तुकोबांची लोकप्रियता आता टिपेला पोचली होती. देहूत, शेजारी लोहगावला, चिंचवडला त्यांची कीर्तने होत असत. तुकोबांच्या चरित्रात या लोहगावशी निगडित अनेक चमत्कार कथा येतात. त्यातील एक शिवाजी कासार यांच्याशी संबंधित. हा ऐंशी वर्षांचा वृद्ध सतत तुकोबांच्या कीर्तनाला जातो. रात्रीचा आपल्याजवळ नसतो म्हणून त्याच्या वृद्ध पत्नीने तुकोबांचा सूड घेण्याचे ठरविले. तिने तुकोबांना घरी स्नानास बोलवले आणि त्यांच्या अंगावर कढत पाणी ओतले. तुकाराम भाजले. गाथ्यात एक अभंग आहे- ‘जळे माझी काया लागला वोणवा। धांव रे केशवा मायबापा।।’ तर हा अभंग चक्क ‘लोहगांवी स्वामींच्या अंगावर ऊन पाणी घातलें तो अभंग’ या मथळ्याखाली जमा करण्यात आला आहे. यावर कडी म्हणजे ‘लोहगांवी कीर्तनांत मेलेंलें मूल जीत झालें, ते समयीं स्वामींनी अभंग केले ते’ असे म्हणून एक अभंग दिला आहे. ज्या तुकोबांनी सातत्याने चमत्कारांचा उपहास केला, त्या तुकोबांवर त्यांच्या भक्त-कथेकऱ्यांनी घेतलेला हा सूडच आहे. तुकोबांच्या नावावर चक्क गाथ्याच्या हवाल्याने असे अनेक चमत्कार खपविले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा