‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या डॉ. पंडित विद्यासागर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन २४ मे रोजी डायमंड पब्लिकेशन्सतर्फे पुण्यात होत आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील हा काही अंश..
ज्ञा नाधिष्ठित समाजाची निर्मिती हे एकविसाव्या शतकातील आपले उद्दिष्ट आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणपद्धतीत अनेक बदल सुचवले जात आहेत. विज्ञानशिक्षण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. मात्र, विज्ञानशिक्षणाचा हा विचार अधिक व्यापक स्वरूपात व्हायला हवा. शालेय आणि माध्यमिक स्तरावर विज्ञान-शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे जरुरीचे आहे. परंतु त्याचबरोबर या परिघाबाहेर असलेल्या समाजातील मोठय़ा घटकाला वैज्ञानिक संकल्पनांची ओळख करून द्यायला हवी. त्यासाठीची भूमिका आंतरविद्याशाखीय असायला हवी. विज्ञानावरील संकल्पनात्मक ग्रंथ हे त्यासाठी उपयुक्त साधन व्हावे. मात्र, या ग्रंथांची भाषा साधी, सोपी आणि मांडणी सर्वसामान्यांना जवळची वाटणारी हवी. ही कल्पना प्रत्यक्षात आणणे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. मात्र, विज्ञानातील संकल्पना ओवीच्या स्वरूपात आणून आणि ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या पुस्तकाची निर्मिती करून डॉ. पंडित विद्यासागर यांनी ही अपेक्षा पूर्ण केली आहे.
‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हा एक नावीन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय म्हणता येईल असा प्रयोग आहे. ‘ओवी’ हा प्रकार मराठी माणसाच्या मनाशी जवळीक साधणारा आविष्कार आहे. ओवीची रचना सोपी, साधी आणि सहज समजणारी असावी लागते. त्यात मुक्तछंद असला तरी पहिल्या तीन ओळींत यमक साधावे लागते. यासाठी क्लिष्टता टाळून अचूकपणा राखणे आणि त्यासाठी समर्पक शब्द शोधणे, ही तारेवरची कसरत आहे. डॉ. पंडित विद्यासागर यांना ती सहजपणे साधली आहे.
या पुस्तकाची व्याप्ती खूपच मोठी आहे. विज्ञानाशी संबंधित प्रमुख विषयांबरोबरच इतर विषयांचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे समाज आणि विज्ञान हा विचार परिणामकारकपणे केल्याचे यात आपल्याला दिसून येते.
विज्ञान म्हणजे काय, त्याची सुरुवात, त्याचा एकूण इतिहास, विश्वाची उत्पत्ती, सजीवांची उत्पत्ती अशा मूलभूत प्रश्नांचा आणि संकल्पनांचा समावेश यात केलेला आहे. मात्र, ही यादी इथेच संपत नाही. एकोणीसशे सालापासून नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात झाली. त्यानंतरच्या भौतिक, रसायन, जीव, तसेच वैद्यक विषयांतील संकल्पनांचाही यात समावेश आहे. जैवतंत्रज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, गणित आणि पर्यावरण या विषयांची ओळख लेखकाने थोडक्यात, मात्र परिणामकारकरीत्या करून दिलेली आहे. विज्ञानाची झालेली ही ओळख ‘समाज आणि विज्ञान’ समजण्यास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यास उपयुक्त ठरणारी आहे. ही सर्व माहिती ओवीरूपात आहे आणि त्याचबरोबर स्पष्टीकरण देणारी अधिकची माहितीदेखील सोबत दिलेली आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.
यातील ओवीबद्ध रचना आकर्षक आणि साहित्यमूल्य असणारी आहे. चपखल शब्दांच्या वापरामुळे या ओव्या वाचताना येणारा अनुभव अनोखा आहे. त्याचा प्रत्यय जागोजागी येतो. विषयप्रवेश करताना संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याविषयीच्या ओव्या आशयघन आणि चित्तवेधक आहेत. याचा प्रत्यय तुकारामांविषयी ‘साधेपणे भाव ठेवूनी ज्ञान महा वर्णिले’ आणि संत ज्ञानेश्वरांविषयी ‘गूढार्थाचे नवनीत कण सहजपणे वेचले’ या दोन ओव्यांवरून सहजपणे येतो. विज्ञानाच्या इतिहासाचा आढावा घेताना पन्नासहून अधिक शास्त्रज्ञांच्या जीवनचरित्रांचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. सुश्रुतापासून सुरुवात करून भारतातील, मध्य-पूर्वेतील, चीनमधील आणि युरोपातील शास्त्रज्ञांचा त्यात अंतर्भाव आहे. त्यांच्या जीवनाचे आणि वैज्ञानिक कार्याचे वर्णन करताना रचलेल्या ओव्या खूपच समर्पक आहेत.
जीवन आणि वैज्ञानिक कार्याबरोबरच विज्ञानातील नियमही या पुस्तकात ओवीबद्ध स्वरूपात आलेले आहेत. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पुढील ओवीमधून स्पष्ट होताना दिसतो..
गुरुत्वाकर्षण बल कसे काढावे। वस्तुमानांना गुणावे॥
त्यास दोन्हीतील अंतरवर्गाने भागावे। बल त्या प्रमाणात असे॥
नियमांबरोबरच विज्ञानातील अनेक संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात येतात. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीव-वैद्यकशास्त्रांचाही समावेश आहे. पृष्ठीय ताण का निर्माण होतो आणि त्याचे वैशिष्टय़ काय असते, हे सहजपणे सांगणारी ओवीही अशीच आहे-
पृष्ठभागावरील रेणू सारे। आकर्षिती परस्परे॥
निर्मित पृष्ठीय ताणाद्वारे। वजन कीटकांचे पेलती॥
रसायनशास्त्राने पॉलीमरची निर्मिती केली आणि पदार्थ-निर्मितीमध्ये क्रांतिकारक बदल घडून आले. वस्त्रे, मोटार, विमान, रॉकेट आणि इतर अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी पॉलीमरचा वापर होतो. हे पॉलीमर कसे बनते, याचे यथायोग्य वर्णन पुढील ओव्यांमधून दिसून येते..
एका रेणूने दुसरा जोडीला। दुसऱ्याने तिसरा ओढीला॥
तिसऱ्याने चवथा नास्डिला। आपल्यासवे येण्यास॥
ऐसे अनेक रेणू जोडिता। शृंखला तयार होत असता॥
रेणूंच्या या शृंखलेस आता। पॉलीमर नाव हे॥
या रचनांमध्ये विज्ञानातील संकल्पना आणि माहिती देत असतानाच त्यावर सुंदर भाष्यही केलेले आहे. कधी कधी ते वर्तमानातील विदारक सत्य पुढे आणते, तर कधी ते तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जाऊन अंतर्मुख करते. याची वानगीदाखल दोन उदाहरणे देता येतील. मलेरिया डासांमुळे पसरतो, हा शोध लागून शंभर वष्रे झाली आहेत. तरीसुद्धा आपण मलेरियाच्या तावडीतून सुटलेलो नाही. अस्वच्छतेमुळे मलेरिया होतो, हे माहीत असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. यावर लेखकाने पुढीलप्रमाणे भाष्य केले आहे..
शोध लागूनी शतक लोटले। परि आम्हा नाही उमजले॥
गलिच्छपणाचे शेले। आम्ही आजही पांघरतो॥
न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वावर भाष्य करतो. जडत्व हे अस्तित्वाचे मूळ आहे. परंतु ज्ञानी लोक जडत्वाचा त्याग करू पाहतात. नियम समजावून सांगताना यावर केलेले भाष्य वाचकाला अंतर्मुख करणारे आहे..
ऐसी जडत्वाची ख्याती। परी ज्ञानी त्यासी त्यजू पाहती॥
जाण्या निर्वाणा मोक्षाप्रती। जडत्व त्यजणे लागावे॥
विज्ञानाचा प्रसार हा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यापुरताच मर्यादित न ठेवता तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा लेखकाचा मानस आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातही विज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उपयोग कसा होऊ शकतो, याची मांडणी ‘समाज आणि विज्ञान’ या भागात परिणामकारकपणे केलेली आहे. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी विज्ञानाची ओळखही सर्वसामान्य माणसाला व्हायला हवी. मात्र, विज्ञानाबद्दल त्याच्या मनात कुतूहल असले तरी वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याविषयी तो साशंक असतो. परंतु या संकल्पना ओवीच्या स्वरूपात मांडल्यामुळे त्याला विज्ञानाविषयी वाटणारा दुरावा आपोआपच कमी होईल. असे झाले तर सामाजिक प्रगल्भता वाढवण्याच्या दिशेने टाकलेले ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. प्रस्तुत पुस्तकात ती क्षमता निश्चितपणे आहे. विज्ञानाचा सामाजिक संदर्भ सांगताना महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांनी केलेल्या कार्याचा लेखकाने यात उल्लेख केलेला आहे. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा अभ्यास व्हावा, ही लेखकाची अपेक्षा योग्यच आहे.
या पुस्तकात समाविष्ट विषयांचा आवाका थक्क करणारा आहे. साहित्यिक मूल्य असलेले हे पुस्तक विज्ञानाची व्यापक आणि सखोल मांडणी करते. परिणामी शालेय आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. किंबहुना, प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये हे पुस्तक असायलाच हवे असे मला वाटते. सर्वसामान्य जिज्ञासू व्यक्ती आणि विज्ञानप्रसारकांच्या दृष्टीनेही हे पुस्तक बहुमोल ठेवा ठरणार आहे. त्याच्या आंतरविद्याशाखीय स्वरूपामुळे विषयतज्ज्ञांनाही तो उपयुक्त ठरेल. मराठीच्या प्राध्यापकांना विज्ञानातील संदर्भ सहजपणे समजून घेता येतील. साहित्यामधील विज्ञानविषयक संदर्भ स्पष्ट करताना याची मदत होईल. यातील संज्ञांच्या स्पष्टीकरणामुळे आणि विषयसूचींमुळे ते आणखी सुलभ होईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे पुस्तक त्यासाठी पूरक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा