जगताना अनेकवार घरं बदलली तरी बालपणीचं घर हे खरं घर असतं. अनकेदा आपण स्वप्नामध्ये ज्या खोल्यांमध्ये वावरतो, त्या बालपणीच्या घरातल्या असतात. आणि मग जागं झालं आणि ते आठवलं तर चमकून जायला होतं. बॅचलर्डनं त्याच्या ‘पोएटिक्स ऑफ स्पेस’मध्ये म्हटलंय- ‘अवर हाऊस इज ए कॉर्नर ऑफ वर्ल्ड! ते बालपणीचं घर हे आपलं पहिलं विश्व असतं. खराखुरा ‘कॉसमॉस’चा प्रत्यय तिथेच प्रथम मिळतो.’ आणि गंमत म्हणजे जरा मोठं झालं की ते घर काही काळ तरी सोडावं असं वाटतं! ओढ असते घराची; पण वय तरणं असतं! ही जेनेलिया खटय़ाळ डोळ्यांनी रितेश देशमुखला गात म्हणतेय- ‘सौ सौ तारों से भरके ये दामन, ले चल मुझे कही दूर..’ तिच्याच घरात ते दोघं असतात. पण जेव्हा सखा शतताऱ्यांनी ओंजळ भरणार असतो तेव्हा घरापासून दूर जावं वाटतंच. मग पुष्कळ जगून झाल्यावर एकाएकी त्या जुन्यापान्या, लहानपणी राहिलेल्या घराची ओढ लागू लाग्ोते. पुन्हा कधी तिथे जाऊन भेटावंसं वाटतं त्या घराला.
-एलकुंचवारांना वाटलं तसंच! पण त्या वाटण्यामागचा उत्कट कल्लोळ आपल्या कवेतला नाही. आणि त्या भेटीचं सार्थक तर एखाद्याच प्रज्ञावंताला प्राप्त होणारं! ‘पारवा’ नावाचं ते एलकुंचवारांचं गावं; तिथलं त्यांचं बालपण, त्या गावचं त्यांचं जुनं, समृद्ध, त्यांच्या मनात निरंतर ठाण मांडून बसलेलं घर आणि मग अनेक वर्षांनंतर त्यांच्या दोन चुलतभावांसोबत त्या पारव्याला त्यांनी दिलेली भेट! ‘गहकूट विसङ्गितम्’ या एलकुंचवारांच्या लेखामधलं खोड हे असं! आणि तेही पुरेसं सशक्तच आहे! पण त्या खोडाला ज्या अनेक फांद्या फुटल्या आहेत लेखात- त्याला तोड नाही. जाणीव-नेणिवेच्या सीमारेषेवर जगण्याचा पुरा अनुभव कवेत घेऊन हलकेच डुलणाऱ्या त्या फांद्या! मग कधी त्या फांदीवर बुद्ध येतो, कधी गेलेल्या पालकांच्या आठवांची सय.. पारव्याला जायचं हे सोपं नसणार हे माहीत असतंच लेखकाला. ‘यू कॅन नेव्हर गो होम अगेन’ ही ‘स्पष्ट अनुभवी म्हण’देखील त्याला माहीत असतेच. पण तरी तो दोन भावांसोबत तिथे जातो. आश्चर्य म्हणजे जितकी पडझड तिथे त्याने अपेक्षिलेली असते, तितकी काही स्थिती वाईट नसते. लेखकाच्या जुन्या घरात आता एका संस्थेची कचेरी असते. घर विटलेलं नसतं, थकलेलंही नसतं. मग तो लेखक लहान मूलच होतो क्षणार्धात. स्वयंपाकघरात पोहोचल्यावर त्याला कापूर, अन्न आणि दूधदुभत्याचा संमिश्र वास पुन्हा स्पष्टपणे येतो. अंगणातली झाडं नसतात, पण तिथे तो जुना घरगुती केकचा तपकिरी खमंग वास पुन्हा त्याला भेटतो. बैठकीच्या खोलीतलं वरचं लाकडी छत अजूनदेखील जसंच्या तसं सुंदर असतं. तो लाकडी जिना, तिथल्या आठवणी, जुनी पुस्तकं, छतावर उडत आलेला बागेतला मोर आणि त्याच्या केका.. सारं सारं दृश्यमान होतं लेखकाला; आणि मग तो माघारी वळतो.
इथवरचा एलकुंचवारांचा अनुभव हा खास घट्ट केसांच्या सैल वेणीसारख्या त्यांच्या शैलीतला आहे- तो छानच आहे. पण ती ‘थीम’ काही नवीन नाही. अनेक उत्तम लेखकांनी इथवर लिहिलं आहे. आणि इथेच अनेकांचे लेख संपलेही आहेत! एक नॉस्टॅल्जिया, एक हुरहुर लावणारी गोड किंवा आंबट-गोड आठवण असं स्वरूप अशा लेखांना मग प्राप्त होतं. त्याचंही मोल असतं, नाही असं नाही. पण जिथे उर्वरित लेखक थांबतात; तिथे एलकुंचवार खणखणीत फ्लोरोसंट रंगाने ब्रशचा स्ट्रोक कागदावर मारावा तसा एक नवाकोरा, लखलखता आत्मप्रत्यय त्या लेखामध्ये उमटवतात.
घर बघून बाहेर पडताना त्यांना जाणवतं की, आता व्यर्थ आठवणी काढून व्याकु ळ होण्यात अर्थ नाही. आणि मग त्यांना थेट बुद्ध आठवतो! अनित्याचा उद्घोष ‘अनिच्चं, अनिच्चं, अनिच्चं’ अशा उच्चरवात करणारा. ‘राजपुत्र सिद्धार्थाला बोधी प्राप्त झाली तेव्हा तो हर्षभराने उद्गारला- ‘देहरूपी घराची सामग्री मोडली. घर कायमचे तुटले. फुटले. मी मुक्त झालो. तृष्णा, वासना, इच्छा, संस्कार.. यातून मी सुटलो.’’ आणि मग एलकुंचवारांनी असं काही विलक्षण लिहिलं आहे की, त्यावर काही बोलण्याआधी मला ते जसंच्या तसं उतरवू दे. ते लिहितात, ‘माझी जीवनाकडून एवढी मोठी आध्यात्मिक अपेक्षा नव्हती. तृष्णा, वासना, इच्छा, संस्कार मनाला चिकटून आहेतच. आणि ते आहेत म्हणूनच एक घरही मला हवे होते. मला या कुठल्याही गोष्टीपासून मुक्ती नको होती.. माझेही घर आज मोडले. पण मला आनंद नाही झाला सिद्धार्थ गौतमा!’
मी ते अनेकदा वाचूनही या परिच्छेदानंतर क्षणभर थांबून ‘वा!’ असं हलकेच म्हणतो. हलकेच अशासाठी, की त्या अनुभवाच्या सौंदर्यासमोर जायची ताकदही होत नाही! आणि पहिल्यांदा हे अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं तेव्हा तर जिमी हेंड्रिक्स इलेक्ट्रिक गिटार वाजवताना हर्षभरित होऊन जसा थरथरतो तसाच मी थरथरत होतो, फडफडत होतो. आज वाचतानाही ती फडफड जाणवते; पण अधिक काही सुचत जातं- एलकुंचवारांचंच काही; एलकुंचवारांनी सूचित केलेलं आंतर- सांहितिक असे काही; आणि काही आपल्या मनाचंही! चांगल्या साहित्यात ती ‘इंटर-टेक्स्टय़ुअॅलिटी’ची ताकद असतेच. ती संहिता वाचकाला बॅडमिंटनचं फूल रॅकेटनं सहस्र दिशांना फिरवत न्यावं तशी नेत राहते. किती आठवत जातं मग काय काय!
एलकुंचवारांच्या भाषणाचं नुकतंच ‘सप्तक’ म्हणून पुस्तक आलंय. त्यात त्यांनी सध्याच्या तरुण पिढीवर नेमकं बोट ठेवलंय. ही पिढी मुठी वळवीत जोरदार आवाजात आनंद व्यक्त करते; कारण मुळात तो आत नाहीच आहे! अन् मग असुरक्षित वाटायला नको म्हणून ती आनंदाची तऱ्हा उगा आवाजी होते, असं त्या भाषणात त्यांनी म्हटलंय. मला हा पारव्याच्या लेखातला परिच्छेद वाचल्यावर आज तोच संदर्भ आठवला. तसं त्याचं वरवर नातं नाही. पण त्या तरुण पिढीचं घरापासून बाहेर बाहेर आणि बाहेरच असणं हेही त्या आवाजी आनंदामागचं एक कारण असू शकतं. आणि मग माझं शटल थेट पु. लं.च्या ‘एक बेपत्ता देश’ या प्रवासवर्णनाकडे जातंय. ते न्यूयॉर्कचे अनिकेत, बेघर, गांजा-हशीशमध्ये ठाव हरवून बसलेले हिप्पी पु. लं.नी जिवंत केलेत त्या लेखात. त्यांचं घर कुठलं? त्यांची ‘बोधी’ तर सायकेडेलिक् – गौतम बुद्धाच्या निर्वाणाचा आणि या हिप्पींच्या अमली पदार्थाच्या निर्वाणाचा काही संबंधच नाही यार! आणि हे आपले एलकुंचवार! ते थेट साक्षात् बुद्धाला संबोधित म्हणतात, ‘माझेही घर मोडले. पण मला आनंद नाही झाला सिद्धार्थ गौतमा!’ स्वत:चा तो अनुभव किती सहजपणे ते बुद्धापाशी ‘शेअर’ करतात! आपण गाणी शेअर करतो, जोक्स करतो, पावसातल्या चहा- भज्यांचे फोटोही फेसबुकवर मित्रांसोबत ‘शेअर’ करतो. घर मोडण्याचा तो अनुभव घ्यायला आणि मग शेअर करायलाही चॅटवर जमेल हवं तर; पण बुद्धापाशी शेअर करायला एलकुंचवारच हवेत! पण आपलेही अनुभव असतात; आणि छोटय़ा वजनाचे असले तरी ते जिवंतही असतात. घराची संकल्पनाच बदलत जाताना आपण बघत असतो; अनुभवत असतो. म्हटलं तर आपल्यापैकी पुष्कळजण ‘थ्री बीएचके’मध्ये राहतानाही पु. लं.नी वर्णन केलेले ते अनिकेत हिप्पी असतात!
कधी घरात नसतं कुणी आता. माजघरातून ‘निजलास का?’ म्हणत येणारी कुणी आजीही नसते. पण रात्री दोन वाजता तुम्ही ऑनलाइन आहात हे पाहून तुमचा मित्र काळजीने, हक्काने ‘झोप साल्या!’ असा मेसेज पाठवतो! तो तुमच्या घरात प्रत्यक्ष नसतोच; पण तरी तुम्ही एका ‘घरात’ असता. आमच्या पिढीसमोर विस्तारत गेलेलं हे नवं आभासी- सच्चं घर आहे अन् ते मोडतंही; मागे पडतंही जगताना. तुम्ही गौतमशी शेअर केलंत; तसं आम्ही कुणाशी ‘शेअर’ करणार आहोत हे सारं महेशदा!
अन् त्या लेखाचा शेवट! काय हलवतो आपल्याला! एलकुंचवार परत निघतात; गाडी चालवत परतताना जोराचं वादळ येतं. रस्ते दिसेनासे होतात. नाले वाहू लागतात. एलकुंचवार गाडी कडेला घेतात. दहा-पंधरा मिनिटात वादळ संपतं तसं मगाचचं गच्च ढगाळ आकाश निवळ होतं. अन् मग शेवटाला ते लिहितात, ‘वाटले, आता हेच आपले घर! ही जमीन व हे आकाश हेच आपल्या माथ्यावरचे छप्पर आता. ते कधी तुटणार नाही की भंगणार नाही.’ अन् मग हे वाचल्यावर मला समोर दिसते- रोमच्या निळय़ा, स्वच्छ, प्रकाशमान आकाशाकडे निरखत बसलेली ‘इट प्रे लव्ह’ चित्रपटातील जुलिया रॉबर्ट्स! जगण्याचे प्रेमानुभव घेऊन कंटाळलेली, नुकताच घटस्फोट घेतलेली ती जुलिया तिथे बसलीय. ती रोममध्ये काही काळ राहणार- भोग घेणार. मग भारतात काही काळ योग अन् अखेरीस बालीमध्ये या साऱ्याचा संयोग! ती आपल्याला जोक सांगते, ‘एक माणूस रोज संताच्या पुतळय़ापुढे लॉटरीच्या तिकिटाचा नंबर लागण्याची याचना करतो- ‘प्लीज..प्लीज’ करत. शेवटी वैतागून तो संत पुतळय़ातून समोर येतो आणि म्हणतो, ‘माय बॉय, प्लीज प्लीज आधी तू लॉटरीचं तिकीट विकत घे!’’ जुलिया म्हणते की, आता मला हा जोक कळतोय. माझ्याकडे इटली, भारत आणि बाली या नावांची तीन तिकिटं आहेत! आत्मप्रत्ययाच्या शोधामधली ती गहिरी तिकिटं एलकुंचवार किंवा त्या जुलिया रॉबर्ट्सारख्या कसदारांनाच प्राप्त होणारी! ऐऱ्यागैऱ्याला मुळीच न मिळणारी. साक्षात् धरेला आणि स्वच्छ आकाशाच्या मधल्या अवकाशाला जी माणसं घर म्हणू शकतात त्यांनाच मिळणारी! मग मला एकत्र रोमच्या पायरीवर बसलेले एलकुंचवार आणि जुलिया रॉबर्ट्स दिसतात! रितेश – जेनेलियाचं गाणं ते दोघं गात असतात- ‘ले चल मुझे कहीं दूर!’ आणि ज्या घरात बसून ते हे गाणं म्हणतात त्याचं आकाशी छत कसं शततारकांनी उमलून येतं!
डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा