जॉर्ज फर्नाडिस यांच्यावरील लेखांचे पुस्तक तयार करताना व्यक्तिस्तोम, गटबाजी, कोंडाळे, पंथ, फाटाफूट असे सारे संदर्भ डोळ्यांसमोर उभे राहिले. मात्र, हा माणूस आपल्या अद्वितीय कार्यकर्तृत्वाने या संदर्भासकट एका वेगळ्याच उंच ठिकाणी उभा असलेला आढळतो. जॉर्ज यांनी वेगळी कामगार संघटना काढली, स्वतंत्र राजकीय पक्ष काढला. मात्र कोंडाळे, पंथ आणि व्यक्तिस्तोम यांच्या कचाटय़ात ते कधी अडकले नाहीत. इतरांचे नेतृत्व बाजूस सारून त्यांनी स्वतचे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न कधी केला नाही. संसदेत त्यांनी दोन दिवसांत दोन विरुद्ध भूमिका मांडल्याचे जे कुप्रसिद्ध उदाहरण दिले जाते, ते पक्षनेतृत्वाच्या आदेशामुळे! त्यामुळे लोहिया असोत की लिमये, मोरारजी असोत की चरणसिंह; नेते जसे सांगतील तसे आपले कार्यकौशल्य ते वापरीत. स्वतच्या लहरीप्रमाणे ते वागत नव्हते, हे कोणाच्या लक्षात येत नाही. ज्या विचारांचा एकदा पत्कर केला, त्यासाठी सर्वस्व पणाला लावायचे, हा त्यांचा विशेष. समता पार्टीच्या जन्माची कथा येथे वाचायला मिळेल. त्यातून जॉर्ज पक्षफोडे नाहीत हे कळून येईल. ते आत्मकेंद्री, स्वार्थी वागले नाहीत, हेही समजेल.
जॉर्ज यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक, मोहक आहेच; पण त्यांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे, कार्यक्रमांमुळे, रोखठोक भूमिका आणि थेट कार्यक्रम या त्यांच्या बाण्याने त्यांना भरपूर चाहते व अनुयायी मिळत गेले. ते स्वभावाने लाघवी, मधाळ, अघळपघळ, गप्पिष्ट किंवा गोडबोले नसूनही त्यांच्या बेधडक, निर्भयी अन् निस्वार्थी वृत्तीवर लाखो लोक लट्ट व्हायचे. या प्रेमाचा व आदराचा नमुना म्हणजे या माणसाला कोणीही ‘जॉर्ज’ असे एकेरी उल्लेखू लागतो. वैयक्तिक ओळख नसणारी माणसेही आपल्याला हा मोठा नेता किती आवडतो, हे व्यक्त करताना ‘जॉर्ज बोलला, जॉर्जने अमुक केले’ असेच म्हणू लागतो. या लेखसंग्रहातही त्याचे नमुने आढळतील. एकाच लेखात लेखक ‘जॉर्ज’ असे एकेरी आणि ‘जॉर्ज फर्नाडिस यांनी’ असे आदरार्थी बहुवचन वापरतात. आम्ही ते तसेच ठेवले आहे. कारण त्या, त्या लेखकांच्या या मोठय़ा माणसाबद्दलच्या भावना आहेत. एखाद्या नेत्याविषयीच्या औपचारिक व अनौपचारिक भावना एकाच वेळी व्यक्त होणे, ही भारतीय राजकारणातील फार दुर्लभ गोष्ट आहे. पवारांविषयी शरद आणि शरदराव असे संबोधन कोणी वापरत नाही. समवयस्कांनी एकेरी हाक मारणे वेगळे आणि वयाने धाकटय़ा असणाऱ्यांनी एकेरी संबोधन वापरणे वेगळे. हा भेद जॉर्ज यांच्या बाबतीत गळून पडला. एवढी आपुलकी, जिव्हाळा फार थोडय़ा नेत्यांबद्दल भारतीय माणसाने दाखवला.
कामगार चळवळ अर्थवादी म्हणजे निव्वळ अर्थकेंद्री झाल्याचा निष्कर्ष अनुभवांती काढून जॉर्ज त्यांच्या मूळच्या कार्यापासून दूर गेले. तोवर कामगार प्रश्नांसाठी संसदीय राजकारण असा त्यांचा हेतू होता. त्यांच्या या राजकीय परिवर्तनाचा वेध या संग्रहात नाही. ते मोठे स्थित्यंतर टिपणारी व्यक्ती आम्हाला दिसली नाही असे नाही; परंतु तो विषय अख्ख्या एका पुस्तकाचाच वाटल्याने आणि छोटय़ाशा लेखाने उगाच गरसमज होतील म्हणून आम्ही जॉर्ज आणि त्यांचे कामगार चळवळीबद्दलचे विश्लेषण सविस्तर घेणे टाळले. या संग्रहात महिला एकही नाही. ओल्गा टेलीस या पत्रकार महिलेने जॉर्ज यांच्याविषयी लिहावे, असा निरोप आम्ही त्यांच्यापर्यंत धाडला होता. त्या मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी जॉर्ज यांची कामगार चळवळ जवळून बघितली आहे. परंतु त्यांना बहुधा वेळ मिळाला नाही. त्यामुळे हा लेखसंग्रह पुरुषी झालेला आहे याचा खेद आम्हाला वाटतो. शरद राव किंवा जॉर्ज यांचे काही निकटचे सहकारी त्यांच्यापासून इतके दुरावले आहेत, की त्यांच्याकडून जॉर्जविषयीचे अनुभवकथन आम्हाला हवे तसे झाले नसते, अशी शंका आम्हाला वाटली. म्हणून एकेकाळचे जॉर्ज यांचे डावे-उजवे हात आम्ही लिहिते केले नाहीत.
जॉर्ज यांचे खासगी व कौटुंबिक आयुष्यही आम्ही चिवडलेले नाही. जया जेटली, लला फर्नाडिस यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगून आम्ही त्या दोघींच्या अनुषंगाने स्वतंत्र लेख घेणे टाळले. धर्माधिकारी यांच्या लेखात जेटली यांच्याविषयी जो उल्लेख आहे, तो त्यांचा स्व-अनुभव आहे. त्यांचे मत इतरांना पटेलच असे नाही. जॉर्ज यांचे अवघे चरित्र सादर करण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. हा जॉर्ज यांचा गौरवग्रंथही नाही. भाई वैद्य व पन्नालालजी यांच्यासारख्या जॉर्ज यांच्या जुन्या साथींनी जॉर्जवरचे प्रेम जसेच्या तसे व्यक्त केले आहे.
अपेक्षाभंग, विचारत्याग, असंगाशी संग, मूल्यशून्य तडजोड यांचे पडसाद काही लेखांतून उमटतात. पण ना कोणी जॉर्ज यांना जाब विचारला, ना जॉर्ज यांनी या समाजवाद्यांच्या प्रश्नांना स्वतहून उत्तरे दिली! सत्तेच्या राजकारणात माणसे कठोर, निर्दयी, भावनाशून्य, व्यवहारवादी, कातडीबचावू होत असतात. जॉर्ज अशा भावनाशून्यतेत गुंतले नाहीत. पण मागे वळून पाहत बसलेत असेही वागलेले दिसत नाहीत. भारतीय राजकारणात प्रखर काँग्रेसविरोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जॉर्ज यांच्यामध्येच दिसतो. या काँग्रेस तिरस्कारापायी जॉर्ज आपल्या मित्रांना, साथींना सोडून गेले ते गेलेच. ना त्यांनी आपल्या बदलत्या भूमिकांचा बचाव केला, ना त्या बदलांविषयी हळहळ व्यक्त केली. पुढे पुढे जात राहणे आणि हाती घेतलेले काम निष्ठेने, सचोटीने, पारदर्शकतेने आणि निस्वार्थ हेतूने पूर्ण करणे, एवढेच गेल्या २०-२५ वर्षांतील त्यांचे राजकारण दिसते. विश्वनाथ प्रताप सिंह त्यांना मागे टाकून पुढे गेले. चंद्रशेखर एकटय़ाच्या जिवावर पंतप्रधान झाले. या दोघांपेक्षा जॉर्जमध्ये त्याग कमी होता की राजकीय पराक्रम कमी होता? पण असे दिसते की, पराक्रमी जॉर्जविषयी त्यांच्याच काही सहकाऱ्यांना असूया वाटू लागली आणि हा पंतप्रधानपदाचा खराखुरा दावेदार, सामान्य माणसाचा सच्चा कैवारी जाणीवपूर्वक बाजूला टाकला गेला.
वर्गीय राजकारणात दोनच पक्ष असतात. एकाचा शोषिताचा, तर दुसऱ्याचा शोषकाचा. संसदीय राजकारणात आघाडय़ा उभ्या राहू लागल्याबरोबर तडजोडी, समझोते, माघार अशा गोष्टी कराव्या लागतात. तिथे फक्त दोनच बाजू नसतात. जॉर्ज अशा राजकारणात रुळले होते का? धंदेवाईक नेत्यांसोबत राहूनही त्यांना सत्तेचे डावपेच कळत होते का? अमाप पसा, खोलवरचे हितसंबंध, विचारशून्य व मूल्यरहित नेते आणि सामान्य माणसाची फसगत यांत अडकलेल्या दिल्लीच्या राजकारणातून जॉर्जना कधीच सुटका नको होती का? सारेच अपरिहार्य झाले होते का?
प्रश्न खूप आहेत व ते खुद्द जॉर्जही जाणून असणार. इतकी वष्रे संघर्षांच्या व सत्तेच्या राजकारणात घालवलेल्या अव्वल दर्जाच्या नेत्याला ते पडलेच असणार. जॉर्जची खरी अडचण झाली ती जात्याधारित राजकारणाचा आरंभ मंडल आयोगापासून झाला तेव्हा. खरे तर मागासवर्गीयांचे राजकारण समाजवाद्यांनी सुरू केले. ‘सारी बातों में एकही बात, पिछडा पावे सौ में साठ’ अशी घोषणा डॉ. लोहियांच्या नेतृत्वाखाली समाजवादी आंदोलनाने द्यायला सुरुवात करताच काँग्रेस, कम्युनिस्ट आणि जनसंघ यांचे राजकीय आधारच खिळखिळे झाले. या तिन्ही पक्षांमधील उच्चवर्णीय नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. लोहिया अखेरी-अखेरीस एकत्र आले. आंबेडकरांच्या निधनामुळे ही आघाडी खंडित झाली. तरीही समाजवाद्यांच्या व्यतिरिक्त मागासवर्गीयांचे राजकारण देशाच्या पातळीवर न्यायला अन्य पक्षांना यश आले नाही. जातीचा विचार समाजवाद्यांच्या आग्रहामुळेच मंडल आयोगाच्या रूपाने राजकीय मंचावर आला. रामसुंदर दास, कर्पुरी ठाकूर, रामविलास पासवान, शरद यादव, मुलायमसिंह यादव आदी त्या रंगमंचावरील ठळक नावे. त्यांना जात आणि वर्ग यांची सांगड आरंभी घालता आली. मात्र, पुढे जात हा एकमेव घटक सत्तेच्या राजकारणात विराजमान होताच समाजवादी आंदोलनाच्या मर्यादाही उघड झाल्या. धनदांडग्या, सरंजामी वृत्तीच्या आणि भांडवली विकासास प्रतिसाद देणाऱ्या ओबीसींना समाजवादाची ‘व्यर्थता’ जाणवू लागली. प्रादेशिक पक्षांचे नेतृत्वही या जातींच्या हाती पडू लागले. आणि पाहता पाहता समाजवाद ही आंतरराष्ट्रीय बंधुभावाची, ऐक्याची, समतेची आणि सामाजिक न्यायाची विचारसरणी लुळी पडत गेली. त्याबरोबर जॉर्ज यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय, समताधिष्ठित आणि शोषितांचे नेतृत्वही आटत चालले. जॉर्जना ना एखादा प्रदेश होता, ना एक भाषा, ना बलाढय़ जात! नव्या राजकारणाचा पायाच त्यांना नसल्यामुळे त्यांचे नेतृत्व कोणाच्याही उपयोगास येईना. ते वेगाने निस्तेज, निकामी, निष्प्राण होत गेले. ते ज्यांच्यासमवेत सत्तेत होते, त्यांचा हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांचे ते विरोधकच होते. त्यामुळे तिथे ते पाहुणे कलाकार म्हणूनच वावरत. थोडक्यात, एका भव्य वैश्विक राजकारणाची अखेरची घरघर आपल्याला जॉर्ज यांच्या ‘गरलागू’ अवस्थेत प्रतीत होते. जात, धर्म, प्रदेश, भाषा, यांचा खराखुरा त्याग करणारा नेता असा ‘निसंदर्भ’ व्हावा, ही गेल्या वीसेक वर्षांतील भारताच्या राजकारणाची शोकांतिका आहे.
एकवचनी, एकबाणी
‘जॉर्ज- नेता, साथी, मित्र’ हा ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांच्याविषयीचा लेखसंग्रह रंगा राचुरे व जयदेव डोळे यांनी संपादित केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन हर्मिस प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे लवकरच होत आहे. या पुस्तकाला संपादकद्वयांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेतील हा काही संपादित अंश..
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 07-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming book george neta sathi mitra