दु सऱ्या भागाची सुरुवात करण्याआधी याआधीच्या माझ्या लेखासंबंधात एक दुरुस्ती : ‘खयालो में’ या गाण्यात पडद्यावर विजयालक्ष्मी आहे आणि ‘फुलगेंदवा ना मारो’ हे गाणे ‘दूज का चाँद’ चित्रपटातील आहे.
रोशनजींचे प्रमुख साहाय्यक, अॅरेंजर शामराव कांबळेंशी गप्पा मारताना खूप गोष्टी समोर आल्या. रोशन स्वत: उत्तम दिलरूबा वाजवत असत. सारंगीचा त्यांच्याइतका अप्रतिम वापर (ओ. पी. नय्यर यांचा अपवाद वगळता) इतर कुठल्याही संगीतकाराच्या रचनांमध्ये आढळत नाही. ऑर्केस्ट्रेशनच्या बाबतीत अत्यंत जागरूक असलेले रोशन दिलरूबा, सारंगी, बासरी यांच्या विशेष प्रेमात होते. स्वत: दिलरूबा उत्तम वाजवू शकत असल्याने गाण्यात तो टोन डोकावतोच. रोशनच्या गाण्यात सारंगी-सितार यांचं उत्कृष्ट कॉम्बिनेशन दिसतं. सारंगी- सितार त्या- त्या शब्दांशी संवाद करताना दिसते. ‘जुल्मे उल्फत में हमे लोग सजा देते है’मध्ये रूढार्थाने अंतऱ्यातलं म्युझिक नाही. त्यात सतार आणि सारंगी लताबाई जे गातात त्याला हुंकार देऊन प्रतिसाद देताना दिसतात. ‘जो बात तुझ में है..’ यात अशीच सारंगी आणि सतार प्रत्येक वाक्या-वाक्यात जणू प्रतिसाद देतात. ‘जो बात तुझ में है..’ला गाणं जिथे सोडलं जातं, तिथून सतारीचा पीस असा उठतो, की खरोखर कुंचल्याचा एक हलकासा स्ट्रोकच त्या चित्रसोपानावर फिरल्याचा भास व्हावा. ‘बेजान हुस्न में कहाँ रफ्तार की अदा..’ ‘तुझ्यातला आवेग या निर्जीव चित्रलावण्यात कसा उतरवू? यात तुझं प्रतििबब भलेही असेल; पण ‘तू’ नाहीस ना! तुझी ती सुंदरता माझ्या कुंचल्यात कुठून येणार?’ या सगळ्या भावनेला जितका न्याय रफीचा आवाज देतो, तितकाच भाग या सुंदर, बोलक्या सारंगी-सितारचा आहे हे विसरून चालणार नाही. ‘फिर एक बार सामने आजा किसी तरह’ म्हणताना रफी किंचित रेंगाळतो, ते किती सुंदर आहे. अगदी प्रेमात आकंठ बुडाल्यावर येणारी ती विवशता. इथे सारंगी जणू समजूत घालणारी वाटते. हे सगळं अनुभवण्यासाठी हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं यात आश्चर्य नाही. पं. रामनारायण (सारंगी), पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी), जयराम आचार्य (सितार) यांसारख्या कलाकारांनी वाजवलेले हे तुकडे अजरामर आहेत. ‘रात की महफिल सूनी सूनी’ (नूरजहाँ) या गाण्यातली बासरी अशीच ऐकण्यासारखी.
एकाच गाण्यात- किंबहुना ध्वनिपदातच रिदमचे वेगवेगळे पॅटर्न करणे हेसुद्धा एक महत्त्वाचे वैशिष्टय़ रोशनच्या गाण्यात दिसतं. ‘छुन छुन छुन बाजे पायल’ (हमलोग) हे गाणं मिळवून जरूर ऐका. ‘पायल’ या शब्दापर्यंत सगळं एका ठेक्यात चाललेलं असतं. (मधेच ‘पायल’ शब्द लताबाई जो वर उचलतात, ते ऐकायचं.) आणि ‘बाजे’ शब्दानंतर जे काही घडतं, ते केवळ अप्रतिम. एकदम दुपटीच्या लयीत ढोलक जातो. या गाण्यात अॅकॉíडअन ऐकण्यासारखीच ढोलकची मजा घ्यायची. पुन्हा पुन्हा ऐकायचं ते निव्वळ ढोलकसाठी ठेवलेल्या चार मात्रा जागेसाठी ‘बार बार तोहे क्या समझाए’ (आरती) या गाण्यात. गाणं सुरू होतं जलद लयीत- ‘एहे बाहार बाहार’ म्हणत. अस्सल देशी रंग घेऊन, लाजवाब हार्मोनियम, व्हायोलीन आणि हा ढोलक. मनात नाचायला लावणारा ठेका. आणि पुन्हा गाण्याच्या शेवटी ‘क्या’ शब्दानंतरची ती बासरी. इथे शब्दच बासरी होऊन येतात. अब्दुल करीम, लाला गंगावणे यांसारख्या दादा माणसांनी वाजवलेले हे ठेके ढोलकसुद्धा ‘बोलका’ असतो, हे दाखवून जातात.
नेहमीच्या तालांना थोडय़ा वेगळ्या ठेक्यात आणताना रोशनने अनेक करामती केल्या. पं. अशोक रानडे यांच्या मते, ‘दिल जो न कह सका’मध्ये रफीच्या ओळींना िहदुस्थानी, तर वाद्यांच्या तुकडय़ांना वेस्टर्न असे ठेके आहेत. ‘बहारोंने मेरा चमन लूटकर’ (देवर)मध्ये ताल झपतालासारखा वाटतो, पण येतो वेगळ्याच ढंगात. ‘सलामे हसरत कबूल कर लो’मध्येसुद्धा केरवा वेगळ्या ढंगात येतो.
रोशनचा गाण्यात वाद्यांचे छोटे फीलर (जागा भरणारे तुकडे) येतात ते त्या व्होकल पार्टशी इतके समरसून, की त्याचाच एक भाग बनतात. ‘तुम अगर मुझको’मध्ये ‘अब अगर मेल नहीं है, तो जुदाई भी नहीं’ याला लागून ‘गरेगसा’ हा तुकडा असा चपखल, की ‘नहीं’ या शब्दाचंच ते एक्स्टेन्शन वाटावं. गुणगुणून पाहा- लगेच लक्षात येईल. तसंच ‘खयालो में किसी के’मध्ये ‘हसीं फूलों के दो दिन चांदनी भी चार दिन की है’ यात ‘है’च्या आतूनच व्हायोलीनचा पीस सुरू होतो.
आता काही खास गाण्यांची चर्चा करू.
‘रहे ना रहे हम’ (साहिर- ‘ममता’)
शतकात एखादंच असं गाणं बनतं. मागे उल्लेख केल्याप्रमाणे ‘ठंडी हवाएँ’वरून प्रेरित झालेली चाल, पण इंट्रो-पीसपासून पकड घेणारी. तशीच अत्यंत दिव्य, उदात्त भावना असलेलं गाणं. ‘रहे ना रहे हम’मधल्या ‘हम’चा उच्चार इतका भरीव, अर्थपूर्ण लताबाईच करू शकतात. ‘बनके कली, बनके सबा’ म्हणताना मागे हळुवार जलतरंग स्वरांची मोहक पखरण करत जातो. ती नसती तर..? शब्दा-शब्दाला बासरी, व्हायोलीन प्रतिसाद देताहेत आणि ढोलकचा सुंदर ठेका गाणं तोलून धरतोय.. हे सगळंच आपल्याला स्तब्ध करायला पुरेसं आहे.
‘जब हम न होंगे,
जब हमारी खाक पे तुम रूकोगे चलते चलते..
अश्कोंसे भीगी चांदनी में एक सदा सी सुनोगे चलते चलते..
वहीं पे कही हम तुमसे मिलेंगे,
बनके कली, बनके सबा, बागे वफा में..’
‘शरीराने मी नसेन जेव्हा- माझ्या आठवणींनी क्षणभर थबकशील. तेव्हा डोळ्यांतल्या अश्रूंनी विझू विझू झालेलं हे चांदणं बघ.. त्यात माझी हृदयसाद नक्कीच ऐकू येईल तुला. तिथेच भेटेन मी तुला कुठेतरी तुझ्यात गुंतलेली. कारण शरीराने असणं-नसणं याला आपल्यात काही महत्त्व नाहीच मुळी. दरवळत राहू एकमेकांच्या मनात. कितीतरी रूपांत..’
या गाण्यात शब्द संपले तरी व्हायब्रो, जलतरंग सुरूच राहतात. कारण ही ‘भेट’ या जन्मापुरती नाही ना. पुन्हा पुन्हा ती होत राहणार. डोळे मिटून शांतपणे हे गाणं ऐकलं तर हे सगळे विचार येऊन केव्हा अश्रू ओघळायला लागलेत कळणारच नाही. मला तर हे गाणं इथलं.. लौकिकातलं वाटतच नाही. जन्म-मृत्यूच्या पलीकडचंच वाटतं. चित्रपटाच्या साऊंड ट्रॅकवर रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्याही आवाजात हे गाणं आहे.
‘छुपा लो यूं दिल में प्यार मेरा’ (ममता)
िहदी चित्रपट संगीतामध्ये काही मोजकी ‘पवित्र’ गाणी झाली. त्यापकी हे एक गाणं. हे गाणं ‘पवित्र’ अशासाठी, की फक्त समर्पणभाव, अद्वैताचा आध्यात्मिक अर्थ उलगडणारा भाव या द्वंद्वगीतात जाणवतो. या गाण्याच्या दैवी सामर्थ्यांबद्दल काय बोलावं? कमीत कमी वाद्यं आणि हेमंत-लता अशी जोडी असल्यावर..
‘छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा के जैसे मंदिर मे लौ दिये की
तुम अपने चरणों में रख लो मुझको
तुम्हारे चरणों का फूल हूँ मैं
मं सर झुकाए खडी हूँ प्रीतम,
के जैसे मंदिर में लौ दिये की’
प्रेमाला मंदिरातल्या तेवत्या शांत ज्योतीची उपमा देण्याहून जास्त उदात्त काय असतं? इतका दिव्य, सात्त्विक भाव असलेली द्वंद्वगीतं खूप दुर्मीळ आहेत. या तोडीचं ‘तुम गगन के चंद्रमा’ (लक्ष्मीकांत प्यारेलाल- ‘सती सावित्री’) हे एक गाणं आठवतं.
‘तुम अगर मुझको न चाहो तो’ (मुकेश. ‘दिल ही तो है’)
साहिरच्या लेखणीतून एक कमालीचा प्रॅक्टिकल विचार मिळालाय. प्रेमातली ही ‘धास्ती’- की तू मला मिळाली नाहीस तरी एक वेळ चालेल, पण दुसऱ्या कोणाची झालेली बघणं नशिबात येऊ नये. आता मी निदान या भ्रमात आहे, की होकार नसला, तरी अगदी नकार तरी नाही तुझ्याकडून. पण तू मला सोडून ‘भलत्या’वरच तुझ्या प्रेमाचा वर्षांव केलास तर मात्र पंचाईत होईल. इतका गोड विचार! आणि मुकेशने या गाण्यास इतका न्याय दिलाय, ते इतकं अप्रतिम गायलंय, की जलद रोमँटिक गाण्यात त्याचा खूप वरचा क्रमांक लागतो. इतका ताजा, मिश्कील आवाज लागलाय मुकेशचा! आणि केरव्याच्या फ्रेममध्ये वेगळ्याच वळणाने मांडलेले ते शब्द. फ्लूट, व्हायोलिन आणि अॅकॉर्डियन यांची जादू आहेच. ‘तुम अगर मेरी भी नहीं तो पराई भी नहीं’ म्हणताना खूप सूक्ष्म पॉज घेऊन ‘मेरी’ शब्द गायलाय, तो मुकेशचा उत्कट भावना व्यक्त करण्याची ताकद दाखवून जातो.. जिला खरंच तोड नाही.
‘जिन्दगीभर नहीं भूलेगी..’ (साहिर- ‘बरसात
की रात’)
सौंदर्याच्या सगळ्या विशेषणांच्या पलीकडे गेलेली मधुबाला. अप्रतिम चाल. त्यातली एक विलक्षण सहजता. आणि त्या भेटीने विद्ध झालेला रफीचा तो अत्यंत रोमँटिक आवाज. पावसातली ती भेट.. जन्मात न विसरता येणारी. जसं वर्णन गाण्यात येतं, तशा तशा तिच्या प्रतिक्रिया केवळ लोभस आणि ‘फूल से गालों पे रूकने को तरसता पानी’ म्हणताना क्षणभर ताल थांबतो. या सगळ्यात नाजूक जलतरंग.. हे खूप तरल आहे सारं. हेच गाणं लताबाईंच्या आवाजातही जादू करतं.
रोशनजींची आणखीनही काही अवीट गोडीची गाणी पुढच्या भागात बघूयात..