तुकारामांसाठी धर्म, धार्मिकता हे केवळ मोक्षाचे साधन नव्हते. ते विरागी होते. ‘संसाराच्या तापे तापलो मी देवा। करिता या सेवा कुटुंबाची’ असे ते म्हणत होते. पुढे तर ‘जन वन आम्हां समानचि झालें।’ अशा वृत्तीला ते येऊन ठेपले होते. पण म्हणून त्यांनी भौतिक व्यवहारापासून नाते तोडलेले नव्हते. ते या जगाचेच संत होते. येथील माणसांबद्दल त्यांच्या काळजात कळवळा होता. धार्मिक शोषणाबद्दल मनात संताप होता. स्वत:तील चांगुलपणा वाढविणे आणि चांगला माणूस घडविणे हे त्यांच्यासमोरील ध्येय होते. तीच त्यांची धार्मिकता होती. म्हणूनच त्यांना त्या मोक्षात, ते जन्म-मरणाचे फेरे चुकविण्यात काडीचा रस नव्हता. ‘मोक्षाचे आम्हांसी नाही अवघड। तो असे उघड गाठोळीस।।’ असा आत्मविश्वास त्यांच्या ठायी होता. परंतु ‘न लगे मुक्ती आणि संपदा। संतसंग देई सदा।।’ हे त्यांचे मागणे होते. ‘मोक्षपद तुच्छ केलें याकारणें। आम्हां जन्म घेणें युगायुगीं।।’ देवाने खुशाल त्यांना गर्भवासी घालावे, पुढचा जन्म द्यावा असे ते सांगत होते. तुकारामांना हवा होता तो संतसंग. चांगल्या माणसांची संगत. त्यांच्या त्या चांगुलपणाच्या व्याख्येत धार्मिक असणे हा महत्त्वाचा भाग होताच. ते स्वाभाविकच होते. धर्माआगळी नैतिकता असू शकते, धर्माचा आधार न घेता माणूस नीतिमान, प्रामाणिक असू शकतो, हा विचार तसा आधुनिकच. पण हिंदुस्थानच्या वैचारिक इतिहासात तो येऊन गेलेला आहे. चार्वाकांनी तो सांगितला आहे. खासकरून वैदिक धर्माने त्याची मोठी बदनामी करून तो नामशेष करण्याचा प्रयत्न केला असला, तरी हा विचार नष्ट होऊ शकलेला नाही. एक खरे, की सतराव्या शतकात हा विचार तुकोबांपर्यंत येईल असे वातावरणच नव्हते. अशा परिस्थितीतही तुकोबा जेव्हा वेदांचा वेगळा अर्थ सांगून वेदद्रोह करतात, प्रसंगी ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनीं अनुभवावा।।’ किंवा ‘माझे लेखी देव मेला। असो त्याला असेल।।’ असे म्हणतात, तेव्हा त्यांच्या वैचारिकतेची धाव अचंबित करून जाते. असे असले तरी ते धर्माच्या परिघातच नैतिकता मांडत होते. त्यातून धर्माचा चेहरा बदलू पाहत होते.
अवघें धरू सुपंथ!
ते सांगत होते ती नीतिमूल्ये साधीच होती. साध्याच व्यावहारिक गोष्टी ते सांगत होते
Written by तुलसी आंबिले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-09-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व तुका लोकी निराळा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual quotes of tukaram