तुकारामांच्या चरित्रातील खरा खलनायक तसा एकच. तो म्हणजे तेव्हाची सनातनी प्रवृत्ती. समाजातील सुधारणांना, मानवतावादी बदलांना परंपरेच्या नावाखाली विरोध करणारी. द्वेषाने आणि तिरस्काराने पछाडलेली. समाजातील संतांना, सुधारकांना, सज्जनांना छळणारी. हिंसक सनातनी प्रवृत्ती. मंबाजी हा त्या प्रवृत्तीचा एक वारसदार.
मंबाजी हे देहूमधील एक मोठे प्रस्थ होते. ते मूळचे चिंचवडचे ब्राह्मण. पुढे वैराग्य धारण करून गोसावी बनले. पण वृत्तीने असा, की तुकोबांच्या एका अभंगात जणू याचेच वर्णन आहे..
‘होउनि संन्यासी भगवीं लुगडीं।
वासना न सोडी विषयांची।।
निंदिती कदान्न इच्छिती देवान्न।
पाहताती मान आदराचा।।
तुका म्हणे ऐसें दांभिक भजन।
तया जनार्दन भेटें केवीं।।’
या पंथाचे ‘मिथ्या भगल वाढवून आपुली आपण पूजा घेणारे’ अनेक तथाकथित संत आज तथाकथित सत्संग भरविताना दिसतात. मंबाजी हा त्यांचा आद्यगुरूच. त्याचा देहूमध्ये मठ होता. शिष्यपरिवार होता. पुढेमागे कदाचित त्याचे तेथे मोठे संस्थान तयार झाले असते. पण तुकोबा त्याच्या आड आले होते. लोकांपुढे अशा प्रवृत्तीच्या धार्मिक लांडय़ालबाडय़ा उघड करून दाखवीत होते. पाखंडखंडन करीत होते. सांगत होते- हे गोसावी शिष्यांकरवी लोकांना सांगतात, की आमचे गुरू अयाचितवृत्तीचे आहेत. कोणाकडून काही मागत नाहीत. कोणी स्वखुशीने दिले तरच घेतात. पण हे असे गुरू म्हणजे दगडाची नाव. ते काय दुसऱ्या दगडांना तारणार?
‘आमचे गोसावी अयाचितवृत्ती।
करवी शिष्याहातीं उपदेश।।
दगडाची नाव आधींच ते जेड।
ते काय दगड तारूं जाणे।।
तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी।
सोंगसंपादणी करिती परी।।’
साधूच्या वेशाची विटंबना करणारे हे खरे सोंगाडेच. यांच्यामुळेच ‘ऐसे धर्म झाले कळीं। पुण्य रंक पाप बळी।।’ ‘वर्णाश्रम हाच धर्म’ असे हे लोक सांगतात. पण ते खरे नव्हे. तुकोबा सांगतात- ‘अवघी एकाचीच वीण। तेथें कैसें भिन्नाभिन्न।’ आणि हे काही आपल्या पदरचे नाही. वेदपुरुष नारायण, तेणे केला निवाडा!
हा खरे तर वेदांचा वेदद्रोही अर्थच तुकोबा सांगत होते. सनातन्यांच्या दृष्टीने तो नुसताच वेदद्रोह नव्हता, तर ते त्यांच्या सत्तेला दिलेले आव्हानही होते. त्यांचे हितसंबंध त्यामुळे धोक्यात येऊ लागले होते. मंबाजी तुकोबांचा द्वेष करीत होता तो अशा धार्मिक आणि व्यावहारिक कारणांसाठी.
वस्तुत: सुरुवातीला याच मंबाजीला तुकोबांनी आपल्या देवळात पूजाअर्चा करण्याचे काम दिले होते. त्याच्याकडे देवळाच्या व्यवस्थेसाठी मिळालेली विठ्ठलटिके नावाची जमीन होती. ती त्यांनी त्याला कसायलाही दिली होती. पण तुकोबांचे विचार, त्यांना मिळणारी जनमान्यता आणि त्यामुळे आपल्या धर्माच्या धंद्यावर होणारा परिणाम हे मंबाजीला सहन होत नव्हते. आपण एवढे मोठे महंत येथे असताना लोक या शूद्र कुणब्याच्या भजनी लागत आहेत, हे पाहणे मंबाजीच्या उच्चवर्णीय मानसिकतेला शक्य नव्हते. आणि तुकोबा तर ‘बरा कुणबी केलो। नाही तरी दंभे असतो मेलो।।’ असे सांगत या मानसिकतेला डिवचत होते. मंबाजीच्या मनात त्यामुळेच तुकोबांविषयीच्या द्वेषाचे विष उकळत होते.
तुकोबा हे धर्मद्रोही आहेत, ते धर्मनिंदा करीत आहेत असे मानणाऱ्या परंपरावाद्यांकडून तुकोबांचा छळ सुरूच होता. अपप्रचार हा त्या छळाचाच एक भाग. आपल्या विरोधकांविषयी खोटय़ानाटय़ा कंडय़ा पिकवणे हा त्यांना संपविण्याचा एक प्रभावी उपाय. तो तुकोबांबाबतही अमलात आणला जात होता. तुकोबांनाही त्याची जाणीव होती. त्यांचा एक अभंग आहे-
‘तुका वेडा अविचार। करी बडबड फार।।..
बोल नाईकें कोणाचे। कथे नागवाचि नाचे।।
संग उपचारें कांटाळे। सुखें भलते ठायीं लोळे।।..
केला बहुतीं फजित। तरी हेंचि करी नित्य।।’
हा तुका वेडा आहे. अविचारी आहे. फार बडबड करतो. कोणाचे काही ऐकत नाही. कीर्तनात नागवा नाचतो. त्याला चांगल्या गोष्टी चालत नाहीत. कुठेही लोळत असतो. त्याची किती वेळा फजिती केली, पण तो काही सुधारत नाही, असे हे लोक सांगत असत. पण अशा छळवाद्या निंदकांना तुकोबा एवढेच म्हणतात-
‘अहो पंडित जन। तुका टाकावा थुंकोन।।’
हे पंडितांनो, तुका तुम्हाला पचणार नाही!
तुकाराम अशा प्रचाराला भीक घालणारे नाहीत, हे पाहिल्यानंतर हे धर्मवीर त्यापुढचे पाऊल उचलणार हे निश्चित होते. इतिहासाचा दाखला तसाच आहे. हे पाऊल होते शारीरिक दंडाचे. महिपतीबुवा आणि नंतरच्या काही चरित्रकारांनुसार, द्वेषाने पेटलेल्या मंबाजीने क्षुल्लक कारणावरून तुकोबांना काटेरी फांदीने मारहाण केली. त्याबद्दलचे अभंग ‘मंबाजी गोसावी यांनी स्वामीस पीडा केली’ (देहू संस्थान) किंवा ‘तुकोबास मंबाजी गोसाव्याने मारिलें त्याजबद्दल देवाजवळ परिहार’ (जोगमहाराज) या मथळ्याखाली गाथ्यात येतात. कृष्णराव केळुसकर, ल. रा. पांगारकर, बाळकृष्ण भिडे अशा काही चरित्रकारांनुसार, तुकोबांच्या देवळाच्या बाजूला मंबाजीने बाग केली होती. एके दिवशी तुकोबांची म्हैस या बागेत घुसली. तेव्हा त्याने तुकोबांना खूप शिव्या दिल्या. त्यानंतर देवळापासून बागेपर्यंत त्याने काटेरी कुंपण घातले. त्यामुळे देवळाच्या प्रदक्षिणेची वाट बंद झाली. लोकांना अडचण होऊ लागली. तेव्हा तुकोबांनी त्या काटय़ा बाजूला सारल्या. तुकोबा सांगतात- ‘सोज्वळ कंटकवाटा। भावें करूं गेलों रे।’ ते पाहिल्यावर मंबाजीला आयतेच कारण मिळाले आणि त्याने तुकोबांना मारले. त्या प्रसंगाबद्दल तुकोबा सांगतात-
‘बरवें बरवें। केलें विठोबा बरवें।
पाहोनिया अंत क्षमा। अंगी कांटी वरी मारविलें।।
शिव्या गाळीं नीत नाहीं। बहु फार विटंबिलें।।’
आपणांस काटेरी फांद्यांनी मारले. शिवीगाळ केली. फार विटंबना केली.
पारंपरिक चरित्रकथेनुसार, हा मंबाजी नेहमी तुकोबांच्या कीर्तनास येत असे. त्या मारहाणीच्या दिवशी काही तो आला नाही. तेव्हा तुकोबा त्याच्या समाचारास गेले. पाहतात तर तुकोबांना मारल्यामुळे मंबाजीचे अंग दुखत होते. तेव्हा तुकोबांनी पश्चात्ताप होऊन त्याचे अंग रगडून दिले. तुकोबा म्हणजे कसे भोळेभाबडे, शत्रू-मित्रांपक्षी कसे समबुद्धी असे सांगण्यासाठी रचलेली ही कथा. तुकारामांचा द्वेष करणारा मंबाजी नेहमी त्यांच्या कीर्तनाला जात असे. तुकोबांना मारून मारून त्याचे अंग दुखले, असे सांगणारी ही कथा सरळच बनावट आहे. मारहाण प्रकरणाविषयीच्या अभंगात- ‘तुका म्हणे पुरे आता। दुर्जनाची संगती रे।।’ असा उद्गार आहे. हे म्हणणारे तुकोबा नंतर त्या दुर्जनाची विचारपूस करण्यासाठी जातात असे मानणे हा भाबडेपणाचाच पुरावा. वास्तवाच्या जवळही ते जात नाही. मंबाजीने तुकोबांना कोणत्या कारणावरून मारहाण केली, तुकोबा त्याचे दुखते अंग रगडून देण्यास गेले की नाही, यापेक्षा या घटनेतून जे वास्तव दिसते ते अधिक महत्त्वाचे आहे. ते म्हणजे ज्याला देवपूजेचे काम दिले, कसण्यासाठी जमीन दिली, त्यानेच खाल्ल्या घरचे वासे मोजत तुकोबांना विटंबिले.
पण हा छळ एवढय़ावरच थांबलेला नव्हता. तुकोबांना केलेल्या मारहाणीनंतरही मंबाजीचे मन निवले नव्हते. एकदा रामेश्वरभट्टांनी तुकोबांना देशोधडीस लावण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पुढे तेच त्यांचे अनुयायी बनले. आता मंबाजीने तो विडा उचलला होता.
हा शूद्र कुणबी कीर्तन करतो. धर्मद्रोह करतो. वेदवाक्ये खोटी ठरवतो. शूद्र असूनही ब्राह्मणांचा गुरू बनतो. याला तुरुंगातच टाकून स्वधर्माची जपणूक केली पाहिजे. धर्म अशा प्रकारे जपला नाही तर राज्याचे तर वाटोळेच होईल. ते होऊ देता कामा नये. याला शिक्षा झालीच पाहिजे, या विचारांनी मंबाजी पेटला होता..
तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा