कामाठीपुरा म्हटलं की पांढरपेशा समाजातील माणसांच्या डोळ्यांसमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. कामाठीपुऱ्याशी कधीच काहीच संबंध येत नसल्यामुळे ती प्रतिमाच कायम राहते. या कामाठीपुऱ्याच्या आतले ताणेबाणे, तिथल्या माणसांचं जगणं, त्यांचा संघर्ष, त्यांची सुख-दु:ख, त्यांचे एकमेकांशी असलेले बरेवाईट संबंध या सगळ्याचे तपशील फारसे कुणालाच माहीत नसतात. ते ज्यांना माहीत असतात, ते लिहिणारे वा लिहू शकणारे असतातच असं नाही. त्यामुळे ही दोन जगं कायमच दोन टोकांवरची राहिली आहेत. त्यातही कामाठीपुऱ्यातल्या वेश्याव्यवसायावर आजपर्यंत फिक्शन, नॉनफिक्शन पद्धतीचं बरंच लिखाण झालं आहे, पण त्याशिवायच्या कामाठीपुऱ्याबद्दल तिथे राहणाऱ्या, वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या इतर समाजांबद्दल फारसं माहीत नसतं. या पाश्र्वभूमीवर गौतम अनंत तांबे यांचे ‘ ‘क’ कामाठीपुऱ्यातला’ हे पुस्तक आलं आहे. कामाठीपुरा म्हणजे वेश्याव्यवसाय या पांढरपेशा समाजाच्या मनात असलेल्या रूढ प्रतिमेच्या पलीकडे जाऊन तिथल्या दलित, शोषित, कष्टकरी कामगारांच्या जगाचं अंतरंग हे पुस्तक उलगडून दाखवतं. लेखक गौतम तांबे हे मुळात कामाठीपुऱ्यात राहणारे कार्यकर्ते. तिथे राहताना, काम करत असताना भेटलेली वेगवेगळी माणसं, त्यांचं जगणं त्यांच्यातल्या लेखकाला अस्वस्थ करत होतं. या अस्वस्थतेची कागदावर उमटलेली वाट म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ सूचक आहे. प्रस्तावनेत पुस्तकाचा उल्लेख कथासंग्रह असा केला गेला असला तरी या काही रूढ अर्थाने कथा नाहीत. एका तळमळीच्या कार्यकर्त्यांला आपल्या आसपासच्या, कामाच्या निमित्ताने भेटलेल्या माणसांच्या आयुष्यात डोकावून पाहताना जे जाणवलं-भावलं, ते त्याने तेवढय़ाच सच्चेपणाने कागदावर उतरवलं आहे. तांबे यांच्या या लिखाणाला प्रत्यक्ष अनुभवाचा आधार आहे. लोकांच्या जगण्यातली वेदना, त्यातूनही निर्माण होणारी त्यांची जगण्याची ऊर्मी, परिस्थिती त्यांच्याशी खेळत असलेले खेळ या सगळ्यातलं नाटय़ लेखकाला जाणवलं आहे, हे लेखनासाठी निवडलेल्या प्रसंगांवरून, व्यक्तिरेखांवरून जाणवतं. मुळात जगण्यातलं हे नाटय़ जाणवणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ते प्रत्यक्ष कागदावर उतरवणं ही आणखी वेगळी गोष्ट आहे. कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या माणसाला तर इच्छा असूनही अनेक व्यवधानांमधून ते जमतंच असं नाही. म्हणूनच कथा म्हणून हे लिखाण अपुरं असलं तरी अभिव्यक्तीच्या सच्च्या ऊर्मीतून ते आलं आहे हे महत्त्वाचं!
‘ ‘क’ कामाठीपुऱ्यातला’ – गौतम अनंत तांबे,
प्रकाशक संजीवनी राणे, मुंबई, पृष्ठे – १४१,
मूल्य – १०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा