मी आज तुम्हाला अगदी ‘मन की बात’ सांगणार आहे. पण विश्वास ठेवणार ना तुम्ही? नाही, तुम्ही ठेवाच विश्वास. माणूस खोटं केव्हा बोलतो? त्याला स्वार्थ साधायचा असेल तर. खरंय ना? उगाच कुणी कुणाशी खोटं बोलत नाही. अन् तुमच्याशी खोटं बोलून, तुम्हाला फसवून मला कोणता स्वार्थ साधायचा आहे? तुम्ही काय इतके भोळे आहात- सहज फसले जायला? नाही ना? तुमच्याशी मोकळेपणानं बोलल्यानं माझं मन रितं होईल. मनावरचं दडपण नाहीसं होईल, हा माझा स्वार्थ आहे.

तर सांगतो काय, ते नीट ऐका. मी जिच्याबरोबर संसार करतोय ती माझी बायको नाही, किंवा मी तिचा नवराही नाही. तिचा नवरा दुसराच आहे. यात काय मोठंसं, असं म्हणाल. आमचे विवाहबाह्य़ संबंध आहेत असं समजाल. तसं नाही. आमचं देवाब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न झालंय. पण तरीही मी तिचा नवरा नाही. पण तिला ते माहीत नाही. ती मला तिचा लग्नाचा नवरा समजते आहे. हा तिचाच समज आहे असंही नाही. तिचे सासू-सासरेसुद्धा मला आपला मुलगा समजतात. तिचे दीरही मला आपला भाऊच समजतात.
थांबा. थांबा. वेडय़ाच्या हॉस्पिटलमधून एखादा पेशंट पळालाय का, अशी चौकशी करायला निघू नका. मी अगदी खरं तेच सांगतोय. माझं आणि माझ्या बायकोचं देवाब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न झालंय. पण मी तिचा नवरा नाही. रेखाचं आणि माझं लग्न झालेलं नाही.
खूप गोंधळ होतोय का तुमचा? अगदी पहिल्यापासून सगळं खरं खरं सांगतो. पण तुम्ही हे रेखाला सांगू नका हं! तिला, वैजयंतीला, विशाखाला आणि विशालला- कुणालाच कळू देऊ नका. वैजयंती, विशाखा आणि विशाल ही आमची मुलं आहेत. रेखाची मुलं आहेत. पण ती माझी मुलं नाहीत. माझ्या आणि रेखाच्या मुलांची नावं वैजयंती, विशाखा आणि विशाल हीच आहेत.
माझी मुलं- वैजयंती मोठी बारा वर्षांची. विशाखा आणि विशाल ही जुळी मुलं- आठ वर्षांची. तिघंही हुशार आहेत. चतुरस्र आहेत. म्हणजे ऑलराऊंडर आहेत. मी सांगणार आहे ती घटना सहा वर्षांपूर्वी घडली. विशाखा अन् विशाल यांच्या जन्मानंतर दोन वर्षांनी. पण त्या घटनेच्या आधीपासून सगळं सांगतो.
माणिक माझ्या नजरेला पहिल्यांदा पडली ती बारावीच्या परीक्षेला बसली होती तेव्हा. मी त्या परीक्षेला सुपरवायझर होतो. हा एक अनुभव घ्यावा, पॉकेटमनीही मिळेल, हा हेतू. परीक्षा हॉलमध्ये माणिक बावरलेली होती. अशी बावरलेली माणिक पुन्हा मला दिसली, ते तिचा हात पहिल्यांदा हातात घेतला तेव्हा. करेक्ट! आताची रेखा म्हणजे तेव्हाची माणिक.
मी तेव्हा एम. ए.च्या शेवटच्या वर्षांला होतो. माणिकनं माझ्या मनात घर केलं होतं. माझ्या घरात हे माणिक आणायचं असं तेव्हाच ठरवलं होतं. हॉल तिकिटावरून तिचं नाव, पत्ता मिळाला. ती पेपर लिहीत होती तेव्हा मी तिला न्याहाळीत होतो. तिचे विभ्रम मनात साठवत होतो. दातांनी खालचा ओठ चावणं. काहीतरी आठवण्याकरता समोर पाहणं. आठवलं की आनंद चेहऱ्यावर दिसायचा. तिचा सोनेरी गौरवर्ण तिला खुलून दिसायचा. उफाडय़ा बांध्याची माणिक म्हणजे रत्नच होतं. माझ्या नजरेला तिची नजर मिळाली की तिच्या पापण्या झुकायच्या. तिच्या डोळ्यांतल्या मासोळ्या सुळकन् पळायच्या. बोटांमध्ये पेन धरून ती पेपर लिहीत होती. तिनं नखं वाढवलेली आणि रंगवलेली होती. मनगटापासून कोपरापर्यंत फिकट मेंदीचं डिझाइन होतं. स्वत:शीच पुटपुटायची. तिच्या लालसर ओठांची हालचाल व्हायची. कधी कधी ती दोन्ही ओठ एकमेकांवर घट्ट दाबायची.
मी तिला समोरून, डाव्या बाजूनं, उजव्या बाजूनं, पाठीमागून असा सगळ्या बाजूनं न्याहाळीत होतो. तिचं संथ श्वसन चाललं होतं. मुलींना सहावा सेन्सरी ऑर्गन असावा. माणिक मधेच मला एखादं स्मित देत होती. पुरवणी देता-घेताना सहज झाल्यासारखा ती मुद्दाम हस्तस्पर्श होऊ देई. तेव्हाचं तिच्या ओठांचं अस्फुट विलग होणं, नजरानजर आणि नजर खाली झुकणं.. सगळंच न्यारं.
तिचे सगळे पेपर संपेपर्यंत स्मितहास्याची देवाणघेवाण करण्याइतकी, एखादं वाक्य बोलण्याइतकी आमची ओळख झाली. तेव्हा मग सगळा धीर एकवटून सगळे पेपर संपल्यावर तिला कॉफीपानाला बोलावलं. सगळ्या मत्रिणींना टाळून ती आलीही.
मग पुढच्या पायऱ्या चढणं सोपं गेलं. नंतरची सुट्टी मी वाया घालवली नाही. आठवडय़ातून दोन-तीन वेळा तिला भेटणं, पुस्तकं वाचणं, त्यावर चर्चा. नाटक-सिनेमापर्यंत एवढय़ात मजल मारणं गर होतं. खरं म्हणजे भेटणं आणि तिचे विभ्रम मनात टिपणं, हा एकच उद्देश असे. उर्वरित वेळ तिच्या आठवणींत घालवत होतो. पुढच्या वर्षी बारावीनंतर तिनं आमच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अन् एम. ए.नंतर मीसुद्धा त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. एक दिवस अचानक माणिकचे आई-बाबा आमच्या घरी आले आणि माणिकच्या अन् माझ्या साखरपुडय़ाची तारीख ठरवूनच परत गेले. त्यानंतर आमचा विवाह तुलसीविवाहानंतरच्या पहिल्या मुहूर्तावर झाला. माणिकची ‘रेखा’ बनली.
त्यानंतरची चौदा वर्षे अगदी मजेत गेली. एके दिवशी मात्र मला दुर्बुद्धी सुचली. मी बाईकवरून कारगिलमाग्रे लेहला गेलो. जिलबी घाटात समोरून तो दुसरा ‘मी’ बाईकवरूनच आला. आमची नजरानजर झाली. तो दुसरा ‘मी’ माझ्या जगात शिरला अन् मी या जगात आलो.
दोन समांतर विश्वं आहेत. समांतर असली तरी घडी पडल्यानं एखाद्या ठिकाणी या दोन्ही विश्वातलं अंतर शून्य होतं. आपण सहजपणे बेसावध क्षणी एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जातो. मी दुसऱ्या विश्वात जात असताना बाईकचं पुढचं चाक दिसेनासं झालं तेव्हाच खरं तर माझ्या लक्षात यायला हवं होतं. म्हणूनच तो बेसावध क्षण म्हणायचा. चालताना आपलं पुढचं पाऊल दिसलं नाही की सावध व्हावं. इथं विश्वाला घडी पडली आहे असं समजावं. नाहीतर आपण दुसऱ्या विश्वात जातो.
माझ्या विश्वातली रेखा, वैजयंती, विशाखा आणि विशाल वेगळे, अन् या जगातले रेखा, वैजयंती, विशाखा आणि विशाल वेगळे. हे वेगळेपण कसं ओळखायचं? त्या जगातले आम्ही सगळे डावरे आहोत. आमच्या मेंदूचा उजवा भाग डॉमिनंट असतो. उत्परिवर्तनाने काहींच्या मेंदूचा डावा भाग डॉमिनंट असतो. पण अगदी थोडे असतात असे. माझ्या जगातली रेखा, वैजयंती, विशाखा आणि विशाल आम्ही सगळे डावरे आहोत.
मला एकदा रेखानं विचारलंसुद्धा, ‘सर, तुम्ही उजव्या हातानं लिहायचे, आता लेहहून आल्यापासून एकदम डावरे कसे बनलात?’
माझी डावरी रेखाही मला ‘सर’च म्हणते.
काय सांगू या रेखाला- माझं जग वेगळं अन् तुमचं जग वेगळं आहे म्हणून? जिलबी घाटात त्या उजखोऱ्या ‘मी’च्या नजरेला नजर मिळाली अन् माझ्या विश्वातून मी या विश्वात आलोय.. अन् तुझा नवरा म्हणजे तो दुसरा ‘मी’ या जगातून त्या माझ्या जगात गेलाय म्हणून?
काहीतरी थातुरमातुर उत्तर दिलं. रेखाला जेव्हा जेव्हा स्पर्श करतो, तेव्हा तेव्हा मला माझ्या डावऱ्या रेखाची आठवण येते. तो दुसरा उजखोरा ‘मी’ तिला स्पर्श करत असेल, या विचारांनी मी अस्वस्थ होतो. डावरे वैजयंती, विशाखा आणि विशाल आठवतात. तो दुसरा ‘मी’ त्यांना पितृप्रेम भरभरून देत असेल का, या विचारानं मी रात्र-रात्र तळमळून काढली आहे.
दरवर्षी मी बाईकवरून जिलबी घाटातून जातो. तो दुसरा ‘मी’ समोरून येईल, आमची परत नजरानजर होईल, आणि मग तो दुसरा ‘मी’ त्याच्या जगात अन् मी माझ्या जगात जाईन, या एकाच आशेनं. या विश्वातल्या सगळ्यांना वाटतंय- मला डोंगरदऱ्यांतून बाईकवरून भटकायला खूप आवडतं. वेडे कुठले! ल्ल

sharadpuranik4@gmail.com