इंद्रायणीत स्नान करून बहिणाबाई तुकोबांच्या विठ्ठलमंदिरात गेल्या. तेव्हा तुकोबा आरती करीत होते. आरती झाली. बहिणाबाईंनी सहपरिवार तुकोबांचे दर्शन घेतले. बोलणे-चालणे झाले. चित्त स्वस्थ झाले. आता राहण्या-खाण्याचा प्रबंध करायचा होता. तो तसाही तुकोबांच्या घरी झाला असता. परंतु ब्राह्मण कुटुंब शूद्राच्या पंगतीला बसणार कसे? तेव्हा बाईंचे पती गंगाधरपंत गावात गेले. फिरता फिरता त्यांची गाठ कोंडाजीपंतांशी पडली. त्यांनी या कुटुंबाला भोजनाचे आमंत्रण दिले. ‘माध्यान्ही या.’ म्हणाले. आता वास्तव्याची सोय करायची होती. जागेचा शोध घेत ते एका प्रशस्त वाडय़ात गेले. तो होता मंबाजी गोसाव्याचा. ही त्यांची मंबाजीशी झालेली पहिली भेट. बहिणाबाई सांगतात-
‘मंबाजी गोसावी त्या स्थळीं नांदतां।
गृह प्रवेशतां देखीयेले।।
जाऊनी तयासी मागीतलें स्थळ।
तो अति चंचळ क्रोध तया।।
मारावया उठे घातलें बाहेरी।
आनंदें वो वरी प्रार्थियेले।।’
राहण्यासाठी जागा मागितली तर त्यांच्या अंगावरच हा गोसावी धावून गेला. त्यांना हुसकूनच दिले त्याने. अखेर ही मंडळी पुन्हा देऊळवाडय़ावर आली. पुढे हाच मंबाजी गंगाधरपंतांच्या मागे ‘माझे शिष्य व्हा’ म्हणून लागला होता. ‘तुम्हीही हरिभक्त आहात. विरक्त दिसता. तेव्हा माझे गुरुत्व स्वीकारा.’ बहिणाबाईंनी हे दोन-चार वेळा ऐकून घेतले. मग सरळच सांगितले, की बाबा रे, आम्ही आधीच अनुग्रह घेतला आहे. पण त्याला ते पटेनाच. अखेर गंगाधरपंतांनी त्याला आधीची सर्व कथा सांगितली. ते ऐकून मंबाजी भडकलाच. म्हणू लागला- ‘या स्वप्नातल्या गुरुपदेशात काय अर्थ आहे? आणि तो गुरूही कोण? तर शूद्र! ‘शूद्राचीया अंतरा ज्ञान कैचें?’ स्वप्नात गुरू केला तर केला, पण तोही असा शूद्र आणि बळीभद्र- म्हणजे नांगरमुठा! तुम्ही मला ही अशी गुरूभक्ती सांगूच नका. तुम्हाला वाळीतच टाकले पाहिजे.’ बहिणाबाई सांगतात- ‘ऐसे मंबाजी बोलीला। द्वेषही मांडीला तेच क्षणीं।।’
द्वेष करावा तरी किती? एकदा वाटेत बहिणाबाईंना तो दिसला. तेव्हा त्या नमस्कार करायला गेल्या. तर याने त्यांना अस्पृश्यासारखी वागणूक दिली. ‘येरू हा न शिवे दुरी पळे!’ म्हणाला, ‘तुमची जात कोणतीही असो; मी तुम्हाला शूद्रच मानणार. तुमच्यात ब्राह्मणत्व नाहीच. तुम्ही आता कुठे कुणा ब्राह्मणाच्या घरी भोजनाला गेलात ना, तर तुमच्याविरुद्ध मी दिवाणांत तक्रार करीन.’
हा मंबाजी केवळ पोकळ धमक्या देणाऱ्यांतला नव्हता. याआधी त्याने खुद्द तुकोबांना मारहाण केली होती. ‘अंगी काटी वरी मारविलें’ असे तुकोबांनीच लिहून ठेवले आहे. त्याच्या या क्रौर्याचा धसका बहिणाबाईंच्याही मनात होता. वास्तविक देहू गावचे कुलकर्णी महादजी कुळकर्णी, कोंडाजीपंत असे काही प्रतिष्ठित ब्राह्मण त्यांच्या पाठीशी उभे होते, तरीही मंबाजी या ना त्या प्रकारे त्यांना छळतच होता. बाई म्हणतात- ‘परंतु तो द्वेष चालवी अत्यंत। मारूं पाहे घात चिंतोनिया।।’ हा मंबाजी घात करून आपल्या कुटुंबियांना मारील अशी भीती त्यांना वाटत होती. मंबाजी हा काय प्रकार आहे, हे समजण्यास हा उल्लेख पुरेसा आहे. मंबाजी अशा प्रकारे धाकदपटशा करीत होता. गावचे कुलकर्णीही त्याच्यापुढे हतबल होते ते कशामुळे, हे नीट समजून घेतले पाहिजे. तो दादागिरी करीत होता, कारण त्याच्यामागे सनातन धर्मसत्ता उभी होती. सामाजिक-धार्मिक बाबतीत तिच्यासमोर राजसत्ताही दुबळी होती. त्याचा प्रत्यय बहिणाबाईंना लवकरच आला. गंगाधरपंतांसारखी ब्राह्मण कुटुंबे ज्या शूद्रामुळे सनातन वैदिक धर्माशी द्रोह करीत आहेत, त्या शूद्र तुकारामालाच धडा शिकविला पाहिजे, या विचारांनी पेटलेल्या मंबाजीने अखेरीस आपाजी गोसावी यांच्याकडे तक्रार केली.
इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, हे आपाजी म्हणजे पुणे-शिरवळ प्रांताचे देशपांडे. हा प्रांत शिवाजीराजांच्या अंमलाखालचा. परंतु श्रीधरबुवा देहूकर यांच्या संशोधनानुसार, हे ते नव्हेत. हे पुण्यात राहणारे राजयोगी होते. त्यांच्याकडे मंबाजीने तक्रार केली याचा अर्थ हे धर्माधिकारी असावेत. धार्मिक न्याय करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असावा. मंबाजीने त्यांना लिहिले- ‘.. तुकोबा गोसावी शूद्र वाणी।। कथा करितसें देऊळी सर्वदा। द्विज त्याच्या पदा लागताती।।  रामेश्वरभट्टांसारखे अतियोगी.. तेही त्याला नमस्कार करतात. हा आम्हाला मोठाच अन्याय वाटत आहे. कारण यामुळे वेदवाक्यच खोटे होत आहे.’ मंबाजीची नमस्काराबद्दलची ही तक्रार केवळ मत्सरातून आलेली नाही. शूद्राला नमस्कार करण्यामुळे वेदवाक्य खोटे ठरते असे तो जेव्हा म्हणतो तेव्हा तो धर्मशास्त्रच सांगत असतो. ब्राह्मणाने कोणालाही नमस्कार करू नये. त्याने सर्व वर्णाना उद्देशून ‘स्वस्ति’ असे म्हणावे असे धर्मवचन आहे. त्याचे उल्लंघन होत आहे, स्वधर्माचा लोप होत आहे, ही मंबाजीची तक्रार होती. तो म्हणतो-
‘आणीक ही एक स्त्री-पुरुष आहेती।
तेही म्हणवीती शिष्य त्याचे।।
म्हणविती ब्राह्मण आहेती सोनार।
कुळकर्णी ही फार मान्य केले।।
स्वधर्माचा लोप होतसे देखोन।
धाडीलें लिहोन म्हणोनीया।।
याचा कीं अपमान न करितां जाण।
राज्यही बुडोन जाय तरी।।’
शूद्रांना गुरुत्व आले आणि त्याचे पारिपत्य झाले नाही तर राज्यच बुडून जाईल असे तो सांगत आहे. यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे तुकारामांना काढण्या लावून नेण्याचा. आपाजींना लोणी लावत मंबाजी सांगतो- ‘तुम्ही थोर अहां दंड करावया। बांधोनीया तया न्यावे तेथें।।’ यात मंबाजीने खुबीने सोनारांचाही उल्लेख केला आहे.
हे पत्र वाचल्यानंतर आपाजीही संतापले. बहिणाबाई सांगतात-
‘आपाजी गोसावी वाचोनीया पत्र।
क्रोधें फार नेत्र भोवंडीत।।
शूद्र होवोनीया नमस्कार घेत।
पाप हे अद्भुत होत असे।।
सोनाराच्या जाती म्हणविती ब्राह्मण।
तयाचें दर्शन घेऊं  नये।।
शूद्राचा अनुग्रह घेताती ब्राह्मण।
भ्रष्टाकार पूर्ण होत असे।।
त्याची शिक्षा द्यावी दोष नाहीं यासी।
ऐसा निश्चययेसीं नेम केला।।’
सोनार स्वत:स ब्राह्मण म्हणवून घेत, हा अन्य ब्राह्मणांच्या दृष्टीने भ्रष्टाचार होता. यातूनच पुढे पेशवाईत सोनारांनी जानवे घालू नये, थाटामाटाने लग्नेही करू नयेत असे र्निबध घालण्यात आले होते. जातीसंघर्षांचा हा वेगळाच नमुना. धूर्त मंबाजीने येथे त्याचाही फायदा उठविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आपाजीलाही ते पटले. पण तो म्हणतो, दोष या लोकांचा नाही, दोष तुकारामाचा आहे. त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. आपाजीने मंबाजीला प्रत्युत्तर पाठविले, की ‘होय यथाकालें कार्यसिद्धी.’ जरा दम धरा. योग्य वेळी आपले काम होऊन जाईल. आपाजीने हे जे आश्वासन दिले आहे, ती कार्यसिद्धी म्हणजे नेमके काय, याचा उलगडा झालेला नाही.
ल. रा. पांगारकरांच्या मते, हा काळ साधारणत: १६४० चा आहे. यावेळी तुकाराम ३२ वर्षांचे होते. शिवाजीमहाराज अद्याप जिजाऊंसमवेत कर्नाटकातच होते. आणखी दोन वर्षांनी ते पुण्यात येणार होते. पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांकडे होती आणि सत्ता आदिलशहाची होती. एकंदर अजून या भागाची राजकीय घडी बसायची होती आणि सामाजिक-धार्मिक बाबतीत सत्ता धर्माधिकाऱ्यांकडे होती. त्यामुळेच तुकारामांच्या मागे लोक असूनही त्यांचा छळ होऊ  शकत होता. खरे तर भ्रष्टाकार पूर्ण होत होता तो यातून.
समाजजीवनावरील धर्मसत्तेचा पगडा एवढा प्रचंड होता, की त्यापुढे तुकारामांसारख्या खंबीर सत्पुरुषालाही झुकावे लागत होते. जलदिव्यासारख्या परीक्षा द्याव्या लागत होत्या. प्रसंगी मारहाणीसारखे प्रसंगही झेलावे लागत होते. परंतु त्यांच्या निष्ठा अबाधित होत्या. प्रहार सोसून पुन्हा उभे राहण्याचे बळ त्यांना त्यातूनच मिळत होते. ‘आम्ही बळकट झालों फिराऊनि’ असे ते म्हणतात ते या निष्ठेच्या जोरावरच. त्यातूनच ते बजावतात-
‘आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ।
यातिहीनकुळ दैन्यवाणा।।’
सनातन धर्मव्यवस्थेसमोरील अशी बंडखोरी हाच तर तुकोबांच्या जगण्याचा पाया होता. ते ‘वैकुंठवासी’ याच कारणासी येथे आले होते, की ‘झाडू संतांचे मारग। आडरानें भरलें जग।’
आडरानाने भरलेले जग साफसूफ करायचे होते. धर्मातील गचपण दूर करायचे होते..
तुलसी आंबिले  tulsi.ambile@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा