भानामती हा प्रकार जेव्हा कुणासाठी त्रासदायक, जीवघेणा ठरतो, वा या प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जगण्याचा हक्क नाकारला जातो; तेव्हा अजूनही समाजात प्रबोधनाची गरज आहे, हेच सिद्ध होतं. असं प्रबोधन करणारं डॉ. नरेंद्र दाभोलकर व माधव बावगे यांनी लिहिलेलं पुस्तक या आठवडय़ात राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश..
आदिम अवस्थेतील माणूस स्वत:चे जीवन कसेबसे पुढे ढकलत होता. ढग का गडगडतात? धुवॉंधार पाऊस का कोसळतो? वीज चमकते कशी आणि अदृश्य होते ती कुठे? जंगलेच्या जंगले बेचिराख करणारा वणवा कसा निर्माण होतो? समुद्रात उसळणाऱ्या लाटा, वादळ, वावटळ, भूकंप, हिमवृष्टी या सर्व बाबी त्या आदिम माणसाच्या आकलनाच्या पलीकडे होत्या. स्वाभाविकच त्याला असे वाटत होते की, हे सगळे घडवून आणणारी एक अदृश्य अलौकिक शक्ती कुठेतरी असली पाहिजे. त्या शक्तीच्या सामर्थ्यांने या असंख्य घटना घडत असल्या पाहिजेत. या शक्तीला आदिम मानवाने जवळजवळ सर्व ठिकाणी ‘यातू’ असे नाव दिले. स्वत:च्या जीवनाबाबत कर्तुम अकर्तुम सामथ्र्य असणाऱ्या या शक्तीची पूजा बांधणे, हे ओघाने आलेच. ही पूजा बांधण्याची जी कर्मकांडे होती त्याला ‘यातुक्रिया’ असे संबोधले गेले. यातुशक्तीची उपासना यातुक्रियेद्वारे करणे यातून जो सिद्ध होतो त्याला ‘यातुधर्म’ असे नाव मिळाले. यातू या शब्दाच्या अपभ्रंशातून जादू हा शब्द तयार झाला, म्हणूनच यातुधर्माला ‘टंॠ्रू फी’्रॠ्र४२ इ्र’्रीऋ’ असे म्हणतात.
थोडक्यात, ही यातुविद्या म्हणजेच आजची ‘ब्लॅक मॅजिक’ अथवा ‘जादूटोणा’ अथवा ‘भानामती’. मुळात जादूटोणा हा शब्दच जादू आणि टोणा या दोन शब्दांपासून बनला आहे. टोणा हा मूळ कन्नड शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ‘फसवणे’. स्वाभाविकच जादूटोणा याचा अर्थ गूढ शक्तीचा दावा करून फसवणे, असा होतो. मूळ शब्द जादू. याच्या दोन व्युत्पत्ती असू शकतात. एक म्हणजे ‘जादू’ या फारसी शब्दापासून तो जसाच्या तसा आला असणे शक्य आहे. मात्र, हजारो वर्षांपूर्वी वेदामध्ये यातुविद्येचे उल्लेख आढळतात. या ‘यातू’ शब्दावरूनच आजचा जादू शब्द बनला असणे शक्य आहे. जसे यमुना हे नाव जमुना झाले त्याप्रमाणे. ‘शतपथ ब्राह्मण’ या ग्रंथात यातुविद्येचा उल्लेख आहे, तसाच मायावेद या प्रकाराचाही उल्लेख आहे. माया शब्द यातुविद्येसाठी वापरत आणि ती करणाऱ्याला मायावी म्हणत. पुराणात अनेक राक्षस मायावी असल्याचा उल्लेख आहे आणि त्या गोष्टी अजूनही सांगितल्या जातात. किंबहुना मायावेद किंवा यातुविद्या ही मुळात असुरांचीच विद्या गणली जात असे. शांकरभाष्यात मायावींचा उल्लेख आहे. ते एकाच वेळी जमिनीवर चालतात व आकाशातही विहार करतात, असे म्हटले आहे. अथर्ववेदात मायावी विद्या येणारे घातक असतात, असा उल्लेख असून त्याची बाधा होऊ नये म्हणून प्रार्थना केलेल्या आहेत. या सगळ्याचा अर्थ जादूटोणा अथवा भानामती ही फसवणूक करणारी बाब आहे, असे हजारो वर्षे मानले गेलेले आहे, असा होतो. यासाठीच महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करत असताना श्रद्धा कोणत्या व अंधश्रद्धा कोणत्या यातून वाद निर्माण होऊ नये म्हणून कायद्याचे नाव ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’, असे केले आहे.
अशाच प्रकारचे उल्लेख जगभरातील इजिप्शियन, बाबिलोनियन, समोरियन, अरब आणि सर्व प्राचीन संस्कृतीत आढळून येतात. मृत पितर हे कडक स्वभावाचे असतात व त्यांचा कोप होऊ नये म्हणून इजिप्शियन संस्कृतीत अनेक प्रकारची कर्मकांडे आणि प्रार्थना आढळतात. अरब आणि ज्यू संस्कृतीत मानवाला त्रास देणाऱ्या सैतानाचा वारंवार उल्लेख आढळतो. ख्रिश्चन लोकांमध्ये शत्रूवर अरिष्ट कोसळावे यासाठी चर्चमध्ये ‘ब्लॅकमेस’ (काळी जादू) करणारी प्रार्थना बाराव्या शतकापर्यंत होत असे. युरोपमध्ये गावात आलेल्या साथी वा अचानक घडणाऱ्या दुर्घटना यांच्यासाठी वृद्ध स्त्रियांना धर्मग्रंथाच्या आधारे जादूटोणा करणाऱ्या चेटकिणी समजून जिवंत जाळून मारले जात असे. त्या विरोधातील कायदा इंग्लंडमध्ये आला तो अठराव्या शतकात. तोपर्यंत हजारो स्त्रियांचे बळी गेले होते. भारतात सोडाच, समाज-सुधारकांची लखलखती परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात एकविसाव्या शतकातही जादूटोणाविरोधी कायदा करण्याचे लेखी आश्वासन राज्यकर्त्यांनी देऊन १८ वर्षे झाली, तरी अजूनही याबाबतचा कायदा शासनाने केलेला नाही.
या यातुक्रिया दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे शुक्लयातू. ती मुख्यत: चांगल्या कामासाठी वापरली जाते. उदा. पाऊस पडावा, अन्नधान्याची समृद्धी व्हावी, संतती लाभावी अशा स्वरूपाच्या इष्ट बाबींच्या कामनापूर्तीसाठी केलेल्या गोष्टी त्या शुक्लयातू. फेझर या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या मते, शुक्लयातू हाच सर्व जगभर धर्मसंस्थेचा मूळ पाया आहे अथवा सुरुवात आहे. अलौकिक, अदृश्य, प्रभावी, पण गूढ अशी यातुशक्ती आहेच. परंतु अघोरी मार्गाने (उदा. नरबळी) ती फारशी वश होत नाही, त्यावर विजय मिळवता येत नाही, असे मानवाच्या लक्षात आल्यावर तो तिला शरण जाणे, तिची मनधरणी करणे यांसारख्या उपायांकडे वळला. हीच धर्मसंस्थेची सुरुवात होय. या शुक्ल यातुविद्येत अंतर्भूत असलेले विधी हे दुसऱ्याचे अहित करणाऱ्या उद्देशाने नसतात; तर ते व्यक्तीच्या, कुटुंबाच्या वा सामूहिक, भौतिक कल्याणाच्या हेतूने केलेली साधना या स्वरूपाचे असतात. या साधनेचे सर्वसाधारण तीन प्रकार होते. उत्पादन विधी, संरक्षण विधी आणि निवारण विधी. शेतात प्रथम नांगर घालत असताना करावयाचा विधी, गर्भदान, विवाह इत्यादी विधी हे उत्पादन विधी होत. युद्धाच्या प्रारंभी व युद्ध चालू असताना करायचे विधी हे संरक्षण विधी होते, तर निरनिराळे रोग निवारण करणे, दुष्काळ टाळण्यासाठी पावसाची याचना, प्रार्थना हाही एक निवारण विधी होता. म्हणूनच दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यावर दस्तुरखुद्द महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सर्व शासकीय कार्यालयांत आणि शाळांत पावसासाठी प्रार्थना करण्याचे आदेश काढले होते.
यातुविद्येचा दुसरा प्रकार म्हणजे कृष्णयातू. शेजाऱ्याच्या शेतावरील खळ्यातले धान्य आपोआप आपल्याकडे यावे, सवत वांझ व्हावी, शत्रू रक्ताची उलटी होऊन मरावा, प्रतिस्पध्र्याच्या गायी-गुरे, संपत्ती यांचा नाश व्हावा, अलौकिक अघोरी अशा यातुशक्तीने आपल्या प्रतिस्पध्र्याचा पाडाव व्हावा या सर्व गोष्टी कृष्णयातुद्वारे साधल्या जातात, अशी आदिम मानवाची कल्पना होती. कृष्णयातू दोन नियमांद्वारे कार्यरत होतो, असे मानले जाई. त्यातील पहिला नियम होता सादृश्याचा. ज्या शत्रूवर यातुविद्या करावयाची, त्याची मेणाची किंवा मातीची प्रतिकृती तयार करण्यात येत असे. त्या प्रतिकृतीच्या ज्या भागात सुई खुपसली जात असे, त्याचा परिणाम प्रत्यक्ष व्यक्तीच्या शरीरातील त्या त्या जिवंत अवयवांवर होतो, अशी कल्पना यामागे होती. उदा. प्रतिकृतीच्या पोटात जर सुया खुपसल्या तर प्रत्यक्ष शत्रूच्या पोटात असह्य वेदना होऊन तो गडाबडा लोळू लागतो व प्रसंगी तो रक्ताची उलटी होऊन मरतोही, असे मानले जाई. हे शक्य नसल्यास संसर्गाचा नियम वापरला जाई. यासाठी शत्रूच्या वस्त्राचा तुकडा, त्याचा केस, तो वापरत असलेली काठी इत्यादींवर मंत्र टाकून शत्रूचा घात केला जाई.
जगातील सर्व प्राचीन संस्कृतींत जादूटोण्याच्या कल्पनेचा प्रभाव होता. मानवाचे बहुतांशी जीवन भौतिक शक्तींशी झगडण्यात जात होते. या भौतिक शक्तींच्या मागचा कार्यकारणभाव आदिम मानवाला माहीत असणे शक्यच नव्हते. स्वाभाविकच या गूढ पारलौकिक शक्ती आपले जीवन नियंत्रित करतात आणि यातुप्रधान कर्मकांडांद्वारे त्याबाबत प्रतिकूलता नष्ट करता येते, अनुकूलता वाढवता येते, असे मानले गेले. स्वाभाविकच या शक्तीला आवाहन करणारा माणूस हा पीडित व्यक्ती अथवा इच्छित साध्य एका बाजूला आणि पारलौकिक शक्ती दुसऱ्या बाजूला, यातील दुवा अथवा मध्यस्थ बनत असे. यासाठी त्याला नियमित स्नान करणे, जप आणि मंत्रोपचार करणे, काही पदार्थ स्वत:च्या जीवनातून वज्र्य करणे, विशिष्ट काळ किंवा कायमचे लैंगिक संबंध वज्र्य करणे अशा अनेक व्रतांचे पालन करावे लागत असे. यातुक्रिया करणाऱ्या याच व्यक्तींमधून पुढे मांत्रिक, वैद्य, पुरोहित, भविष्यवादी निर्माण झाले, असे मानववंशशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ सांगतात.
आता विज्ञानाचे एकविसावे शतक उजाडले आहे. निसर्गातील असंख्य घटनांचा कार्यकारणभाव माणसाला समजला आहे. अनेक गोष्टी अजून अज्ञात आहेत हे खरे, पण त्याचे कारण वैज्ञानिक दृष्टिकोनानेच समजेल, यातुक्रियांद्वारे नाही, हेही माणसाला कळले आहे. अशा परिस्थितीत खरे तर भानामतीचे प्रकार हे आपोआपच नष्ट व्हावयास हवे होते. समितीचे गेल्या २५ वर्षांतील कार्य हे सांगते की, हे प्रकार कमी झालेले आहेत; परंतु बंद झालेले नाहीत. १० मे २०११ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड तालुक्यातील कऱ्हाडपासून अवघ्या ११ किलोमीटरवर असलेल्या धोंडेवाडी या गावात अचानकपणे भानामतीचे प्रकार घडू लागले. टाकीतील पाणी तांबडे होणे, बंद कपाटातील वस्तू आपोआप बाहेर येणे, कपडे फाटणे व जळणे अशा स्वरूपाच्या या भयचकित करणाऱ्या गूढ घटना होत्या. ही भानामती आपला ५ वर्षांचा नातू करतो हे देवऋषीचे म्हणणे प्रमाण मानून भानामतीचे प्रकार थांबवण्यासाठी सख्ख्या आजीने गळा दाबून ५ वर्षांच्या नातवाचा बळी घेतला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी ११ मे २०११ ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मुंबईहून काही काळासाठी घरी आलेल्या तरुणाने लग्नानंतर ४ वर्षे आपल्याला मूलबाळ नाही याचे कारण आपल्या चुलत बहिणीने करणी केली आहे, हे भगताचे म्हणणे खरे मानून थंड डोक्याने बहिणीच्या डोक्यात काठी मारून तिचे आयुष्य संपवले, तर १३ मे २०११ ला नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ तालुक्यात धाकटय़ा जावेने आपल्यावर करणी-भानामती केली या संशयाने थोरल्या जावेने धाकटी जाऊ व तिचे एक महिन्याचे मूल यांचे जीवन संपवण्यासाठी त्यांना विष पाजले. हे सर्व लिहिताना आणि वाचताना अत्यंत क्लेशदायी आहे. परंतु त्यापासून बोध एवढाच घ्यावयाचा की, एकविसाव्या शतकात विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला असतानाही भानामतीची झापडे लावून माणसे आपले जीवन जगत आहेत.
सुशिक्षित माणसे ज्या आधुनिक जगात वावरतात त्यामध्येदेखील खडे, भाग्यरत्ने, रुद्राक्ष, अंगठय़ा यांचा वापर, वास्तुशास्त्राप्रमाणे स्वत:च्या घरातील बदल, नारायण नागबळीची पूजा अशा अनेक कृतींद्वारे हेच दाखवून देत आहेत की, अजूनही त्यांच्या मनातील यातुनिर्भर श्रद्धा कायम आहे. याचे एक कारण म्हणजे विश्वातील अनेक गूढं माणसाला उकललेली नाहीत. कधी उकलली जाणार, माहीत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गुहेत राहणाऱ्या माणसात अदृश्याची भीती व अतृप्त कामनांची पूर्ती या बाबी समानच आहेत. गुहेत राहणाऱ्याला हिंस्र श्वापदांची भीती वाटत असेल, तर गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्यांना अतिरेक्यांच्या हवाई हल्ल्यांची भीती वाटू शकेल. प्रत्येकाची सुखाची आणि उपभोगाची कल्पना वेगळी आहे. परंतु त्यातील अनेक बाबी दोघांच्याही आवाक्याबाहेर असण्याची शक्यता समान आहे. जीवनातील अनिश्चिततेशी माणसाचा झगडा सतत चालूच राहणार. इच्छा-आकांक्षांना तर पूर्णविराम नाहीच. त्यामुळे सुखाची हाव आणि धाव थांबत नाही. यामुळे माणसांच्या अंतर्मनातला आदिमानव नेणिवेच्या पातळीवर अधूनमधून प्रगटतोच आणि यातुविद्येची कर्मकांडे बदलत्या स्वरूपातही कायम ठेवतो.

Story img Loader