आजच्या घडीला अमेरिकी अध्यक्षांचे प्राधान्य आहे ते पेंटॅगॉनवर पूर्ण ताबा मिळविण्याचे. त्याला कारणही तसेच झाले आहे. युक्रेनमध्ये पुरवलेले ड्रोन्स निष्प्रभ आणि कालबाह्य असल्याचे लक्षात आल्यावर पेंटॅगॉनच्या आणि व्हाइट हाऊसच्या पायाखालील जमीन हादरली आहे. कदाचित म्हणूनच ट्रम्प हे पुतिन यांच्याशी सतत संपर्क ठेवून आहेत. शिष्टमंडळे पाठवीत आहेत. कदाचित तहाची बोलणी करण्यासाठी. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी की माघार घेण्यासाठी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉ शिंग्टन डीसी येथील पेंटॅगॉन या पंचकोनी इमारतीतून अमेरिकेची युद्धनीती ठरविली जाते. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ या ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या नांदीत म्हटल्याप्रमाणे पेंटॅगॉनचा गळ्यात कवठ्या धारण करणाऱ्या शिवासारखा विक्राळ दरारा आहे. अमेरिकन आक्रमक संरक्षण व्यवस्थेचे हे मुख्यालय आहे. आपल्याकडे महालक्ष्मीची जशी तीन रूपे आहेत, त्याप्रमाणे – १- काली म्हणजे पेंटॅगॉन,२- लक्ष्मी म्हणजे ‘फेड’ ३- आणि सरस्वती म्हणजे आय.व्ही.लीग विद्यापीठे. पेंटॅगॉन कालीसारखा संहार करतो, ‘फेड’ लक्ष्मीसारखी धनदौलत सांभाळते, उभी करते आणि आय. व्ही. लीग विद्यापीठे सरस्वतीसारखे ज्ञानार्जन-संशोधन करतात. या तिघी एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली तर देशाचे सर्वार्थाने हित जपतात.

सध्या नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उत्साहाचे उधाण आले आहे. त्याचे कारण आहे त्यांचे मित्र इलॉन मस्क! मस्क यांच्या सर्व क्षेत्रातील हस्तक्षेपामुळे अमेरिकन जनता नाराज आहे. ‘अध्यक्ष कोण? ट्रम्प की मस्क?’ असे लिहिलेले बोर्ड घेऊन लोक रस्त्यावर उतरले आहेत. मस्क यांनी तर नवीन योजनांचा धडाका लावला आहे. त्यांची ‘टेस्ला’ ही विजेवर चालणारी मोटार सुरुवातीला अल्पावधीतच लोकप्रिय झाली. पण कालांतराने या इलेक्ट्रिक मोटरवर चालणाऱ्या गाडीची लोकप्रियता उतरू लागली. मस्क यांची स्वत:ची प्रतिमाही मलीन होऊ लागली आहे. ३० टक्के अनुदान मिळूनही टेस्लाने अजून मूळ धरलेले नाही. त्याच्या मॉडेल ३ ला (सर्वात छोटी) वर्षभराच्या वापरासाठी जवळजवळ ४.५ लाख रुपये (५१८०.५२ डॉलर) एवढा खर्च येतो. जानेवारी २०२३ ला टेस्लाचा अमेरिकेतील मार्केट शेअर ५ टक्के होता. तो आता घसरू लागला आहे. सुरुवातीला टेस्ला घेणाऱ्यांमध्ये जी अहमहमिका होती ती आपण किती पर्यावरणप्रेमी आहोत, हे दाखवण्याची. हे एक कारण झाले. बॅटरीचे वय संपल्यानंतर मग त्या भंगार झालेल्या बॅटरीचे करायचे काय, हा प्रश्न उरतोच. बॅटरी नष्ट करताना प्रदूषण हे होतेच.

अनेक दशके भगीरथ प्रयत्न करून इलेक्ट्रिक मोटार बनवण्याची परवानगी अमेरिकेत कोणाला मिळत नव्हती. तेलाची लॉबी ती मिळू देत नव्हती. मस्क यांनी असे काय केले, ज्यामुळे त्यांना ही परवानगी अमेरिकन सरकारकडून मिळाली? कारण तसे पाहता त्यांच्या ‘टेस्ला’ या इलेक्ट्रिक मोटारीमध्ये नवे आणि विशेष असे तंत्रज्ञान काही नाही. मग मस्क यांची अशी काय जादू होती की त्यांना ही परवानगी मिळाली.

मंगळ ग्रहावर वस्ती निर्माण करण्यासाठी ‘स्पेस एक्स’ या अंतराळ प्रवास कंपनीची स्थापना मस्क यांनी केली. पण २००८ साली ही कंपनी दिवाळखोरीत गेली. मात्र नंतर बाहेरून भांडवल आणल्यामुळे ती फायद्यात चालली आहे असे दिसते.

मस्क यांनी ‘ट्विटर’ ही मीडिया अॅप कंपनी बऱ्याच चढ्या दराने खरेदी केली. त्यानंतर मस्क यांच्या व्यवस्थापन हाताळण्याच्या कठोर पद्धतीने (स्टाइल) बरेच कर्मचारी ‘ट्विटर’ सोडून गेले. ‘ट्विटर’चा शेअरही उतरला. तेव्हा मस्कने ‘ट्विटर’वर जाहिराती घ्यायला सुरुवात केली. यामुळे ग्राहक आणखी बिथरले. एकंदरीत मस्क यांचा कारभार हा धरसोड वृत्तीचा दिसतो. जनमानसातील त्यांची प्रतिमाही बदलत चाललेली दिसते. तरीपण काही पत्रकारांचे असे भाकीत आहे की, मस्क हे अमेरिकेचे भावी अध्यक्ष होऊ शकतात.

अमेरिकेच्या फेडरल गव्हर्नमेंटमध्ये मस्क यांनी ढवळाढवळ करून सगळीकडून रोष ओढवून घेतला होता. तरी मस्क यांनी पुन्हा ट्रम्प यांच्या आशीर्वादाने फेडरल ब्युरोक्रसीमध्ये ढवळाढवळ केली. DOGE ( Department of Government Efficiency) ही नोकर कपातीची योजना राबवली. परंतु त्यांच्या या ‘मस्कगिरी’कडे डोळेझाक केली गेली. त्याचप्रमाणे USAID (युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेण्ट) बंद करण्याचा ट्रम्प यांचा धाडसी इरादा होता. त्याचे विरोधी पडसाद जगभर उमटले. तसेच अमेरिकन नोकरशाहीबरोबर ( HILL, Capitol Hill) घेतलेले वैर ट्रम्प यांना महागात पडले. तीच गोष्ट फेडरल रिझर्व्ह बँकेची.

‘फेड’च्या बाबतीत दोन दशकांपासून चर्चेत असलेला मॉनिटरी पॉलिसी ऑडिटचा जुना विषय त्यांनी पुन्हा उकरून काढला. सोशल मीडियावर लाखो पोस्ट टाकून ‘फेड’चे ऑडिट व्हावे, असा घोशा त्यांनी लावला. ‘फेड’च्या मॉनिटरी पॉलिसीवर अशा प्रकारचे ऑडिट लादणे हे अमेरिकन सरकारला परवडणारे नव्हते आणि ‘फेड’वर ऑडिटविषयक अशी टीका अनेक दशके होत आली आहे, त्यात नवीन काही नाही. शेवटी ही फक्त एक स्टंटबाजी ठरली. ‘फेड’च्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाल्यास अमेरिकेच्या अर्थस्वातंत्र्याला ते धोकादायक ठरेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वर उल्लेखिलेल्या तीन देवींपैकी सरस्वती- आय. व्ही. लीग विद्यापीठे ही एकतर बव्हंशी सत्तेच्या कलाने घेतील, मात्र तेथील जेफ्री सॅक्ससारख्या विचारधारा पक्की असलेल्या प्राध्यापकांची मते बदलणे कठीण! त्यांच्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करतील, म्हणून आर्जवाने सरस्वतीची दखल घेण्याची गरज छोट्या पल्ल्याच्या काळात राजकारण्यांना नसते. उरलेल्या दोन देवींवर मात्र ट्रम्प आणि मस्क यांनी जनक्षोभाला न जुमानता हल्ला चढवला आहे.

अमेरिकेचा संरक्षण सामुग्री पुरवठा विभाग काही मोजक्या लोकांनी हातात घेतला आहे आणि ते ‘कार्टेल’ करून एकाधिकारशाही गाजवत आहेत. या कार्टेलमध्ये मुख्यत्वे पाच कंपन्या आहेत, Lockheed Martin, Boeing, RTX, Northrop Grumman U General Dynamics. पेंटॅगॉनचा ८६ टक्के धंदा या कंपन्या एकमेकांच्या साथ-संगतीने गिळंकृत करत आहेत, त्यामुळे त्या पेंटॅगॉनवर ताबा ठेवून आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या क्षमतेला त्यामुळे खीळ बसू शकते.

अमेरिकेत युद्धनौका, महाकाय विमानवाहू नौका यांच्या निर्मितीचा खर्च जपान किंवा द. कोरियापेक्षा खूपच अधिक आहे. त्यांचा वापर कमी करून ‘एआय’युक्त क्षेपणास्त्रे आणि पाणबुड्यांचा वापर युद्धात करणे स्वस्त पडेल, असे मस्क सांगतात.

ऑगस्ट २०२३ साली ‘रेप्लिकेटर’ ( Replicator) हा हजारो ड्रोन्स खरेदीचा कार्यक्रम राबवण्यासाठी पेंटॅगॉनने एकूण बजेटच्या फक्त ०.५ टक्के अधिक खर्च संरक्षण अंदाजपत्रकात मांडला होता. हा वाढीव खर्च (बिल) मान्य करून घेण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांच्या जवळजवळ ४० वादळी बैठका घ्याव्या लागल्या. यावरून लक्षात येते की, संरक्षण या विषयात नव्या गोष्टी करणे हे किती दुरापास्त आहे. तरीही अमेरिकेची तंत्रकुशलता आणि नवनिर्माण करण्याची क्षमता ही अमेरिकेचे सैनिक गुंतागुतीच्या डिफेन्स बजेटसारख्या अडसरांकडे डोळेझाक करून मनापासून राबवताना दिसतात, असे निरिक्षण सांगते.

मार्क मिले ( Mark Milley) हे अमेरिकेतील वयाने सर्वात ज्येष्ठ सैनिक! ते असे म्हणतात की, मिलिटरीची मशिनरी आता नवीन डिजिटल तंत्रामुळे चार वर्षांत कालबाह्य होते. नवीन यंत्रसामुग्री घेण्यासाठी पुन्हा सगळे अडसर आणि लाल फितीचा कारभार पार करावा लागतो. यात खूप वेळ वाया जातो. एरिक श्मिट ( Eric Schmidt) या गूगलच्या पूर्वाश्रमीच्या सीईओने गेल्या वर्षी लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे की, अमेरिकन कंपन्या या सर्वोत्कृष्ट ‘एआय’ यंत्रणा बनवतात. परंतु अमेरिकन सैनिक त्या जाणून घेण्यात आणि वापरण्यात अपयशी ठरतात. (हा विरोधाभास आहे.) दरमहा येणारे नवीन तंत्रज्ञान पेंटॅगॉनच्या हाती पडेपर्यंत जुने झालेले असते. याचे कारण, शेवटी लाल फितीची मानसिकता आणि या कारभारामुळे होणारा विलंब हेच आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे जोडीदार इलॉन मस्क यांनी आता या विषयात रस घेण्याचे ठरवले आहे. मात्र वर्षानुवर्षांची जुनी नोकरशाही आणि कंत्राटदारांचे ‘कार्टेल’ यांना तोंड देणे अध्यक्षांनासुद्धा कठीण जाणार आहे. पण मस्क लॉबीचे असे म्हणणे आहे की, या महाकाय विमानवाहू नौका, प्रचंड मोठी कार्गो विमाने, बॉम्बर जेट्स आणि F-35 सारखी लढाऊ विमाने यांचा वापर आता कालबाह्य झाला आहे. त्याऐवजी ‘एआय’वर आधारलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे ( ICBM – Intercontinental ballistic missile) हे काम अत्यंत कमी खर्चात करू शकतात. तसेच ड्रोन्सचा वापर करून F 35 सारखी खर्चीक लढाऊ विमाने बाद करता येतील. त्यावर पेंटॅगॉनचे म्हणणे असे आहे की, बॉम्बर किंवा फायटर विमाने जितक्या वजनाचे बॉम्ब आणि क्षेपणस्त्रे वाहून नेऊ शकतात तेवढे वजन ड्रोन्स वाहू शकत नाहीत. त्यामुळे फायटर विमाने आणि पायलट्सची गरज ही अजून तीस-चाळीस वर्षे तरी राहील आणि म्हणून ही विमाने बाद करता येणार नाहीत. कारण फायटर जेटसारखी जलद हालचाल (मनूव्हरिंग) ड्रोन्स करू शकत नाहीत. जी उष्णता आणि गती फायटर विमाने बाह्यांगावर झेलतात, तशी ड्रोन्स झेलू शकणार नाहीत. अशी वेळ आल्यास त्यांच्या आकाशात ठिकऱ्या उडतील आणि ते पेट घेतील. पारंपरिक शस्त्रसामग्री, विमानवाहू नौका, फायटर जेट यांना मस्क सहजासहजी कालबाह्य ठरवू शकत नाहीत आणि पर्यायाने त्यांचे Grok-3 AI chatbot तंत्रज्ञान पेंटॅगॉनला तातडीने विकू शकत नाहीत.

अमेरिकन राजकीय साहाय्यक राज शहा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील तज्ज्ञ ख्रिास्तोफर किर्चहॉफ यांनी दहा वर्षांपूर्वी Defense Innovation Unit च्या रूपाने पेंटॅगॉनच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले. युद्धनौका आणि विमानवाहू नौका बनविण्यासाठी येणारा प्रचंड खर्च पाहता हायपरसॉनिक बॅरिअर/ध्वनीच्या गतीची कक्षा तोडणारी क्षेपणास्त्रे आणि अँटीचिप क्षेपणास्त्रे वापरणे कमी खर्चाचे ठरेल, असेच या दोघांचेही म्हणणे आहे. परंतु त्यांच्या या विचारालाही पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. सॉफ्टवेअरवर आधारित इनफ्युज्ड शस्त्रे आधुनिक युद्धात कामाची नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

आजमितीस अमेरिकेच्या संरक्षणासाठी होणाऱ्या खर्चातील ८६ टक्के खर्च हा ‘कार्टेल’ला जातो. एकूण संरक्षण खर्चातील दोन तृतीयांश खर्च हा पहिल्या दहा पुरवठादारांना पेंटॅगॉन देते. चीनमध्ये हे प्रमाण फक्त ३ टक्के आहे. असे DIU चे ( Defense Innovation Unit) मायकल ब्राउन म्हणतात. ही तफावत धक्कादायक आहे. एकंदरीत पेंटॅगॉनला ‘एआय डेटा’ आणि कोडवर आधारित तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे सध्या जड जात आहे. म्हणून कदाचित त्यांनी या नवीन तंत्रज्ञानावर दोषारोप केले असावेत, अशीही शक्यता आहे.

सिलिकॉन व्हॅलीतील बड्या नवीन टेक कंपन्या आता पेंटॅगॉनच्या जवळ येऊ लागल्या आहेत. या वर्षी ४ फेब्रुवारी रोजी गूगलने त्यांची जुनी एआय टूल्स मिलिटरीसाठी न वापरण्याची पॉलिसी आता बदलली आहे आणि तिचा वापर मिलिटरीसाठी खुला केला आहे, हा मोठा बदल आहे. Open AI, Anthropic, Deep Seek तसेच Meta अशा AI मॉडेल बनवणाऱ्या कंपन्या संरक्षण उद्याोगात आता शिरल्या आहेत. पण त्यांना पेंटॅगॉनचे जुने नियम मान्य नाहीत. हा तिढा सुटेल तेव्हा सुटेल.

गेल्या दहा वर्षांत व्हेंचर कॅपिटलचा वापर संरक्षण क्षेत्रात १८ पटीने वाढला आहे. २०१४ मध्ये हा वापर ५०० मिलियन डॉलर होता, तो २०२४ मध्ये ८.७ बिलियन डॉलर एवढा झाला आहे. यावरून हाय टेक संरक्षण उद्याोगाची व्याप्ती किती झपाट्याने वाढते आणि बदलते आहे, हे ध्यानात येते.

ट्रम्प आणि मस्क (मराठीत कस्तुरी) हे या कस्तुरी धनाच्या मागे धावत असतील तर त्यात काही नवल नाही. कारण दुसऱ्या कोणी या संरक्षण खात्यातील मूलभूत बदलांवर पकड मिळवली, तर अध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी ते धोक्याचे ठरू शकते. त्यांची प्रशासनावरील पकड ढिली पडू नये म्हणून त्यांना एआय तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी प्रस्थापित पेंटॅगॉनच्या धुरीण अधिकाऱ्यांना आणि व्यवस्थेला बदलणेही कठीण आहे. या दोन्ही व्यवस्था उत्तर व दक्षिण ध्रुवासारख्या दूर आहेत. त्यात सुवर्णमध्य साधून विषुववृत्तावर येणे अध्यक्षांच्या खुर्चीत, व्हाइट हाऊसमध्ये बसून, ट्रम्प यांना अवघड जाईल, पण मस्क यांचे तसे नाही. स्वत:च्याच नाभीत असलेली कस्तुरी शोधत वणवण भटकणाऱ्या हरणाप्रमाणे Grok-3 AI chatbot सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ते धावत राहतील. बघू काय होते ते.

पेंटॅगॉनचा, आय.टी. उद्याोगांचा आणि अमेरिकन विद्यापीठांचा सततचा संपर्क तंत्र संशोधनासाठी सुरू असतो. तेव्हा विद्यापीठांकडून हा तणाव सोडवला जाण्याची शक्यता अधिक आहे. कारण नवे तंत्रज्ञान हातळण्यास सोपे (यूजर फ्रेंडली) केले तर ते (सैन्याला) सहज वापरता येईल आणि ते डायनॅमिक असेल तर होणारे बदल पचनी पाडता येतील. पण त्याला राजकीय इच्छाशक्ती-व्यापार-तंत्रज्ञान यांचा समन्वय आणि मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध झाला पाहिजे. (हीच ती कस्तुरी)! थोडक्यात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काली, लक्ष्मी आणि सरस्वती या तिघींच्या सहकार्याने हे जमणे शक्य आहे.

Jayraj3june@gmail.com