‘महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ।
बोलिला लोकांत सर्वद्रष्टा।।’
या बहिणाबाईंच्या ओळी. तत्कालीन सनातनी पुरोहितशाहीचा परशू तुकोबांवर कोसळणार होता तो यामुळेच. बहिणाबाईंच्या या ओळींतील दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक- ‘वेदान्ताचा अर्थ’ आणि दुसरी- ‘महाराष्ट्री शब्दांत’! तुकोबांसारखा शूद्र वेदान्त सांगून घोर पातक तर करीत होताच, परंतु त्यावर कडी म्हणजे ते तो अर्थ थेट महाराष्ट्री शब्दांत- मराठीत- सर्वसामान्यांच्या भाषेत सांगत होता. पुरोहितशाहीच्या दृष्टीने हे महत्पाप होते. कारण तुकोबांची ही भाषिक कृती थेट पुरोहितशाहीच्या मुळावरच येणारी होती. हा भाषेच्या राजकारणाचा भाग आहे. काळ कोणताही असो, भाषा हे नेहमीच सत्ताधारी वर्गाच्या वर्चस्वाचे एक महत्त्वाचे साधन राहिलेले आहे. आज ते काम इंग्रजी भाषा करीत आहे. प्राचीन काळी ते संस्कृत करीत असे. ख्रिस्तपूर्व ६०० पर्यंत तरी भारतात संस्कृत ही बोलीभाषा होती. पुढे तिचे महत्त्व कमी होत गेले आणि ख्रि्रस्तपूर्व २०० पर्यंत प्राकृत भाषांचा व्यवहारात वापर सुरू झाला. तरीही धर्म आणि ज्ञानाच्या क्षेत्रातील संस्कृतचे स्थान अबाधित होते. कारण ती वेदांची आणि देवांची भाषा. ती ज्ञानभाषा. विश्वातील सगळे ज्ञान तिच्यात. ते सामान्यांच्या भाषेत आणणे म्हणजे देवभाषेचे महत्त्व कमी करणे आणि त्यातून संस्कृत भाषकांच्या वर्चस्वावर, त्यांच्या मक्तेदारीवर घाला घालणे. गौतम बुद्धाने नूतन धर्मप्रसारासाठी तेव्हाच्या व्यवहारातील पाली भाषेचा वापर केला, तो यामुळेच. महाराष्ट्रात हे ‘भाषिक राजकारण’ पहिल्यांदा केले चक्रधरस्वामींनी. त्यांनी मर्हाटीला धर्मभाषेचे स्थान दिले. ‘तुमचा अस्मात् कस्मात् मी नेणें गा : मज श्री चक्रधरे निरिपिली मर्हाटी : तियाचि पुसा :’ – हे चक्रधरशिष्य नागदेवाचार्याचे विधान. हे मराठीचे अभिमानवाक्यच! पुढे हा वारसा ज्ञानोबांनीही चालविला. पण हे करताना त्यांनी आणखी एक ‘गुन्हा’ केला. त्यांनी अमृतातें पैजा जिंकणाऱ्या मराठीत भाष्य तर केलेच, पण त्यासाठी बाकीचे धर्मग्रंथ बाजूला ठेवून निवडली ती भगवद्गीता.
आपल्या धर्मपरंपरेनुसार गीतेचे स्थान वेदांच्या खालचे आहे. कारण गीता स्मृती आहे, वेद श्रुती. तेव्हा जेव्हा प्रामाण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रमाण वेद असतात. तरीही ज्ञानोबांनी भाष्यासाठी वेद व उपनिषदांऐवजी गीता निवडली. सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत ज्ञानेश्वरी सांगितली. त्याचा परिणाम काय झाला, तर येथील सनातनी वैदिकांनी चक्क गीतेशी वैर धरले. गीतेवर बहिष्कार टाकला. का? तर मराठी भाषेमुळे गीतेतील विचार स्त्री-शूद्रांपर्यंत गेले आणि ती विटाळशी झाली. हे आज अगदीच अविश्वासार्ह वाटते, पण त्यास खुद्द बहिणाबाईंचा दाखला आहे. त्या सांगतात-
‘नामाचा विटाळ आमुचिये घरी।
गीता शास्त्र वैरी कुळी आम्हां।।’
तुकारामांचे शिष्य कचेश्वरभट्ट ब्रrो यांचाही हाच अनुभव आहे. त्यांचे घराणेही वैदिक ब्राह्मणांचे. ते चाकणचे. (आणि थोरल्या शाहू महाराजांचे ते राजगुरू. त्यावरून पुढे ब्रrोंचे ‘राजगुरू’ झाले. हुतात्मा शिवराम राजगुरू हे त्यांच्याच घराण्यातील.) या कचेश्वरांना त्याकाळी गीतावाचनाबद्दल मार खावा लागला होता. आपल्या आत्मचरित्रात्मक अभंगांत त्यांनी म्हटले आहे-
‘चित्ता दृढ आलें गीता ही पढावी।
आनंदे पहावी नित्य टीका।।
एक दिसीं घरी पुस्तक वाचितां।
कांहीं आलें चित्ता वडिलांच्या।।
तीर्थस्वरूपांनी घातलें ताडन।
गीतार्थ नमन करूं नको।।
चोरूनियां गीता भावें पाठ केली।
अविद्या चालली हळूहळू।।’
कचेश्वरभट्ट यांना केवळ मारहाणच झाली असे नाही, तर त्यांच्यावर विषप्रयोगही झाल्याचे सांगण्यात येते. तुकोबांचा गुन्हा त्यांच्याहून थोर. त्यांनी ज्ञानेश्वरांप्रमाणेच गीताभाष्य लिहिले. तेही आपल्या मर्हाटमोळ्या बोलीमध्ये.
तुकोबांच्या नावावर असा एक गीतेचा अनुवाद आहे हेच अनेकांना माहीत नसते. त्यांच्या अनेक अभंगांतून गीतेचा भावार्थ प्रकट होतो हे सर्वाना मान्य आहे, परंतु त्यांनी ‘मंत्रगीता’ हा गीतानुवाद रचला, हा मात्र वादविषय आहे. वारकरी परंपरेला ही बाब मुळातूनच नामंजूर आहे. डॉ. भा. पं. बहिरट, डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याही मते, हा ग्रंथ तुकोबांचा नाही. मात्र, वा. सी. बेंद्रे यांच्यासारख्या इतिहास संशोधकांच्या मते, हा ग्रंथ देहूच्या तुकोबांचाच आहे. स्वत: बेंद्रे यांनी १९५० मध्ये हा गीतानुवाद विविध पुराव्यांनिशी प्रसिद्ध केला. बहिणाबाईंच्या अभंगातील एक उल्लेख हा त्यातील एक महत्त्वाचा पुरावा. त्या कोल्हापुरास असताना तुकोबांनी त्यांना स्वप्नात गुरूपदेश केला-
‘ठेवोनिया कर मस्तकीं बोलिला।
मंत्र सांगितला कर्णरंध्री।।
म्यांही पायावरी ठेविलें मस्तक।
दिधलें पुस्तक मंत्र गीता।।’
येथे ‘मंत्रगीता’ असा स्पष्ट उल्लेख आहे, ही बाब लक्षणीय आहे. बहिणाबाईंना गुरूपदेश झाला तो १६४० मध्ये. याचा अर्थ तुकोबांनी त्यापूर्वीच ‘मंत्रगीता’ लिहिली होती. (बेंद्रे यांच्या मते, हे साल १६४७ आहे. पण जलदिव्यात बुडविली ती मंत्रगीता- या आपल्या मताच्या पुष्टय़र्थ त्यांनी हे साल पुढे आणले असावे अशी शक्यता आहे.)
गाथेत ‘स्वामीस संतांनी पुसलें कीं, तुम्हांस वैराग्य कोणत्या प्रकारे झाले तें सांगा’ या प्रकरणातील तीन अभंगांतून तुकोबांनी आपले आत्मवृत्तच सांगितले आहे. त्यानुसार १६३० च्या थोरल्या दुष्काळाने ‘आटिले द्रव्य नेला मान.’ व्यवसायाचे दिवाळे निघाले. ‘स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली.’ तुकोबांना वैराग्य आले ते या आपदांनी. त्यानंतर दुष्काळाची छाया जरा दूर होताच तुकोबांनी काय केले, तर आपल्या घरातील देवळाचा जीर्णोद्धार. पूर्वी ते कीर्तनास जात. एकादशी करीत. परंतु ‘नव्हते अभ्यासीं चित्त आधीं.’ यानंतर मात्र त्यांनी ‘काही पाठ केलीं संतांचीं उत्तरे.’ कीर्तनात ध्रुपद धरण्यास सुरुवात केली. त्यांची साधना सुरू झाली. दूर डोंगरावर जावे. तेथील गुंफेत बसावे. ग्रंथ वाचावेत. चिंतन-मनन करावे. ‘सत्य-असत्यासी मन ग्वाही’ करावे- हा तुकोबांचा दिनक्रम बनला होता. हा तुकारामांच्या आयुष्यातील आंतरिक उलथापालथीचा काळ होता. तशात एके दिवशी, नेमके सांगायचे तर माघ शुद्ध दशमी, वार गुरुवार, ता. १० जानेवारी १६३३ रोजी तुकोबांना स्वप्नात गुरूपदेश झाला.
तुकोबा सांगतात-
‘मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश।
धरिला विश्वास दृढ नामीं।।
यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ति।
पाय धरिलें चित्तीं विठोबाचे।।’
म्हणजे तुकारामांच्या कवित्वाला प्रारंभ झाला तो १६३३ नंतर. याच काळात नामदेवांनी त्यांना स्वप्नात येऊन कवित्व करण्यास सांगितले असावे. त्यांची ‘मंत्रगीता’ ही अर्थातच यानंतरची- आणि १६४० आधीची.
तुकोबा कवित्व करतात, मराठीत गीतानुवाद करतात, ‘गोब्राह्मणाहिता होऊनि निराळें। वेदाचें तें मूळ तुका म्हणे।।’ असा वेदांचा भलताच अर्थ सांगतात, हे कारण वैदिकांच्या दृष्टीने तुकोबांना शिक्षा करण्यास पुरेसे होते. याकामी पुढाकार घेतला तो रामेश्वरभट्ट यांनी. आपल्या आयुष्यातील या अत्यंत अवघड, खरे तर जीवघेण्या प्रसंगाबद्दल तुकोबा सांगतात-
‘निषेधाचा कांही पडिला आघात।
तेणें मध्यें चित्त दुखवलें।।’
चित्त दुखवले!
तुकोबांनी किती मवाळपणे हा प्रसंग उडवून लावला आहे. खरे तर तो त्यांच्या जगण्याच्या प्रयोजनालाच नख लावणारा असा प्रसंग होता. ‘महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ’ सांगून पुरोहितशाहीच्या मक्तेदारीला दिलेल्या आव्हानाबद्दल रामेश्वरभट्टाच्या माध्यमातून अवघ्या सनातनी संस्कृतीने तुकारामांना मरणाहून भयंकर अशी शिक्षा फर्मावली होती.
नामदेवाने पांडुरंगासवे स्वप्नात येऊन जागे केले होते. ‘करावे कवित्व’ हे ‘काम सांगितले’ होते. तो अवघा ‘अक्षरांचा श्रम’ आता पाण्यात बुडवायचा होता..
तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा