राजेश खन्नामुळे केव्हा गुरूशर्टवर आलो, कळलंच नाही. राजेश खन्नाने आमचे आयुष्यच बदलून टाकले. त्याच्या ‘आनंद’ने आम्हाला खूप अंतर्मुख केलं. तेव्हा आम्हीही ठरवून टाकलं होतं, की आपल्याला जर कॅन्सर झाला तर ‘आनंद’मधल्या राजेश खन्नासारखंच वागायचं. आता याचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा हादरून जातो. शक्य आहे का ते? सिनेमा बघत बघतच आम्ही मोठे झालो. आज जुन्या काळातील कितीतरी गाणी कुणी एखादा मुखडा म्हटला तरी पुढच्या ओळी पटापट आठवतात. परवा नातवाला झोपवताना चिऊ-काऊच्या गोष्टींबरोबरच सिनेमातील जुनी गाणी अंगाईगीतं म्हणून ओठावर येत गेली. तेव्हा कळलं- सिनेमा किती आपल्यात मुरलाय, ते!
माझ्या वाचनाला जशी शिस्त नाही, तशीच सिनेमा बघण्यालासुद्धा. मी कोणतेही सिनेमे पाहत होतो. सिनेमा पाहण्याचं खरं पर्व माझ्या आयुष्यात सुरू झालं ते माझी मत्रीण अंजली अंबेकरमुळे. अंजलीला गाणं, खाणं आणि सिनेमा पाहण्याची प्रचंड आवड. तिच्यामुळेच मला चांगला सिनेमा म्हणजे काय, ते कळलं. तिने पाहिलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सिनेमांची ती जेव्हा नावं घ्यायची तेव्हा मला प्रचंड न्यूनगंड यायला लागला. मग आम्ही फिल्म सोसायटी सुरू केली. त्यानिमित्ताने सुधीर नांदगावकरांची ओळख सुरू झाली. त्यांच्यामुळे फिल्म अ‍ॅप्रिशिएशनचा कोर्सही केला. त्यावेळी पुण्यात जे काही सिनेमे मी पाहिले, त्यामुळे माझी दृष्टीच पार बदलून गेली. सत्यजीत रेंच्या चित्रपटांपासून मी दूर होतो. अंजलीने पहिल्यांदा मला या चित्रपटांची ओळख करून दिली. नंतर ‘राशोमन’, ‘चिल्ड्रन ऑफ द हेवन’, ‘बायसिकल थिफ’ असे कितीतरी एकाहून एक सुंदर चित्रपट मी बघत गेलो. भाषा समजत नसतानाही काही चित्रपट आपल्यापर्यंत पूर्णपणे पोचतात, हे लक्षात आलं. चित्रपटाची दुनिया किती अफाट आहे, हे कळत गेलं. आता अंजली मुंबईला असली तरी अधूनमधून ‘शामराव, हा चित्रपट बघा!’ असा सल्ला देत असते.
प्रत्येकाच्याच मनात सिनेमाची एक सुंदर दुनिया वसलेली असते असं अंबरिश मिश्र म्हणतो. खरं आहे ते. चित्रपटाची शंभरी साजरी होत असताना आपण त्यासोबत आहोत, ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.

Mukkam post Bombilwadi marathi drama
‘मु. पो. बोंबिलवाडी’ रुपेरी पडद्यावर, २४ वर्षांनंतर गाजलेल्या नाटकाचे माध्यमांतर
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Alankrita Sakshi’s Success Story
Alankrita Sakshi : अलंकृतासारखे तुम्हीही Google मध्ये नोकरी मिळवू शकता; बीटेक, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम अन् या आयटी स्कीलच्या जोरावर मिळवले ६० लाखांचे पॅकेज
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Hanumankind music video woman maut ka kuan
Big Dawgs: ‘मौत का कुआं’मध्ये स्टंट करणारी कल्याणची कांचन आणि पती सुलतान शेखची प्रेम कहाणी, रॅपर साँगच्या माध्यमातून ठरली जगभरात चर्चेचा विषय
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा