माईली सायरसचं एक नवं गाणं आलंय. ती त्यात म्हणते, ‘वी कँट स्टॉप, वी वोंट स्टॉप!’ नव्या तरण्या पिढीचं ते आक्रमक विधान आणि जरबेत गाणारी ती माईली! आणि ते गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मला खूपदा अभिराम दीक्षितच्या राजकीय लेखनाची आठवण होते. त्याच्या ब्लॉगचे हजारो वाचक आहेत. त्याच्या फेसबुक पोस्टवर वाचक अहमहमिकेने प्रतिक्रिया लिहायला सरसावतात. आणि त्याचे ते फटाकडे, तरणे शब्द ते माईली म्हणते तसेच आहेत. ते थांबणार नाहीत, थांबू शकणार नाहीत. तो उजवा आहे असं डाव्यांना वाटतं. तो डाव्यांना सरळसरळ ‘फुरोगामी’ म्हणत असल्याने त्यात काही आश्चर्य नाही. पण तो पुष्कळ उजव्यांना डावा वाटत राहतो, हेही महत्त्वाचं आहे. तो उजवीकडे, डावीकडे बघत नाही. कम्युनिस्टांवर शाब्दिक गोळ्या झाडत जेम्स बाँडसारखा तो बाइकवरून सुसाट सरळ जात राहतो. त्याचे शब्द थांबू शकत नाहीत; थांबायचा त्यांचा इरादाही नाही. ‘दे कँट स्टॉप, दे वोंट स्टॉप!’
आणि हा दुसरा राजकीय लेखन करणारा तरुण लेखक- उत्पल व. बा. त्याचं चंदावर हे आडनाव क्वचित कधी बातम्यांत वगैरे छापून आलेलं दिसतं. पण सहसा तो आडनाव न लावता लोकांसमोर येतो. हा डावा- निदान असा डाव्यांचा आणि उजव्यांचा समज असावा! तोही पठडीतलं लिहीत नाही. अभिराम ‘फुरोगामी’ असं पुरोगाम्यांना म्हणतो तसं उत्पल काही त्याच्या विरोधकांना उद्देशून म्हणत नाही. त्याचे शब्द सौम्य देह धारण करून पुढय़ात येतात. त्याचे राजकीय विचार आस्ते आस्ते लोकांसमोर लेखामागून लेख प्रसिद्ध झाल्यावर येत राहतात. अनेकांना तो गांधीवादी वाटतो, तर अनेकांना तो आणि त्याचे सौम्य शब्द वरून समाजवादी आणि आतून भांडवलशाहीवादीही वाटतात. विरोधकांनाच काय, त्याच्या वाचकांनाही मतभेद झाल्यास तो शिंगावर घेतो! इथे आयुर्वेदावरच्या त्याच्या पोस्टवर डॉ. रवींद्र थत्ते त्यांच्या गुळवेल संशोधनाचा हवाला त्याला देत आहेत. आणि तो ऐ- क- त- च नाही! उत्पल आंबेडकर जयंतीला सुरू झालेल्या रस्त्यावरच्या डीजे गोंधळावर लिहितो आणि कुणी त्याला ‘सवर्ण सौंदर्यवादी’ म्हणतं तेव्हा तो सौम्यपणे ‘थोडं विस्तृतपणे मांडाल का?’ असं त्या वाचकाला म्हणतो. पण म्हणून तो आक्रमक नाही असं समजू नका! हे दोघं उत्तम राजकीय लेखन करणारे, मला आवडणारे विरुद्धधर्मी लेखक आपल्या मताला पक्के असतात. आपल्या शैलीत आपापला मुद्दा ते पुढे रेटतात. त्या अभिरामच्या शब्दांसारखेच उत्पलचे शब्दही वरून कितीही शीतल भासले तरी थांबणारे नाहीत! दे वोंट स्टॉप, दे कँट स्टॉप!
पण चांगल्या वाचकानं मात्र थांबत थांबत राजकीय लेखन वाचायचं असतं. आपली प्रत्येकाची राजकीय भूमिका असतेच. कुणाला संघ पटतो, मोदी आवडतात. कुणी रामदास आठवले यांचे चाहते असतात. कुणाला सगळेच नेते, सगळेच राजकीय विचार हे फालतू वाटत असतात. आणि तीही वाचकांची एक राजकीय भूमिकाच असते. पण मला वाटतं, की राजकीय साहित्याला सामोरं जाताना- आणि यात मी वैचारिक आणि ललित (उदा. सिंहासन) अशा दोन्हींचा विचार करतो आहे- आपण अगदी निर्लेपपणे नाही, तरी निर्विषपणे तरी जावं. बघावं तरी- काय म्हणतोय समोरचा गडी. वाक्य वाचता वाचता मनात फुल्या मारत जाऊ नये. नंतर करावा की विरोध! आणि लिहून करावा; जाळून नव्हे! पण एक गोष्ट आहे. तो लेखक समर्थानी म्हटल्याप्रमाणे ‘अभ्यासोनि प्रकटावा’ अशा स्वरूपाचा आहे का, हे मात्र जरूर बघावं. मला अनेक उत्तम राजकीय लेखन करणारे लेखक आसपास दिसतात. पण कधी इतिहासाचं आकलन अपुरं असतं. साधा भौगोलिक तपशीलही लिहिताना ध्यानी घेतलेला नसतो. आणि मग आपल्या तरण्या लेखणीला मोकळं सोडण्याआधी पुरेसा ‘होमवर्क’ करणारी, अभ्यास करून, पचवून, विस्तारून प्रकटणारी ही अभिराम- उत्पल यांची विरुद्धधर्मी- निदान भिन्नधर्मी दुक्कल मला मोलाची वाटत राहते.
त्यांच्यातला सामायिक विशेष हा आहे की, ते ‘टॅग्ज’च्या पलीकडे थांबतात. अभिरामला हिंदुत्ववादी समजावं, तर तो अनेकदा हिंदुत्ववादी साच्यापलीकडचं लिहितो असं दिसतं. तो नास्तिक डॉक्टर आहे, हे झालंच; पण त्याचा दाभोलकरांच्या हत्येनंतरचा ‘शहाणपण मेले’सारखा लेख किंवा ‘चार्वाक नावाचा चमत्कार’ हा लेख त्याचीच साक्ष देतात. पण त्याचवेळी ‘हिंदुत्व-विचाराची फेरमांडणी’ तो करतो. आणि त्यामध्ये मनुस्मृती व वेदांवरही त्याने हल्ला चढवला तरी मूलत: हिंदूंनी एकवटणं ही त्याला महत्त्वाची निकड वाटते, हेही ध्यानात घ्यायला हवं. आणि ते ठामपणे म्हणतानाच खरलांजी घटनेनंतर ‘हिंदुत्ववादी कुठे चकार शब्द बोलले नाहीत’ हेही तो टीका करताना म्हणतो. किंवा मग तो थेटपणे म्हणतो, ‘स्पष्ट बोलायचे झाले तर काही मोजके आणि सन्माननीय अपवाद वगळता बरेचसे पुरोगामी, बहुजनवादी, कथित समाजवादी हे हिंदुत्ववाद्यांइतकेच जातीवादी आहेत.’ हे विधान पुरेसं बोलकं आहे. लेखकाचा वैचारिक, भावनिक आणि शाब्दिक पिंड उलगडणारं ते विधान आहे. अनेकदा अति आक्रमक असून शिव्याबिव्या घालत लिहितानाही हा लेखक खोलात जातो, जात राहतो. आणि तेच सर्वात महत्त्वाचं असतं.
उत्पलही खोलात जातोच. पण अभिरामसारखा सूर मारत, पाणी खळबळत नव्हे. उत्पलच्या शब्दांची ताकद ही आहे, की त्याला त्याच्या शब्दांना विनासायास खोलात नेता येतं आणि तसं जाताना त्याचे शब्द अकारण बोजड, संज्ञीय, तांत्रिक बनत नाहीत. मन्या बोडस हे उत्पलनं निर्मिलेलं एक पात्र. उत्पल नावाचा लेखक या त्याच्या दोस्ताशी- मन्याशी वैचारिक वाद घालतो. ते वाद घालताना घटनेच्या दोन्ही बाजू वाचकांसमोर येतात. (अंतिमत: अनेकदा मन्या पडतं घेतो, हेही बोलकं आहे!) दोघे पुण्याच्या चमत्कारिक ‘झेड्’ ब्रीजवर बसतात आणि सनी लिऑनचं दहीहंडी उत्सवात लागलेलं पोस्टर बघून पोनरेग्राफीवर चर्चा करतात. कॉलेजच्या दिवसांची हिरवी आठवण त्यांना होते खरी; पण व्यक्तिगत बिंदूपासून झपाटय़ानं तो लेख समाजाची नैतिक नजर, त्यातला दुटप्पी व्यवहार, बाईचं शरीर आणि स्वेच्छा; या साऱ्याला दहीहंडीनिमित्तानं पडलेलं सामाजिक अस्तर अशा पायऱ्या ओलांडत कायच्या काय वर जातो! पण मी आधी म्हटलं तसं मन्या बऱ्याचदा घेतो तसं पडतं घेतो. हे त्या साऱ्या सौम्यपणामागचं लेखकाचं आक्रमक अंग! अभिरामसारखंच! (या विधानापुढे ‘स्माईली’ वापरावा की नाही, याचा मी अजून विचार करतो आहे!) ते आक्रमक अंग एखाद्या पात्राच्या संवादातून सपकन् ओठाबाहेर पडतंही. जसं स्मिता एस. टी. प्रवासात उत्पलला म्हणते, ‘स्त्रीवादाची लिंगभाव दृष्टी जशी व्यापक आहे, तशीच मार्क्सवादी दृष्टीदेखील व्यापक आहे. मला तर वाटतं, की या दोन दृष्टींनी पाहिलं तरच जगात आशा आहे.’ या स्मिताच्या विधानात ‘तरच’ हा शब्द (त्यातला ‘च’!) हा पुरेसा आक्रमक, अँड वेल, सध्याचा प्रसिद्ध शब्द वापरायचा तर ‘असहिष्णु’ आहे! असं डिट्टो अभिरामच्याही अनेक विधानांबाबत मला म्हणता येईल. पण माझी राजकीय मतं मांडायची ही जागा नाही. मला या दोघांचं राजकीय लेखन हे साहित्यातच मोडावंसं वाटतं आणि त्याची व्यापक अर्थाने साहित्यिक समीक्षा करावीशी वाटते. म्हणून हा लेख इथे आहे. ते राजकीय, वैचारिक लेखन ललित नसतानाही ललित भासत राहण्याचं एक कारण म्हणजे या दोन्ही लेखकांचे राजकीय ‘कन्सर्न्स’ हे व्यक्तिगततेपासून दुरावलेले नाहीत. साध्या माणसांचं जगणं आणि त्या जगण्यातल्या अपार कटकटी या लेखकांना आतवर बोचत असाव्यात. उत्पल तर कवी आहेच, पण अभिरामच्या ज्या स्फुटकविता मी वाचल्या त्यातही तो समाजाप्रति असलेला आत्मीय झरा नीट दिसत राहतो. दोघांना दोन तऱ्हांनी समाजाचं ‘भलं’ होईल असं वाटतं आहे. आणि ती जाणीव मुदलात शुभंकर आहे, असते. ती शुभंकर जाणीव त्या राजकीय वैचारिक लेखनाला साहित्यिक मूल्ये प्रदान करीत जाते. आणि त्याहून मोलाचं म्हणजे ते दोघं ‘डेमनायजेशन’- दैत्यीकरण करत नाहीत. आणि कुणाला देवही ते बनवत नाहीत. या दोघांसारखाच राजकीय लेखनाने इंग्लंडमधला ‘गार्डियन’ गाजवणारा ओवेन जोन्स (Owen Jones) हा तिशीतला लेखक मला स्मरतो आहे. आणि त्याचं यासंदर्भातलं ते गहिरं वाक्यही- ‘Demonisation is the ideological backbone of an unequal society…’ असं जोन्सनं म्हटलं आहे. एकाला, एका समूहाला, एका जातीला, एका धर्माला, एका वांशिकतेला दैत्य केलं की दुसरं सारं स्वर्गीय, दैवी होतं आणि हे चित्र भयाण सामाजिक असमतोलाचं पहिलं निदर्शक असतं. आज आसपास पाहिलं, आसपासचे कंपू आणि त्यांचे हट्ट पाहिले की आपली वाटचाल त्याच दिशेने चालली आहे असं वाटू लागतं. आणि मग उत्पल किंवा अभिरामसारख्या अभ्यासू लेखकांची अधिक निकड भासू लागते. ‘बटरफ्लाय फ्लाय अवे’ असं गोड गाणं बापासोबत गाणारी ती माईली सायरस झडझडून वयात आली आणि ‘वी कँट स्टॉप!’ असं उच्चारवात म्हणू लागली. वैचारिक बाल्य मागे सारत झडझडून राजकीय वयात येणारी एक नवी, सजग, बारकाईनं भवताल तपासणारी पिढी मला मग दिसते आहे. आणि माझ्या राजकीय जाणिवांचं आणि साहित्यिक जाणिवांचंही तेच आशास्थान आहे!
डॉ. आशुतोष जावडेकर ashudentist@gmail.com
वी वोंट स्टॉप!
आणि ते गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मला खूपदा अभिराम दीक्षितच्या राजकीय लेखनाची आठवण होते.
Written by डॉ. आशुतोष जावडेकर
आणखी वाचा
First published on: 05-06-2016 at 02:00 IST
मराठीतील सर्व ‘वा!’ म्हणताना.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aggressive statement of youth generation