‘अडोस पडोस’ या मालिकेला दर्शकांकडून छान पावती मिळाली. पुन्हा एकदा ‘प्रकाशवाणी’कडून (‘दूरदर्शन’साठी पु.ल. देशपांडय़ांनी योजलेला सुंदर शब्द.) मला निमंत्रण आले. ‘अशीच एक रंजक, खेळकर, कौटुंबिक स्वरूपाची, आशयघन वगैरे वगैरे मालिका त्वरित हवी आहे. कृपया धाडून द्यावी.’ वर दिलेल्या सर्व lok16विशेषणांना न्याय देणारी मालिका बनवायला रीतसर मुदत देण्याची बात अर्थातच नव्हती. तयार कार्यक्रम नेहमीच ‘त्वरित’ हवा असतो. उद्याच्या उद्या, जमलं तर आज किंवा कालच!
तर एक मोठं आव्हान चालून आलं होतं. हाताशी पुरेसा अवधी नाही आणि मुख्य म्हणजे डोक्यात पुसटशीदेखील काही संकल्पना नाही, अशी परिस्थिती होती, पण मार्ग निघतोच. एक क्लृप्ती सुचली, आपल्याच ‘सोयरीक’ नाटकाची मध्यवर्ती कल्पना उचलली तर? नाही तरी नाटक बसवताना अनेक वेळा ‘हे पडद्यावर किती छान दाखवता येईल.. काही म्हटलं तरी रंगमंचाची मर्यादा पडतेच.’ असा नाटय़द्रोही विचार अनाहूतपणे अनेकदा मनात डोकावला होता. तर आता संधी चालून आली होती. स्वत:चीच एखादी कलाकृती दुसऱ्या कशासाठी वापरली तर ते वाङ्मयचौर्य होते का, या गहन प्रश्नाच्या खोलात न शिरता, मी हा धोका पत्करायचं ठरवलं.
शृंखलेच्या ‘कडय़ा’ भराभर लिहून झाल्या. अडीच तासाच्या नाटकाचा जीव तो केवढा? त्याचा मूळ गाभा कायम ठेवून त्याच्या भोवताली मी गोफ विणत गेले. सगळी मूळ पात्रं इतकी दमदार होती, की त्यांच्यासाठी नवनवीन लीला हुडकणं अवघड नव्हतं. शेजारी शेजारी राहणारे, सतत भांडाभांडीत मग्न असणारे, पण एकमेकांवर जान कुर्बान करणारे रवी आणि मिथिला (मिठ्ठ), त्या दोघांचे आजोबा नाना आणि आबू, मिठ्ठची अतिविशाल ममी विदुला, ममीच्या मुठीत असणारे पपा यदुनाथ आणि रवीची सालस सोज्वळ आई एवढीच प्रमुख पात्रं होती. आणि हो, मुद्दाम या मालिकेसाठी एका बहारदार पात्राची मी निर्मिती केली. मिठ्ठच्या घरचा गडी- मदनबाण. मदनबाणच्या अवतारात चंदू पारखीने कहर केला. पाहता पाहता तो दर्शकांच्या गळ्यातला ताईत बनला. या वल्लीला इंग्रजी बोलण्याचा फार सोस. विशेषत: कुठून फोन आला की साहेबाच्या भाषेतून तारे तोडायची संधी तो वाया जाऊ देत नसे. फोन आला (अद्याप मोबाइल जन्मले नव्हते.) की, हा ऐटीत ‘हॅलो, आय द मदनबाण.. यू हू ?. येस, येस, बट हू यू?’ असे फर्डे संभाषण करीत असे. विदुलच्या किटी पार्टीमधल्या साळकाया माळकाया घरी आल्या, की हा आवर्जून ‘वेलकम.. हॅव चेयर. हॅव सोफा’ असा प्रेमळ आग्रह करी. ‘छोटे बडे’मधली मोजकी पात्रं, माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे चोखंदळपणे निवडली गेली.
‘इधर उधर’ या शृंखलेमध्ये मी अजित पाल नावाचा नवा नट पाहिला होता. मिश्कील चेहरा, उमदे व्यक्तिमत्त्व आणि विनोदाची उत्तम समज असलेला अजित रवीच्या भूमिकेसाठी दाखल झाला. विनीने ‘सोयरीक’ या नाटकात चक्क मिठ्ठचीच भूमिका करून वाहवा मिळवली होती. इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे ही अवखळ भूमिका तिला हातमोजासारखी फिट्ट बसली. तेव्हा मिठ्ठचा प्रश्न घरच्या घरी सुटला. दोन्ही आजोबा पण जवळच मिळाले. अरविंद आणि सुलभा देशपांडे खूप जुन्या दोस्तीतले. सुलभाने माझ्या अगदी पहिल्या (बाल) चित्रपटात भूमिका केली होती, पण अरविंदबरोबर काम करण्याचा योग ‘छोटे बडे’मध्ये प्रथमच आला. त्याने ‘नानां’ची व्यक्तिरेखा साकार केली. आबू किंवा रिटायर्ड कर्नलसाहेबांचं काम वारसाहक्काने अरुणकडेच गेलं. अरुणला ‘डँडी’ भूमिका करायला मनापासून आवडत असे. ब्रशसारख्या फिस्कारलेल्या मिशा, डोक्यावर ऐटबाज चपटी फ्रेंच बेरे, हातात पाइप, असा त्याचा रिटायर्ड आर्मी ऑफिसर मोठा रुबाबदार वाटे. रवीच्या आईचा पुण्याच्या सुहासिनी देशपांडेनं जिम्मा उचलला. माझ्या ‘कथा’ चित्रपटांत, दीप्ती नवलच्या आईचं तिनं छान काम केलं होतं. अगदी अलीकडे ‘धग’ या अप्रतिम मराठी सिनेमात तिला पाहिलं. एक अतिशय अवघड भूमिका केवढय़ा ताकदीने तिने पार पाडली आहे, हे पाहून मला भरून आलं. मात्र ‘छोटे बडे’मधली रवीच्या आईची भूमिका अतिशय सपक होती. अगदी ‘गुडी गुडी’. विदुलचं काम केलं सुधा चोपडाने. दिल्लीमधल्या माझ्या नाटय़सेवेच्या वृत्तान्तामध्ये तिने केलेल्या लक्ष्मी (हिंदी ‘सखाराम बाइंडर’) आणि पारो (‘चक्का यलदा ए’- ‘तू वेडा कुंभार’चा पंजाबी अवतार)च्या भूमिकांबद्दल मी सविस्तर लिहिले आहे. सुधा हरहुन्नरी अभिनेत्री होती. भावपूर्ण शोकांतिका असो वा आचरट फार्स, ती एकाच तल्लीनतेनं स्वत:ला भूमिकेत झोकून द्यायची. माझ्या ‘स्पर्श’ या चित्रपटात तिने शबानाच्या मैत्रिणीची महत्त्वाची भूमिका केली. दिल्लीला दूरदर्शनवर अनेक वर्षे सुधा माझी साहाय्यक होती. तीही आता मुंबईला आली होती. विदुलचा रोल तिने नेहमीच्या सराइतपणे केला. जोडीला यदूच्या रूपात श्याम अरोडा असल्यामुळे तर ती खूपच सुखावली. श्याम हा दिल्लीचा एक मान्यवर नट मुद्दाम ‘छोटे बडे’च्या चित्रणासाठी मुंबईला आला होता. यदुनाथच्या व्यक्तिरेखेत तसा काही दम नव्हता, पण श्याम दोस्तीखातर आमच्या टेलि-टीममध्ये सामील झाला. या प्रमुख टोळीखेरीज किटी पार्टीतल्या चार-पाच बायकादेखील एक से एक अर्क होत्या. त्यातली पुशी- शहनाज आनंद (टीनू आनंदची बायको आणि जलाल आगाची बहीण), हिला सेटना, चंद्रा वेंकटरामन अशा काही जणी आठवतात. रवीच्या चित्रकार दोस्तांच्या कंपूमध्ये यतिन कार्येकर, बकुळ ठक्कर, सुप्रिया मतकरी असे तेव्हाचे उभरते सितारे होते. या तरुण संचाच्या दमदार सहभागामुळे सेटवर सतत चैतन्य सळसळत असे.
या मालिकेची कथा तशी आम होती. नेहमीचीच. दोन प्रेमिकांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध. मिठ्ठचं पारडं जरा जड, कारण तिचे पपा कुठल्याशा कॉपरेरेट कंपनीत बडे ऑफिसर असतात. त्यामुळे मुळातच बडे घर की बेटी विदुला, हिचं नाक आणिकच वर झालेलं. आपल्या लेकीसाठी तिच्या आकांक्षा महत्त्वाकांक्षी असतात. ‘माझी पोर रंगाऱ्याच्या गळ्यात बांधणार नाही’ हा तिचा ठाम निश्चय. अर्थात तिच्या विरोधाला (एक यदू सोडला तर) कुणीही जुमानत नाही ही गोष्ट वेगळी. दोघे आजोबा ठामपणे प्रेमिकांच्या पाठीशी उभे असतात, पण तरीही अडथळे येतातच. मिठ्ठला नजरकैद, दोघा प्रेमिकांना भेटायची बंदी वगैरे. पण अखेरीस रवीच्या पहिल्याच चित्रप्रदर्शनाची प्रचंड तारीफ होते, वृत्तपत्रांमधून उत्तम परीक्षणं येतात, चित्रं विकली जातात आणि मुख्य म्हणजे त्याला भल्या भल्या ग्राहकांच्या ऑर्डरी येऊ लागतात. हा अपेक्षित (पण काहीसा अवास्तव?) बदल घडून येताच साहजिकच विदुलचे परिवर्तन होते आणि ठरल्याप्रमाणे शेवट गोड होतो.
सरळ वहिवाटीच्या मार्गाने जाणारी, नित्यक्रमाच्या ढाच्यात फिट्ट बसणारी ही मालिका तरीही लोकांना ‘अभिनव’ वाटली. ताजी वाटली. याचं कारण, तिची हाताळणी काहीशी ‘हटके’ होती असं म्हणता येईल. एक तर चित्रमय जगतात कथा फुलली. तेव्हा अगदी साहजिकच नानाविध गहिरे रंग घेऊन ती गडद होत गेली. तिच्यात वावरणारी सगळीच छोटी आणि बडी मंडळी चित्रविचित्र, गमतीशीर होती. त्यांनी एक-दोन डावांतच दर्शकांची मनं जिंकली. वारंवार रंगाचा बेरंग करणारी विरोधी पक्षाची विदुलासुद्धा लोकांना आवडून गेली. पात्रांच्या परस्परसंबंधांचा कथेत आवर्जून वापर केला होता. घरी ऐटबाज ड्रेसिंग गाऊन घालून वावरणारे, रोज सायंकाळी ‘एक छोटा पेग’ मारणारे आबू आणि काडीचा चष्मा, धोतर, बंडी अशा थाटातले ज्ञानेश्वरीची पारायणं करणारे नाना या दोघांची दोस्ती अजब होती. आपल्या लाडक्या नातवंडांचा बार उडवून द्यायचा, हे दोघांचं एकच ईप्सित. हाच त्यांना बांधणारा घट्ट धागा. अरुण, अरविंदचे सगळे प्रवेश खूप रंगत. आपापल्या सुना आणि नातवंडांचा पहारा चुकवून गाडीवर पाणीपुरी चापणं, शत्रुपक्षाच्या हालचालींवर नजर ठेवून परवलीच्या शिटय़ा वाजवणं, सूचक गाणी म्हणणं असले पोरसवदा चाळे मोठय़ा उत्साहाने ते पार पाडत. अखेरच्या लग्नसोहळ्याच्या प्रसंगी जेव्हा आबू धोतर, टोपी, उपरणं घालून आणि नाना सुटाबुटांत प्रकटतात, तेव्हा त्या दोघांची जोडी वधू-वरांवर मात करते. दोघी शेजारणींचा क्वचितच सामना होई. कारण विदुल अग्निहोत्री कुटुंबाला आपल्या तोलाचे मानत नसे. पण एकदा शेजारणीकडे जाण्याचा प्रसंग येतोच. ‘मिठ्ठला तुमच्या घरी यायची बंदी करा’ हे सांगायला बाईसाहेब तरातरा शेजारी आलेल्या असतात. रवीच्या आईला साहजिकच त्यांना पाहून आश्चर्य वाटतं.
‘‘अगंबाई, आज इकडे कशा काय?’’
‘‘तसंच कारण आहे. मी का आले ते तुमच्या लक्षात आलं असेलच.’’
‘‘विरजण हवं आहे का?’’
चित्रकाराच्या पॅलेटला शह देईल असे रंगीबेरंगी प्रफुल्ल वातावरण, हे या मालिकेचं गमक होतं. सुदैवानं मुंबईच्या सुप्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्टनं आपले दरवाजे आम्हाला खुले केले. रंग आणि रेखा यांचा वेध घेत, आपल्या भवितव्याचा मागोवा घेणाऱ्या तरुण प्रतिभावंतांची ही पाठशाळा. कहाणी सुरू होते, तेव्हा उत्तम रीतीनं उत्तीर्ण होऊन रवी नुकताच पदवी घेऊन बाहेर पडला आहे. हा पदवीदान समारंभ आम्ही जे.जे. मधेच चित्रित केला. या समारंभासाठी खुद्द एम.एफ. हुसेन ‘पाहुणे कलाकार’ म्हणून हजर झाले. त्यांनी एक छानसं छोटंसं भाषण पण केलं. त्यांच्या सहभागामुळे ‘छोटे बडे’चा भाव वधारला हे सांगायला नकोच. समारंभानंतर रवी, मिठ्ठ आणि त्यांचे सवंगडी यांनी गायलेलं एक धमाल गीत आम्ही तिथेच शूट केलं. याच शिक्षण संस्थेमधले दामू केंकरे, शांताराम पवार यांच्यासारखे नावाजलेले शिक्षक आणि पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी (आता चित्रकार) यांची पण फार मदत झाली. अगदी पहिल्या कडीपासूनच हिरो रवी मिठ्ठचे पोट्रेट बनवण्याचा प्रयास करीत असतो. पण काही केल्या त्याच्या मनातली मिठ्ठ कागदावर उतरत नाही. या अभियानात किती भांडणं होतात, कागद फाडले जातात, रंग उडून जातात, त्याची गणती नाही. एकदा तर बऱ्याच वेळानंतर बनवलेलं चित्र चक्क चिंपॅन्झी माकडाचं निघतं, तेव्हा मिठ्ठच्या रागाला पारावार उरत नाही. पण अगदी अखेरी अखेरीस काहीतरी जादू होते. रवीच्या कुंचल्याला जणू परीसस्पर्श होतो आणि त्याच्या फलकावर मिठ्ठ झरझर उतरत जाते. आरशामधलं प्रतिबिंब जसं. मिठ्ठचं हे चित्र सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांनी काढलं. विनी या चित्रासाठी बांद्रय़ाला त्यांच्या स्टुडिओमध्ये ‘सिटिंग्ज’साठी जात असे. या तयार चित्रावरून कधी नव्हे ते दोघा बुजुर्ग मित्रांमध्ये वादावादी होते.
आबू : हे चित्र आमच्या या भिंतीवर छान दिसेल.
नाना : भलतंच! हे चित्र आमच्या हॉलमध्ये झळकणार.
आबू : मुलगी पळवलीत लेको. चित्र तरी राहू दे आम्हाला.
नाना : असं कसं? अरे, गृहलक्ष्मी ती आमच्या घरची.
आबू : मग फोटो टांगा एखादा. हे बघ, चित्र माझ्या नातीचं आहे. तेव्हा हक्क माझा बनतो.
नाना : महाशय, काढलं आहे माझ्या नातवानं. तेव्हा.. इ. इ.
रवीच्या चित्रांच्या प्रदर्शनाची एक मोठी कडी ‘छोटे बडे’मध्ये आहे. त्या प्रदर्शनानंतरच रवीची खरी ताकद समजून येते. राणी पाटील ही स्वत: जे.जे.ची विद्याíथनी होती. तिने आमचा कपडेपट आणि कलाविभाग तर संभाळलाच, पण ‘संपर्क अधिकारी’ म्हणूनही मोलाची कामगिरी केली. चित्रकारांची तिला माहिती होती. ओळखही होती. ती मला मालाडला सुहास बहुलकर यांच्या कार्यशाळेत घेऊन गेली. बहुलकर तेव्हा चांगलेच नावारूपाला येत होते. त्यांनी आपल्या वेधक चित्रांचा खजिना आमच्या (राणीच्या ) हवाली केला. त्या चित्रांच्या जोरावर आमचा नायक भाव खाऊन गेला.
मालिकेमधली गाणी अशोक पत्कींनी बसवली. छान उडत्या चाली देऊन. ही तीन-चार गाणी सगळी सळसळत्या रक्ताच्या जोशील्या तरुण मंडळींनी पेश केल्यामुळे छान उठावदार झाली. ‘छोटे बडे’ची शेवटची कडी प्रदर्शित झाल्यावर, आपण ‘सोयरीक’ नाटकाच्या मध्यवर्ती कल्पनेची उचलेगिरी केली, हे एकूण ठीकच केलं असं मला प्रामाणिकपणे वाटलं. मंचावर ज्या मर्यादा पडल्या होत्या, त्या छोटय़ा पडद्यावर भरून काढता आल्या. मुख्य म्हणजे नाटकात चित्रनगरीच्या विविध पैलूंबद्दल पात्रांनी नुसतंच भरभरून वर्णन करायचं आणि प्रेक्षकांनी आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे रंग भरायचे हा शिरस्ता पाळावा लागला होता. पण टेलिमालिकेत बऱ्याच प्रमाणात रंगाची किमया प्रत्यक्ष दाखवता आली. त्या अद्भुत चित्रनगरीमधल्या असंख्य कलानिपुण सुहृदांच्या मदतीमुळे हा चमत्कार शक्य झाला.
याखेरीज एक मोठं समाधान म्हणजे आमचे छोटे आणि बडे सगळेच कलाकार घरोघरी प्यारे झाले. टेलिव्हिजन आणि रजतपट सिनेमाचा तोलनीय विचार केला (हे फार पुस्तकी झाले का?) तर एक गोष्ट लक्षात येते, की दूर स्क्रीनवर चमकणाऱ्या सिताऱ्यांविषयी आपल्याला दबदबा वाटतो. त्यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण वाटलं, तरी कुठेतरी एक दुरावा भासत राहतो. ती मंडळी किती दूर? किती उंचावर? या उलट टेलिव्हिजनमधले तमाम नट चक्क आपल्या घरात शिरतात. आपण कशाही अवस्थेत असलो तरी त्यांना फरक पडत नाही. आपण जेवताना, चहा पिताना, लोळताना, फोनवर बोलताना कधीही त्यांनी यावं. आपला घरगुती गबाळा अवतार त्यांना चालतो. पण सिनेमाला जायचं म्हणजे त्याचा आब राखूनच गेलं पाहिजे. माझ्या ओळखीची एक जुनी सिनेतारका अमिता (‘तुमसा नहीं देखा’ची नायिका) ही रॉक हडसनची प्रचंड चाहती. त्याचा सिनेमा पाह्यला जायचं तर ती पार्लरमध्ये जाऊन केस सेट करून, फेशिअल करून मगच जात असे.
‘छोटे बडे’ चालू असतानाचा एक किस्सा. मी कशासाठी तरी बाजारात गेले होते. एका शाळकरी घोळक्यातल्या छोटय़ा मुलानं मला पाहिलं. त्याचे डोळे लकाकले. ‘‘अरे वो देखो, वो देखो’’ तो ओरडला, ‘‘मिठ्ठ की मां!’’ आणि मग गलका करीत ती सगळी टोळी माझ्या मागे लागली.
एका वाक्याने, त्या पोरटय़ांनी माझ्या अवघ्या कामगिरीवर बोळा फिरवला होता. गोळाबेरीज आता एवढीच शिल्लक राहिली होती ‘मिठ्ठ की मां’. तर ही टेलिव्हिजनच्या छोटय़ा स्क्रीनची किमया!    lok06

    

star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब
Students 26th January Drama Students viral video
बापरे! स्वत:च्या मोठेपणासाठी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; एकजण सरळ स्टेजवर धावत आला अन्…. VIDEO पाहून धक्का बसेल
tula shikvin changalach dhada adhipati big misunderstanding about wife akshara
अधिपतीचा अक्षराबद्दल मोठा गैरसमज! ‘ते’ दृश्य पाहताच होणार राग अनावर, नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
lakshmichya pavalani new promo
Video : अद्वैत नयनाला कलाची माफी मागायला लावणार! पाहा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा नवा प्रोमो
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar make cold coffee for spardha thigle
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरने नव्या मुक्तासाठी केली ‘ही’ खास गोष्ट, स्वरदा ठिगळे फोटो शेअर करत म्हणाली…
Shiva
Video: “तुझा संसार…”, दिव्याचे सत्य शिवासमोर आणण्यासाठी चंदन काय करणार? ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Story img Loader