घडय़ाळाच्या जाहिरातीतल्या घडय़ाळात नेहमीच जितके वाजतात तितक्याच वाजता- म्हणजे ठीक १० वाजून १० मिनिटांनी गाडी चाळीला चिकटलेल्या फुटपाथला बिलगून उभी राहायची. हातगाडी.. फळ्यांनी भरलेली. चाळीतले दोन जवान तयारच असायचे. हातगाडीवरची वरची फळी दोघेजण दोन्ही टोकाला स्ट्रेचरसारखी धरून मग ती तळमजल्याच्या बाहेरच्या गॅलरीला टेकून उभे करायचे. गॅलरीच्या आतल्या बाजूला असलेले दुसरे दोन जवान ती फळी तशीच वरच्या गॅलरीतल्या जवानांकडे उभीच ढकलायचे. ते जवान तिचे तेच ढकलणे त्याच्या वरच्या गॅलरीतल्या जवानापर्यंत पोहोचवायचे. असे ‘चाळरोहण’ करीत फळी गच्चीवरच्या कठडय़ावर पोहोचायची तेव्हा तेथील दोन वेटलिफ्टर ती फळी ओढून अंगावर घेत गच्चीवर टाकायचे आणि नंतर येणाऱ्या फळीला कवेत घेण्यासाठी सिद्ध व्हायचे. हे फळीउड्डाण दीड-दोन तास चालायचे. तालासुरात. ही गंमत बघणारी बघ्यांची गर्दी हटता हटायची नाही. फळ्या उचलणारे इतके रंगात यायचे, की अखेरीस फळ्या संपल्या, हे विसरून हातगाडीलाच हात घालायचे. घोरपड लावून मावळे गड चढले होते. इथे मजल्या-मजल्यावर मावळे होते. घोरपड म्हणजे आमच्या गच्चीचा कठडा होता. फळीउड्डाणाचा हा रोमहर्षक कार्यक्रम दरवर्षी तशाच हाऊसफुल्ल गर्दीत आणि त्याच शिस्तीत पार पडायचा. पण कधी कुणाच्या हातून फळी सरकली नाही, की कुणाचा कपाळमोक्ष झाला नाही. फळ्या चढवणाऱ्या या युवकांना चाळीतली मुलं चेष्टेने ‘फलंदाज’ म्हणायचे. सगळ्या फळ्या गच्चीवर आल्यावर गरमागरम बटाटावडय़ाचा कार्यक्रम होऊन जिम्नॅशियममधले व्यायामपटू आंघोळीला जातात तसे सगळेजण आपापल्या घरी आंघोळीला जायचे.. रात्री पिंपात भरलेल्या पाण्याने आंघोळ करायला!
आमचे नाटक आमच्याच स्टेजवर होणार, या चाळीच्या स्वाभिमानी वृत्तीचे फलित म्हणजेच या स्वहस्ते गच्चीवर येणाऱ्या आणि रंगमंच उभारणाऱ्या फळ्या! चाळीतले बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर दरवर्षी या फळ्या नेमाने पुरवीत असत. नाटक हे त्यांचे दुसरे वेड होते. (पहिले वेड- बायको!) बिल्डिंगचे हे कॉन्ट्रॅक्टर बायकोलाच म्हणायचे- ‘काय इमारत आहे!’
गच्चीवर सात फूट उंचीच्या व अडीच फुटी रुंदीच्या नऊ-दहा चौकटी उभ्या केलेल्या असायच्या. हा चाळीच्या नाटकाचा नेपथ्यनिर्माण विभाग होता. चित्रकार बापूंनी सर्वाना पूर्वीच सक्त ताकीद दिलेली असायची.. ‘पुढच्या महिन्याची रद्दी विकायची नाही. प्रत्येकाने आदल्या दिवशी पेपर घेऊन गच्चीवर जायचं आणि कार्याला सुरुवात करायची.’ चौकटींच्या जवळ खळीनं (कागद चिकटवण्याची पेस्ट) भरलेलं पातेलं असायचं. त्यात एक छोटं फळकुट खोवलेलं. प्रत्येकाने आपल्या हातातल्या पेपरला खळ लावायची आणि तो कागद चौकटीवर चिकटवायचा. चौकट भरली की त्याच कागदावर दुसरा कागद. चिकटवणे, वाळवणे गच्चीवर होत राहायचे. गच्चीवरच्या नाटकासाठी जाड पुठ्ठय़ासारखे टणक आठ-नऊ फ्लॅट्स आपोआप तयार व्हायचे. कचऱ्यातून कला.. नव्हे, रद्दीतून नेपथ्य! या पेपर चिकटवण्यामुळे गच्चीवरच्या या फ्लॅट्सवर वेगवेगळ्या गमती पाहायला मिळायच्या. एकदा गांधी व नेहरू समोरासमोर लढाईच्या पवित्र्यात उभे राहिलेले व वल्लभभाई त्यांना ‘नको- नको’ सांगत असलेले दिसले. एकदा तर आचार्य अत्रे आणि नर्गिस हातात हात घालून राज कपूरला खिजवत असल्याचेही या फ्लॅट्सवर चाळकऱ्यांनी पाहिले. मीडिया काहीही करू शकतो, हेच खरं!
चित्रकार बापू मग एका दुपारी सगळ्या फ्लॅट्सना रंगसफेदी द्यायचा. आणि त्यानंतर त्याला हवा तो रंग. कलावंतांचे लक्ष या फ्लॅट्सकडे असण्याची काही गरज नव्हती. पण मास्टर जयवंत रंगवलेले फ्लॅट्स बघून म्हणायचे- ‘व्वा! रंगसंगती फ्रेश आहे!’ चित्रकार म्हणायचे, ‘हो. आत्ताच तर रंग तयार केलेत!’ दरवर्षी नव्या रंगाचे नवे, फ्रेश फ्लॅट्स. नाटय़प्रयोग संपल्यावर चाळीतली पोरे त्याचा लपाछपीसाठी उपयोग करायची. काहींची प्रेमं या फ्लॅट्समुळेच जमली असं म्हणतात. नाटक मराठी माणसाच्या जीवनात मुरतं, ते असं!
नाटक ठरलं होतं- ‘करीन ती पूर्व’. मामा वरेरकरांचं ऐतिहासिक नाटक. राम गणेश गडकरी- औंधकर वळणाची पल्लेदार भाषा. काही पात्रांची उर्दू-हिंदीमिश्रित. यावेळी विनोदी नट कमलाकर शंकरची फारच पंचाईत होणार (कारण त्याला उर्दू किंवा हिंदी पदर अजिबातच नव्हता.) याबद्दल सर्वाचीच खात्री होती. तालमी जोरात सुरू होत्या. सगळ्यांचे पाठांतर चोख होते. वृद्धाची भूमिका करणाऱ्या रामने तर ‘बळवंत पुस्तक भंडार, किंमत २।। रुपये आणि वरेरकरांची अन्य नाटके’ हेसुद्धा तोंडपाठ करून टाकले होते. मा. जयवंत.. अर्थातच बाजीप्रभूच्या प्रमुख भूमिकेत. तो दर तालमीला एकाच वेळी दहा-दहा यवनांना कंठस्नान घातल्यासारखा फुरफुरायचा. तालीम संपल्यावर श्रमिक कामगारासारखा ‘हा.. हा..’ करीत खुर्चीवर अंग टाकायचा. त्याने घरून बरोबर आणलेले दोन टर्किशचे टॉवेल त्याच्या घर्मबिंदूंनी चिंब भिजायचे. लढाईच्या तालमी मात्र झाल्या नव्हत्या. पण त्याची हमी पहिल्या मजल्यावरच्या बाळने घेतली होती. तो शेजारच्या व्यायामशाळेत दररोज संध्याकाळी जायचा. लाठीकाठीत निष्णात असणारे काही युद्धपटू प्रयोगाच्या अगोदर तो आणणार होता. ‘एक वेळ बाजी मरणार नाही, पण लढाई झाल्याशिवाय राहणार नाही..’ अशी त्यानं छातीठोकपणे खात्री दिल्यावर कोण काय बोलणार?
नाटक ऐतिहासिक असल्यामुळे चित्रकार बापूचे कागदी फ्लॅट्स प्रयोगाला उपयोगाचे नव्हते. त्याने त्याच्यावर श्रेयनामावली लिहून आणि लढाईची दृश्ये रेखाटून ते फ्लॅट्स गच्चीच्या कठडय़ाला टेकून प्रयोगाच्या दिवशी उभे केले होते.. वातावरणनिर्मितीसाठी!
गिरगावातल्या कोटकर पडदेवाल्यांकडून रुळावर गुंडाळलेले रंगवलेले पडदे आणले होते. एक पावनखिंडीचा व दुसरा गडावरील महालाचा. बरेच दिवस.. नव्हे र्वष त्याच्या त्या पडद्यांना मागणीच नव्हती. त्याला ती जागाही साफ करून घ्यायचीच होती. ‘नेण्या-आणण्याचा खर्च व श्रमदान चाळकरी करतील..’ या बोलीवर त्याने ते पडदे विनाभाडय़ाने दिले होते. हे पडदे परत येणार नाहीत याबद्दल त्याची खात्री होती. आयतीच जागा रिकामी करून त्याला मिळणार होती.
तळमजल्यावरचा एक मुलगा लायब्ररी रोडवरील पोवार कपडेवाल्यांकडे कामालाच होता. त्याने ऐतिहासिक नाटकाच्या कपडय़ांचे आणि ढाल-तलवारीचे एक बोचके प्रयोगाच्या आदल्या दिवशीच पोवारांना अंधारात ठेवून गच्चीवर आणून टाकले होते.
नाटककाराला मानधन देण्यावर चाळकऱ्यांचा विश्वास नव्हता. एकदा नाटक छापले की ते जनतेचे झाले. परत त्याच्याबद्दल रुपये घेणे म्हणजे रंगभूमीवर अत्याचार करण्यासारखे आहे असे नाटकवाल्या चाळकर्मीचे स्पष्ट मत होते. शिवाय ‘करीन ती पूर्व’ नाटकाचे लेखक मामा वरेरकर दिवंगत असल्यामुळे तक्रारीला जागाच नव्हती. त्यांच्या स्मृतीला वंदन करूनच नाटकाचा प्रयोग सादर होणार होता. स्मृतीला वंदन हेच त्यांचे मानधन!
अखेर गच्चीवरच्या त्या प्रयोगाची रात्र उजाडली. परंपरागत प्रथेप्रमाणे रामूच्या हातात पडद्याची दोरी होती. नाटक ऐतिहासिक असल्यामुळे यावेळी त्याच्या तोंडात ड्रीलमास्तरांची स्टीलची शिट्टीही आली होती.
व्यायामशाळेतले गडी सर्वात अगोदर गच्चीवर हजर झाले. कपडय़ाच्या बोचक्यातून त्यांनी चांगले चांगले कपडे निवडले. मोत्याच्या माळा, पगडय़ा घालून ते सर्वाअगोदर तयार झाले. ढाली-तलवारींसकट. काहींच्या ढाली पुठ्ठय़ाच्या होत्या, तर तलवारींना बेगड लावलेली होती. बाजीप्रभूची भूमिका करणाऱ्या दिग्दर्शक मा. जयवंत यांना त्यांच्या मापाची सुरवारच कपडय़ात मिळेना. पण ते डगमगले नाहीत. लेंग्याला वर खेचून सुतळीने तो बांधून त्यांनी ‘थ्री-फोर्थ’ केला व ते भूमिकेत मिसळून गेले. (इथे दिग्दर्शक दिसतो!) मा. जयवंत यांनी आपली तलवार व ढाल घरूनच करून आणली होती. ‘जो कॅप्टन- त्याचीच बॅट हवी’ या सत्यावर त्यांचा अढळ विश्वास होता.
विनोदी प्रवेश आला. नाटकातली मंडळी कमलाकर शंकरची आता कशी फजिती होईल याची उत्सुकतेने वाटच बघत होती. कारण तो फक्त आदल्या दिवशी तालमीला हजर झाला होता. या नाटकात तो कासम सरदाराच्या वेशात होता. जोशात प्रवेश करीत त्यानं हाक मारली..
– खामखां, कहा गये हो?
दुसऱ्या विंगेतून दुसरा मुसलमान सरदार आला.
– खामखां आप चिल्ला रहे हो!
– अल्ला कहा गये?
– परवरदिगार- खाविंद हो गये!
– क्यों, खाविंद हो गये? मकरंद, पदारविंद क्यों न हो गये?
– क्यों की उनको मुकुंद गुलकंद मंगता था!
– तुम अल्ला को ताला लगाव.. जाव!
– नहीं- मैं पाक करता हूँ. पाक करने को जाता हूँ!
– तो मैं नापाक होता हूँ?
– तकलिया!
– बिस्मिल्ला!
दोघे दोन्ही दिशांनी निघून जातात. आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. ‘आहे’ किंवा ‘नाही’ अशा मराठी क्रियापदांचा कुणीच वापर न केल्यामुळे कमलाकरच्या उर्दू व हिंदी भाषेवरील प्रभुत्वाचे चाळकरी प्रेक्षकांना तुफान कौतुक करण्यावाचून गत्यंतर नव्हते.
आणि ज्याची सर्व आबालवृद्ध उत्कंठतेने वाट बघत होते तो समरप्रसंग आला. पडद्यावर तांबडय़ा जिलेटिनच्या कागदातून पडलेला लाल प्रकाश पडला. तबला-डग्ग्याचे पाश्र्वसंगीत सुरू झाले. ढाल-तलवारी घेऊन केव्हापासून तयार बसलेले मावळे आणि मुसलमान दोन्ही बाजूंनी रंगमंचावर धावत आले. दोन्ही बाजू ‘हरहर महादेव’च ओरडत होत्या. तालीम नसलेली लढाई जोरात सुरू झाली. प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला. लढाई तुंबळ.. पण कुणाची आणि कुणाबरोबर, हेच कळत नव्हते. मावळेच मावळ्यांशी लढत होते आणि यवन यवनांशी. कुणीच मरत नव्हते. आणि हे सगळं बाजीप्रभूंच्या डोळ्यादेखत!
दिग्दर्शक ‘बाजीप्रभू’ला ते दृश्य पाहवेना. लढणाऱ्या मंडळींना दोन्ही बाजूच्या विंगेत पिटाळताना त्याच्या नाकी नऊ येत होते. कारण कुणीच थांबत नव्हते. खरोखरच बाजी खिंडीत सापडले होते. बाजी थकून गेले हे पाहून विंगेत तयारीत असलेल्या रामूने आपल्या खिशातले अॅटमबॉम्ब बाहेर काढले. ते गच्चीच्या कठडय़ावर ठेवले. एकामागोमाग एक बॉम्ब स्टेजच्या मागे फुटायला लागले. पाच बॉम्ब फुटले होते. सहावा पेटणार- इतक्यात कुणा इतिहासतज्ज्ञाने धावत येऊन तो बॉम्ब हाताने रस्त्यावर उडवला. तोफांचे पाच आवाज ऐकून बाजीने खरोखरच सुटकेचा नि:श्वास टाकला. ‘शिवाजीमहाराज की जय’ म्हणत त्यानं स्टेजवर देह टाकला. लढणारे पळून गेले. रामूने शिट्टी वाजवली. स्टेजवर डोळे मिटून उताणा पडलेल्या बाजीने डोळे उघडले तो काय? रुळावर गुंडाळलेला पडदा रुळासकट धूळ उडवीत खाली येत होता. धूळ पडद्याची होती.. परंतु गडगडत खाली येणाऱ्या त्या जाडजूड रुळाचे काय? कपाळमोक्षच! आकाशातून बाजीवर बांबू कोसळत होता. पण बाजी दिग्दर्शक होते. ते मेल्या आईचं दूध प्यायलेले नव्हते. प्रसंगावधान राखून बाजी कुशीवर वळले. बांबूसकट पडदा स्टेजवर जोराने धाड्दिशी पडला. त्या आवाजाने कुशीवर वळलेल्या बाजीप्रभूने डोळे उघडले. आणि पाहतो तो काय? समोरच त्याला प्रेक्षक दिसले. पडद्याच्या आतल्या बाजूला वळण्याऐवजी तो बाहेरच्या बाजूला वळला होता. बाजीच्या मागे महालाचा पडदा होता. शिवाजीमहाराज विंगेत एन्ट्रीसाठी तत्परच होते. त्यांनी गडावरच्या महालात प्रवेश केला. पायाकडेच बाजीप्रभूू बाजी पडलेला. आपल्या अगोदर हा इथे कसा पोचला, महाराजांना कळेना. पण महाराज डगमगणारे कसे असतील? त्यांनी बाजीप्रभूच्या बॉडीवरून टुण्णकन् उडी घेतली. गुडघे टेकून त्याच्या जवळ प्रेक्षकांना तिरकस होऊन बसले. डोईवरचा जिरेटोप त्यांनी हातात घेतला आणि गदगदत्या आवाजात ते म्हणाले, ‘माझा बाजी गेला. मी आलो आणि बाजी गेला. हरहर! हरहर! महादेव!’ याचवेळी कसा कुणास ठाऊक, जमिनीवर मघाशी पडलेल्या अॅटमबॉम्बचा आवाज झाला. त्या धक्क्य़ाने महाराजांच्या हातातल्या टोपाच्या झिरमिळ्या उताणा पडलेल्या बाजीच्या नाकात घुसल्या. न राहवून त्याने जोराची शिंक दिली. रामूच्या तोंडातली शिट्टी वाजली. हातातली दोरी सुटली. दर्शनी पडदा पडला. तुफान टाळ्यांच्या कडकडाटात एका पर्वाचा अंत झाला.
अशा प्रकारे एका ऐतिहासिक नाटकाचा अनैतिहासिक प्रयोग अध्र्या शतकापूर्वी एका चाळीच्या गच्चीवर झाला होता, याची नोंद कुणी इतिहासकार घेतील काय?
त्यानंतर कोटकरकडून आणलेले पडदे गच्चीत एका भिंतीला ऊन-पाऊस खात अनाथ होऊन पडले होते. पण पुन्हा कधीही चाळीने ऐतिहासिक नाटक करायचा घाट घातला नाही.
तात्पर्य- मराठी माणसाच्या रक्तारक्तात नाटक भिनलं आहे हे तर खरंच, पण त्याअगोदर ते चाळी-चाळीतून मुरलं होतं, हेही विसरून चालणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा