ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कन्नड साहित्यिक, नाटककार आणि नाटय़-चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कार्नाड यांच्या ‘आडाडता आयुष्य’ या मूळ कन्नड आत्मकथनाचा ‘खेळता खेळता आयुष्य’ हा मराठी अनुवाद येत्या २५ मे रोजी राजहंस प्रकाशनातर्फे पुण्यात प्रकाशित होत आहे. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या या आत्मकथेतील एका प्रकरणाचा हा संपादित अंश..
१९ ६९ च्या सुमारास एक दिवस जी. बी. जोशींनी ‘मनोहर ग्रंथ’मालेकडे आलेलं एका नव्या कादंबरीचं हस्तलिखित मला वाचायला दिलं. श्रीकृष्ण आलनहळ्ळी नावाच्या एका तरुणानं लिहिलेलं हस्तलिखित. कादंबरीचं नाव-‘क्रौर्य’! मंडय़ा जिल्ह्यातल्या एका खेडय़ात घडणारं चित्रण त्यात असलं तरी कादंबरीमध्ये एक वैशिष्टय़ होतं. त्याकाळी खेडं म्हटलं की निसर्गाच्या कुशीत जगणाऱ्या रम्य किंवा असहाय्य जीवनातले ताणतणाव, तिथे जगणाऱ्यांची गरिबी, सामाजिक असमानता अथवा आर्थिक मागासलेपणामुळे त्रास भोगावा लागत असला तरी ती मुळात सरळ माणसं असतात, भाबडी असतात- असंच चित्रण सगळीकडे दिसून येत होतं. पण ‘काडु’मध्ये दोन गावांमधल्या नातेसंबंधांमध्ये आढळणारी मानवी क्रूरता आणि कठोरपणा व्यक्त होत होता. त्यातही स्त्रीविषयीची क्रूरता. मुलांविषयीची क्रूरता. प्राण्यांविषयीची क्रूरता. ती कादंबरी वाचून मी थक्क झालो.
कोप्पल नावाच्या खेडय़ात राहत असलेला कंेचा नावाचा मुलगा होसुर गावच्या शिवगंगाच्या घरात काम करत असतो. कंेचावर व्यभिचाराचा आरोप येतो. पंचायत बोलावली जाते. शिवगंगा आपल्या सेवकासाठी तिथे हजर होतो. एका गावच्या ‘पंचायती’ला दुसऱ्या गावाच्या प्रमुखानं निमंत्रण नसताना यायचं नसतं. अशावेळी शिवगंगानं हा शिष्टाचार मोडला, हे निमित्त होऊन त्याचा कोप्पलच्या चंद्रेगौडाशी वाद सुरू होतो. अखेर दोन्ही खेडय़ांमधला द्वेष पराकोटीला पोहोचतो. त्याचं पर्यवसान रक्तपातात होतं. शहरातून पोलीस येतात आणि गावांवर नियंत्रण मिळवतात.
हे कथानक रंगवताना आलनहळ्ळीनं आपला खेडय़ातला सगळा निकटचा अनुभव त्यात ओतला होता. खेडय़ातल्या जीवनात उसळणारी हिंसा, परंपरेवर असणारी अंधश्रद्धा, त्यापुढे बायका-मुलांचं असलेलं केविलवाणं जिणं- हे सगळं त्यात सूचकपणे चित्रित झालं होतं. बेंगळुरूला ‘दोरे इडिपस’च्या तालमी चालल्या असताना आलनहळ्ळी मला भेटायला आला होता. मी त्या कादंबरीवर चित्रपट करायचा विचार बोलून दाखवताच त्याला आनंद झाला. मी त्याला कादंबरीला ‘क्रौर्य’ हे फार भडक नाव नको, असंही सुचवलं. त्याऐवजी जास्त सूचक असं ‘काडु’ म्हणजे ‘रान’ हे नाव ठेवू या, असं सुचवलं. ते त्यानं मान्य केलं.
‘संस्कार’, ‘वंशवृक्ष’ या दोन्ही चित्रपटांनी डोळे दिपवून टाकतील इतक्या प्रमाणात आर्थिक यश मिळवलं नसलं तरी त्यात घातलेला पैसा परत मिळवून दिला होता. त्याहीपेक्षा त्यावेळेपर्यंत कन्नडमध्ये पुट्टण्णा कणगाल यांना केवळ ‘गेज्जे पूजे’ या एकमात्र चित्रपटाच्या पटकथेसाठी राष्ट्रीय मान्यता मिळाली होती. ती राष्ट्रीय मान्यता या चित्रपटांना मोठय़ा प्रमाणात मिळाली होती. त्यामुळे या चित्रपटांमध्ये समाविष्ट असणाऱ्यांना कन्नड सांस्कृतिक दुनियेत मानाचं स्थान मिळालं होतं.
हे दोन्ही चित्रपट आर्थिकदृष्टय़ा यशस्वी व्हायला केवळ त्याची कलात्मक बाजूच कारणीभूत नव्हती; तर आर्थिक गळतीच्या सगळ्या बाजूंवर कडेकोट नियंत्रण ठेवल्यामुळे बजेटवर काटेकोरपणे नजर ठेवून चित्रीकरण संपवण्यात आलं होतं, हे महत्त्वाचं होतं. या नव्या प्रवाहातल्या चित्रपटांमध्ये ‘घातलेल्या पैशाला धोका नाही’ असा विश्वास गांधीनगरमधले लोकही बोलून दाखवू लागले. सिनेमानिर्मितीत उडी घेतली तरी आम्ही रंगभूमीवरची शिस्त मोडली नाही.
त्यामुळे याआधी एक चित्रपट केलेले जी. एन. लक्ष्मीपती आणि के. एन. नारायण (एल. एन. कंबाइन्स) माझ्याकडे आले आणि मी त्यांच्यासाठी एका चित्रपटाचं दिग्दर्शन करावं अशी त्यांनी मागणी केली. मी ‘काडु’ करायचा असेल तर तयार आहे म्हटलं. त्या दोघांनाही ही कथा आवडली.
‘वंशवृक्ष’च्या यशानंतर मी आणि कारंतांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल किंवा शंकर-जयकिशन यांच्याप्रमाणे नेहमीच जोडीनं दिग्दर्शक राहायचं नाही असा निर्णय घेतला होता. तरच दोघांची स्वतंत्र वाढ होऊ शकेल अशी आमची भावना होती.
त्याप्रमाणे मी एकटय़ानं ‘काडु’चं निर्देशन करायचं ठरवलं. कारंत कला-दिग्दर्शक झाले, संगीत दिग्दर्शक झाले. तरीही आलनहळ्ळीच्या चित्रीकरणाच्या वेळी असो वा कनकपूरमध्ये असो- मी आणि कारंतच नव्हे, तर छायाचित्रकार गोविंद निहलानी, गोपी, नागाभरण, आलनहळ्ळीला येणारे सगळे पाहुणे शेजारी शेजारी पथाऱ्या पसरून सोबतच झोपत असल्यामुळे रात्री घोटभर रम घेऊन चर्चा सुरू झाली की त्यात सगळ्यांचाच सहभाग असायचा.
मला श्रीकृष्णानं सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या कादंबरीतल्या दोन गावांपैकी कोप्पल हे वक्कलिगांचं गाव आहे, तर होसुर हे लिंगायतांचं गाव आहे. त्यामुळे या दोन्ही गावांमधल्या झगडय़ाला जातीयवादाची पाश्र्वभूमी होती. लेखक म्हणून श्रीकृष्णाची मोठी त्रुटी म्हणजे त्याची सगळी पात्रं काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवलेली होती. शिवाय कथानकाच्या बाबतीतही लेखकाचा पक्षपातीपणा स्पष्ट दिसत होता. वक्कलिग चंद्रेगौडानं लिंगायत बस्सक्काला ठेवली आहे. वक्कलिग गौडतीवर बलात्कार करणारा शिवगंगा लिंगायत आहे. चाऱ्याला आग लावून भांडण उकरून काढणारे होसुरचे लिंगायत आहेत. तेच ‘ओकळी’च्या सणाच्या वेळी भांडणाला सुरुवात करतात. एकूण काय, कादंबरीत दाखवण्यात आलेला जातीचा तपशील जसाच्या तसा चित्रपटात आणला असता तर गडबड होणार यात शंका नव्हती. कारण स्वत: श्रीकृष्ण वक्कलिग होता.
त्यामुळे मी म्हटलं, ‘‘आपल्याला हा जातींचा गोंधळच नको. दोन्ही वक्कलिगांचीच खेडी आहेत असं दाखवू या.’’ पण त्यावेळी श्रीकृष्णाला माझं म्हणणं समजलंच नाही. त्यानं ‘असं का?’ म्हणून वाद घातला. पण जर एखाद्या गटानं आपण चुकीचाच अर्थ लावायचा असं ठरवलं तर काहीही करून चुकीचा अर्थ लागू शकतो याचा मला अनुभव होता.
त्यालाही तो लवकरच आला.
पुट्टण्णा कणगाल रशियाला जायला निघाले होते. त्यासंदर्भात ‘स्टार’ कल्पनानं त्यांचा एक सत्कार आयोजित केला होता. तो श्रीकृष्ण आलनहळ्ळी याच्या हस्ते होता. त्याकाळी बेंगळुरूच्या चित्रपटक्षेत्रात एकीकडे राजकुमारचा कॅम्प आणि दुसरीकडे कल्पना-पुट्टण्णा कणगालचा कॅम्प असे दोन गट प्रस्थापित झाले होते. या सभेत कल्पनाच्या प्रतिभेचं कौतुक करायच्या भरात श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘रजतपटावर नायकाच्या चपला दिसल्या तरी टाळ्या वाजवणाऱ्या आमच्या प्रेक्षकांनी कल्पनासारख्या प्रतिभावंत कलाकाराच्या कलागुणांना ओळखलेलं नाही.’’
राजकुमार यांच्या चित्रपटात हिरो पहिल्यांदा प्रवेश करतो तेव्हा आधी त्याची पादत्राणं क्लोजअपमध्ये दाखवली जायची. यावर प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्टय़ा. त्यानंतर कॅमेरा निवांतपणे त्यांच्या पायापासून चेहऱ्यापर्यंत जायचा आणि त्यांच्या विजयी मंद हास्यासह त्यांचं प्रेक्षकांना दर्शन घडायचं. ही एक अत्यंत लोकप्रिय पद्धत होती. श्रीकृष्णानं आपल्या विधानानं राजकुमार यांचा अपमान केला आहे, त्यांच्या रसिक प्रेक्षकांचा अपमान केला आहे, अशी आवई उठली. काही राजकुमारभक्तांनी ‘काडु’ चित्रपटावरच बहिष्कार घालण्याची घोषणा केली.
मी त्या मुलांना कामत लॉजवर बोलावून घेतलं आणि पटवलं- ‘‘या सिनेमावर बहिष्कार घातलात तर नुकसान होईल ते चित्रपट निर्मात्यांचं, कलात्मक चित्रपटाचं. आलनहळ्ळीचं नव्हे.’’ हे पटल्यावर त्यांनी बहिष्काराचा कार्यक्रम रहित केला. तरीही चित्रपटाचं प्रकाशन होईपर्यंत धास्ती होतीच. कारण या चित्रपटाच्या पहिल्याच शॉटमध्ये चंद्रेगौडाच्या वहाणा क्लोजअपमध्ये दिसतात. त्यानंतर चंद्रेगौडाची पावलं शॉटमध्ये प्रवेश करतात, वहाणा चढवतात आणि निघून जातात.
या प्रकरणामुळे श्रीकृष्ण सावध झाला आणि सार्वजनिक जागी असली विधानं करायचं त्यानं कमी केलं. कादंबरीच्या कंेद्रस्थानी ‘ओकळी’ हा खेळ आहे. या खेळात दोन्ही गट एकमेकांवर पाण्यानं आक्रमण करतात. हा खेळ दोन्ही गावचे लोक एकत्रपणे खेळतात. पण मी कधीच असा खेळ पाहिला नव्हता. जर याचं अंगावर काटा येईल अशा प्रकारे चित्रण करणं शक्य झालं नाही तर हा चित्रपट करण्यात काहीही अर्थ नाही असं मला वाटलं. कथेत हा प्रसंग अखेरीस येतो. पण आम्ही सगळ्यात आधी त्याचं चित्रीकरण करायचं ठरवलं. आमच्या चित्रीकरणाला ‘ओकळी’च्या दृश्यानं प्रारंभ केला. गावाच्या मध्यभागी वर्षभर बुजवून ठेवलेलं ‘ओकळी’चं कुंड मोकळं करण्यात आलं. गावातलं पाणी त्यात ओतून अतिशय देखणेपणानं चित्रीकरण करण्यात आलं. गोविंद निहलानीनं अत्यंत सावधपणे त्या प्रसंगाचं चित्रीकरण केलं. तो प्रसंग चित्रपटाचा ‘हायलाइट’ ठरला.
पात्रयोजनेचा विषय निघाला तेव्हा चंद्रेगौडासाठी आवश्यक असलेला सुदृढ बांधा, चेहऱ्यावर कठोरता आणि उग्रपणा असलेला नट आवश्यक होता. असा नट कन्नडमध्ये तरी माझ्या नजरेला आला नाही. मुंबईमध्ये दुबे ग्रुपमध्ये ‘ययाति’ करताना मी अमरीश पुरी याला पाहिलं होतं. चित्रपटाचे छायालेखक गोविंद निहलानींशी यासंदर्भात बोललो तेव्हा त्यांचंही तेच मत पडलं- ‘‘होय. त्याचा राकट चेहरा या पात्राला साजेसा आहे!’’
‘वंशवृक्ष’चे वितरक एम. भक्तवत्सल यांच्या लावण्यवती पत्नी प्रेमा या गौडतीच्या (पाटलिणीच्या) पात्रासाठी तयार झाल्या तर चित्रपटाची गुणवत्ता वाढेल असं माझ्यात आणि कारंतांमध्ये बोलणं झालं. हा विषय योग्य वेळ पाहून भक्तवत्सल यांच्याकडे काढायचं मी ठरवलं असतानाच एक दिवस त्यांच्या घरात आम्हा सगळ्यांचं जेवण चाललं असताना कारंत धाडकन त्यांनाच- ‘‘आमच्या सिनेमात प्रमुख भूमिका करणार काय?’’ असं विचारून मोकळे झाले. त्याही गडबडल्या. लाजल्या. इंग्लिशमध्ये म्हणाल्या, ‘‘माझंही ते स्वप्न आहे.’’ याला भक्तवत्सल यांनीही मान्यता दिली. तरीही ही निवड आम्ही पत्रकारांपासून लपवून ठेवली होती. कनकपूरमध्ये सगळ्या पत्रकारांना बोलावून हे सांगण्यात आलं तेव्हाच हे सगळ्यांना समजलं. ‘अशोक हॉटेलमध्ये भेटलेली गौडती’ असा एका वर्तमानपत्रानं मथळा दिला होता.
पण प्रेमा ही श्रीमंत, शहरी कुटुंबातली स्त्री. तिला खेडय़ातली गौडती (पाटलीण) दाखवायची असेल तर कनकपूरच्या घरातल्या शेणानं सारवलेल्या जमिनीवर बसावं लागेल, चटईवर झोपावं लागेल- या सगळ्या अटी मान्य करून घ्याव्या लागल्या. प्रेमानं ही सगळी शिस्त मान्य तर केलीच; पण त्या किट्टीच्या पात्रासाठी निवडलेल्या जी. व्ही. शिवानंद यांच्या नऊ वर्षांच्या मुलाची (नटराजची) खरोखरच मामी झाल्या. त्याला ‘श्रेष्ठ बालनट’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यामध्ये प्रेमाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
कारंतांना बेंगळुरूमधला नटवर्ग जितका ठाऊक होता, तेवढी मला माहिती नव्हती. त्यामुळे काही पात्रांसाठी योग्य नटांची निवड त्यांनीच केली. डॉक्युमेंटरीज् बनवण्याच्या आपल्या अनुभवामुळे गोविंद निहलानीनं ओकळीच्या विस्तृत दृश्याचं अविस्मरणीय रीतीनं चित्रीकरण केलं आणि युरोपियन ‘फिल्म न्वार’ अशा प्रकाशयोजनेमुळे चित्रपटात शोकांतिकेची छाया सर्वत्र भरून राहील असं केलं. चित्रपटातलं नव्वद टक्के कथानक रात्री किंवा घरातल्या अंधाऱ्या भागात घडतं. त्यामुळे या शैलीला एक प्रकारे अपरिहार्यताही आली होती, तसंच सौंदर्यही. (गोविंद कन्नड छायाचित्रकार व्ही. के. मूर्ती यांचा शिष्य. बेंगळुरूमधल्या इन्स्टिटय़ूटचा तो विद्यार्थी होता.) पण त्याची प्रकाशयोजना मात्र अतिशय सावकाश व्हायची. क्लोजअपची रचना व्हायची असेल तरी चाळीस-पंचेचाळीस मिनिटं घ्यायचा. एक शॉट संपल्यावर किरकोळ बदल करून परत ‘रिटेक.’ त्यामुळे नऊ वर्षांचा नटराज दमून जायचा. त्याच्या जागी आणखी कुणी बालक असतं तर दमून भुईसपाट झालं असतं. पण नटराज गुब्बी कुटुंबातला. कंपनी-कुटुंबातली कला आणि शिस्त त्याच्याही अंगी होती. शिवाय गोविंदचं काम हळूहळू चालत असलं तरी प्रकाशयोजनेतले नवनवे प्रयोग करत असल्यामुळे तो सगळ्यांनाच आदर्शभूत झाला होता.
‘काडु’ संपत आला तेव्हाच मला पुण्याच्या ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’मध्ये संचालक होण्याचा प्रस्ताव आला. मी तो मान्य केला. ही घटना घडली तेव्हा मी बेंगळुरूमध्ये नव्हतो. चित्रपट प्रकाशित झाला तेवढय़ापुरता जाऊन आलो.
प्रेक्षकांबरोबर चित्रपट बघितल्यावर मला गोविंद निहलानीनं विचारलं, ‘‘इतका संथ वेग ठेवून का संकलन केलंस? एवढी पॉवरफुल सामग्री असताना पूर्वार्धात सिनेमा बोअर होतोय ना!’’ मलाही ते पटलं. संकलन केलं होतं व्यावसायिक संकलनकार पी. भक्तवत्सल यानं. चित्रपटाच्या गतीविषयी योग्य ती न्यायबुद्धी असलेला माणूस. पण कुठंतरी मीच ‘वंशवृक्ष’च्या अरुणा-विकास यांच्या थिअरीजमुळे प्रभावित होऊन चित्रपटाचा वेग कमी केला असला पाहिजे. निर्माते नारायण म्हणाले, ‘‘चित्रपट आणखी वीस मिनिटं कमी केला असता तर दुप्पट पैसा कमावला असता.’’
‘काडु’ चित्रपटामुळे सगळ्यात जास्त फायदा झाला असेल तर तो अमरीश पुरी याचा. तो ‘स्टार’ झाला. मी त्याची निवड केली तेव्हा त्याला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्थान नव्हतं. पण ‘काडु’चं चित्रीकरण चाललेलं असता तेलगूमधली चित्रपट निर्मात्यांची जोडी बापू-रमण कनकपूरला आले होते. ते भक्तवत्सलचे मित्र असून तेव्हा ‘पडवारळ्ळी पांडवरू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘हम पाँच’ या नावानं करायच्या विचारात होते. अमरीशला पाहताच ‘हम पाँच’ चित्रपटातल्या दुष्ट जमीनदाराच्या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. ‘हम पाँच’ देशभरात फारसा यशस्वी झाला नसला तरी मुंबईमध्ये चांगला चालला. तेवढंच पुरेसं झालं. अमरीश ‘स्टार’ झाला. मोठा होत गेला. तो उत्कर्षांच्या अत्युच्च टोकावर असताना परिस्थिती अशी होती, की कुठल्याही हिंदी चित्रपटाचं भित्तिचित्र पाहिलं तरी त्याचाच चेहरा पब्लिकला धमकावत असायचा. पण अखेपर्यंत तो अहंकारविरहित मित्र होऊनच राहिला. बेंगळुरूला आला की आपल्या अत्यंत व्यग्र दिनक्रमातूनही घरी फोन करून माझ्या पत्नीला, ‘भाभीजी, कैसी हैं आप?’ अशी चौकशी केल्याशिवाय राहायचा नाही.
‘काडु’चं चित्रीकरण संपत आलं तेव्हा मला एक विचित्र- ज्याला अतिमानुष म्हणता येईल असा अनुभव आला. खेडय़ातल्या रस्त्यामध्ये, घरामध्ये करायचं सगळं चित्रीकरण संपलं होतं. आता जंगलाच्या मधोमध करायचं रात्रीचं चित्रीकरण तेवढं राहिलं होतं. पण कनकपूर आणि आलनहळ्ळीच्या जवळपास कुठेही जंगल असं राहिलंच नव्हतं. श्रीकृष्णानं सांगितलं होतं तसं ‘सगळं जंगल कोळसा करून विकून खाल्लं होतं.’ आता निर्माता नारायण यांचं गाव सावनदुर्गला जंगलासाठी जावं लागणार होतं. ‘इतकं दूर जावं का? त्याशिवाय काही उपाय नाही का?’ यावर विचार चालू होता.
एका संध्याकाळी कनकपुरात आम्ही राहत असलेल्या घराच्या शेजारून वाहणाऱ्या ओढय़ाच्या बाजूला एका कडेला मी शौचाला बसलो होतो. संडासाची ओळख नसलेल्या खेडय़ापाडय़ांमध्ये वास्तव्य असताना पहाटे किंवा संध्याकाळी तिन्हीसांजेला शेतात किंवा मोकळ्या माळावर उकिडवं बसून भोवताली नजर टाकायची घटका आमच्यासारख्या नगरवासीयांना काही वेळा आल्हादकारक वाटते. विशेषत: संध्याकाळी कामाचं दडपण कमी झालेलं असताना, थंडगार हवेत हलकेच अंधारात वितळून जात असलेल्या निसर्गाला आणि शांत होत चाललेल्या किलबिलाटाला प्रतिसाद देत असताना विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती एकमेकांत मिसळून जाऊन वेगळंच काहीतरी सुचतं. मलाही त्या संध्याकाळी सुचलं.
माझ्यासमोर असलेल्या नदीचं पात्र विशाल होतं. मे महिना असल्यामुळे ते कोरडं पडलं होतं. आता दगडगोटय़ांनी गच्च भरलेल्या, खाचखळगे नसलेल्या रुंद रस्त्यासारखं ते पसरलं होतं. त्याच्या दोन्ही काठांवर आंबा, पिंपळ यांसारखे वृक्ष वाढले होते. त्याच्या पलीकडे मोकळं माळ असलं तरी रात्रीच्या चित्रीकरणात त्या वृक्षांच्या राक्षसी फांद्या आणि विक्राळ खोडं-मुळं प्रकाशमान करून (एका लहान मुलाच्या दृष्टीनं) दाट अरण्याचा आभास निर्माण करणं शक्य नाही का होणार? पाणी असताना नदीच्या आत बुडून असणारी आणि आता बाहेर दिसणारी वेडीवाकडी वाढलेली मुळं सर्पाकृती आकारात वापरता येणार नाहीत का? मी विचारात पडलो.
अशा प्रकारची काहीतरी प्रकाशयोजना म्हटली की गोविंदला आणखी उत्साह चढे. तो लगोलग तयार झाला. सावनदुर्गला जाण्यासाठी लागणारा वेळ, श्रम.. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा! तेवढाच खर्च वाचला म्हणून सगळ्यांना आनंद झाला. गोविंदनं निवडलेला दगडगोटे, झाडं-मुळं असलेला सगळा भाग धुऊन स्वच्छ करण्यात आला. त्या मर्यादित जागेत चित्रपटातली गौडती किट्टीबरोबर जंगलातून जाते, मांत्रिक ग्रामदेवतेपुढे कोंबडीचा बळी देतो आणि अखेरच्या दृश्यात किट्टी जंगलात एकटाच बसून रडतो- अशी सगळी दृश्यं चित्रित करून झाली.
आता शिवगंगा आणि त्याचे मित्र मांत्रिकाकडे चाललेल्या किट्टी आणि गौडतीला रस्त्यात अडवतात आणि गौडतीवर बलात्कार करतात- हे एकच मुख्य दृश्य राहिलं होतं. आणि त्याचवेळी अचानक दररोज संध्याकाळी वळवाचा पाऊस यायला सुरुवात झाली. चार-पाच दिवस हेच चाललं. रोज संध्याकाळी प्रकाशयोजना होऊन चित्रीकरणाला सुरुवात केली की पावसाला सुरुवात होई. सगळे दिवे आणि इतर उपकरणं घेऊन घरात धाव घेणं हे लाइट बॉईजचं कामच होऊन बसलं होतं. त्यातच लोकेश ‘मला निघालं पाहिजे!’ म्हणून तगादा करू लागला. शेवटी नारायणही संयम गमावून ‘आजच्या दिवसात चित्रीकरण संपलं नाही तर शेडय़ूल संपवू आणि पुन्हा पाऊस थांबल्यावर पुढचं चित्रण करू,’ म्हणू लागला.
पाऊस थांबल्यावर..? आम्हा सगळ्यांच्या पोटात गोळा उठला. हा मे महिना. पाऊस थांबल्यावर म्हणजे चित्रीकरण सप्टेंबपर्यंत पुढे जाणार! हे कुणालाच नको होतं. त्या दिवशी फिल्म युनिटमध्ये काम करणारा एक तमीळ कर्मचारी माझ्यापाशी आला आणि म्हणाला, ‘‘गेले तीन दिवस मला स्वप्न पडतंय. त्यात ग्रामदेवतेचा पट दिसतोय. तुम्ही त्या देवतेची बळी देऊन पूजा केली आहे, पण शांती कुठे केलीय? देवीची शांती व्हायला पाहिजे!’’
माझा कधीच असल्या कर्मकांडांवर विश्वास नाही. पण कसंतरी करून चित्रीकरण संपणार असेल तर मी काहीही करायला तयार झालो असतो. आम्ही एका वृक्षाच्या अक्राळविक्राळ मुळांपाशी ग्रामदेवतेचा पट ठेवून कोंबडीचा बळी द्यायचा प्रसंग चित्रित केला होता. नंतर किट्टीच्या रडण्याच्या दृश्याला तीच भयाण जागा योग्य वाटल्यामुळे तो ग्रामदेवतेचा पट कुठंतरी अडगळीत टाकून दिला होता. आता पुन्हा अडगळीतून तो देवीचा पट शोधून काढून पुन्हा त्याच जागी त्याला ठेवून मी आणि कारंतांनी त्याची पूजा केली. नारळ फोडला. त्यानंतर गोपी, गोविंद, मी आणि कारंतांनी त्याची चारही टोकं धरली आणि जवळच्या एका विहिरीत त्याचं विसर्जन केलं. त्या संध्याकाळी पाऊस आला नाही. आमचं चित्रीकरण अडचणीशिवाय पुरं झालं.