रवींद्र माधव साठे
पं. दीनदयाळजींचे स्वप्न आणि रामभाऊ म्हाळगींच्या ध्यासाचे मूर्त स्वरूप म्हणजे ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी.’ या संस्थेला अलीकडेच चाळीस वष्रे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने..
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीस १९ ऑक्टोबरला ४० वर्षे पूर्ण झाली. एका विशिष्ट हेतूने स्थापन झालेल्या सार्वजनिक संस्थेस कार्याची चार दशके पूर्ण होणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. कोणतीही सामाजिक संस्था निर्माण करणे सोपे असते; परंतु ती संस्था चालविणे, टिकविणे, फुलविणे, संस्थेस सक्रिय राजकारणापासून दूर ठेवणे, संस्थेत राजकारण होऊ न देणे, संस्था कुणाची खाजगी मालमत्ता न बनणे ही सामान्यपणे आजच्या काळातील संस्थांपुढची आव्हाने असतात. या सर्व आव्हानांना स्वीकारून म्हाळगी प्रबोधिनीने १९८२ पासून आपला निरंतर विकास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याप्रसंगी म्हाळगी प्रबोधिनीस अभिनंदनाचे पत्र पाठवून आम्हा कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत केला.
म्हाळगी प्रबोधिनीची मूळ संकल्पना पं. दीनदयाळ उपाध्याय यांची. पं. दीनदयाळजींचे हे स्वप्न उराशी बाळगून ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा निर्धार रामभाऊ म्हाळगींनी केला. यातूनच ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ या संस्थेच्या निर्मितीची बीजे रोवली गेली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था म्हणजे पं. दीनदयाळजींचे स्वप्न आणि रामभाऊ म्हाळगींच्या ध्यासाचे मूर्त स्वरूप आहे. रामभाऊ म्हाळगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही काळ प्रचारक होते. १९५१-५२ पासून त्यांनी आधी जनसंघाचे व नंतर भारतीय जनता पार्टीचे काम करताना प्रभावी संघटक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. रामभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या स्मृत्यर्थ काही उपक्रम हाती घेण्याच्या विचारांतून रा. स्व. संघ व भाजपाशी संबंधित काही ज्येष्ठ कार्यकर्ते एकत्र आले. त्यातून ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ या संस्थेची १९ ऑक्टोबर १९८२ मध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली.
उत्तमराव पाटील, झमटवल वाधवानी, हशु आडवाणी, लक्ष्मणराव मानकर, अरिवद लेले, प्रा. राम कापसे, जगन्नाथ पाटील, हे प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त. १९८२ मध्ये चंचल स्मृती, वडाळा येथे छोटय़ाशा जागेत एक टेबल टाकून काम सुरू झाले. १९८२-८८ या काळात वर्षांकाठी निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, एक-दोन छोटेखानी प्रशिक्षण एवढंच सीमित काम चालायचे. १९८८-८९ मध्ये विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे प्रबोधिनीची पूर्ण जबाबदारी आली तेव्हापासून प्रबोधिनीला खऱ्या अर्थाने संस्था म्हणून आकार-उकार येऊ लागला. त्यांची कल्पकता, प्रशासकीय गुण व कार्यकर्त्यांना सांभळण्याची वृत्ती यामुळे प्रबोधिनी स्थिरावू लागली. सध्या ते प्रबोधिनीचे उपाध्यक्ष म्हणून भूमिका सांभाळत आहेत. उत्तमराव पाटील हे प्रबोधिनीचे पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रमोद महाजन, वसंतराव पटवर्धन, गोपीनाथ मुंडे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे आदी मान्यवर मंडळींनी प्रबोधिनीचे अध्यक्षपद भूषविले आहे. सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रबोधिनीचे विद्यमान अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत.
प्रबोधिनीच्या देदीप्यमान विकासात सिंहाचा वाटा राहिला तो प्रमोद महाजन यांचा. ते तब्बल १६ वर्षे प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून राहिले. प्रबोधिनीच्या नव्या संकल्पनांचे त्यांनी नेहमी स्वागत केले. सर्व उपक्रमांना पाठबळ दिले. त्यांच्याच नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) स्वयंसेवी संघटना विभागाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीस ‘विशेष सल्लागार संस्था’ म्हणून २००६ साली मान्यता दिली.प्रबोधिनीची सुरुवात झाली त्यावेळी कामाची काही ब्लू पिंट्र नव्हती. भाजपा व संघ संबंधित संस्थांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सहभागी कार्यकर्त्यांच्या मौलिक सूचना व कार्यक्रम योजण्यातून आलेला आत्मविश्वास यातून प्रबोधिनीची घडी बसत गेली. १९९० पासून प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन हा प्रबोधिनीच्या कामाचा मूलाधार बनला. प्रबोधिनीच्या कामात संशोधनाचा समावेश व्हावा हा आग्रह प्रबोधिनीचे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब आपटे यांचा होता. याच कार्यत्रयीच्या माध्यमातून स्वयंसेवी व राजकीय कार्यकर्त्यांमधील नेतृत्वगुणांना पोषक अशा प्रशिक्षणाची आवश्यक ती सर्व रचना उत्पन्न करण्याच्या दिशेने प्रबोधिनीची वाटचाल चालू झाली.
लोकप्रतिनिधी किंवा राजकीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण ही संकल्पनाच आजच्या काळात अनेकांना वैशिष्टय़पूर्ण वाटते. ग्रामपंचायत सदस्य, आमदार-खासदारांच्या स्वीय साहाय्यकांपासून केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्र्यांपर्यंत सर्वजण प्रबोधिनीच्या उपक्रमांत सहभागी होतात, एकत्रित निवास करतात, अनेक विषयांवर सामूहिक चर्चा करतात. जनसामान्यांचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करता यावेत म्हणून लोकप्रतिनिधींना उपलब्ध असणाऱ्या सर्व साधनांचा त्याला उपयोग करता आला पाहिजे, ही म्हाळगींची मनीषा होती. लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षणात यावर विशेष भर दिला जातो. राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणात वैचारिक विषयांबरोबर प्रेरणा प्रशिक्षण व व्यावसायिक कौशल्यांचीही तोंडओळख करून दिली जाते. यात व्यक्तिमत्त्व विकास, भाषण कसे करावे, मतदारसंघ बांधणी, कार्यालय व्यवस्थापन, जनसंपर्क, निवडणूक व्यवस्थापनापासून ते कार्यकर्त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याची चर्चाही घडवून आणली जाते.
संघटनशास्त्र, नेतृत्वशास्त्र, संस्था बांधणी या संकल्पना सामान्यत: व्यवस्थापन शास्त्राचे अंग म्हणून ओळखल्या जातात. या संकल्पनांचे वर्तमान व्यावहारिक संदर्भ तपासून या शास्त्राचा उपयोग स्वयंसेवी संस्थांच्या बळकटीसाठी व तेथील कार्यकर्त्यांच्या गुणवत्ता विकासासाठी कसा करून घेता येईल या दृष्टीने कार्यक्रमांची योजना होत असते. संस्था बांधणी सहयोग योजना हा असाच एक उपक्रम.प्रबोधिनीच्यावतीने सुरू झालेला शैक्षणिक संस्थांमधील घटकांसाठी क्षमता विकास कार्यक्रम, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यसंस्कृतीविषयक दिशादर्शन, सार्वजनिक कार्यक्रमांचे संयोजन, वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिर, प्रकल्प प्रस्ताव लिखाण तंत्र या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. व्यवस्थापन शास्त्राच्या चौकटीत असणाऱ्या वरील संकल्पनांना प्रबोधिनी अधिक व्यापक स्वरूप देण्यास हातभार लावत आहे हेच या कार्यक्रमांच्या आयोजनातून यशस्वीपणे सिद्ध होते. आजपर्यंत प्रबोधिनीने ९५० पेक्षा जास्त प्रशिक्षणाचे विविध कार्यक्रम योजले आहेत.
समाजातील अनेक प्रचलित आणि प्रमुख विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने इ. प्रकारचे वैचारिक उपक्रम घडवून आणणे हे प्रबोधिनीच्या कामाचे आणखी एक अंग! हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेपासून, एक देश एक निवडणूक ते बांगलादेशी घुसखोरी समस्या, शहरी नक्षलवाद अशा सुमारे ८० विषयांवरील चर्चासत्रे प्रबोधिनीने योजली आहेत. राष्ट्रवादी विचारांशी प्रबोधिनी बांधील असली तरी अशा वैचारिक उपक्रमांत भिन्न विचारसरणी व मतप्रवाह असलेली अनेक मंडळी प्रबोधिनीच्या व्यासपीठावर येतात हा प्रबोधिनीचा एक विशेष. उषा मेहता, प्रा. राम जोशी, विजय तेंडुलकर, कुमार केतकर ही त्याची वानगीदाखल नावे.कार्यकर्त्यांची अध्ययनशीलता वाढावी व एखाद्या विशिष्ट विषयाबाबत सर्वंकष माहिती आणि दृष्टिकोनांचे संकलन व्हावे यासाठी तज्ज्ञ मंडळींचा समावेश असलेली अभ्यास पथके पाठवून प्रबोधिनीतर्फे समक्ष पाहणी प्रकल्प हाती घेतले जातात. महिला राखीव धोरणाची फलश्रुती, पं. बंगालमधील साम्यवादी सत्तेची पाळेमुळे यांसारख्या ९० विषयांवर प्रबोधिनीने प्रकल्प पूर्ण केले आहेत.
निवडक विषयांची आणि संदर्भमूल्य असलेली कात्रणे संकलित करून अभ्यासू कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरणारी संदर्भ सेवा, सहकारी बँकांतील क्षमता व अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीचा सहकार कक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, पत्रकारांसाठीची वास्तव-दर्शन पाठय़वृत्ती योजना, प्रकाशन विभाग, पाण्यासंदर्भात प्रबोधन करणारे विलासराव साळुंखे अध्यासन, सामाजिक-आर्थिक विषयांवर सर्वेक्षण करणारे विकास-नियोजन केंद्र, आंतरराष्ट्रीय कक्ष हे प्रबोधिनीचे अन्य उपक्रम. नीती आयोगाच्या सहकार्याने सुरू झालेले अटल इन्क्युबेशन सेंटर, दीनदयाळ उपाध्याय संग्रहालय हे अलीकडच्या काळातील उपक्रम. मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयांत डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोधिनीस संशोधन केंद्र म्हणून मिळालेली मान्यता, केंद्र व राज्य सरकारच्या काही संस्थांबरोबर प्रबोधिनीचे झालेले सामंजस्य करार यामुळे प्रबोधिनीचा व्याप आणखी वाढला.
आधुनिक व्यवस्थापनशास्त्राच्या प्रचलित सिद्धांताप्रमाणे, आजच्या काळात प्रशिक्षण म्हणजे केवळ प्रशिक्षण कक्षात बसवून विषय शिकवणे नव्हे, तर कार्यकर्त्यांचा सहभाग, आंतरक्रिया, अनुभवांची देवाण-घेवाण यांच्या माध्यमातून त्यांची मानसिक व बौद्धिक क्षमता उंचावण्यास मदत करणे. त्यामुळे राजकारणात मिळणाऱ्या व येणाऱ्या संधीचे सार्थक होण्यासाठी कार्यकर्त्यांची गुणवत्ता व क्षमतावाढीसाठी त्यांचे प्रशिक्षण घडवून आणणे, हा म्हाळगी प्रबोधिनीचा सुरुवातीपासूनचा एक अजेंडा राहिला आहे.याचाच एक भाग म्हणून प्रबोधिनीच्यावतीने २०१७ मध्ये नेतृत्व, राजकारण आणि सुशासन या त्रिसूत्रीवर आधारित नऊ महिन्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थानच्या माध्यमातून सुरू झाला आहे. हा आगळा-वेगळा अभ्यासक्रम भारतातील विचारशील तरुण आणि भारतातील लोकशाही मूल्ये आणि सुशासन यांच्यातील दुवा ठरला आहे. राजकारण व सार्वजनिक क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणारे युवक यात सहभागी होतात. यंदा या पाठय़क्रमाचे ६ वे वर्ष असून १३ राज्यातील ३१ प्रतिनिधी त्यात सहभागी झाले आहेत.
अभिनवता, नावीन्यपूर्णता, कार्यक्रमातील वैविध्यता हे प्रबोधिनीचे आणखी एक वैशिष्टय़. महाविद्यालयीन उपक्रमशीलता किंवा पत्रकारांसाठी महाराष्ट्र अध्ययन-२००८ सारखी कार्यशाळा, विदेशातल्या तरुण व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी योजलेला विश्वबंधुता निवासी कार्यक्रम, हिंदूुत्व परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे असे काही उपक्रम. प्रबोधिनीच्या उपक्रमांत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याचा खरंच व्यावहारिक लाभ होतो का? त्यांची गुणवत्ता वाढते का? त्याचा पाठपुरावा कसा केला जातो? असे प्रश्न अनेकदा प्रबोधिनीस भेट देणारे विचारतात. वस्तुत: त्याचे उत्तर देणे सोपे नाही. कारण हा व्यापक सर्वेक्षणाचा विषय आहे. परंतु प्रशिक्षण वर्गामधून सहभागी झालेले कार्यकर्ता ‘असा उपक्रम वर्षांतून किमान एकदा तरी व्हायलाच हवा’, असा जेव्हा अभिप्राय देतात तेव्हा समाधान वाटते. एक काळ असा होता की, प्रबोधिनीने एखादा कार्यक्रम योजला तर तो पुरेशा संख्येनिशी यशस्वी होईल की नाही अशी शंका आम्हा मंडळींच्या मनात असायची. परंतु आज प्रबोधिनीच्या कोणत्याही प्रशिक्षण उपक्रमात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त व सातत्याने वाढत जाणारा प्रतिसाद पाहिला तर प्रशिक्षणाचे समाजातील महत्त्व व उपयुक्तता लक्षात येते. प्रबोधिनीचे कार्यक्रम सहभागात्मक असतात, कार्यक्रमात अनुशासन असते, व्यावसायिकता असते, पण त्याचबरोबर मानवीय स्पर्शही असतो- जो सहभागींना नेहमीच भावतो.
बघता-बघता प्रबोधिनीच्या कार्याची ४० वर्षे पूर्ण झाली. ४० वर्षांत प्रबोधिनीने काय मिळवले, तर या काळात प्रबोधिनीस नवनवे आयाम प्राप्त झाले. प्रबोधिनीत एक संस्थाजीवन विकसित झाले. आपल्या वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांमुळे प्रबोधिनी राष्ट्रवादी विचारांचे संक्रमण घडवून आणणारी, युवा पिढीत नेतृत्वगुण विकसित करणारी आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रबोधन घडवून आणणारी राष्ट्रीय संस्था म्हणून आता सुपरिचित झाली आहे. भारतीय उपखंडात दक्षिण आशियात राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घडवून आणणारी ती एकमेव संस्था आहे. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रबोधिनीच्या कार्यास चिरस्थायी स्वरूप लाभावे यासाठी प्रबोधिनीने केशवसृष्टी, भाईंदर येथे वर्ष २००० मध्ये १५ एकर जमिनीवर स्वत:चे असे अद्ययावत प्रशिक्षण संकुल उभे केले. १९८२ साली मुंबईतील छोटय़ाशा जागेतून सुरू झालेला प्रवास, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण संकुलापर्यंत पोहोचला. ६ जानेवारी २००३ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व लाल कृष्ण आडवाणी यांच्या उपस्थितीत या संकुलाचे लोकार्पण झाले. हा प्रबोधिनीच्या इतिहासातील सुवर्णक्षणच.
प्रबोधिनीच्या चार दशकांच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले, संकटे आली, तरीही प्रबोधिनीच्या विकासाचे चक्र कधी थांबले नाही. याचे प्रमुख कारण संस्थेत विकसित झालेली कार्यसंस्कृती, विश्वस्तांकडून मिळणारे प्रोत्साहन व प्रारंभापासून प्रबोधिनीच्या अध्यक्षांची राहिलेली पालकत्वाची भूमिका आणि दैनंदिन कामात कोणताही हस्तक्षेप न करता आम्हा मंडळीस दिलेले स्वातंत्र्य, यामुळे काम करण्यास नेहमी उभारी मिळत गेली. प्रबोधिनीस पुढील काळात आणखी नव-नवी क्षितिजे गाठायची आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे संयत व प्रागतिक विचारांचे नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधिनी आणखी यशस्वीपणे पुढे वाटचाल करत राहील यात तिळमात्र शंका नाही.
(लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.)
ravisathe64 @gmail.com