गेल्या आठवडय़ात आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकारिणीच्या मीटिंगला जमलो होतो. वर्षभरात ज्या काही उल्लेखनीय आशादायक घटना घडतात त्याची आम्ही नोंद ठेवून त्या संस्थांना, व्यक्तींना आवर्जून अभिनंदनपर पत्र पाठवतो. त्यांच्या कामाला गरज असेल तर काही आर्थिक मदतही पाठवतो. टीव्हीवरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेद्वारे
न्या. रानडे आणि त्याहीपेक्षा रमाबाई रानडेंचे कार्य दाखवायचा स्तुत्य प्रयत्न केल्याबद्दल आम्ही त्या मालिकेच्या निर्माता आणि दिग्दर्शकांना अभिनंदनपर पत्र लिहायचे ठरवले. इतक्यात एक झगमगीत साडीतील स्त्री ऑफिसमध्ये शिरली. आम्ही चमकून तिच्याकडे पाहत असतानाच परवानगीची वाट न पाहता ती खुर्चीवर धप्पकन बसलीही.
आणि माझ्याकडे बोट रोखून म्हणाली. ‘तुम्ही अध्यक्ष ना? माझे काम आहे तुमच्याकडे!’ अशा आगाऊ बाईसाठी खरंतर आमच्याकडे वेळ नव्हता, पण समोरचे प्रकरण ‘जरा हटके’ वाटल्याने मी म्हटले, ‘बाई, आम्ही जरा महत्त्वाच्या कामात आहोत. वेळ नाहीये, पण..’
‘ओ मॅडम, मी पन हितं रिकामटेकडी न्हाई. ७७७७७७ वार्डाची नगरसेवक हाय मी. माजं नाव सुरेखा दिवटे. ओळखलं न्हाय का मला?’ आम्ही साऱ्यांनी चमकून एकमेकींकडे पाहिलं.
‘अस्सं का? सॉरी हं. पण.. आमच्याकडे तुमचं काय काम?’ आमच्या खजिनदाराचा प्रश्न.
‘तुम्ही त्या रमाबाईच्या शिरीयलचं कौतुक करताय ना? त्या रमाबाईवानीच माझा बी झोका तसाच उंच उंच जातोय, ते तुम्हाला सांगायला आले.’ सुरेखा.
आम्ही अजूनही संभ्रमातच. ‘पण सुरेखाताई, तुमचा कसला झोका? आणि..’ मी हळूच काही बोलायचा प्रयत्न केल्यावर तिने चिडूनच म्हटलं, ‘त्येच सांगतेय ना! गुमान ऐकून घ्या की! त्या रमाबाईवानी मला बी शाळंत जायचा लई कट्टाळा यायचा. थोडी वरसं मी शाळेत गेली, पण मग सोडलीच शाळा. पुढं आईबापानी माझं लगीन लावून दिलं. माझा मालक म्हंजे माझा नवरा लई हिकमती बघा. तसा नोकरीधंदा न्हाई केला त्यानं, पन पब्लिकची सेवा लई करायचा. म्हंजे समाजसेवा म्हना की! आणि आमच्या पक्षासाठी तर दिवस-रात्र राबायचा. आमच्या पक्षश्रेष्ठींच्या गळय़ातला ताईतच बनला ना त्यो.’
सुरेखाचं मालकपुराण आवरण्यासाठी मी हळूच म्हटले.. ‘तुमच्याबद्दल सांगताय ना सुरेखाताई?’
‘त्येच तर सांगतेय ना! अवो, मुन्शिपाल्टीच्या विलेक्शनमधी त्येलाच तिकीट भेटणार नक्की झालंतं.. पन ऐन वक्तला तो मतदारसंघ बायांसाठी राखीव झाला. आणि ध्येनीमनी नसताना घरकाम आणि पोरबाळं सांभाळताना अचानक माझी जिंदगीच बदलली म्हना की! पहिलं मी घाबरून न्हाईच म्हटलं, पर मालक जिद्दीलाच पेटला. ‘बायकोला नगरसेवक करनारच!’ असा हट्ट धरून बसला. तुमच्या त्या रमाबाईचा शेंडीवाला नवरा. काय त्याचं नाव?’
‘न्यायमूर्ती रानडे.’ मी हळूच म्हटलं.
‘त्याने कसा बायकोला शिकवायचा हट्ट धरला ना.. तस्साच!’ तिच्या चेहऱ्यावर नवऱ्याबद्दलचं ओसंडून वाहणारं कौतुक पाहून आम्ही चकित! ते पाहून तिला बहुधा अधिकच हुरूप आला. ती पुढं सांगू लागली, ‘माझ्या मालकानं मला समजावलं की सुरखे, घाबरायचं काम न्हाई. फकस्त नगरपालिकेत जायाचं आणि तिथं आपला लीडर सांगेल तसं वागायचं.’
‘मंग काय! मी विलेक्शन जितले आणि झक्कास साडी घालून, हातात मोबाइल घेऊन गेली की पालिकेत! आता बोला! गेलाय की न्हाई माझा
झोका उंच?’
माना डोलावण्यावाचून आमच्यापुढे पर्यायच नव्हता.
विजयी मुद्रेने तिनं पुढं सुरुवात केली. ‘आता पुढं ऐका.. आधी आधी मला समद्यांशी बोलताना लई भ्या वाटायचं. कुठून कुठून पब्लिक माझ्याकडं त्यांची कामं सांगायला यायचं. पण मालक माझ्यामागं पहडावानी उभे व्हते. मला चुलीकडे धाडून सोत्ता सव्र्याशी बोलायचे.’
‘अहो, पण सुरेखाताई, असं कसं चालेल? नगरसेवक या नात्याने लोकांचे प्रश्न तुम्हीच समजून घ्यायला नको का?’ आमच्या सेक्रेटरीचा बाळबोध प्रश्न!
‘गुमान ऐका हो. पब्लिकला वाटंला लावलं का पुढं काय करायचं हे मला बैजवार सांगत. थोडे दिवसांनी माझा बी कान्फिडन्स वाढला. सगळे मला ‘वहिनीसाहेब.. वहिनीसाहेब’ बोलाया लागले. परवाचीच गंमत सांगते- आमच्या पक्षश्रेष्टींच्या वाढदिवसाला शुभेच्या द्यायला कार्यकर्त्यांनी मोठ्ठा फलेक्स बनवला. त्यात माझा फोटो इतर कार्यकर्त्यांएवढा छोटा दिला. तो बघितल्यावर तर माझी सटकलीच. रातोरात मोबाइलवरून त्यांना माझ्या सामने बोलावलं. त्यांना म्हनले, तुम्ही कोन? मी कोन? ठावं हाय ना? मी हाये वहिनीसाहेब. इथली नगरसेवक, तुमच्या लायनीत बसवता काय मला? माझा फोटो शी.एम. आणि एमेलेच्या साइजचा पायजे. असले टरकले म्हनता! रातोरात बोर्ड बदलाया लावला. बोला, झाली की नाय मी पावरबाज?’
तिची विजयगाथा ऐकून आम्ही कसनुशा हसलो. ते पाहून तिला मात्र अधिकच स्फुरण चढलं.
‘हां, आनखी एकदा माझा झोका उंच गेला. कसा माहितेय?’ आमच्या माना अर्थातच नकारार्थी हलल्या.
‘दोन महिन्यांपूर्वी एका अभ्यासगटाची मेंबर बनून चीनच्या कामगार बायांची पाहणी करायला मी फारीनलाबी जाऊन आले.’
‘व्वा! कमाल आहे हं! तिथं कसला अभ्यास केला तुम्ही?’ माझ्या बोलण्यातील खोच तिला कळण्याची शक्यता तशी कमीच होती.
त्यावर ‘मंग सांगते काय तुम्हाला? अवो, पब्लिकची सेवा करायला नगरसेवक झाले म्हनल्यावर मालक आणि मी बायांच्या उद्दारासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी काही करायचं ठरवलं. असं वाटलं, का मी एक न्हाय शिकली, पर आजच्या जमान्यात पोरी शिकल्या तर समाज पुढं जाईल असं मी पक्षश्रेष्टींच्या भाषणात बी ऐकलं व्हतं. तवा हितं शहरात नाय, पर खेडय़ातल्या वाडय़ावस्तीवरच्या पोरींसाठी आश्रमशाळा काढायचं ठरवलं. लई खटपटी करून आमच्या गावच्या आजूबाजूची मोठ्ठी जमीन घेतली. आसपासच्या तीन-चार गावातल्या अगदी तीन-चार वर्षांपासून ते पार १५-१६ च्या जितक्या बी पोरी व्हत्या त्यांची नावं शाळेच्या पटावर लिवली. तुम्हाला सांगते, या साऱ्यांच्या शिक्षणासाठी, आश्रमशाळेच्या खर्चासाठी, सरकारी अनुदानासाठी, शिक्षण अधिकाऱ्यांना काय हवं काय नको बघण्यासाठी, पक्षश्रेष्ठींचे आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या मालकांनी जीवाचं रान केलं.’
‘वा! खूप छान काम केलंय की तुम्ही सुरेखाताई!’ मी.
त्यावर अधिक फुशारकीनं ती सांगू लागली, ‘अवो, आधी दोन-तीन रूमांचीच शाळा बांधली. एक मास्तरबी लावला पोरींना शिकवायला. त्याच्या बायकोलाच पोरींचे खाणंपिणं बघाया सांगितलं. पण पोरी आळशी हो, शाळंत यायचं नाव न्हाय. तशा थोडय़ाफार आल्या, पण बाकी शाळा रिकामी!’
‘अरेरे..! मग.. काय केलं तुम्ही?’ मी
‘मग मास्तरलाच तिथला वर्ग राहायला दिला आणि बाकीच्या वर्गात आमच्या शेतातलं धान्य ठिवलं. थोडं दिवस गोडाऊनसारखं हो! मास्तरलाच त्यावर लक्ष बी ठेवायला सांगितलं.’
‘अहो, हे कसे शक्य आहे?’ आमच्या कौतुकाचं रूपांतर थोडं रागात झालेलं.
माझ्या आवाजातील चीड ऐकून ती उसळून म्हणाली, ‘ह्योच ते तुमचे शहरी विचार! पेपरवाले म्हनाले, शाळेत मुलीच न्हाईत. आता मला सांगा, लहान वयात आईबाप सोडून, खेळ सोडून कुणाला शाळंत डांबून घ्यायला आवडतंय व्हय? मुली लहान हायेत अजूनी. येतील आज ना उद्या. त्यांच्या समजुतीने घ्यावं जरा. पण न्हाई.. उगा विरोधी पक्षांना पेटवून चौकशीची भानगड मागे लावली आमच्या.’
‘अहो पेपरवाल्यांचं काय चुकलं? तुमचे चुकले नसेल तर चौकशीत सिद्ध होईलच की!’ माझा सात्त्विक संताप उफाळून आला.
‘आता आम्ही तिरुपतीला आन् पक्षश्रेष्टींना साकडं घातलंय. ते ‘थोडं सबुरीनं घ्या,’ बोलले. तुम्हाला सांगते, ही खऱ्याची दुनिया न्हाई. त्या रमाबाईवानी मी पण पोरींसाठी काही कराया गेली तर माझ्या आंगलट येतंय. पण माझा इरादा पक्का हाय.. रमाबाईवानीच समद्या आडचणींतून मी वाट काढणारच आणि माझा बी झोका उंच जानारच.’ तिच्या चेहऱ्यावर जणू निश्चयाचं तेज झळकू लागलं.
‘पण सुरेखाताई, मला कळत नाही. तुम्ही एवढय़ा कर्तबगार नगरसेवक! आम्ही सामान्य माणसं तुमच्यासाठी काय हो करणार?’- मी.
‘अशा कशा अडाणी वो तुमी?- मनापासून मी काय सांगतेय? तुमच्या मंडळाचं सगळीकडं चांगलं नाव हाय. तुमी ‘उंच माझा झोका’ शिरियलच्या निर्मात्याला पत्र धाडताय ना? त्यात पुढं त्याला सूचना. न्हाई.. माझी आर्डर आहे सांगा, की आता सुरेखा दिवटेवर ‘उंच माझा झोका भाग-२’ बनव. पैल्या भागात तुमी रमाबाईने बायांच्या भल्यासाठी केलेले प्रयत्न दाखवले. त्याच्यामुळे आता आमी बायांनी कशी प्रगती केली, ते या दुसऱ्या भागात दाखवा. तुमचं नक्की ऐकतील ते. मंग.. बोला करनार की न्हाई माझं काम.? न्हायतर गाठ माझ्याशी हाय.’
आम्हाला इशारा देत राणीसारखी ती तिच्या आलिशान गाडीतून दिसेनाशी होईपर्यंत आम्ही पुतळय़ासारख्या स्तब्ध झालो होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा