माणसे सुखाच्या शोधात असतात. माणसे आनंद कुठे मिळेल हे पाहात असतात. काहींना भौतिक आणि ऐहिक सुखे हवी असतात. काहींचे हे मिळूनही समाधान होत नाही. त्यांना मानसिक, भावनिक, वैचारिक आनंद देणारे काहीतरी हवे असते. अशा आनंदासाठी स्वत:च लेखक, कवी, कलावंत असण्याची गरज नसते. निर्मितीपेक्षा निर्मितीचा आस्वाद त्यांच्या आयुष्यात आनंदाची झुळूक बनून येतो. मग ते लिहित नसले तरी वाचतात, गात नसले तरी ऐकतात, काही सादर करीत नसले तरी पाहतात. या आपल्या अवतीभोवतीच्या माणसांनी त्यांच्या त्यांच्यापुरते एक सुखाचे तळे शोधलेले असते. त्या तळय़ाकाठी ते ‘मग्न’ होतात. नाटक, चित्रपटसंगीत, साहित्य, क्रीडा, व्याख्याने, रांगोळी, आकाशदिवे, कुणाला गुपचूप आर्थिक मदत, कुठे श्रमसेवा, अशा अनेक गोष्टी त्यांना सुखावतात. अर्थात, मनोमन!
भाषेच्या संदर्भात बोलायचे तर आपल्या मराठी समाजात असे हजारो लोक आहेत जे उर्दू शायरीवर प्रेम करतात. त्यांचा गट म्हणावा, असे नाही. ते विखुरलेले असतात, पण ते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांना भेटतात, एकमेकांना नव्याने त्यांना सापडलेले शेर ऐकवतात. त्यातील अवघड शब्दांचे अर्थ अतीव आनंदाने एकमेकांना सांगतात. आपापल्या प्रिय शायराची बाजू घेऊन भांडतात. शायरांच्या आयुष्यातील किस्से, आख्यायिका हळू आवाजात सांगतात आणि समोरचा जेव्हा आपण न ऐकलेली गज़्‍ाल ऐकवतो तेव्हा बालसुलभ कुतूहल कानात घेऊन ऐकतात तेव्हा तो माहौल पाहण्यासारखा असतो.
वही है मर्कज़्‍ो काबा,
वही है राहे बुतखाना
जहाँ दीवाने दो मिलकर
सनम की बात करते हैं
मराठी माणसांना जी हिंदी येते, तिचे श्रेय हिंदी चित्रपटांना जाते. मराठी विद्वानांना जेवढी इंग्रजी येते तेवढी हिंदी येत नाही. आपली नेतेमंडळी जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा त्यांची तारांबळ आणि हिंदीची होणारी दुर्दशा अगदी पाहवत नाही. मग उर्दू तर उच्चारणाच्या बाबतीत काटेकोर आणि सोवळेपण जपणारी भाषा!
तरीही उर्दूचे आकर्षण प्रचंड. पूर्वी आकाशवाणीवरून उर्दूतून बातम्या ऐकताना ‘हिंदोस्ताँ के वजम्ीरे आलम जनाब नेहरूने पाकिस्तान के वजम्ीरे दाखला से कश्मीर के मुआमिलात में..’ असं काही ऐकताना भाषा कळूनही वाटायचे की, काहीतरी गंभीर आणि महत्त्वाचे घडते आहे. उर्दूचे शब्द, तिचा लहेजा, भाषेची अदब, तिची मोडणी, तिचा भारदस्तपणा आणि ‘मुगलेआजम’ आणि ‘मेरे मेहबूब’ व ‘बहुबेगम’ या ‘बोल’पटांमधून दिसून येणारी खानदानी तहजम्ीब म्हणजे संस्कृती यांनी मराठी मनावर गारुडच केले होते. त्यात शकील बदायुनी, मजरुह सुलतानपुरी, कैफी आज़्‍ामी, साहिर लुधियानवी यांसारखे  जातिवंत कवी गाणी लिहित होते. साहिर यांनी तर आपल्या मूळ कविताच थोडा बदल करून काही चित्रपटांत आणल्या. चलो इक बार फिरसे, जिन्हे नाजम् है हिन्द पर वो कहाँ है, तंग आ चुके है कश्मकशे जिंदगी से हम.. इत्यादी अन् त्यात कहर आणि कयामत म्हणजे शकील यांच्या गजम्ल गाणाऱ्या बेगम अख्तर.. मेरे हमनवास, मेरे हमनवा.
ऐकून ऐकून उर्दू कळायला लागली. आवडायला लागली. जरी ती वाचता येत नव्हती. अडसर भाषेचा नव्हता. लिपीचा होता. जिला ‘रस्मुलखत’ म्हणतात. मराठीसाठी देवनागरी, तशी उर्दू पर्शियन लिपीत लिहिली जाते. अशा वेळी उर्दू-हिंदी-मराठी या भाषाभगिनींना अधिक जवळ आणणारा एक देवदूत अवतरला. त्याचे नाव प्रकाश पंडित. हा उर्दू, उर्दू कवी आणि उर्दू कविता यांच्याशी एकरूप झालेला दिलदार विद्वान आणि रसिक. त्यांनी हिंद पॉकेट बुक्स आणि राजपाल अ‍ॅण्ड सन्स या प्रकाशकांच्या सहकार्याने उर्दू शायरी देवनागरी लिपीत उपलब्ध करून देण्याचे जणू धर्मकार्यच हाती घेतले. ती पुस्तकेही स्वस्त आणि रसिकांसाठी इंद्रधनुषी आकाशच खुले झाले. पुढे १९६८च्या आसपास श्रीपाद जोशी यांनी प्रा. एन. एस. गोरेकर यांच्या साहाय्याने उर्दू-मराठी शब्दकोश (सुमारे २५ हजार शब्दांचा) तयार केला. तो महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. (हे मंडळ त्या काळी खूप चांगली कामे करीत असे, असे दिसते.)
जसे पक्षिनिरीक्षक वा पक्षिप्रेमी असतात. त्यांना त्यांचे कार्य इतके प्रिय असते की ते तल्लीन होऊन आनंद उपभोगतात. संख्येने कमी असतात, पण एखादा नवीन पक्षी त्यांच्या परिसरात दिसला की ते हर्षोत्साहित होऊन आपल्या पक्षिमित्र नावाच्या जमातीतील सदस्याला कळवतात. उर्दूप्रेमी यह एक जमात है। उर्दू शायरी हे त्यांच्यासाठी आनंदनिधान आहे. लिपीचा प्रश्न सुटला आणि आनंद आणि संवादाला उधाण आले. उर्दूच्या भाषिक संस्कार आणि प्रभावाचे सूक्ष्म परिणाम मराठी कवितेवरही दिसतात. हा काही अनुकरणाचा प्रकार नाही. पण मनात रुजलेल्या भाषिक मोडणीची आणि आशयाची सावली हलताना दिसावी अशी अभिव्यक्ती दिसून येते. एक उदाहरण सहज आठवते. बहादूरशाह जफर यांच्या गज़्‍ालेतील प्रसिद्ध शेर असा आहे-
उम्रे दराज माँग कर लाये थे चार दिन
दो आरजू में कट गए, दो इंतजमर में
सर्वसामान्य माणसापासून विद्वानापर्यंत सर्वावर मोहिनी घालणारा, बादशाहने लिहिलेला हा बादशाही शेर. याचा असर मार्क्‍सवादी नारायण सुर्वे यांच्या कवितेत असा उमटला-
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले आणि रोमँटिक कवी अनिल यांच्या ‘दशपदी’मध्ये हा शेर असा डोकावला.
दोन दिवस आराधनेत, दोन प्रतीक्षेत गेले.
उर्दू कवितेत अनेक प्रकार आहेत. पण राज्ञीपद मिरवते ती गजम्ल. गजम्ल, रुबाई, कतआ, नात, सेहरा, पैगंबरासाठी कसीदा आणि ईश्वरासाठी हंद, तुर्की, फारसी, अरबी यातून पुढे जनमनाजवळ  जाण्याच्या निकडीने हिंदी व तिच्या बोलीभाषा यांच्या संयोगाने तयार झाली उर्दू. तिचा जन्म इथला, या मातीतला. ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा असेल, पण उर्दूचा जन्म झाला तेव्हा पाकिस्तान हिंदुस्थानातच होते. सिकंदर अली वज्द यांचा एक गोड शेर आहे-
वज्द उर्दू की आबरू है गजम्ल
ये नवाजिम्श मेरे वतन की हैं
आजही अनेकांच्या मनात असा समज आहे की उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे. भाषा कशी काय एखाद्या जातीच्या, समूहाच्या किंवा धर्माच्या मालकीची असू शकते? पण ज्यांना धर्माचा व भाषेचा वापर राजकारणासाठी वा सत्तेसाठी वा वर्चस्वासाठी करायचा आहे त्यांना हा समज कायम ठेवणे वा पसरविणे आवश्यक वाटत असावे. निदा फाजली हे काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला मुशायऱ्यानिमित्त जाऊन आले. त्यांनी दिलेले उत्तर वरील प्रवृत्तींसाठीच आहे असे वाटते-
इन्सान में हैवान यहाँ भी है वहाँ भी
अल्लाह निगेहबान यहाँ भी है वहाँ भी
हिंदू भी मजे में हे मुसलमान भी मजे में
इन्सान परेशान यहाँ भी है वहाँ भी
उर्दूला मुसलमानांची भाषा मानणाऱ्यांनी हेही जाणून घ्यावे की उर्दू कविता समृद्ध करणाऱ्यांमध्ये या हिंदोस्तानी (हिंदू म्हणता?) कवींचे योगदान खूप मोठे आहे. जगन्नाथ आजमद, अर्श, मल्सियानी, पं. बृजनारायण चकबस्त लखनवी, किशनचंद जेम्बा, पं. चंद्रिकाप्रसाद, कन्हैयालाल साकिब, मुन्शी गौरीशंकर अख्तर, रामप्रसाद बिस्मिल (तेच हे, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है लिहिणारे) आणि उर्दूला पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारे फिराक गोरखपुरी यांचे नाव रघुपती सहाय होते हे अनेकांना ठावे नसेल आणि नरेशकुमार शाद यांना तर कतआ या प्रकारात कमाल उंची गाठणारा कवी म्हणून समग्र उर्दूजगताने गौरविले. (आजच्या हिंदी सिनेमावाल्यांनी मोडतोड केलेल्या शाद यांच्या कतआतील मूळ (वास्तववादी!) ओळी अशा-
जिसे देखकर मेरे जेहन में
आतिशे इश्क ये भडकी है
तेरी जन्नत की कोई हूर नहीं
मेरे दफ्तर की एक लडकी है
मराठीचे सुदैव असे, की आधुनिक काळात तिला ‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा,’ असे म्हणणारा आणि ‘जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत’ असा घोष करणारा केशवसुतांसारखा कवी लाभला. उर्दूजगतातही फिराक यांना हिंदू म्हणून कोणी ज्ञानपीठ मिळविल्यावर हिणविले नाही.
खरेतर धर्मापेक्षा संस्कृती महत्त्वाची. अनेक धर्मामध्ये फरक दिसतो, पण कर्मकांडाच्या बाबतीत. संस्कृती-मूल्ये आणि जीवनरीत यांच्याशी संबंधित असते म्हणून समानता दिसते. राष्ट्र, राष्ट्रीय जीवन, सामाजिक एकोपा याबाबतीत बोलणे हा उर्दू कवितेचा स्वभावच आहे. परिवर्तन, बदल या म्हणायचे तर ज्या संस्कृतीची पाळेमुळे अधिक प्राचीन असतात, तिच्यात बदल व्हायला उशीर लागतो. पण बदल होतो. निश्चितपणे होतो. सुदर्शन फाकिर जेव्हा म्हणतात,
जिसको देखो उसे लोग बुरा कहते है
और जिसको देखा भी नहीं उसको खुदा कहते है
तेव्हा बदलाची चुणूक जाणवते आणि परवीन शाकिरसारखी नव्या युगाची शायरा जेव्हा सुनावते-
तलाक दे तो रहे हो कहर के साथ
मेरा शबाब भी लौटा दो मेहेर के साथ
तेव्हा बदलाबाबत खात्रीच पटते.
पाकिस्तानातील उर्दू कवितेची मुळे तपासताना तेथील एक समीक्षक सैयद मुजफ्फरअली यांनी असे लिहिले आहे, की ‘हम अरबियत और फारसियत में बहुत आये निकल गये हैं और उर्दू जबान के देसीपन को भूलते जा रहे हैं। यह हम पर वाजे (प्रकट) करता हैं की मीर और सौदा से पहले नानक और कबीर ने इस जबान की दागबेल डाली थी, जिसे हम आज उर्दू का नाज देते हैं।’
हा अभिप्राय वाचून मराठीतील देशीवाद्यांना आनंद होईल. भाषा जवळ आणते माणसांना. तर आजच्या दूरत्वाचा प्रचार करणाऱ्या वातावरणात उर्दू कविता समुपदेशनाचे कार्य करू शकते. अलीकडे मराठी लेखक-कवींना पुरातन आणि सनातन यांची ओढ लागली आहे आणि वैश्विकतेऐवजी कानेकोपरे आणि सांदीबोळी सुरक्षित वाटू लागल्या आहेत. अशा वेळी उर्दू कविता आणि आनंद आणि दिलासा देऊ शकते.
कोणी कवी मुस्लिम असो की पाकिस्तानातील असो, मुळांचा विसर पडत नाही. या ओळी काय दर्शवितात-
उतरी है सतहे जेम्हनपर कोई शकुन्तला
या कोई मेघदूत छुपा है घटाओं में
    – खुर्शीद अफसर बिस्वानी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतर्यामी के दर्शन को अंतज्र्ञानी जाए
सहबाजी बनवास से कोई राम नही बन पाए
    – सहबा अख्तर

आणि हे शिवाचे, भैरवाचे वर्णन करणारे नजीर अकबराबादीचे शब्द
आँखो में छा रहा है तेरा स्वरूप काला
तनमन भभूत मलकर गलबीच रुंडमाला
-कलावंत धर्म, जात, प्रांत ओलांडून जाण्याचे साहस दाखवितो तो असा. इथे कट्टरता, दुराग्रह यांना प्रवेश नसतो. हे असते आनंदाचे आवार. इथे आले की मालिन्य आणि काठिण्य गळून पडते. पाकिस्तानमधील नामवंत कवी जान एलिया यांची व्याकूळ अवस्था कशामुळे झाली आहे, हे आपल्याला आतून जाणवले तर आपल्यालाही प्रतिसाद द्यावासा वाटेल.
वह कहकशाँ वह राहगुजर देखने चलो
जान, एक उम्र हो गयी, घर देखने चलो
जौहर है अपनो रूहका हिंदोस्तां की खाक
अकसीर है वह खाक असर देखने चलो
अकोल्याचे शायर अन्वर नश्तर कुरैशी यांच्या बहिणीला आणि जावयाला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. जाताना बऱ्याच भेटवस्तू घेऊन गेले. ते नातेवाईक सुन्नपणे त्या भेटींकडे पाहातच राहिले. कुरैशी घाबरून म्हणाले, ‘क्या हुआ, आपको पसंद नही आया?’ तेव्हा मूळचे अकोल्याचे आणि पाकिस्तानात उच्च सरकारी पदावर असलेले त्यांचे जावई म्हणाले, ‘इन सब चीजों की बजाय, अन्वरभाई, आप अकोला के जमीन की मुठ्ठीभर धूल लाते तो हम आपके एहेसानमंद रहते..’
अकोल्यात एक-दोन उर्दू शाळांमध्ये सेकंड लँग्वेज म्हणून हिन्दीऐवजी मराठी शिकवली जाते. मराठी मुले-मुली तिथे शिकविण्यासाठी जातात. इंग्रजी, मराठी, उर्दू असे त्रभाषिक सूत्र आहे. आपण काय करावे? एका गाण्यात सांगितल्याप्रमाणे करावे-
दो कदम तुम भी चलो
दो कदम हम भी चले
म्हणजे दिव्याने दिवा लावावा. अत्तदीप. आतला दिवा महत्त्वाचा. तो अनेकांच्या मनात उजळला की समजावे, आली माझ्या घरी ही दिवाळी..!

अंतर्यामी के दर्शन को अंतज्र्ञानी जाए
सहबाजी बनवास से कोई राम नही बन पाए
    – सहबा अख्तर

आणि हे शिवाचे, भैरवाचे वर्णन करणारे नजीर अकबराबादीचे शब्द
आँखो में छा रहा है तेरा स्वरूप काला
तनमन भभूत मलकर गलबीच रुंडमाला
-कलावंत धर्म, जात, प्रांत ओलांडून जाण्याचे साहस दाखवितो तो असा. इथे कट्टरता, दुराग्रह यांना प्रवेश नसतो. हे असते आनंदाचे आवार. इथे आले की मालिन्य आणि काठिण्य गळून पडते. पाकिस्तानमधील नामवंत कवी जान एलिया यांची व्याकूळ अवस्था कशामुळे झाली आहे, हे आपल्याला आतून जाणवले तर आपल्यालाही प्रतिसाद द्यावासा वाटेल.
वह कहकशाँ वह राहगुजर देखने चलो
जान, एक उम्र हो गयी, घर देखने चलो
जौहर है अपनो रूहका हिंदोस्तां की खाक
अकसीर है वह खाक असर देखने चलो
अकोल्याचे शायर अन्वर नश्तर कुरैशी यांच्या बहिणीला आणि जावयाला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. जाताना बऱ्याच भेटवस्तू घेऊन गेले. ते नातेवाईक सुन्नपणे त्या भेटींकडे पाहातच राहिले. कुरैशी घाबरून म्हणाले, ‘क्या हुआ, आपको पसंद नही आया?’ तेव्हा मूळचे अकोल्याचे आणि पाकिस्तानात उच्च सरकारी पदावर असलेले त्यांचे जावई म्हणाले, ‘इन सब चीजों की बजाय, अन्वरभाई, आप अकोला के जमीन की मुठ्ठीभर धूल लाते तो हम आपके एहेसानमंद रहते..’
अकोल्यात एक-दोन उर्दू शाळांमध्ये सेकंड लँग्वेज म्हणून हिन्दीऐवजी मराठी शिकवली जाते. मराठी मुले-मुली तिथे शिकविण्यासाठी जातात. इंग्रजी, मराठी, उर्दू असे त्रभाषिक सूत्र आहे. आपण काय करावे? एका गाण्यात सांगितल्याप्रमाणे करावे-
दो कदम तुम भी चलो
दो कदम हम भी चले
म्हणजे दिव्याने दिवा लावावा. अत्तदीप. आतला दिवा महत्त्वाचा. तो अनेकांच्या मनात उजळला की समजावे, आली माझ्या घरी ही दिवाळी..!