‘तुजविण संसारी’ हे आशा मुळगावकर यांचं पुस्तक आज (२ नोव्हेंबर) मुंबईमध्ये प्रकाशित होत आहे. कॅन्सरग्रस्त मुलीच्या उपचारांसाठी, तिचं मनाधैर्य टिकवण्यासाठी केलेल्या अविश्रांत कष्टांची एका आईने सांगितलेली ही कहाणी. या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश..
हल्ली सकाळी उठलं की वाटतं आपण खूप वेळ झोपलो होतो. कदाचित अनेक रात्री, अनेक दिवस आपण झोपलेलोच होतो. आता अनेक दिवसांनंतर आपण जागे होत आहोत.
मन विचार करतं आणि मागे मागे जातं.. दुर्गाच्या त्या आजाराच्या पहिल्या दिवसापर्यंत- अगदी २८ ऑक्टोबर २००६ पर्यंत मी मागे जाते.. माझं स्वत:चंच वागणं, बोलणं आठवतं. तेव्हा वाटत होतं, आपण खूप संयमाने सारासार विचारानेच जमेल तसे वागतो आहोत.
आमच्यावर आघात तर प्रचंड मोठा झाला होता. कॅन्सरसारखा रोग.. तोही जवळजवळ थर्ड स्टेजला आलेला.. एखादी त्सुनामी लाट यावी किंवा प्रचंड भूकंप व्हावा.. ज्वालामुखीच्या तोंडाशी आपण उभं असावं असंच काहीसं झालं होतं.. पण तरीही कधीतरी त्सुनामी येणार.. भूकंप होणार.. अशी सोसाटय़ाची भयंकर वादळं येणार. मनात कुठेतरी त्याचीही तयारी हवीच. पण लहानपणापासून अशा वादळांची सवयच नव्हती. आयुष्य कसं सुखासीन झालं होतं. कधीकाळी दु:ख आपल्या वाटय़ाला येईल याचा विसरच पडला होता. सुखाच्या गाद्यागिरद्यांवर मी निश्िंचतपणे विसावले होते आणि दैवाने मुस्कटात मारून मला जागं केलं होतं.
सगळ्यात माझ्या हळव्या भावनेवर त्याने राक्षसी प्रहार केला होता. अत्यंत क्रूर.. बीभत्स, भयानक अक्राळविक्राळ सत्य, उघडंनागडं माझ्यासमोर उभं राहिलं होतं. मी अत्यंत घाबरले होते. त्या वास्तवाला सामोरं जायची माझी तयारी नव्हती. मनात त्या सत्यापासून मला दूर पळून जायचं होतं. कदाचित हे जर माझ्या बाबतीत झालं असतं तर मी स्वत:ला संपवून घेतलं असतं का? कोण जाणे.. पण ती माझी लाडकी लेक होती. माझ्या स्वत:पेक्षाही मला प्रिय असणारी. मी तिला माझ्या तळहाताच्या फोडासारखी वाढवली होती. तिला या गर्तेतून बाहेर काढणं ही माझी जबाबदारी होती. मी आता कोलमडणं म्हणजे तिचा आत्मविश्वास कमी करण्यासारखं होतं. तिला आधार द्यायला मी कशीबशी उभी राहिले होते.
आज वाटतं.. कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची मनाची तयारी हवी. सोशिकपणा हवा. तो माझ्याकडे नव्हता. आम्ही सर्वानीच  त्यावेळी घेतलेले निर्णय हे भावनेच्या भरात घेतले होते. भावनेत आम्ही कुठेच कमी पडलो नव्हतो, पण व्यवहारात चुकलो होतो. आज इतक्या वर्षांनंतर त्रयस्थपणे मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं.. आपण भावनेच्या भरात वाहवत गेलो.
कॅन्सरसारख्या रोगाला सामोरं जाताना यापेक्षा कितीतरी अधिक धाडसी असणं, व्यवहारी असणं आणि संयमी असणं गरजेचं होतं. पाण्यात बुडणाऱ्या माणसांनी मिळेल त्याचा आधार घेऊन जीव वाचवावा तशी धावपळ आम्ही करत होतो.
कॅन्सर होऊनही तो कुणाला कळू नये ही धडपड अत्यंत बालीशपणाचीच होती. आपल्याला कॅन्सर झालाय हे कळू नये असं दुर्गाला वाटणं हे ठीक आहे. पण मीसुद्धा तिला हवं तसं वागत होते. कॅन्सर झालाय हे जर मोकळेपणी स्वीकारलं असतं तर कितीतरी पर्याय आमच्यापर्यंत आले असते. त्याच रोगाला सामोरं जाणाऱ्यांनी त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले असते. त्यातून आम्ही योग्य पर्याय कदाचित निवडू शकलो असतो. आज काय झालं असतं, काय झालं नसतं, हे बोलण्यात अर्थ नाही असंही वाटू शकतं. पण ते खरं नाही. आज त्रयस्थ म्हणून मी या सर्वाचा विचार करायला हवा व मला वाटतो तो माझ्या दृष्टीने योग्य विचार मांडायला हवा. त्याचा कुणा अनामिकेला उपयोग होऊ शकतो.
आत्ताआत्तापर्यंत मी भावनेच्या भरातच वागत होते. ती असतानाही आणि आत्तापर्यंत.. ती गेल्यानंतरही. पण मी त्रयस्थ होऊन विचार केला तर वाटतं, आम्ही बरेच भावनेच्या भरात वाहून गेलो. थोडासा व्यवहाराचा विचार केला असता, भावनेशी व्यवहाराची सांगड घातली असती तर ते योग्य ठरलं असतं.
कॅन्सरसारखा रोग कुणालाही होऊ शकतो. त्याचा इलाज करावाच लागतो. कॅन्सर हा दीर्घकाळ चालणारा आजार आहे. तेव्हा कमीत कमी खर्चात, पण उपचारांच्या दृष्टीने कुठचीही तडजोड न करतानाच इलाज करायला हवा. सर्व धडपड व धावपळ करूनही स्वत:ची व पेशंटची शक्ती वाचवायला हवी. कारण ही शक्ती दीर्घकाळ टिकणं आवश्यक आहे. या रोगाला भरपूर पैसा लागतो. त्याचबरोबर पेशंटचं मनोधैर्य टिकवणं महत्त्वाचं असतं. कित्येक पेशंटस् या रोगाने हताश होतात. त्यांचं मनोधैर्य कमी पडतं. आपल्या या रोगाने लोक आपल्यालाही कंटाळणार तर नाहीत ना, याचीही भीती वाटते. दुर्गाच्या बाबतीत तिचं मनोधैर्य शेवटपर्यंत टिकून होतं. तिचा संयम वाखाणण्यासारखा होता. तिने तिचं दु:खही ग्रेशसली निभावलं. तिची देवावरची निष्ठा कधीही ढळली नाही. तिला मिळालेलं आयुष्य तिने पूर्णपणे उपभोगण्याचा आणि ते सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत ती पेशंटस्ना अ‍ॅडव्हाइस देत राहिली. ती शेवटपर्यंत काम करत राहिली.
आम्ही मात्र तिच्यासाठी इकडे तिकडे धावत होतो. कोण काय सांगेल ते उपाय करत होतो. पैसा, वेळ आणि कष्ट कशालाही कमी पडत नव्हतो. पण आमच्याकडून सर्व योग्य होत होतं का?
जेव्हा सर्व उपाय संपले तेव्हा आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेलो. सगळ्या उपचारांनी दुर्गा इतकी थकून गेली होती की, ती स्वत: कधीही टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊ शकली नाही. तिचे रिपोर्ट्स घेऊन चिनू हॉस्पिटलमध्ये जात असे. तिकडच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ती सर्व औषधं व उपचार सांगे. ते घरीच केले जात. कधीतरी दुर्गाही डॉक्टरना फोन करे, त्यांना स्वत:च्या शंका विचारून स्वत:च्या उपचारांबद्दल विचारून घेई.
कधीतरी मी वरळीला तिच्या शेजारी बसले असताना तिनेच मला म्हटलं होतं.. ‘आई, मला वाटतं आपण जर पहिल्यापासूनच टाटा कॅन्सर हॉस्पिटलला गेला असतो तर खूप बरं झालं असतं.’ कॅन्सरचं दुखणं लपवण्याच्या नादात आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटल टाळलं!! टाटा हॉस्पिटलमध्ये गेलं की, हा नक्की कॅन्सरच आहे हे सर्वाच्या लक्षात येतं. पण जे अटळ आहे त्यापासून पळून जाण्यात काय अर्थ आहे?
टाटा हॉस्पिटलमध्ये त्यावेळी ओरल केमोथेरपी दिली जात होती. अनेक खेडोपाडी जाऊन डॉक्टर्स पेशंटस्वर या केमोथेरपीचा उपचार करत. या उपचारांमुळे कॅन्सर पूर्णपणे बरा होत नसला तरी तो वाढत नाही असं त्यांना आढळून आलं होतं. या केमोथेरपीचे उपचार दुर्गावरही सुरू केले. पण त्याआधी तिच्यावर एकोणीस वेळेला किमो देऊन झाली होती. त्याचे तिच्यावर भलभलते साइड इफेक्टसही झाले होते. तरीसुद्धा त्या ओरल किमोचा तिच्यावर थोडाफार चांगला परिणाम दिसून आला. ही केमोथेरपी कायमस्वरूपीही घेता येते.
एकदा टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर्स म्हणाले, ‘तुम्ही पहिलं ऑपरेशन झाल्यावर तरी निदान टाटामध्ये यायला हवं होतं. त्या ऑपरेशननंतर जर तुम्ही ओरल किमो घेतली असती तर कदाचित तिचं आयुष्य वाढलं असतं. तिला कमी त्रास झाला असता.’
पण आता हातातून वेळ निघून गेली होती. जेवढं हातात उरलं होतं तेवढं करणं, जास्तीत जास्त योग्य प्रयत्न करणं हातात उरलं होतं.. आम्ही तेच करत होतो.
गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय सर्वानाच कॅन्सरसारखा रोग होतो. कुठल्याही वयात होतो. आपापल्या परिस्थितीप्रमाणे सगळ्यांनाच त्याला सामोरं जावं लागतं. त्या सगळ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर योग्य त्या मोबदल्यात त्यांना फक्त टाटा कॅन्सरच उपचार देऊ शकतं. हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असते. लाइनीत थांबावं लागतं. हे सगळं जरी खरं असलं, तरी तोच एक योग्य उपाय आहे.
आपल्यावर योग्य उपचार होत आहेत आणि योग्य त्या मोबदल्यात होत आहेत याची तरी निदान हमी मिळू शकते. आपण केलं ते योग्य की अयोग्य.. आपण बरोबर पैसे दिले की लुटले गेलो, याचं शल्य तरी नक्कीच कमी होईल.
आज टाटा कॅन्सरमधून अनेक पेशंटस् बरे होऊन घरी जातात. तिथेसुद्धा काही वेळा आयुर्वेदिक औषधे सुचवली जाऊ शकतात. पण ती अनुभवाने सिद्ध झालेली असतात. आततायीपणे स्वत:वर प्रयोग करून घेणं हे आत्मघातकी आहे. होमिओपॅथी, आयुर्वेद किंवा अ‍ॅलोपॅथी- कुठलंही औषध वज्र्य नाही, पण ते जाणत्यांनी योग्य रीतीने दिलेलं असलं पाहिजे. स्वत:च्या प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या व्यक्तीसाठी प्रत्येकजण आपल्या कुवतीबाहेरही पैसा खर्च करतो, वेळ खर्च करतो, कष्ट उपसतो. त्याचं चीज व्हायला हवं. फळ मिळणं- ना मिळणं, हे शेवटी देवाच्या हातात आहे.
रोग्यांवर योग्य इलाज होणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे सर्व करूनच हा उपाय व्हायला हवा. श्रीमंत-गरीब हे सर्व आजारात सारखेच आहेत. गरीबांवरही सर्व उपचार योग्य त्या मोबदल्यात व्हायला हवेत.. दीर्घकाळच्या ट्रीटमेंटसाठी योग्य त्या खर्चात व कष्टांत उपचारासाठी काय करावं, ते कॅन्सर झाल्यावर थंड डोक्याने प्रथमच ठरवायला हवं. तरच आपण चूक होतो की बरोबर होतो या विचारांनी होणारी तगमग थांबेल.
आज दुर्गासाठी आम्ही केलेल्या कष्टांची, तिच्यासाठी खर्च केलेल्या वेळेची आणि तिच्यासाठी खर्च केलेल्या पैशांचीही कुठेही खंत नाही. फक्त एवढंच वाटतं, त्याचं  चीज व्हायला हवं होतं.. ती आत्ता असायला हवी होती.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा