स्वत:ला जिवापाड जपणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसत असतात. स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायला मागेपुढे न पाहणारी माणसेदेखील या समाजात दिसून येतात. या पाश्र्वभूमीवर जिया खानसारखी पंचवीस वर्षांची एक तरुण अभिनेत्री- जिने अजून आयुष्याचा पुरेसा अनुभवदेखील घेतलेला नाही, ती स्वत:च्याच हाताने आयुष्य संपवून घेते, या घटनेकडे कुठल्या नजरेने बघावे, हा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडणे स्वाभाविक आहे.
गुरुदत्तपासून ते सिल्क स्मितापर्यंतच्या बॉलीवूडमधील आत्महत्यांमध्ये आणखीन एक भर म्हणत तात्पुरती हळहळ व्यक्त करून आपण हा सगळा प्रसंग विसरू शकतो. पण भारतातल्या तरुणाईमधील वाढत्या आत्महत्येच्या सुप्त लाटेतील एक घटना म्हणून जर आपण जिया खानच्या आत्महत्येकडे पाहिले, तर मात्र अनेक गंभीर गोष्टी समजून घेण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.
पहिली व महत्त्वाची गोष्ट अशी की, आपल्यातील अनेकांना हे माहीतच नाही, की आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर तरुणाई स्वत:च्या हाताने स्वत:चे आयुष्य संपवून घेते आहे. ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’च्या पुढाकाराने झालेला भारतातील आत्महत्यांचा शास्त्रीय अभ्यास ऑगस्ट २०१२ च्या ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख आत्महत्या होतात. आणि त्यामधील ४० टक्के पुरुष व ५९ टक्के महिला या १५ ते २९ वयोगटातील आहेत. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर दरवर्षी देशातील जिया खानसारखी ऐंशी हजार ते एक लाख तरुण मुले-मुली स्वत:च्या हाताने स्वत:चे आयुष्य संपवून घेत आहेत. भारतातील आत्महत्यांची नोंद ठेवणाऱ्या ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या यावर्षीच्या रिपोर्टनुसार, २००६ पासून दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. भारताने लढलेल्या कुठल्याही लढाईत मृत्युमुखी पडलेल्या अथवा दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या कितीतरी जास्त भरेल.
भारतातील तरुणाईमधील वाढत्या आत्महत्यांची विशिष्ट कारणे समजून घेण्याआधी एकुणातच एखादी व्यक्ती आत्महत्या का करते, हे मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. आत्महत्येच्या कारणांविषयी आपल्या समाजात शास्त्रीय माहितीपेक्षा गरसमजच जास्त आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा गरसमज म्हणजे मनात आत्महत्येचे विचार येणे हा त्या व्यक्तीच्या मनाचा कमकुवतपणा होय.
आत्महत्येच्या कारणांचा शास्त्रीय अभ्यास मात्र आपल्याला असे सांगतो की, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येणे हे जैव-मनो-सामाजिक अशा तीन प्रकारच्या कारणांच्या एकत्रीकरणातून दिसून येणारा परिणाम आहे. व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येण्यामागे ‘जैविक’ कारणे असतात, हे आपल्यातील अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकते. पण आत्महत्येचे विचार मनामध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये ‘सिरोटोनीन’ या जैव घटकाची कमी असते, हे आता शास्त्राने सिद्ध केले आहे. आत्महत्येचे विचार मनात येण्यासाठीच्या जैविक कारणांमध्ये ‘आनुवंशिकता’ हादेखील महत्त्वाचा भाग असतो. हेमिंग्वे या प्रख्यात साहित्यिकाच्या सात पिढय़ांमध्ये आत्महत्यांची नोंद आढळते. स्वत: हेमिंग्वेनेदेखील आत्महत्या करूनच आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येचे विचार मनामध्ये येण्यामागच्या मानसिक कारणांमध्ये औदासीन्य (डिप्रेशन) व व्यसनाधीनता हे मानसिक आजार प्रमुख आहेत. त्याचबरोबर व्यक्तीच्या स्वभावातील उतावळेपणा व अस्थिर स्वप्रतिमा हीदेखील दोन महत्त्वाची मानसिक कारणे आहेत.
सामाजिक कारणांमध्ये शेतीमालाच्या अस्थिर भावामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अथवा परीक्षा पद्धतीच्या ताणाने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या गोष्टी येतात. जैव-मनो-सामाजिक यांतील एकाच एका कारणाने व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त होते असे नसून, या तिन्ही गोष्टींच्या कमी-अधिक संयोगामधूनही व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. तरुणवर्गातील वाढत्या आत्महत्यांचा विचार करताना मात्र तरुणवर्गाची बदलती जीवनशैली व कुटुंबव्यवस्था या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. आयुष्यामध्ये अपयशी होणे म्हणजे जणू काही भयंकर गोष्ट आहे व कुठल्याही प्रकारे आयुष्यात यशस्वी झालेच पाहिजे, ही धारणा सध्याच्या तरुणवर्गात मोठय़ा प्रमाणावर रुजलेली आहे. यशस्वी होण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या तरुणाईची संस्कृती एका बाजूला घडवीत असतानाच अपयश पचवायला शिकवणारी संस्कृती घडवण्यात आपली समाज म्हणून कुठेतरी पीछेहाट झाली आहे. तरुणांमधील वाढत्या आत्महत्यांमागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
खासकरून करिअर व प्रेमाच्या नातेसंबंधात आलेले अपयश पचवायला आजच्या तरुण पिढीला अवघड जाते आहे. प्रेम व आकर्षण या संकल्पनांमधील गोंधळ, एकदा प्रेमात अपयश आले म्हणजे आयुष्य संपले अशी मनोधारणा आजच्या तरुणाईत मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. बदलत्या कुटुंबव्यवस्थेचादेखील एक महत्त्वाचा संदर्भ या आत्महत्यांना आहे. आयुष्यात टोकाच्या ताणाच्या प्रसंगी जवळचे नातेसंबंध आपल्याला भावनिक आधार देण्याचे काम करत असतात. बदलत्या कुटुंबव्यवस्थेत अशा आधाराच्या जागा झपाटय़ाने कमी होत आहेत. त्याचा सगळ्यात मोठा फटका मुलांना व तरुणांना बसताना दिसतो आहे. आयुष्याच्या प्रचंड वाढलेल्या वेगामुळे शांतचित्ताने समोरच्या प्रसंगाचा विचार करण्याचे माणसाचे कौशल्यदेखील कमी होते आहे की काय, अशी शंका येते. आपणा बहुतांश लोकांच्या आयुष्यात असा प्रसंग कधी ना कधीतरी येतो की, दैनंदिन जीवनातले त्रास सहन करण्यापेक्षा नसलेले बरे असा विचार आपल्या मनामध्ये चमकून जातो. अशा परिस्थितीत त्या विचारावर उतावळेपणाने कृती करण्याऐवजी आपण आयुष्यातील सकारात्मकतेचा विचार करून स्वत:ला सावरतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा पाहणाऱ्या या क्षणांना सामोरे जाण्याचे कौशल्य तरुण पिढीमध्ये कमी पडल्यामुळे तर अशा घटना घडत नाहीएत ना, अशी शंका येते.
यासाठी शासन व समाज यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. शासनाने वाढत्या आत्महत्या हे तरुण वयातील मुलामुलींच्या मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे हे मान्य करून काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. राज्यपातळीवर वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी कार्यक्रमाची आखणी करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मानसिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे मोठे पाऊल ठरू शकते. उदासीनता व व्यसनाधीनतेचे आजार हे आत्महत्येमागचे एक महत्त्वाचे कारण असल्याने या आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर उपलब्ध असलेले उपचार हे वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नातून बचावलेली व्यक्ती ही परत आत्महत्या करण्याची मोठी शक्यता असते. महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्हा रुग्णालयामध्ये वर्षांतील कुठल्याही दिवशी असे एक-दोन रुग्ण तरी उपचार घेत असतात. त्यांना मानसिक आधार व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास या व्यक्ती परत आत्महत्येच्या विचारांकडे वळणार नाहीत. मानसिक अस्वस्थतेच्या वेळी हमखास मदत मिळेल अशा २४ तास चालणाऱ्या टोल फ्री टेलिफोन सुविधादेखील जिल्हापातळीवर सुरू करणे सहजशक्य आहे.
आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न ही गोष्ट आजदेखील कायद्याने गुन्हा समजली जाते. त्यामुळे कायद्याच्या भीतीने अनेक वेळा वैद्यकीय उपचार घेण्यात दिरंगाई होते. त्यामुळे जिवाला धोका होऊ शकतो. आत्महत्येच्या घटनेकडे मानसिक अस्वस्थतेचा निर्देशांक म्हणून पाहून या घटनेचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे.
हे झाले शासन व कायद्याच्या पातळीवरील प्रयत्न! परंतु आपणा सर्वाच्या संवेदनशील आणि कृतिशील सहभागाशिवाय केवळ कायदा अथवा शासनाच्या प्रयत्नांनी हा प्रश्न सुटू शकत नाही हे सर्वानीच जाणायला हवे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती अशी कृती करण्याच्या आधीच्या महिन्याभरामध्ये थेट अथवा अप्रत्यक्षपणे याविषयी आपल्या जवळच्या व्यक्तीला सूचित करण्याचा प्रयत्न करतात. बहुतांश वेळा आपल्या समाजात असे विचार करणारी व्यक्ती ही स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी असे करते आहे किंवा नाटक करते आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या आजूबाजूला अशी कोणी व्यक्ती असल्यास आपण हा इशारा गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. जवळच्या नातेवाईकांचे प्रेमाचे दोन शब्ददेखील अशावेळी त्या व्यक्तीसाठी जीवनदायी ठरू शकतात. त्यापलीकडे गरज भासल्यास अशा व्यक्तीला समुपदेशकाकडे घेऊन जाण्यातदेखील आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे आहे ते आपल्या आजूबाजूच्या तरुणाईशी संवाद साधणे! बदलत्या जीवनशैलीला सामोरे जाताना आपल्या आयुष्याचा समतोल तर ढळत नाहीए ना, हे तपासून पाहायला आपण त्यांना उद्युक्त केले पाहिजे.
प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यात येणाऱ्या आकर्षण, प्रेम, जोडीदाराची निवड या आनंददायी टप्प्याकडे तरुणाईला निकोपपणे बघण्यासाठी आपण मदत करणे आवश्यक आहे. आपल्या घरात या विषयांवर मोकळेपणाने बोलता यावे असे वातावरण तयार करणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. आयुष्याच्या या टप्प्यामध्ये निर्णय घेताना भल्या-भल्यांकडून गोंधळ होतात. तरुण वयात प्रेमातील नकारामुळे आयुष्यच व्यर्थ आहे ही भावना प्रेमाच्या उत्कटतेचा निर्देशांक नसून उतावळेपणा व अपरिपक्वता आहे.. आयुष्य प्रत्येकाला परत परत संधी देत असते, हे या तरुणाईपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. करिअरच्या बाबतीतदेखील यश व अपयश या आयुष्याच्या दोन महत्त्वाच्या बाजू असून, हे दोन्ही अनुभव आयुष्यात आपल्याला भरपूर काही शिकवत असतात, हेदेखील तरुणांशी आपण बोलले पाहिजे.
प्रसार माध्यमांचीही याबाबतीत मोठी जबाबदारी आहे. आत्महत्येच्या बातम्यांचे वार्ताकन हे दुधारी शस्त्र आहे. हे वार्ताकन अनेकदा आत्महत्यांविषयी समाजामध्ये जागृती वाढविण्याऐवजी त्यातून ‘कॉपीकॅट’ प्रकारातील आत्महत्या वाढण्याची भीती असते. जागतिक आरोग्य संघटनेने माध्यमांनी आत्महत्यांचे वार्ताकन कसे करावे, याविषयी दिशादर्शक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये माध्यमांनी आत्महत्यांचे सनसनाटीकरण टाळावे, पहिल्या पानावर अशा बातम्यांना ठळक प्रसिद्धी देणे टाळावे, आत्महत्येच्या प्रयत्नाचे सविस्तर वर्णन देणे टाळावे, अशा अनेक गोष्टी सुचविल्या आहेत. त्यांचे आपल्याकडे सर्रास उल्लंघन होताना दिसते. आत्महत्यांचा प्रश्न समाजासमोर मांडताना त्याचा उलटा परिणाम तर होणार नाही ना, याबाबतची संवेदनशीलता माध्यमांनी बाळगण्याची गरज आहे.
देशाबाहेरून होणाऱ्या हल्ल्यांविषयी आपण जेवढे संवेदनशील असतो, त्याच्या एक-दशांश संवेदनशीलता जरी आपण या प्रश्नाविषयी दाखवली, तसेच शासन, समाज व माध्यमे यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर आपण तरुणाईचे हे आत्महत्येचे सत्र निश्चितच थांबवू शकू.

‘लॅन्सेट’मधला शोधनिबंध काय सांगतो?
१) आत्महत्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या एच. आय. व्ही.ने होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येच्या दुप्पट आहे.
२) महाराष्ट्र, तामिळनाडू व आंध्र प्रदेश या तुलनेने प्रगत राज्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण अधिक.
३) ग्रामीण व निमशहरी भागामध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षित वर्गामध्ये आत्महत्यांचे प्रमाण जास्त.
४) कीटकनाशकांच्या प्राशनामुळे होतात सर्वात जास्त आत्महत्या. त्यामुळे कीटकनाशकांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न आवश्यक.

Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
Asen Me Nasen Me Review
असेन मी नसेन मी!
Suicide of a youth, Kondhwa area , Suicide Kondhwa,
पुणे : सावत्र वडिलांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या
Allu Arjun arrest, Pushpa 2 , Telangana Theater women Death ,
अशा दुर्घटनांना सेलिब्रिटींना जबाबदार धरायचे की नाही?
dombivli 15 year old minor girl committed suicide by jumping into creek from Mankoli bridge in Mogagaon
डोंबिवलीत माणकोली पुलावरून उडी मारून तरूणीची आत्महत्या
Story img Loader