माहिती ही नेहमीच महत्त्वाची असते. लेखकासाठी तर विशेषच. मग त्याला काही का लिहायचं असेना. तो जर कथा, नाटक, कादंबरी लिहीत असेल तर त्याला त्या ‘माहिती’च्या सामग्रीपलीकडे जायचं असतं, हे उघड आहे. पण मुळात माहितीचा पाया पक्का असेल तरच ते शक्य होतं. आणि जेव्हा लेखकाला ‘माहितीपर लेखन’ करायचं असतं, तेव्हा तर ही माहिती अधिकच कसून मिळवावी लागते. एकदा गप्पा मारताना मी ‘माहितीपर लेखन’ असं म्हटल्यावर रेखा साने-इनामदार मॅडम पुढे सावकाश ‘तथ्याधिष्ठित लेखन’ असं म्हणत्या झाल्या. आणि तो शब्द मला मागाहून आवडला. तथ्याचं अधिष्ठान असलेलं लेखन. ज्या लेखनाच्या मागे आणि पुढे, वर आणि खाली तथ्याची चौकट असते असं लेखन. मग ते कधी अगदी निखळ माहितीपर असेल; कधी लालित्याचा वास पुसणारं, तर कधी थेट ललितही. पण ‘तथ्य’ तिथे वरचष्मा दाखवत उभं असणार! हे सुश्रुत कुलकर्णी यांचं मोबाइलचा आणि मोबाइल अ‍ॅपचा वापर अनभिज्ञांना, ज्येष्ठ मंडळींना करायला शिकवणारं पुस्तक! त्यात चोख माहिती आहे. ती अनेक स्रोतांमधून मिळवलेली, पडताळलेली अशी आहे. ती नुसती विकिपीडियाची मराठी आवृत्ती नव्हे. आणि ही तथ्याधिष्ठित लेखनाची पहिली पूर्वअट आहे! तशीच सुविहित माहिती विजय नाईक यांच्या ‘साऊथ ब्लॉक, दिल्ली’ या पुस्तकात आहे. परराष्ट्रनीतीचे अनेक तथ्य-पदर त्यात सुबोधपणे, रंजकपणे उलगडले आहेत. ही दोन्ही पुस्तके लालित्याकडे झुकत नाहीत. एका अर्थाने ते उचितच. ते विषयच काहीसे तसे आहेत. आणि हे अनिल अवचटांचं नवं ‘मुक्तांगणची गोष्ट’ हे पुस्तक तेवढय़ातच समोर येतंय. तेही एका अर्थाने तथ्याधिष्ठितच पुस्तक आहे. पण शीर्षकच सांगतंय, की त्यात केवळ व्यसनं, व्यसनाधीनता यांचे तपशील नसणार; ती मुळात ‘गोष्ट’ आहे. अवचटांचं बव्हंशी लेखन असं मधल्या वळणाचं. आणि इतक्या छोटय़ा जागेत आज मी त्यावर लिहीत नाही. अवचटांचं लेखन हा स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. पण त्यांचं पुस्तक डोळ्यासमोर आलं, कारण ते लेखन तथ्याधिष्ठित लेखनाची दुसरी पूर्वअट पुरी करतं. चांगल्या तऱ्हेनं मिळवलेल्या माहितीचं संकलन करणं, त्याची लेखनामधली क्रमवारी ठरवणं, अनावश्यक माहितीचा फापटपसारा ‘डिलीट’ करणं- ही ती दुसरी पूर्वअट! इथे लेखकाचा कस लागतो. त्याची स्वत:ची कायं ‘व्हिजन’ आहे, त्याला वाचकांपुढे काय आणायचं आहे, हे त्याला पक्कं ठाऊक असलं की मग हे विनासायास घडतं. मग येते पायरी माहितीच्या विश्लेषणाची! त्या सगळ्या माहितीला क्रमवारीने एकत्र मांडून चांगलं पुस्तक होईल; पण ती निर्मिती नसेल. त्या माहितीचं स्वत:च्या नजरेतून लेखक विश्लेषण करतो आणि मग ते लिखाण कसं जिवंत होतं! त्या माहितीपर लेखनामधल्या माहितीचा कंटाळा कसा दूर पळतो.

हे बघा- गिरीश कुबेरांच्या ‘एका तेलियाने’ या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच मला तसं सांगते आहे. ‘त्या श्रीमंत, शापित वाळवंटास..’ अशी ही अर्पणपत्रिका आहे. आखाती तेलाचा कारभार लीलया सांभाळणाऱ्या शेख यामानी या सौदी तेलमंत्र्याचं ते चरित्र आहे. पण ही अर्पणपत्रिका सांगते की, हा केवळ इतिहास नसणार. या पुस्तकात केवळ माहिती नसणार. त्यातली शैलीची नाटय़मयता या विशेषणांमध्ये दिसतेच! ‘श्रीमंत’ आणि ‘शापित’ ही दोन विशेषणं ही नाटय़मय शैली एकत्र आणते तेव्हाच हे पुस्तक ललित होऊ लागतं. हे पुस्तक नुसतंच माहितीपर नाही, तर कथानक घेऊन उभं आहे. यामानी यांचा जन्म १९३० चा- हे त्यात पृष्ठ क्रमांक ४२ वर येतं! त्याआधी मध्य-पूर्वेतल्या तेलाच्या राजकारणाची दीर्घ, रोचक कहाणी येते. आणि तेव्हाच या पुस्तकाचा अदृश्य दीर्घकथेचा किंवा लघुकादंबरीचा घाट समजतो! माहितीचं रूपांतर अनुभवात होण्यासाठी चांगला लेखक स्वत:चा मार्ग काढतो. त्यातला महत्त्वाचा मार्ग नाटय़मयतेचा. यामानींवर स्तुतिसुमने वाहणारे प्रेस-कोट्स पृ. क्र. २०७ वर हारीने आहेत. एरवी अशी उद्धृतं कंटाळवाणी होतात. उदा. एका नियतकालिकात लिहिलं होतं : ‘इंधन संकटामुळे ग्रासलेल्या जनतेपुढे दोनच पर्याय होते : यामानी किंवा देवदूत!’

पण लेखकाने मागे-पुढे काय जोडलं आहे त्यावर पुष्कळ ठरतं. पेट्रोलियम वीकली, मिड्ल-ईस्ट इकॉनॉमिक रिव्ह्य़ू इत्यादी मासिकं यामानींच्या कामगिरीवर काय लिहितात, ते शब्दश: उतरवून कुबेर परिच्छेद बदलतात आणि लिहितात : ‘‘पण पौर्णिमेनंतर लगेच अमावास्येचे वेध लागावेत तसं या कौतुक सोहोळ्याच्या मागे अमेरिकेत एक कायदेशीर लढाई यामानी यांच्यामागे आ वासून उभी होती.’’ आणि मग ते प्रकरण संपतंच- वाचकाची उत्कंठा ताणत! कधी लेखक स्वत:ची मतं त्या कथानकाच्या ओघाला व्यत्यय न आणता मांडतो आणि त्यानेही लालित्याकडे ती माहिती झुकते. यामानींनी रशियाच्या गोटात असलेल्या रुमानियाशी करार केला, हे समजल्यावर अमेरिका भडकते. यामानी पत्रकारांना सांगतात, ‘‘माझ्या सभ्यपणाला अमेरिका आमचं दुबळेपण मानते.’’ मग लेखक पुढे लिहितो, ‘‘ही घटना १९६४ च्या उत्तरार्धातली. पण अमेरिकेविषयी आजही अनेकांची हीच भावना आहे. इतरांच्या सभ्यपणाला हा देश दुर्बलता मानतो.’’ हे निरीक्षण त्या कथनाला वेगळा ओघ देतं. कुबेरांचं हे पुस्तक नुसतं तथ्याधिष्ठित नव्हे, तर समकालीन इतिहासाचं नेमकेपण टिपणारी ती दीर्घकथा आहे. खरं तर कुबेरांच्या हातात तेलाच्या माहितीचा गळ आणि (नळ!) लागला आहे. त्यांनी तेलाची त्रिस्थळी यात्रा वाचकांना घडवून आणली आहे.

आणि आता ही आहे उत्तम कथा. समाजशास्त्र या कथेचा मध्यबिंदू आहे. त्याचं शीर्षक- ‘भरती आणि ओहोटी’ असं आहे. धरमतरची ती सुस्नात हिरवी खाडी. तिथला आगरी समाज. तिथली मासेमारी. त्या वेगवेगळ्या होडय़ा. त्यांच्या किमती. त्या कोळी बायका. घरागणिक असणारी होडी. आणि कुणी न शिकवता मुलांना येणारं मासेमारीचं कसब. मिलिंद बोकील अशी ही सुबक रांगोळी ठरवून काढतात. कारण पुढे ज्या त्वेषाने ती रांगोळी विस्कटते, ते त्यांना अधोरेखित करायचं आहे! इस्पात कंपनीची तिथे सुरू झालेली जेटी, खाडीत वेळी-अवेळी येणाऱ्या, मासेमारीच्या जाळ्या तोडणाऱ्या, छोटय़ा होडय़ांना धोका पोहोचवणाऱ्या त्यांच्या अजस्त्र बोटी, त्यातून येणारा कच्चा माल (जो कन्व्हेअर बेल्टवरून थेट कंपनीत पोचतो) आणि मग सुरू झालेलं ते आंदोलन. आगरी समाजाचा तरुण नेता, कोळी बायकांचा जिल्हाधिकाऱ्यांपुढचा बांगडी मोर्चा, मंत्रालयातली मीटिंग.. सगळं खरं आहे, ‘तथ्य’च आहे, समाजशास्त्रीय वास्तव आहे. पण बोकीलांची मांडणी अशी आहे की, तो एका उत्तम चित्रपटाचा स्क्रीन-प्ले वाटावा! आणि गंमत म्हणजे त्याची शैली कुबेरांसारखी नाटय़पूर्ण नाही. मिलिंद बोकील स्वत: ललित लेखक आहेत. उत्तम ललित लेखक आहेत. आणि तरीही, किंवा त्यामुळेच इथे त्यांची शैली काहीसं कोरडं, सलग, क्रमवार मांडणी करणारं, जात्याच गोष्टी सुबोध करून सांगणारं वळण घेते. हाडाच्या शिक्षकासारखे बोकील ती खाडी आणि तिथलं ते नाटय़ आपल्याला मुद्देसूदपणे समजावतात. तो शिक्षकी बाणा त्या ‘माहितीपर लेखना’ला पूरकच ठरत असतो. पण म्हणून लेखक फक्त ‘तथ्यां’ची उतरंड मांडत नाही. त्याचं स्वत:चं असं म्हणणं आहे, या वादात त्याची स्वत:ची बाजू आहे, ओढा आहे. तो ओढा थेट येत नाही. त्यामुळेच कथनाला विश्वासार्हता देतो. पण तो ओढा या कथेसारख्या मांडणीमध्ये येतो. आधीची ती शांत खाडी आणि मग त्यावर झालेलं आक्रमण हे त्या क्रमाने मांडलं गेल्याने त्या खाडीलगतच्या जीवनाची (मानवी व अन्य) वाताहत वाचकांच्या डोळ्यात पटकन् भरते. अर्थात कुठल्याही समाजशास्त्रीय लेखाचे शेवट हे सगळ्या वाचकांना पटणं अशक्यच असतं. पण चांगला लेखक वाचकालाही माहितीपलीकडे जाऊन विचार करायला लावतो. बोकील हे असे लेखक खचितच आहेत. एखाद्या वाचकाला हा लेख वाचून हळहळ वाटेल. एखादा म्हणेल, ‘‘अरे बाबा, का इतका रोमँटिक होतो आहेस? औद्योगिकीकरण हे अपरिहार्य आहे.’’ एखादा वाचक हा लेख वाचून पर्यावरणाच्या ऱ्हासाची काळजी करील. एखादा म्हणेल, ‘‘ग्रेटर गुड’साठी काहींचं असं नुकसान अपरिहार्यच.’ ते वाचकाचं स्वातंत्र्य आहे. माहितीपर लेखनात ‘माहिती’, तिचं विश्लेषण, त्या माहितीचे अन्वयार्थ जर लेखकाने चांगले मांडले, तर आणि तरच वाचकही विचाराला उद्युक्त होतो. त्यामुळे मिलिंद बोकीलांचा हा लेख वाचून अंती कुणाला त्यांचं म्हणणं पटेल- न पटेल; पण कुणी ‘की फर्क पैदाये’ असं म्हणणार नाही. आणि खाडीवरचा पूल ओलांडताना वाचकांची  गाडी वेगात गेली, तरी त्याच्या नजरेला जो खाडीचा भाग दिसेल तो इतरेजनांहून सुस्पष्ट दिसत असेल!

परवा असाच खाडी ओलांडून कोळीवाडय़ात गेलेलो. माझं आणि सावनी रवींद्रचं नवं गाणं येतंय त्याचा व्हिडीओ शूट करण्यासाठी छोटी बोट बघायची होती. तिथल्या काकांनी बोटीआधी मला आणि माझ्या मेव्हण्याला तिथले मासे आधी उत्साहात दाखवले! मोठे मोठे मेलेले सुरमई मासे, बर्फात ठेवलेले अनेक छोटे-मोठे मासे, काही टांगलेले मासे. पुढच्या गल्लीत बाया सपासप मासे सोलताहेत. एका दांडीवर दोन बनियन, एक टी-शर्ट आणि दोन वाळवायला टांगलेले मासे एकत्र नांदत आहेत. मग मला अर्नेस्ट हेमिंग्वेचं ‘दि ओल्ड मॅन अ‍ॅण्ड दी सी’ हे पुस्तक मागून आठवतंय. भरसमुद्रात होडी लोटून दिलेला तो म्हातारा कोळी, त्याच्या गळाला लागलेला मोठा मासा, शार्कने येऊन केलेला हल्ला आणि म्हाताऱ्याची ती झुंज!

.. आता बोटीत आमचं शूटिंग चाललंय. अनिकेत फोटो काढतोय. सारंग बोटीच्या कडेला बसून सरोद वाजवतोय. मी नाळेवर उभा राहून गातोय. कॅमेऱ्यासमोर. आणि समोर आहे हे मोठ्ठं मासेमारीचं जाळं. थेट हेमिंग्वेनं वर्णन केलेलं- तसं! हा गळ! त्याच कादंबरीतला! आमची बोट चालवणारा हा सुकलेला देह असलेला माणूस. हेमिंग्वेचा म्हाताराच हा! मग मला ध्यानात येतंय, की हेमिंग्वेची ‘माहिती’ किती पक्की, अचूक, तथ्याधिष्ठित होती! ते पुस्तक ललित आहे, कादंबरी आहे; पण त्यामागची ही मासेमारीची ‘माहिती’ हेमिंग्वेनं पक्की काढली असणार! ते सारे तपशील म्हणूनच जिवंत वाटत असणार. आणि मग त्या भक्कम माहितीच्या तपशिलांच्या पायावर हेमिंग्वेनं तपशिलापलीकडचं असं कालातीत मांडलं असणार! ‘‘कदाचित माशाला मारणं हे पाप असेल.. But then everything is sin.. पाप-पुण्याचा पगारी विचार करणारे पुजारी आहेत. त्यांना ते बघू देत. तू कोळी म्हणून जन्मला आहेस आणि मासा हा मासा म्हणून जन्मलेला आहे! .. Do not think about sin’’ असं काहीतरी विलक्षणच हा हेमिंग्वे लिहितो आहे. इकडे समुद्रातला सूर्य कसा डुबू डुबू झाला आहे. शूटिंगच्या पॅकअप्ची घोषणा झाली आहे. सेल्फींची झुंबड सरली आहे. त्या जाळ्यावर मी पहुडलो आहे. आणि कुठल्याही लेखकासारखं मला वाटतंय की, आता गळाला कुठली ‘माहिती’ लागणार आहे? आणि तिचं मी काय करणार आहे? ती तुमच्याबरोबर कशी ‘शेअर’ करणार आहे?

डॉ. आशुतोष जावडेकर

ashudentist@gmail.com