‘लिहिले कवित्व आपुल्या हातें।
बुडवीं उदकांत नेऊनी।।’
तुकारामांना कवित्व नष्ट करण्याचा आदेश रामेश्वरभट्टांनी दिला. काही इतिहास संशोधकांच्या मते, यात त्यांचा काहीच संबंध नाही. त्यांना खलनायक ठरवून महाराष्ट्राने त्यांच्यावर अन्याय केला आहे. काहींच्या मते, रामेश्वरभट्टांनी वह्या बुडविण्याचा आदेश दिला खरा, पण त्यामागे त्यांचा हेतू चांगला होता. तुकोबा हे थोर आहेत हे लोकांना कळायला पाहिजे, तर त्यासाठी त्यांच्या नावावर एखादा चमत्कार हवा. तुकोबा भलेही चमत्कारांना धिक्कारतात; पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही येथील जनरीत आहे. म्हणूनच ज्ञानोबांच्या चरित्रात रेडय़ामुखी वेद बोलविणे, भिंत चालायला लावणे यांसारखे चमत्कार आवश्यक झाले. तुकोबांनाही ते करणे आवश्यकच होते. आणि म्हणून आपल्या या रामेश्वरभट्टांनी त्यांना न्यायालयात खेचले. जलदिव्य करायला लावले. रामेश्वरभट्ट पुढे जाऊन तुकोबांचे शिष्य होतात, म्हणून त्यांच्या आधीच्या कृत्यांवर असा मुलामा ज्यांना चढवायचा आहे त्यांनी तो खुशाल चढवावा. पण महिपतीबाबा ताहराबादकर यांची साक्ष प्रमाण मानायची, तर रामेश्वरभट्ट हे प्रारंभी सनातन वैदिक धर्माची ध्वजा खांद्यावर घेऊन तुकोबांना निखंदण्यास निघाले होते. ‘देशोधडी करावा तुका’ असे त्यांनी ठरविले होते ही वस्तुस्थिती आहे. आणि नंतर ते तुकोबांचे अनुयायी बनले हेही खरे आहे. पण या प्रसंगात रामेश्वरभट्ट ही व्यक्ती मुळातच बिनमहत्त्वाची आहे. गाथ्याच्या पंडिती आणि देहू प्रतीतला याबाबतचा उल्लेख पाहण्यासारखा आहे- ‘अलकापुरीं स्वामी कीर्तनास उभे राहिले, तेव्हां कवित्वाचा निषेध करून लोक बोलिले कीं, कवित्व बुडविणे..’ तेव्हा कवित्व बुडविण्याचा आदेश कोणी दिला याला फारसे महत्त्व नाहीच. कारण तो रामेश्वरभट्टांचा आदेश नव्हताच. तो धर्मसत्तेचा आदेश होता. त्यामागे सनातन वैदिक धर्माचे अवघे बळ उभे होते. त्या आदेशाला दंडसत्तेचा पाठिंबा होता. तिकडे राज्याचा अधिपती कोणीही असो- निजामशहा असो की आदिलशहा; जहागिरी कोणाचीही असो- मुसलमानांची असो की स्वकीयांची.. शहाजीराजांची; मात्र सामाजिक सत्ता होती ती पुरोहितशाहीचीच, धार्मिक ग्रंथांचीच. मुसलमानांच्या बाबतीत हा ग्रंथ अर्थातच कुराण होता. त्यांना शरियतचे कायदे लागू असत. हिंदूंचा न्याय प्रचलित हिंदू धर्मशास्त्राने होत असे. अर्थात मुसलमानी आणि हिंदू कायदा यांत मतभेद असतील तेथे पारडे मुसलमानी कायद्याचेच जड असे. या मध्ययुगीन कालखंडातही हिंदूंच्या पंचायती, गणसभा, गोतसभा चालूच होत्या. ही परिस्थितीने लादलेली सहिष्णुता होती. त्यामागील खरे कारण मुस्लिम राज्यकर्त्यांकडील मनुष्यबळाच्या कमतरतेचे होते. परंतु यामुळे हिंदूंच्या किमान धार्मिक बाबतीत तरी परंपरागत कायद्यांचीच सत्ता चालत होती. त्याची ‘घटना’ स्मृती आणि धर्मसूत्रांची होती. तुकोबांना कवितेच्या वह्य़ा पाण्यात बुडविण्याचा जो आदेश देण्यात आला तो या घटनेला धरूनच. एरवी वह्य़ा नष्ट करायच्या तर त्या बुडवायच्या कशाला? त्या जाळून नष्ट करणे अधिक सोपे होते. परंतु एखाद्या रामेश्वरभट्टाच्या मनी द्वेष उपजला म्हणून झालेली ही शिक्षा नव्हती. हे धर्मशास्त्राने सांगितलेले दिव्य होते.
तुकारामांच्या काळातील या दिव्यपद्धतीची माहिती गागाभट्टांच्या ‘व्यवहारनिर्णया’त मिळते. दिव्याचे अनेक प्रकार असतात. पण कोणते कोणाला आणि कोणत्या वर्णाना, तसेच कधी द्यायचे, याचे काही नियम असतात. त्यानुसार वैश्याला जलदिव्य सांगितले आहे. त्यात चौदा दिवसांची मुदत असते. दिव्य घेण्यापूर्वी तीन अहोरात्र उपोषण करायचे. चौथ्या दिवशी दिव्याच्या जागेची पूजा करायची. मग जलदिव्य सुरू करायचे. दिव्य घेणाऱ्यास छातीभर पाण्यापेक्षा अधिक खोल जाण्याची परवानगी नाही. तुकारामांना हे जलदिव्य सांगितले असेल तर मग यात त्यांच्या वह्य़ा कोठून येतात, असा एक प्रश्न येतो. इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी ‘तुकाराम चरित्रा’त याची चर्चा केली आहे. ते सांगतात, ‘तुकोबांनी (कवित्व) लिहिले हेही तुकोबांना मान्यच होते. प्रश्न होता- हे सर्व देवाच्या आदेशाप्रमाणे होते की नाही, हे देवानेच प्रत्यक्षाप्रत्यक्ष मार्गाने पटवून द्यावयाचे होते. तेव्हा हे जलदिव्य वह्य़ांनीच करून त्यांनी आपली सत्य वस्तुस्थिती लोकांस जाहीर करावयाची होती. त्यानुसार तुकोबांनी दिव्य करण्यास संमती दिली. तीन दिवस उपवास, नंतर चौथ्या दिवशी वह्य़ा सविधी पाण्यात बुडवून दुपारचे सुमारास दिव्य केले.’
तेरा दिवस झाले. वह्य़ा वर आल्याच नाहीत. तुकोबा सांगतात-
‘तेरा दिवस झाले निश्चक्र करितां।
न पावसी अनंता मायबापा।।
पाषाणाची खोळ घेऊनि बैसलासी।
काय हृषिकेशी झालें तुज।।’
‘मी तेरा दिवस उपोषण केले. पण तू अजून मला पावत नाहीस. दगडाची खोळ घेऊन बसलास की काय? तुला झाले तरी काय?’ एवढेच विचारून तुकोबा थांबत नाहीत. ते विठ्ठलाला थेट धमकीच देतात. म्हणतात-
‘तुजवरी आतां प्राण मी त्यजीन।
हत्या मी घालीन पांडुरंगा।।’
(गाथ्यात जलदिव्याबद्दलचे २७ अभंग एकत्र येतात. त्याच संदर्भातला हा एक अभंग. तो मात्र भलताच कुठेतरी येतो. असे का, हा प्रश्नच आहे.)
तर सलग तेरा दिवस तुकोबा इंद्रायणीकाठी विठ्ठलाची करुणा भाकत होते.
‘द्यावे अभयदान। भूमी न पडावें वचन।।’
‘आम्हाला अभयदान द्या. आमचे शब्द भूमीवर पडल्यासारखे निर्थक होऊ देऊ नका,’ असे विनवीत होते.
‘जाणवलें आतां करीं ये उद्देश।
जोडी किंवा नाश तुमची जीवें।।’
‘तुम्हांस काकुळती येण्यात मी आपल्या जीवाचा नाश करून घेईन,’ असे बजावत होते. जलदिव्यास आता एकच दिवस उरला होता. आणि त्याच दिवशी चमत्कार झाला. तुकोबांच्या विठ्ठलाने
‘उदकी राखिलें कागद। चुकविला जनवाद।
तुका म्हणे ब्रीद। साच केलें आपुलें।।’
गाथ्यात उल्लेख आहे- ‘स्वामींनी तेरा दिवस निद्रा केली. मग भगवंते येऊन समाधान केलें की, कवित्व कोरडें आहे, तें काढणे उदकांतून.’
तुकोबांसह अवघी परंपरा सांगते, की पांडुरंगाने वह्य़ा राखल्या. महिपतीनेही या प्रसंगाचे मोठे रसाळ वर्णन केले आहे. ते सांगतात-
‘रात्रीं दृष्टांत बहुतांस।
दाखवितसे जगदात्मा।।
म्हणे तुकयाचे अभंग निश्चित। म्यां कोरडेचि रक्षिले जळांत।
आता वह्य तरंगोनि वरत्या येत।
तरी काढाव्या त्वरित जावोनि।।’
तुकोबांच्या आयुष्यातील हा एक सर्वात मोठा चमत्कार. गेली चार शतके महाराष्ट्र या चमत्काराचा अर्थ शोधत आहे. ज्यांना अशा चमत्कारांवर विश्वास ठेवायचा असतो त्यांचा प्रश्नच नसतो. पण चमत्कारापलीकडे जाऊन जे संतांचे जीवन समजून घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी मात्र हे सारे अवघड होऊन बसते. मग महिपती म्हणतात त्याप्रमाणे तेराव्या रात्री देहूतल्या काही लोकांना- हे अर्थातच तुकोबांच्या बाजूचे असणार- परमेश्वराने दृष्टान्त दिला आणि मग त्यांनी सकाळी येऊन वह्य़ा तरंगून वर आल्याचे सांगितले. या घटनेतून काही खोल अर्थ शोधावे लागतात.
इंद्रायणीच्या डोहात त्या दिवशी काय झाले, हा सवाल अद्यापि कायम असला तरी एक मात्र खरे, की लोकगंगेने तुकोबांचे अभंग राखले.
शिवाय हेही तेवढेच खरे, की खुद्द तुकारामांना या चमत्काराचे काहीच कौतुक नव्हते. ‘याती शूद्र वैश्य’ या अभंगातून त्यांनी आपले आत्मवृत्त सांगितले आहे. त्यात त्यांनी हा प्रसंग असा काही किरकोळीत उडवून लावला आहे, की पाहातच राहावे. ते एवढेच सांगतात-
‘बुडविल्या वह्य बैसलों धरणें।
केलें नारायणें समाधान।।
विस्तारी सांगतां बहुत प्रकार।
होईल उशीर आतां पुरे।।’
तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा