थोरल्या दुष्काळाने तुकारामांच्या अवघ्या मनोधारणा बदलून गेल्या होत्या. १६०८ ते १६२९ या काळातले तुकोबा आता राहिले नव्हते. अवघ्या २१-२२ वर्षांचा हा तरुण स्वत:च्या आणि देवाच्या शोधात वेडापिसा झाला होता.. ‘सिणलो दातारा। करिता वेरझारा। आता सोडवीं संसारा। पासोनिया।।’ हे त्यांचे मागणे होते.
तशी तुकारामांची वृत्ती पहिल्यापासूनच भाविक. घरात कुटुंबाच्या मालकीचे विठोबाचे देऊळ. माता-पिता, थोरला बंधू विठ्ठलभक्त. तेव्हा घरातील वातावरण भाविक असणे स्वाभाविकच होते. घरचेच विठ्ठलमंदिर म्हटल्यावर तेथे होणाऱ्या भजन-कीर्तनातील चार शब्द आपसूकच कानावरून जात असणार. पण हे अजून तेवढय़ापुरतेच होते. तुकोबा सांगतात- ‘आरंभी कीर्तन। करी एकादशी। नव्हते अभ्यासी। चित्त आधी।।’ बाकी हे कुटुंब अन्य चांगल्या सधन, प्रतिष्ठित कुटुंबासारखेच होते. घरात वारसाहक्काने चालत आलेली देहूची महाजनकी होती. ही बाब येथे महत्त्वाची आहे. शिवकालातील गावगाडय़ात पाटील, कुलकर्णी, चौगुले यांच्याप्रमाणेच शेटे-महाजन हेही महत्त्वाचे पद आहे. गावात पेठ वठवायची जबाबदारी शेटे-महाजनांकडे असे. शेटय़ांकडे पेठेची जबाबदारी असे आणि पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम महाजनांकडे असे. पेठेकडून या दोघांना रोकड आणि वस्तूंच्या रूपाने हक्क मिळत असत. याशिवाय त्यांचे (बहुधा आठवडे बाजारात लावावयाचे) दुकानही होते. इनामात मिळालेली १५ एकर बागायती शेती होती. आणि वयाच्या सतराव्या वर्षी माता-पिता गेल्यानंतर, विरक्त होऊन थोरले बंधू घर सोडून गेल्यानंतर तुकोबा हा सारा बारदाना व्यवस्थित सांभाळत होते. ही गोष्ट तुकोबांचा भोळसटपणा दाखवीत नाही. त्यातून प्रकट होते ती व्यवहारकुशलता. पुढे एका अभंगात त्यांनी आपल्या या काळातील वर्तनाचे वर्णन केले आहे. ते म्हणतात- ‘लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष। पत्नी दोनी भेदाभेद। पितृवचनीं घडली अवज्ञा अविचार। कुटाळ कुचरवादी निंद्य।। आणिक किती सांगों तें अवगुण। न वळे जिव्हा कांपे मन। भूतदया उपकार नाहीं शब्दा धीर। विषय लंपट शब्दहीन।।’
या शब्दांमध्ये पश्चात्तापदग्धता आहे. अतिशयोक्ती तर नक्कीच महामूर आहे. पण तरीही तुकोबा शेती, व्यापार करीत होते त्या काळातील त्यांचे वर्तन कसे चारचौघा प्रापंचिकांसारखेच होते याचे प्रतिबिंब त्यातून उमटत आहे. वयाच्या तेराव्या वर्षी- १६२१ ला तुकोबांचा पहिला विवाह झाला. पत्नीचे नाव रखुमाई. तिला दम्याचा विकार होता. त्यामुळे काही वर्षांतच त्यांचा दुसरा विवाह करण्यात आला. या पत्नीचे नाव जिजाई. ती पुण्यातल्या गुळवे सावकारांची कन्या. पहिला विवाह झालेला असूनही पुण्यातले एक सावकार त्यांना आपली मुलगी देतात, याचा अन्वयार्थ तुकोबांच्या या व्यवहारकुशल वर्तनातच शोधावा लागतो.
१६३० च्या दुष्काळाने हे सर्व चित्र पालटले. या अकालाने माणसांचे भूकबळी जात होते. त्यानंतर आलेल्या कॉलऱ्याच्या साथीने माणसे चिलटासारखी मरत होती. पण सत्ताधीशांना त्याची पर्वा नव्हती. अशा आपत्काळात १६३२ च्या सुमारास आदिलशाही सरदार रायाराव याने शहाजीराजांच्या मोकाश्यातील पुणे गावातून गाढवाचा नांगर फिरवला. गाव बेचिराख केले. पुण्यापासून देहू अवघ्या १९ मैलांवर. त्याला याची झळ बसली असणारच. तशात १६३३ मध्ये पुन्हा अवर्षण आले. पुन्हा तेच दु:ख, तीच दैना झाली. हे सर्व तुकारामांच्या दृष्टीसमोर घडत होते आणि वैराग्य त्यांना खुणावत होते. ‘पडिलो बाहेरी। आपल्या कर्तव्ये। संसाराचा जीवे। वीट आला।।’ ही त्यांची तेव्हाची भावना होती.
ही पुढची- १६३१-३२ ते १६४० पर्यंतची आठ-नऊ वर्षे म्हणजे तुकारामांच्या परीक्षेचाच काळ. आपल्या अल्पचरित्रात्मक अभंगात या आध्यात्मिक जडणघडणीविषयी ते सांगतात-
‘सत्यअसत्यासी। मन केले ग्वाही।
मानियेले नाही। बहुमता।।
हाही काळ तसा संघर्षांचाच. आंतरिक आणि बाह्य़ अशा. तसा तो सर्वाच्याच वाटय़ाला येतो. पण फक्त काहींनाच तो पेलता येतो. या काळात तुकारामांची खरी लढाई सुरू होती ती स्वत:शी.. आंतरिक अशांतीशी.
‘माझिया मीपणावर। पडो पाषाण।
जळो हे भूषण। नाम माझे।।’
किंवा-
‘जाळा तुम्ही माझे। जाणते मीपण।
येणे माझा खूण। मांडियेला।।’
अशी चकमक सदा सुरू होती. ‘मनासी संवाद’ आणि ‘आपुलाचि वाद आपणासी’ सुरू होता.
‘तुका म्हणे बहु। करितो विचार।।
उतरे डोंगर। एक चढे।।’
असे कोणाही अभ्यासकाला सोसावे लागणारे कष्ट. तुकोबाही ते उपसत होते.
भंडाऱ्याच्या डोंगरावरील भामनाथाच्या मंदिरात एकांतवासात ध्यानधारणा करून ते हा लढा लढत होते. वेदना, पश्चात्ताप, विरक्ती, भक्ती आणि आत्मवेदनेच्या गर्भातून साकारलेली मानवतेबद्दलची असहाय आर्तता ही त्यांची शस्त्रे होती. अध्यात्मातील एकेक गड ते जिंकत होते. त्यांच्या गाथेत ठिकठिकाणी याच्या खुणा आढळतात. तुकारामांचा संतत्वात उन्नयन होण्याचा हा काळ. त्याची प्रचीती पुढे त्यांच्या- ‘आम्ही वैकुंठवासी। आलो याचि कारणासी।।’ किंवा- ‘आमचा स्वदेश। भुवनत्रयामध्ये वास।’ या उद्गारांतून येते. हे उद्गार साध्या भजनकऱ्याचे नसतात. ‘माझे लेखी देव मेला। असो त्याला असेल।।’ ही बंडखोरी भोळ्या भाविकाची नसते. ते ‘जाणत्या’चे विचार आहेत.
कृष्णराव केळुसकरांच्या ‘तुकारामबावांचे चरित्रा’नुसार भंडाऱ्यावरील साधनेनंतर कधीतरी रात्री तुकारामांना नामदेव आणि विठ्ठलाचे स्वप्नात दर्शन झाले. नामदेवांनी त्यांना कविता करण्याची आज्ञा दिली आणि त्यांच्या कवित्वाला प्रारंभ झाला. यातील बराचसा भाग आत्मनिष्ठ भक्तीपर आहे. ते स्वाभाविकच होते. पण तुकोबांच्या बंडखोर मनाला समाजात माजलेला भ्रष्टाचार, धर्माच्या नावाखाली चाललेला अनाचार, हिंसाचार, नीतिशून्यता हे सगळे अस्वस्थ करीत होते. भक्ती चळवळीतून आलेल्या नैतिक शिकवणुकीच्या विरोधात चाललेले सामाजिक वर्तन बोचत होते. हिंदूंचे वेदप्रामाण्य, चालीरीती, कर्मकांड यांचा तीव्र उपहास ते करीत होते. सामाजिक विषमतेवर कोरडे ओढत होते. त्यामागे ‘बुडतां हें जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणऊनि।।’ हे कारण होते.
‘धर्माचें पाळण। करणे पाखांड खंडण।।
हेचिं आम्हां करणें काम। बीज वाढवावें नाम।
तीक्ष्ण उत्तरें। हातीं घेऊनि बाण फिरे।
नाहीं भीडा भार। तुका म्हणे साना थोर।।’
ही त्यामागची भूमिका होती. आणि ‘करीन कोल्हाळ। आतां हाचि सर्वकाळ।।’ ही प्रतिज्ञा होती. हे महाराष्ट्रीय समाजाची नवी मनोभूमिका घडविण्याचे काम होते. त्याला विरोध हा होणारच होता.
तुकारामांच्या चरित्रातील हा गाभ्याचा भाग आहे. एकीकडे त्यांचे संतत्व आणि कवित्व खुपणारे धर्ममरतड त्यांच्याविरोधात दंड थोपटून उभे आहेत आणि दुसरीकडे ज्या समाजाच्या भल्याची तळमळ त्यांच्या मनाला लागलेली आहे, तो विविध पंथांच्या, दैवतांच्या आणि कर्मकांडांच्या नादी लागून भुललेला आहे. त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक गुलामीत ज्यांचे हितसंबंध अडकलेले आहेत अशांचा धर्म आणि ज्ञानदेवांनी ज्याचा पाया रचला आहे तो धर्म यांची चकमक आता उडणारच होती.
‘माझिये मनींचा। जाणा हा निर्धार। जिवासीं उदार। जालों आता।।’ असे सांगत तुकोबा जनलोकांत उतरले होते. हाती ‘शब्दाचीच शस्त्रे’ होती आणि अंतरी ‘आपुलिया बळें। नाही मी बोलत। सखा भगवंत। वाचा त्याची।’ हा आत्मविश्वास होता.
अजून शिवराय शहाजीराजांसमवेत बेंगळुरूला होते. स्वराज्याचे रणशिंग फुंकले जाण्यास बराच अवकाश होता. मराठी मातीतला सामाजिक लढा मात्र पुन्हा एकदा सुरू झाला होता..
तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा