|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्पना करा, माणसाच्या भयानं समजा सगळी झाडं पळून गेली तर? गेली अगदी काळाच्या पार, तुकारामापाशी! किंवा जाऊन बसली कुठल्याशा ऐतिहासिक सहिष्णु माणसापाशी, कोणत्या तरी सभ्य संस्कृतीत. जाताना समजा त्यांचा सगळा प्राणी-पक्षी परिवारही घेऊन गेली तर काय होईल बरं? माणसाचं कोरडेपण पराकोटी गाठून तो कापरासारखा जळून जाईल? अतिआत्मविश्वासाच्या जोरावर अन् नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने अस्तित्व टिकवून ठेवेल? की जिवलगाच्या आस्थेनं पळून गेलेल्या झाडांपाशी जाऊन त्यांची मनधरणी करेल? कुणास ठाऊक काय करेल! आताशा माणसाचं वागणं हे निसर्गप्रेरित न उरल्याने त्याच्या प्रेरणेत स्वप्रज्ञेलाच तेवढं स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस निरनिराळं वागतो. आपल्या विचारांच्या सरण्या करतो. सृष्टीतले इतर सजीव प्रेरणेकरिता निसर्गचक्रावर अवलंबून असतात. नित्य बदलत्या निसर्गाशी जुळवून घेण्याकरिता स्वत:त अनुकूल बदल घडवत टिकून राहतात. माणूस मात्र निसर्गबदलावर मात करण्यासाठी स्वनिर्मित उपाय शोधत राहतो. त्या आपल्या निर्मितीद्वारे निसर्गावर मात करीत राहतो. किंबहुना तसं समजत राहतो. तर आपण ताणली थोडीही कल्पना आणि समजा, आरेमधल्या माणसांच्या निर्णयाकडे फांद्या पसरून पाहात असलेल्या दोन-अडीच हजार झाडांनी मृत्यूभयाने पलायन केलं. मागोमाग त्या भयाचा वणवा पेटून साऱ्या राष्ट्रीय उद्यानातील झाडंही सुंबाल्याकरती झाली तर? आपण माणसं जशी उत्क्रांत होत प्रगत होत गेलो, तशी झाडंही झालीच असतील की प्रगत. स्वत:च्या स्थिरतेतला मृत्यू कळला असेल की त्यांना. तशीही त्यांची समजूत मोठीच. वृक्ष प्रजाती म्हणून एकत्रित समजूत तर किती तरी मोठी! आपण जर हजारो वर्षांत एवढे शहाणे झालोय तर ती मंडळी आपल्या आधीपासून उभी आहेत. मग एव्हाना शोधलं असेल की त्यांनी स्वत:च्या मरणावरचं उत्तर. आम्हाला जर अमरत्वाची आस आहे, तर त्यांनाही ती असेलच की हो. अशी जर खरोखरच ती पळून गेली, अगदी मुंबईतल्या खड्डय़ांतले रस्ते शोधत तर मोठीच पंचाईत. सर्वप्रथम तर आपण आपापसात ‘कुणी पळवली?’ म्हणून मारामाऱ्या करू. आपल्यातले काहीजण नवी यांत्रिक झाडं बनवायच्या कामी लागतील आणि काहीजण करतील विचार कुठं गेली असतील झाडं याचा. मग त्यांना कळेल कदाचित की, महाराष्ट्रातल्या अनेक भूभागावरची झाडं ही खरोखरच पळून गेली आहेत. लांबच्या लांब माळ शीरी सूर्य धारण करून तपाला बसले आहेत. हजारो माणसं, जनावरं विस्थापित होत आहेत. त्यांच्या कहाण्या थरकाप उडविणाऱ्या आहेत.

खरंच गेली असतील का मराठवाडय़ातली झाडं पळून? खानदेशातली आणि विदर्भातली सांगाती घेऊन? आम्ही बरं का, लहान मुलांकरिता म्हणून एक चित्रपट केला होता. ‘धप्पा’ त्याचं नाव. त्या चित्रपटातल्या गोष्टीतली ही कल्पना आहे. सध्या ती आठवण्याचे प्रयोजन म्हणजे, कोर्टाच्या निर्णयाकडे सावली देत वाट पाहात असलेली ती आरे दुग्धालयातील झाडं. कोर्टानं कापल्या जाणाऱ्या झाडांचं मूल्य ठरवायला सांगितलंय म्हणे! त्यातून पडलेला हा प्रश्न. माणसाला ठरवता येईल झाडाचं मोल? एकेकाळी येत असावं. तुकारामाला ते कळलं होतं. त्यानं अस्तित्वाचं गणित वृक्ष सोयरे मानून सोडवलं होतं. त्याला गवसलेलं मूल्य आम्हाला कसं गवसेल? काय करायला हवं आम्ही त्याकरिता? स्वत:ला वगळावं लागेल का फायदा-तोटय़ाच्या गणितातनं? पण ते कसं करता येईल? सध्या तरी आम्ही आमच्यातच गुरफटलो आहोत. सध्या म्हणजे झाली आता बरीच वर्ष. इतका सारा काळ ‘हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण’ अशीच आमची समजूत आहे. आणि आता जो काय उत्तराधुनिक वा दक्षिणोत्तर आधुनिक काळ चालू आहे, त्यानं तर या समजुतीला चांगलंच खत-पाणी घालून दृढ केलं आहे. जे दृष्टीला दिसतं तिथवर आपलंच रान आहे अशा पाटीलकीची आमची वहिवाट आहे. मग त्यात इतर कुणाच्या हक्काचा प्रश्नच कुठे येतो? आम्ही काहीही करू या आमच्या अंगणात. कधी कंटाळलो तर हरणं, बदकं मारू, भुकेजलो तर झाडं तोडू. आताही आमची गाडी ठेवायची आहे आम्हाला. मूल्य कसलं विचारताय? कवडीमोल आहे हे सारं आमच्यासाठी. तोडू द्या पाहू. उशीर झाला तर आमचा खर्च वाढेल. दुसरीकडे आम्ही जाणार नाही.

जरा खोलात जाऊन विचार केला असता, या सगळ्यातला फोलपणा ध्यानी येतो. एकीकडे हजारो माणसं, जनावरं दुष्काळाच्या चटक्यानं अन्न तर सोडा, पाण्याला मोताद होत विस्थापित होत आहेत. आत्महत्या करीत आहेत. विकल होऊन शहराच्या आसऱ्याला येत आहेत. दुसरीकडे त्यांची एकाच ठिकाणी गर्दी होत आहे म्हणून आम्ही सुखसोयी उभारण्याच्या नादात शहरंही उजाड करीत आहोत. आमच्या विकासाच्या कल्पना आणि कार्यक्रम अतिशय भोंगळ आहेत. एकीकडे तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आंतरखंडीय क्षेपणास्त्र आम्ही बांधतो, पण एक गुळगुळीत रस्ता काही बांधता येत नाही. कोटय़वधी जनतेला पाणी पुरविता येत नाही. मात्र त्यांचा प्रवास आम्ही वेगवान करू इच्छितो. विकास या नावाची चीड यावी इतकी दिशाभूल या विकासानं केली आहे. या सगळ्याला आम्ही सारेच कारणीभूत आहोत. आम्ही प्रत्येकानं फक्त स्वत:च्या विकासाचा विचार केला. माझ्या वाढी-वृद्धीसोबत भवतालातल्या निसर्गाच्या जोपासनेचं सूत्र ना कुणी शिकवलं, ना कुणाला सुचलं. याबाबतच जे राजकीय शहाणपण आमच्याठायी उगवलं तेही भिंतीला टांगून ठेवलं. निसर्ग का रुसतो हे कुणी त्यापाशी जाऊन पुसेल की आपलीच मनमानी करेल? अजूनही आम्ही इकडचं पाणी तिकडं नेऊ अशा वल्गना करतो आहोत. आम्हाला वाटतं की सगळंच आमच्या कह्यत आहे. माणसाच्या तर्काबाहेरचं बरंच काही होतं आणि राहणार आहे याचा विसर खरं तर पडू नये. आम्ही विकासाच्या कल्पना मांडताना, त्यांची प्रारूपं बनविताना का नाही मनुष्येतर सृष्टीचा विचार करत? आमचा विकास निसर्गाशी मिळतंजुळतं घेत का होत नाही? प्रकल्प रचतानाच त्यात एकही झाड वा इतर सजीव  मारला जाणार नाही याची युक्ती का नाही लढवीत? जगभरात माणसं ते करीत आहेत. आमच्या पूर्वजांनी ते करून दाखवलं आहे. मग आम्ही का नाही करू शकत? असे कसे आमच्यातले तज्ज्ञ कुचकामी ठरतात? असं कसं  बिनदिक्कत हजारो झाडांचं शिरकाण अपेक्षित धरतो आम्ही? एवढं करून माणसांची गर्दी कमी होणार आहे का? भकास शहरातली सारीच माणसं आता मानसोपचार घेत आहेत. काही काळात ती कदाचित सामूहिक आत्महत्याही करू लागतील. नांदत्या भागांकडे मनमानी दुर्लक्ष करीत सगळीच त्या मुंबईकडे लोटली तर अजून काय होणार? इतक्या वर्षांत स्वत:च्या गावात माणसांना उपजीविका आम्हाला देता आली नाही. यात गेल्या पिढय़ान् पिढय़ा राज्य करणाऱ्यांचा दोष आहे, हे मान्य. तेव्हा थोडाफार निसर्ग शिल्लक होता म्हणून आणि आमचं अडाणीपण डोईवर चढून नाचत होतं म्हणूनही आम्ही त्यांना जाब विचारला नाही. पण म्हणून नव्या सरकारनं घिसाडघाई करून झाडं मोडायचं कारण नाही. तुम्ही म्हणता की ३३ कोटी  झाडं लावली. ती खरीच आहेत की गाईच्या पोटातल्या देवागत अदृश्य, हे काही आम्हाला ठाऊक नाही. असतीलच लावली तर ती कोणाला मोडू द्याल का? मुळात ती वाढतील का? गवताचं पातं उगवून येण्याइतकाही ओलावा भुईत टिकवला नाही आणि कशी जगवणार ही दौलत? त्यांना जगविण्याची जबाबदारी आम्हाला वाटून द्या. गावाला जबाबदार धरा एकेका वृक्षाच्या पालनपोषणासाठी. दंड करा मोडलं एखादं जरी. वापरा तंत्रज्ञान अन् दाखवा रोज पडद्यावर त्यांची वाढ. घडवा आमचं चरित्र अशा एकत्रित प्रयत्नांतून. मग आमच्यात जे अभिकल्पक तयार होतील ते झाडं मोडणारे प्रकल्प रचणार नाहीत. मग राहू आम्ही आमच्या गावात आणि शिवारात. तिथं मुंबईत समुद्रात बुडून जायला येणार नाही. जगभरातले जाणते कारभारी निघालेत रयत घेऊन पळालेल्या झाडांना शोधायला. तुम्हीही ऐकत असालच की निकरानं निसर्ग पुनस्र्थापनेच्या कामात रमलेल्या अशा समाजांबद्दल.

लहान लहान मुलं एकत्र येऊन शाळा बंद करीत आहेत. त्यांच्या वाटय़ाचा निसर्ग सुरक्षित राहू द्या, असं कळवळून सांगत आहेत. आपणच नेमकं उलटं करू या नको. राबणाऱ्या चाकरमान्यांची तुम्हाला चिंता आहे, वाहनांच्या पंगतीत बसून राहणाऱ्यांचा कैवार तुम्ही घेत आहात हे चांगलंच आहे. त्याकरिता तुम्ही गाडी दौडवणार आहात तेही ठीक. त्यानं कदाचित आम्हा साऱ्याच चाकरमान्यांचा आजचा दिवस आपण सुखकर कराल. मात्र, वृक्षतोडीतून उद्या उभी रहाणारी संकटं आमच्यासारखीच तुम्हालाही हतबल करतात हे आम्ही पाहतच आहोत. वृक्षतोडीनं पाऊस आणिक धुंद कोसळेल. तुम्ही-आम्ही रचलेली ही मायानगरी मनमानी करीत पाण्यात बुडवेल. आजचा दिवस गोड करण्याची ही घाई आम्हा सर्वाच्या अंगलट येणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकता काय? कर्तृत्ववान पूर्वसुरींची आपण नावे घेता, मग त्यांच्याकडे होती तशी दूरदृष्टी का नाही मिळवत? समजा, मागचे राज्यकत्रे नाकत्रे होते, पण तेव्हा आमचीही तीच लायकी होती. आज तुम्ही कत्रे असाल तर आमची लायकी सुधारली असेल. लोकशाहीत लोकांच्या लायकीनुरूप शासन मिळतं म्हणतात. आम्ही मोठय़ा उमेदीनं तुम्हाला निवडलंय. पुढच्या पिढय़ांनी आमची लायकी काढावी असं काही करू नका. आमची इभ्रत आपल्या हाती आहे. जे राजकारणाकरिता या समस्येचा वापर करीत असतील त्यांचे बुद्धीदारिद्रय़ त्यांना लखलाभ. माझ्यासारखे अनेक मात्र केवळ त्या तुकोबाचा एवढासा अंश आत शिल्लक असल्यानं कदाचित तळमळत आहोत. झाडं टिकवून धरण्यानं जर होणार असेलच काही अडचण, तर आम्ही सहन करायला तयार आहोत. अत्यंत गचाळ शहर व्यवस्थापन अन् सुविधा (?) सहन करून निर्ढावलोय आम्ही. ‘होऊ द्या खर्च!’ हे नाही तरी तुम्ही शिकवलंच आहे आम्हाला. आम्ही करू की पदरमोड. होणाऱ्यातलं काम आहे. करून दाखवाच.

बरं का, आमच्या पूर्वजांनी आमच्याकरिता मागे ठेवलेल्या रानात आम्ही शे-दीडशे झाडं लावली आहेत. आमचा सोलापूर जिल्हा कायम पर्जन्यछायेत. यंदाही पाऊस झाला नाही. कशी बशी टिकवलीत. चांगली खांद्यापर्यंत आली आहेत. त्यातलं एखादं जरी पळून गेलं ना तरी शपथ सांगतो, विश्वास उडेल माझा माझ्यातल्या माणसावरचा.

girishkulkarni1@gmail.com