सतराव्या शतकातील हिंदू धर्माचे स्वरूप पाहण्यासारखे होते. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून- म्हणजेच शुंग काळापासून सनातन वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली होती. या सनातन वैदिक- अर्थात ब्राह्मणी धर्माने तोवर विविध जमातींच्या देवता, पूजाविधी, आचारविचार आत्मसात करण्याचा सपाटा लावला होता. हिंदुस्थानात आजही अनेक उपासना संप्रदाय आहेत. तेव्हाही होते. ते सर्व पुरोहितशाहीच्या छत्राखाली आणण्यात आले. कितीतरी प्रकारची दैवते होती. आकाशातील ग्रहांपासून पृथ्वीवरील पर्वत, अरण्ये, नद्या, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी, एवढेच नव्हे तर धड मनुष्याचे नि तोंड हत्तीचे वा सिंहाचे अशा काल्पनिक गोष्टींनाही देवत्व देण्यात आले. तुकोबा ज्यांना ‘सेंदरीहेंदरी दैवते’ म्हणतात अशा अनेक क्षुद्र देवतांची पूजा करण्यात येत होती. जनमानसावर पकड बसविण्यासाठी सनातन वैदिक धर्माने अशा सर्व लोकदेवतांना, उपासना पंथांना प्रामाण्य बहाल केले. त्या देवतांना समरसता वा समन्वयातून ब्राह्मणी धर्माचा भाग बनविण्यात आले. त्यातील अनेकांचे उन्नयन करण्यात आले. यामध्ये अनेक अवैदिक देवतांचाही समावेश होता. शैव आणि वैष्णव हे वेगळे संप्रदाय. तेही आता सनातन वैदिक धर्माचे भाग बनले होते. यात पुराणांच्या लेखकांनी मोठी भूमिका बजावली. या सर्वामुळे आधी बौद्ध, नंतर जैन, लिंगायत अशा धर्माचे तगडे आव्हानही हा वैदिक धर्म पेलू शकला. इस्लामी आक्रमण पचवू शकला. या दैवते आणि संप्रदायांच्या संमीलनीकरणाच्या प्रक्रियेतून हा ब्राह्मणी धर्म तगला, फोफावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा