नव्या शतकाची पहाट
सचिन तेंडुलकरची क्रिकेटजगतातील वाटचाल, त्यातले चढ- उतार, त्याने केलेले ‘रेकॉर्ड्स’ आणि त्याचबरोबर त्या-त्या सामन्यांच्या वेळची परिस्थिती..सारं काही उत्सुकता वाढवणारं..त्याविषयी माहिती देणाऱ्या ‘सचिनच्या १०० शतकांची कथा’ या व्ही. कृष्णास्वामी यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद वन्दना अत्रे यांनी केला आहे. पुढील आठवडय़ात तो अमेय प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश..
शतक पहिले (कसोटी शतक क्रमांक एक), सचिन रमेश तेंडुलकर (नाबाद ११९), (२२५ मिनिटे, १८९ चेंडू, १७ चौकार), सामन्याचा प्रकार- कसोटी, प्रतिस्पर्धी संघ- इंग्लंड. सामन्याचे स्थळ- ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, दिनांक- ९ ऑगस्ट १९९०. सामन्याचा निकाल- अनिर्णीत.
अतिशय दुर्मीळ मानसिकता आणि कौशल्य यांचे दर्शन घडवणाऱ्या या डावामुळे तेंडुलकरची स्टारपदाकडे झेप. भारताचा आघाडीचा प्रसिद्ध खेळाडू सुनील गावस्कर याचाच जणू तो दुसरा अवतार वाटतो. प्रत्यक्षातही त्याने त्याचेच पॅड्स पायाला बांधले होते. कसोटी क्रिकेटमधील शतकाची सलामी करताना त्याने आपल्या भात्यातील विविध प्रकारच्या फटक्यांचे दर्शन घडवले. त्यातील सर्वात लक्षणीय होते ते बॅकफूटवर जाऊन ऑफ साईडला मारलेले फटके. अवघी ५ फूट ५ इंच उंची असूनही इंग्लिश फिरकीने केलेल्या आखूड टप्प्याच्या माऱ्यावर त्याने सहजतेने काबू मिळवला.
पाकिस्तानविरुद्ध कराची येथील सामन्यात सचिन तेंडुलकर याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच सामन्याद्वारे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच सामन्याद्वारे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वकार युनुस, वासिम अक्रम आणि इम्रान खान यांच्या माऱ्याला तोंड देत सचिनने हे पदार्पण साजरे केले. पाकिस्तानविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांत त्याने, फैजलाबाद व सियालकोट येथील अर्धशतकासह २१५ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नॅपिअर येथील दुसऱ्या कसोटीत ८८ धावांवर बाद झाल्यावर आपले पहिले शतक हुकल्याच्या दु:खात तो खासगीत रडला होता.
मग सुरू झाली इंग्लंडविरुद्धची मालिका. त्याची ती पहिलीच इंग्लंडवारी होती आणि तिसरी मालिका. अवघ्या १७ वर्षे वयाच्या या मुलाच्या नावापुढे शतकाची नोंद झालेली नव्हती. पण एका महान खेळाडूचा उदय होत असल्याची चर्चा मात्र सुरू झाली होती. बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या खुणा त्याच्या खेळात दिसत होत्या, त्याला अजून सातत्याची जोड मात्र मिळायची होती.
मँचस्टेरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील सामना हा सचिनचा नववा सामना होता. स्टॅँड्समध्ये त्या दिवशी स्थानिक प्रेक्षकांपेक्षा भारतीय चाहत्यांची उपस्थिती अधिक होती. ग्रॅहम गूचने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करीत मायकेल आर्थरटनच्या साथीत २२५ धावा करत शतक ठोकले. गॅ्रहॅम गूचचे हे लागोपाठ तिसरे शतक. आर्थरटन आणि रॉबिन स्मिथ यांनीही शतक फडकवत तब्बल ५१९ धावांचा डोंगर रचला.
भारताने अवघ्या ५७ धावांच्या बदल्यात तीन गडी गमावले. पण त्यानंतर आलेल्या महंमद अझरुद्दीनने १७९ धावा काढल्या. संजय मांजरेकरच्या (९३) साथीने त्याने १८९ धावांची भागीदारी केली आणि मग तेंडुलकर मैदानात आला. खाते खोलण्यासाठी तब्बल ५४ मिनिटे घेतल्यावर ६८ धावसंख्येवर तो कितीतरी वेळ अडकला. पहिल्या डावात इंग्लंडला ८७ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडने ४ बाद ३२० धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. अॅलन लॅम्बने त्यात १०९ धावांचे योगदान दिले.
जिंकण्यासाठी ८८ षटकांत ४०८ धावा करण्याचे भारतीय संघापुढे आव्हान हे यापूर्वीच्या त्याच्याच रेकॉर्डपेक्षा दोन धावांनी मोठे होते. १९७६ साली हे आव्हान भारताने पार केले होते. दोन बाद १०८ वरून सहा बाद १८३ अशी भारतीय डावाची पडझड होत असताना विजय दूरच राहो, सामना अनिर्णीत ठेवण्याचे स्वप्नही फार असाध्य वाटत होते. मांजरेकर, दिलीप वेंगसरकर, अझरुद्दीन आणि कपिल देव तंबूत परतले होते. कोणी दबावाला बळी पडून तर कोणी वेडेवाकडे फटके मारून!
गुरू सुनील गावस्करचे पॅड्स चढवून तेंडवून तेंडुलकर मैदानात उतरला. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या मैदानावर त्याने पावणेचार तास किल्ला चढवला. आठव्या क्रमांकावरील मनोज प्रभाकर साथीला आला तेव्हा तेंडुलकरची धावसंख्या होती ३८. भारताला अजून दोन तास २० मिनिटे मैदानात तग धरायचा होता. तेंडुलकर आणि प्रभाकर या दोघांचेही एकेक झेल सुटले आणि हे जीवदान इंग्लंडला फार महागात पडले. एडी हेमिंग्जने तेंडुलकरचा झेल सोडला तेव्हा त्याची धावसंख्या होती दहा. पुढे क्रिकेटपटूंच्या जर्सीला नंबर देण्याची प्रथा सुरू झाली तेव्हा हाच सचिनचा नंबर झाला.
११ षटके बाकी असताना तेव्हा ९८ धावसंख्येवर असलेल्या तेंडुलकरने फ्रेझरला मिडऑफला फटका मारून तीन धावा काढल्या आणि प्रत्येक फलंदाजाचे जे स्वप्न असते ते पूर्ण केले. शतकाचा टप्पा त्याने गाठलाच आणि १७ वर्षे ११२ दिवस एवढे वय असलेल्या या तरुणाने ती कसोटी वाचवली.
अजून मतदानाचा अधिकार न मिळालेल्या तेंडुलकरने त्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण खेळी केली होती. प्रभाकरच्या (नाबाद ६७) साथीने नाबाद राहत त्याने केलेल्या ११९ धावांनी भारताला पराभवापासून वाचवले. भारत सहा बाद ३४३ अशा धावसंख्येवर असताना आणि दोन अनिवार्य षटके उरलेली असताना सामना जिंकण्याचे आपले प्रयत्न इंग्लंडने सोडून दिले. सामना अनिर्णीत अवस्थेकडे नेणाऱ्या तेंडुलकरला प्रेक्षक उभे राहून अभिवादन करीत असताना बुजलेल्या या खेळाडूला बॅट उंचावून त्याची दखल घेण्यासाठी थोडा वेळ लागला असे खुद्द तेंडुलकरने मान्य केले. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराबद्दल मिळालेली श्ॉम्पेन तो प्यायला नाही, पण ५०० पौंड मात्र चैनीत खर्च केले! प्रेक्षकांमधील प्रौढ स्त्रियांनी त्याच्याभोवती कोंडाळे केले, त्याला मिठय़ा मारल्या, त्याचे पापे घेतले. त्या दिवशी तो सगळय़ा जगाचा कौतुकाचा विषय झाला आणि पुढे दशकाहून अधिक काळ तसाच राहिला. समालोचकांच्या खोलीत बसलेल्या रिची बेनॉने ‘मानसिकता, कौशल्य आणि आल्हाददायक फटक्यांचा डाव’ अशा शब्दांत त्याचा उल्लेख केला.
पुढील अशाच अनेक डावांपैकी हा एक डाव होता.
आगामी
नव्या शतकाची पहाटसचिन तेंडुलकरची क्रिकेटजगतातील वाटचाल, त्यातले चढ- उतार, त्याने केलेले 'रेकॉर्ड्स' आणि त्याचबरोबर त्या-त्या सामन्यांच्या वेळची परिस्थिती..सारं काही उत्सुकता वाढवणारं..त्याविषयी माहिती देणाऱ्या 'सचिनच्या १०० शतकांची कथा' या व्ही. कृष्णास्वामी यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद वन्दना अत्रे यांनी केला आहे. पुढील …
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 03-11-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming book sachinchya 100 shatakanchi katha