‘देवगंधर्व’ भास्करबुवा बखले यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्ताने राजहंस प्रकाशनातर्फे ‘पुणे भारत गायन समाज : एक सुरेल स्वरयात्रा’ हे शैला मुकुंद लिखित (विशेष मार्गदर्शन- निर्मला गोगटे) पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील हा संपादित अंश..
‘किर्लोस्कर नाटक मंडळी’च्या पुढाकारानं ‘देवगंधर्व’ पं. भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ रोजी पुण्यात ‘किर्लोस्कर भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना आहे. बाजीराव रस्त्यावर शनिपाराजवळ या संस्थेची इमारत भास्करबुवांच्या स्मारकाच्या रूपात उभी आहे. त्यांच्या कार्याची, ध्येय-धोरणांची साक्ष देत संस्था आजही कार्यरत आहे. बुवांचे सहकारी, कार्यकर्ते या साऱ्यांनी अनंत अडचणींचे डोंगर पार करत ‘समाजा’तले दिवे जागते ठेवले. ही परंपरा अनेकांच्या खांद्यावरून पुढे सरकत राहिली आहे.
भास्करबुवांचं संस्थात्मक कार्य समजून घेताना पुण्यात आणि एकूणच महाराष्ट्रात त्यावेळी सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती? विचारप्रवाह कसे होते? या परिस्थितीला बाजूला ठेवून कलानिर्मिती, प्रगती, सांस्कृतिक संपन्नता याचा विचार होऊ शकत नाही. ही सर्व क्षेत्रं परस्परपूरक आहेत.
पुण्याची ओळख फार पूर्वीपासून विद्येचं माहेरघर अशी आहे. ‘१५१० सालच्या सुमाराला बंगालमधले चैतन्य संप्रदायी महाधिकारी संत चैतन्यप्रभू पुण्यात आले होते. त्यांच्या मनावर पुण्यातील विद्वानांची, वेदपठणाची, भागवत धर्माची आणि वेदविद्येची इतकी छाप पडली, की त्यांनी पुण्याला ‘पूर्णग्राम’ हे नामाभिधान दिलं..’ असं त्यांचे परमशिष्य गोविंददास यांनी लिहून ठेवलं आहे. नंतरच्या काळात ‘पुण्यासारखे शहर चहूमुलखी नाही’, ‘पुणे शहर अमोलिक’ असे पोवाडे शाहिरांनी गायले.
सांस्कृतिक वातावरण
शाहिरी काव्यगायनानं काही प्रमाणात त्याकाळी करमणूक केली तरी सर्वसामान्य माणसाला पूर्वापार चालत आलेल्या धर्मसंस्कृतीत, भक्तिमार्गातच आपले विरंगुळ्याचे क्षण मिळत राहिले. यामध्ये कीर्तनकारांनी फार मोठी भूमिका बजावलेली दिसते. देवळादेवळांतून ‘ध्रुपद गायक’ आपली गायनसेवा रूजू करत असत. तेही संस्कार भाविकांवर होत होते. यातून संगीताची आवड सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण व्हायला फार मोठी मदत झाली. याबरोबरच समाजातील सरदार, प्रतिष्ठित मंडळींच्या घरच्या सण-उत्सवांमध्येही मोठे गायक हजेरी लावत असत. असं हे धार्मिक, सांस्कृतिक वातावरण केवळ पुण्यात होतं असं नव्हे, तर कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात होतं.
अशा परिस्थितीत शास्त्रीय संगीताचा प्रसार करणं म्हणजे ‘कानसेन’ तयार करणं, अभिजन वर्गापासून बहुजनांपर्यंत या गायनाची गोडी निर्माण करणं, ही अवघड कामगिरी (भास्कर)बुवा आणि त्यांच्या समकालीन गायकांसमोर होती. कलावंत घडवण्यासाठी संगीत शाळा, विद्यालये, संस्थांची आवश्यकता तेव्हाच्या द्रष्टय़ा गुरुवर्यानी ओळखली होती. या प्रयत्नांतून फार मोठे कलावंत निर्माण झाले नाहीत तरी जाणकार श्रोते तयार होऊ शकतील, हा विचार त्यामध्ये होता.
संगीत शिक्षणाचा (महाराष्ट्रातील) सर्वप्रथम सुसंघटित यशस्वी प्रयत्न झाला तो पुण्यामध्ये. तीन ऑक्टोबर १८७४ रोजी ‘पुणे गायन समाजा’ची स्थापना सरदार नातू यांच्या शनिवार पेठेतील वाडय़ात झाली. संगीताच्या प्रसारासाठी व शिक्षणासाठी १८८३ मध्ये ‘करवीर गायन समाजा’ची स्थापना कोल्हापुरात झाली. १८९३ मध्ये ‘देवल क्लब’ स्थापन झाला. त्यानंतर या दोन्ही संस्था एकत्रितपणे ‘देवल क्लब’ या नावानं काम करू लागल्या.
पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी पाच मे १९०१ रोजी लाहोर इथं ‘गांधर्व महाविद्यालया’ची स्थापना केली. पुढे मुंबईत १९०८ साली दुसरी शाखा सुरू झाली. याच वर्षी गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांच्या शुभ हस्ते वसंतराव बोंडसे यांच्या भाडय़ाच्या जागेत ‘ट्रिनिटी क्लब- त्रिमूर्ती मंडळा’ची स्थापना झाली. ‘श्रीगुरू समर्थ गायन-वादन विद्यालया’ची स्थापना १९०९ साली ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अनंत मनोहर जोशी (अंतुबुवा) यांनी मुंबईत केली. ‘किराणा’ घराण्याचे आद्य प्रवर्तक खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांनी १९१० साली बेळगाव इथं ‘आर्य संगीत विद्यालया’ची स्थापना केली. १९१२ साली या विद्यालयाचं स्थलांतर पुण्यात झालं. (१९१३ असाही उल्लेख आहे.) पुण्यात आजही या संस्थेत शिक्षणाचं कार्य चालू आहे. आता ‘सवाई गंधर्व संगीत महाविद्यालय’ या नावानं संस्था कार्यरत आहे.
पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी १९१६ साली बडोदा संस्थानचे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय संगीत परिषद भरवली. ही परिषद यशस्वी झाल्यानंतर त्यांनी दिल्ली, बनारस आणि लखनौ या ठिकाणीही अशा परिषदा भरवल्या. या सर्व परिषदांमध्ये संगीतासाठी एक पद्धतशीर शिक्षण पद्धती अमलात आली पाहिजे, हे सर्व विद्वानांना पटलं. त्यातूनच बडोद्यात १९१७ साली सयाजीराव महाराजांच्या सर्वतोपरी मदतीनं संगीत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. सप्टेंबर १९२६ मध्ये ‘दि मॉरिस कॉलेज ऑफ इंडियन म्युझिक’ या संगीताच्या पहिल्या विश्वविद्यालयाची स्थापना लखनौ इथं झाली. भातखंडे आणि नामदार राजा नबाब अली खान या दोघा प्रमुख संगीतज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग म्हणून ‘मॉरिस कॉलेज’ची स्थापना करण्यात आली.
विविध माध्यमांतून त्या काळात शिक्षणाची चळवळ सुरू झाली होती. इंग्रजी शिक्षणातून प्रगत सामाजिक विचारांचे वारे महाराष्ट्रात फिरत होते. त्याचा परिणाम म्हणून बंद सामाजिक दरवाजे खुले होऊ लागले. उघडताना ते करकरले, कुरकुरले. पण त्या झरोक्यातून ज्ञानाचा प्रकाश आत येऊ लागला. शिक्षणाची चळवळ मूळ धरू लागली. १८४८ साली पुण्यात भिडे यांच्या वाडय़ात महात्मा जोतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. सावित्रीबाई, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे.. अशा स्त्री-सुधारकांची यासंदर्भातली कामगिरी मोलाची आहे.
जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे अशा द्रष्टय़ा विचारवंतांनी स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेतला. इंग्रजी शिक्षणामुळे रूढी, परंपरा, अंधश्रद्धा अशा जोखडांत अडकलेल्या समाजासमोर नवं, उदारमतवादी विचारांचं आव्हान उभं राहिलं. गोपाळराव आगरकरांनी सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘सुधारक’मधून रूढी, परंपरांवर आसूड ओढायला सुरुवात केली.
या पार्श्वभूमीवर १८७८ मध्ये ‘लोकहितवादी’ (गोपाळ हरि देशमुख) आणि न्यायमूर्ती रानडे यांनी पहिलं ग्रंथकार संमेलन पुण्यात हिराबागेत भरवलं. या संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्तीच होते. (१९०६ साली) चौथ्या ग्रंथकार संमेलनाच्या समारोपप्रसंगी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना झाली. या घटना पाहता महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीचं पाठबळ या साहित्यिक, वैचारिक प्रगतीला फार मोठय़ा प्रमाणात मिळालं असं दिसून येतं.
पुण्यातील शैक्षणिक, वैचारिक मंथनाच्या काळातच नाटय़ाचार्य अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्यात ‘आनंदोद्भव’ नाटय़गृहात ‘संगीत शाकुंतल’ नाटकाचा शुभारंभ केला आणि संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून ‘संगीत रंगभूमी’ ही ‘महाराष्ट्राची कला’ म्हणून ओळखली जाऊ लागली. कलावंत आणि श्रोते-प्रेक्षकांच्या साद-प्रतिसादाच्या नात्यातून संगीत रंगभूमी आपलं वैभवी रूप प्रकट करू पाहत होती. त्याचं फलित म्हणजे ‘नाटय़संगीत’! ठुमरी, दादरा, गज़्ल या संगीतप्रकारांप्रमाणे एक नवीन नाटय़ानुकूल गायकीचा प्रकार महाराष्ट्रात रूढ होत होता. महाराष्ट्रात संगीत नाटकांमुळे राग-संगीताला मोठय़ा प्रमाणात लोकाश्रय मिळाला.
‘किर्लोस्कर भारत गायन समाजा’ची स्थापना
संस्था स्थापन झाली ती एका क्लेशदायक घटनेमुळे. त्याचं असं झालं- नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित ‘संगीत मानापमान’ हे नाटक ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’नं १२ मार्च १९११ रोजी रंगभूमीवर सादर केलं. शुभारंभाच्या प्रयोगापासूनच या नाटकाला अमाप लोकप्रियता मिळाली. या नाटकाचं संगीत पं. गोविंदराव टेंबे यांचं होतं. परंतु या नाटकातील ‘धैर्यधरा’ची पदं गुरूवर्य भास्करबुवांनी बसवून घेतली होती व त्यातील काही पदांच्या चालीही बुवांच्याच होत्या. ‘धैर्यधरा’ची भूमिका ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’चे मालक व ज्येष्ठ गायक-अभिनेते नानासाहेब जोगळेकर करत होते.
सातव्या नाटय़संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी ‘धैर्यधरा’च्या पदांवर टीका केली. ‘धिक्कार मन साहिना’ या जोगळेकरांनी गायलेल्या पदाचं उदाहरण घेऊन त्यांनी त्याची खिल्ली उडवली. या जाहीर टीकेमुळे जोगळेकर संतप्त झाले. त्यांनी पलुस्करांच्या ‘गांधर्व महाविद्यालया’शी असलेले आपले संबंध तोडून टाकले. तोपर्यंत ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’तील नवीन गायक मुलं ‘गांधर्व महाविद्यालया’त शिकायला जात असत. जोगळेकरांनी भास्करबुवांना नवी संस्था स्थापन करण्याची गळ घातली आणि ‘किर्लोस्कर भारत गायन समाज’ ही संस्था स्थापना झाली. (पुढे ही संस्था ‘भारत गायन समाज’ आणि त्यानंतर ‘पुणे भारत गायन समाज’ या नावानं आजतागायत कार्यरत आहे. या घटनेनंतरही या दोन्ही पंडितांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते. दोघेही एकमेकांची योग्यता जाणून होते.)
‘पुणे भारत गायन समाज’ ही महाराष्ट्राच्या संगीतविश्वातील एक प्रमुख संस्था आहे आणि म्हणून या संस्थेचा इतिहासवजा प्रवासही महाराष्ट्राच्या सांगीतिक वाटचालीचा काही प्रमाणात दस्तावेज आहे.
संस्थास्थापनेसाठी घटना घडली ती अत्यंत तात्कालिक होती. घटना केवळ निमित्तमात्र ठरली. परंतु एखाद्या तात्कालिक घटनेतून चमत्कार वाटावा असा वैभवशाली सांगीतिक इतिहास निर्माण होण्याचा शुभयोग संस्थेच्या कुंडलीत लिहिला होता. कारण कुंडलीतला एक जबरदस्त ग्रह होता– ‘भास्करबुवा बखले.’
आगामी: संगीत शिक्षणाची पंढरी
'देवगंधर्व’ भास्करबुवा बखले यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्ताने राजहंस प्रकाशनातर्फे ‘पुणे भारत गायन समाज : एक सुरेल स्वरयात्रा’ हे शैला मुकुंद लिखित (विशेष मार्गदर्शन- निर्मला गोगटे) पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील हा संपादित अंश..
Written by लोकसत्ता टीम
First published on: 17-04-2022 at 00:05 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming music education pandhari devgandharva bhaskarbuva bakhle rajhans prakashan kirloskar bharat gayan samaj amy