‘समानशीले व्यसनेषु सख्यं’ या न्यायाने साहसी निसर्ग पर्यटनाच्या प्रेमात पडलेले आम्ही काही प्रवासी. नुकताच चालत नर्मदा परिक्रमा करण्याचा सुंदर अनुभव गाठीशी बांधलेले. आता पुढे काय? कुणीतरी सुचवलं-‘कर्दळीवन’! धुळय़ाचे उत्साही गृहस्थ श्री. शुक्ल यांनी त्वरित त्या दिशेने पावलं टाकली. ‘कर्दळीवन- एक अनुभूती’ या प्रा. क्षितीज पाटुकले यांच्या पुस्तकासह एक अर्ज माझ्या हातात पडला. ‘फक्त बावन्नजणंच जाऊ शकतात. तेव्हा..’ टिंबटिंबचा गर्भितार्थ मी चटकन् ओळखला आणि अर्जासहित पैसे भरून मोकळी झाले. श्रीदत्तात्रेयांचे गुप्तस्थान व श्रीस्वामी समर्थाचे प्रकटस्थान असलेल्या दुर्गम कर्दळीवनाचे माहात्म्य, महत्त्व, भौगोलिक स्थान, इतिहास याविषयीच्या पर्यावरणाने माझं मन काठोकाठ भरून गेलं आणि तिथं जाण्यासाठी मी अतिशय आतूर झाले.
फक्त चार दिवस आणि तीन रात्रींची ही पंचपरिक्रमा. ताट, वाटी, भांडे, मोजके कपडे, गरजेची औषधे, पाण्याची बाटली, बॅटरी इतर आवश्यक गोष्टी- खासकरून हर्बल उत्पादनांच्या स्वरूपात घेतल्या. कारण तेथील निसर्गाचा तोल आपल्यामुळे बिघडू नये! अशी झटपट तयारी करून हैद्राबादच्या गाडीत बसलेसुद्धा. ‘माझे पुण्य फळा आले, आज मी कर्दळीवनांत चालले..’ खुशीतच मी गुणगुणत राहिले. एक-एक करत अनोळखी सहप्रवासी ओळखीचे झाले. ‘मी’च्या वेलांटीचा फास सुटत तो ‘आम्ही’त बदलला. हैदराबाद ते श्रीशैल्य हा सहा-सात तासांचा प्रवास झाल्यावर शिवाजी स्फूर्ती केंद्रात मुक्कामासाठी पथारी टाकली. श्रीशैल्य हे एकमेव असे ठिकाण आहे, जेथे एकाच प्रांगणात १२ ज्योतिर्लिगांपैकी एक श्रीदेव मल्लिकार्जुन आणि १८ शक्तिपीठांपैकी एक श्रीदेवी भ्रमरांबा यांची मंदिरे आहेत. एकूणच ‘नयनमनोहर पाहुनी परिसर, भुलुनी गेलो घरा,’ अशीच साऱ्यांची अवस्था झाली. सर्व मंदिरांतून फिरून मनोभावे नतमस्तक झालो. साक्षी गणपती तर श्रीशैल्य व कर्दळीवनात जाणाऱ्यांचे नाव नोंदवून घेण्याच्या तयारीतच होता. आद्य शंकराचार्याच्या ‘शिवानंदलहरी’ या ग्रंथाचे हे जन्मस्थान. इथे झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचं नादमधुर संगीत कानांत रुणझुणत राहिलं.
दोन कि. मी. वर असलेल्या पाताळगंगा घाटावर जाण्यासाठी ६५० पायऱ्या उतराव्या लागतात. परंतु तंत्रज्ञानाच्या कृपेमुळे आम्ही पाळण्यातून सुखात खाली आलो आणि लगेचच बोटीत बसलो. छोटय़ा नावा, यांत्रिक होडय़ा, बांबूच्या गोल बुट्टय़ा ‘हले-डुले’ करत आमच्या आसपास घोटाळत होत्या. कर्दळीवन या पवित्र तपोभूमीकडे.. सिद्धभूमीकडे आमची वाटचाल सुरू झाली. जणू कालचक्रच उलटे फिरवले गेले. आम्हाला वेढून असलेले ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, रुद्रगिरी हे पर्वत म्हणजे जणू ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे स्वरूपच! नल्लमलाई पर्वतराजींमधून वाहताना कृष्णामाई अंग चोरून घेते आणि तीन हजार फुटांपर्यंत- म्हणजे जणू पाताळापर्यंत खाली जाते. साहजिकच ‘पाताळगंगा’ म्हणून ती ओळखली जाते. श्रीशैल्य ते कर्दळीवनाच्या प्रवासात या शेलाटय़ा पाताळगंगेची वळणे, सभोवतालची गर्द हिरवीगार वनराई, पाण्यावर विसावलेले नजरेचे क्षितीज, वरचं निळंभोर आकाश, खडा पहारा देणारे उत्तुंग पर्वत न्याहाळताना ‘जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’ अशी अवस्था होत होती. आधुनिक सुखसोयींचं नागर जग मागे पडलं होतं. मच्छिमारी करणारे आणि चेंचू जमातीच्या तुरळक झोपडय़ा सोडल्या तर मनुष्याचं नागर जग सीमेपार गेलं होतं. आपल्याच मस्तीत खळाळत वाहणारी पाताळगंगा नीरव शांततेत नादमयता निर्माण करत होती. मन पूर्णपणे त्यात गुंतून गेलं होतं.
अक्कमहादेवी मंदिरात जाण्यासाठी बोटी किनाऱ्याला लागल्या. बाराव्या शतकातील वीरशैव पंथातील महान संत अक्कमहादेवी यांच्या उग्र तपश्चर्येने पावन झालेलं हे ठिकाण. लाख वर्षांपूर्वीच्या गुहेत पर्वताला नैसर्गिक खोलगट छिद्र पडून हे मंदिर तयार झाले असे म्हणतात. पाण्याच्या प्रवाहाने कारागिराची भूमिका पार पाडत खडकात लेणी साकारली आहेत. २०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असे दगड- नव्हे शिळा बघताना नकळत डोळे विस्फारले जातात. मिट्ट काळोखात आधी वाकून, मग गुडघ्यावर बसून आणि नंतर सरपटत एका वेळी एकालाच त्यात प्रवेश करता येतो. आत आपण घुसमटणार तर नाही ना, आणि घसरलो तर.. या विचारांनी कावराबावरा झालेला आपला चेहरा बाहेर येताना मात्र विजयी वीरासारखा उत्फुल्ल होतो. पणती किंवा बॅटरीच्या प्रकाशात स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन होते. ‘धकधक’ करायला लावणाऱ्या या अद्भुत अनुभवाने परिक्रमेला सुरुवात होते. ‘पुन:श्च हरिओम्’ म्हणत बोटी मार्गस्थ होतात. पाताळगंगेच्या गोबऱ्या गोबऱ्या हिरव्यागार गालांचे अनुपमेय सौंदर्य नजरेने टिपण्यात डोळे गर्क होतात. तासाभराचा हा विहार संपुष्टात येऊन बोटी व्यंकटेश किनाऱ्याला लागतात. श्रीदत्तबाबा आणि नुकरत्नम अम्मा यांचा श्रीदत्ताश्रम गजबजून जातो. मोर, टर्की पक्षी कुतूहलाने इथे डोकावून जातात. सांजसावल्या गडद होऊ लागतात. काजळाची जणू दाट रेघ सभोवती रेखाटली जाते. एरवी पाच मिनिटे जरी दिवे गेले तरी कुरकुरणारे आम्ही त्या सुखद, शीतल हिरव्या काळोखात दत्तप्रभूंची पूजा, आरती आणि उदरभरणाचा यज्ञही अगदी सहजतेने उरकतो. चांदण्याचं पांघरूण अनायासे हाताला लागल्यामुळे छान झोप लागली नसती तरच नवल!
मंगल प्रभात होते. पारदर्शी आभाळाने उधळले निळे रंग आणि पर्वताच्या माथी कोरले सूर्यबिंब. सूर्यबिंबाच्या त्या अनोख्या दर्शनसुखाने अगत्याने दिलेल्या चहाची गोडी द्विगुणित होते. ताजेतवाने होत पाठीवर सॅक, बेडस्प्रेडची गुंडाळी, पायात बूट व आधारासाठी हातात काठी घेऊन गिर्यारोहकाच्या भूमिकेत शिरत कर्दळीवनाच्या मोहिमेवर निघतो. दगडगोटय़ांच्या पाऊलवाटेवर आमचे पाऊल पडते. अगदी सरळ, अवघड चढ असल्यामुळे दम लागत होता. लक्ष पायवाटेवरच गुंतलेलं. दुसरा विचार आला की पाऊल लटपटतंच. त्यामुळे आपापसातील गप्पा, घरगुती चिंता, काळज्या धुकं विरावं तशा विरून गेल्या. ग्रुप लीडरच्या पाठोपाठ वाटेतल्या दगडांवरील बाणाने दाखवलेल्या दिशेने आमची मुंग्यांची रांग पुढे सरकू लागली. आपल्या पुढच्या आणि पाठीमागच्या व्यक्तीकडे लक्ष ठेवत, मदतीचा हात तत्परतेने पुढे करत, काठीचा तिसरा पाय भक्कम रोवत सरळसोट पर्वताची चढण चढू लागलो. सगळी मदार त्या पायांवरच होती. शिशिराने केलेली दुर्बल काया सांभाळत वृक्ष वाऱ्याबरोबर दंगामस्ती करत होते. कमरेएवढं पिवळं गवत कोवळय़ा उन्हात चमकत होतं. जरा सपाट पठारासारखा दगड दिसला की क्षणभर विश्रांती घेतली जाई. पाण्याच्या घोटाने घसा ओलसर होई. पाणी पुरवून पुरवून प्यावे लागे. कारण वाटेत कोठेही पाण्याची सोय नव्हती. लिमलेटची गोळी तोंडात टाकून मौल्यवान ‘चांदी’ सॅकमध्ये आवर्जून जाऊन बसे. आमच्या ‘पाय’रवाने सरपटणाऱ्या प्राण्यांचीच इकडून तिकडे धावताना दमछाक होत असावी. धीट सरडे मात्र न घाबरता पायात घुटमळायचे. एखादा मृत हिरवागार नाग किंवा काळा मणेर आपल्या अस्तित्वाची झलक पेश करायचा. डोळे आणखी सावध व्हायचे. विविधरंगी अनोळखी चिमुकली रानफुलं, दुर्मीळ पिवळी ओळखीची रुई प्रसन्नतेचा शिडकावा करायची. पुरुषभर उंचीच्या वारुळांची नक्षी अचंबित करत होती. पठारावर जाताना एका कातळावर स्वामी समर्थाचे पाऊल उमटलेले दिसले. बांबूचे धनुष्य आणि तीरकमठा चालवून केलेली शिकार यावर उदरनिर्वाह करणाऱ्या चेंचू जातीच्या आदिवासींच्या दोन-चार झोपडय़ा दिसल्या. परंतु भाषा येत नसल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. एकापाठोपाठ एक असे सहा पर्वत आणि पुढचे पठार असा नऊ कि. मी.चा पल्ला अखेर पाच-सहा तासांत आम्ही पार केला होता, हे खरंच वाटत नव्हतं.
‘अक्कमहादेवीची गुहा आली..’ कोणीतरी आवाज दिला. खूप हायसं वाटलं. पण समोर तर दिसेना. ‘कडेकपारी’ हा शब्द ओळखीचा होता. त्यातली ‘कपार’ तिथे सापडली. दरीच्या मुखाशी एक अखंड शिळा होती. त्यावरून धबधबा कोसळत होता. दगडांच्या ५० पायऱ्या उतरलो आणि चार-पाच पायऱ्या चढल्यावर अक्कमहादेवीच्या गुहेत आम्ही प्रवेश केला. कपाटातला खण तसा हा डोंगरातला अजस्त्र खण. पाच-सहाशे माणसं झोपू शकतील असा ऐसपैस. धबधब्याचे अवीट गोडीचे पाणी प्यायल्यावर थकवा पळून गेला. बोलणारे पायही जरा थांबले. गुहेची साफसफाई, स्नान, धोबीघाट वगैरे उरकल्यावर गुहेतील शिवलिंग, श्रीअक्कमहादेवीची मूर्ती, श्रीनृसिंह सरस्वती- स्वामींची मूर्ती यांचे दर्शन घेतले. पोटपूजा झाली. आता निवांतपणे पृथ्वीच्या अंगलटीची वळणं अनुभवण्यासाठी आसपास बागडू लागलो. अर्थात ‘लक्ष्मणरेषा’ पाळूनच.
‘फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा,
वरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा’
बालकवींच्या काव्यपंक्ती आठवताना संध्याछाया दाटून आल्या. माणसं, वाहनं, वीज, रस्ते.. काही नाही. फक्त काळोखाचं साम्राज्य. मखमली आकाशात चमचमतं चांदणं बघतानाच निद्रादेवीच्या कुशीत शिरलो.
पूर्वी योगी, तपस्वी, सिद्धमुनी यांचे वास्तव्य असलेल्या कर्दळीवनातील सहा कि. मी.चा दुसरा टप्पा गाठण्यासाठी आम्ही कूच केली. पठारावरून घनदाट अरण्यात केव्हा शिरलो हे कळलंच नाही. अंदाजे चार-पाच हजार वर्षांपूर्वीच्या वडाचा विस्तार डोळ्यांत मावत नव्हता. कर्दळीवन हे तर अगणित औषधी वनस्पतींचे माहेरघर. संशोधकांना आव्हान देणारे. लपतछपत, गिरक्या घेत उडय़ा मारत पाण्याचा एक प्रवाह आमची साथसंगत करत होता. २५०-३०० फूट उंच झाडे, १०-१२ फुटी वारुळ, पायाखाली दलदल, झाडेवेलींनी गळामिठी घालून अडवलेली वाट, बांबू, काटेरी वृक्षांची बने, मुंग्या-कीटकांची भाऊगर्दी, लटकलेली कोळ्यांची जाळी, जंगली श्वापदांची भीती, वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज, अस्वलाची ताजी लेंडी म्हणजे नुकत्याच त्यानं दिलेल्या भेटीच्या पाऊलखुणाच. सतत जागरून राहून वाट काढत जावे लागते. एकमेकांकडे झेपावलेल्या वृक्षांच्या फांद्यांच्या झोपाळय़ावर झुलण्याच्या निमित्ताने दम खाल्ला. सोबत आलेल्या प्रवाहाचे ‘धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे’ असे परिवर्तन झाले. लहानशा दरीत उडी टाकताना बाजूची कपार सामोरी आली. त्या कपारीतल्या गुहेतील कोपरा म्हणजे दत्तप्रभू आणि स्वामी समर्थाचे वसतिस्थान. इथे वड, पिंपळ आणि औदुंबर हे चिकटून आकाशगामी झाले आहेत.
अक्कमहादेवी गुहेत रात्र काढून सकाळी परतीच्या जास्त अवघड वाटणाऱ्या प्रवासाला लागलो. मंतरलेल्या कर्दळीवनातली ती प्रसन्नता म्हणजे ‘विसरू म्हणता विसरेना’ अशीच अनुभूती होय.
शब्दांकन : सुचित्रा साठे