माहिती ही नेहमीच महत्त्वाची असते. लेखकासाठी तर विशेषच. मग त्याला काही का लिहायचं असेना. तो जर कथा, नाटक, कादंबरी लिहीत असेल तर त्याला त्या ‘माहिती’च्या सामग्रीपलीकडे जायचं असतं, हे उघड आहे. पण मुळात माहितीचा पाया पक्का असेल तरच ते शक्य होतं. आणि जेव्हा लेखकाला ‘माहितीपर लेखन’ करायचं असतं, तेव्हा तर ही माहिती अधिकच कसून मिळवावी लागते. एकदा गप्पा मारताना मी ‘माहितीपर लेखन’ असं म्हटल्यावर रेखा साने-इनामदार मॅडम पुढे सावकाश ‘तथ्याधिष्ठित लेखन’ असं म्हणत्या झाल्या. आणि तो शब्द मला मागाहून आवडला. तथ्याचं अधिष्ठान असलेलं लेखन. ज्या लेखनाच्या मागे आणि पुढे, वर आणि खाली तथ्याची चौकट असते असं लेखन. मग ते कधी अगदी निखळ माहितीपर असेल; कधी लालित्याचा वास पुसणारं, तर कधी थेट ललितही. पण ‘तथ्य’ तिथे वरचष्मा दाखवत उभं असणार! हे सुश्रुत कुलकर्णी यांचं मोबाइलचा आणि मोबाइल अॅपचा वापर अनभिज्ञांना, ज्येष्ठ मंडळींना करायला शिकवणारं पुस्तक! त्यात चोख माहिती आहे. ती अनेक स्रोतांमधून मिळवलेली, पडताळलेली अशी आहे. ती नुसती विकिपीडियाची मराठी आवृत्ती नव्हे. आणि ही तथ्याधिष्ठित लेखनाची पहिली पूर्वअट आहे! तशीच सुविहित माहिती विजय नाईक यांच्या ‘साऊथ ब्लॉक, दिल्ली’ या पुस्तकात आहे. परराष्ट्रनीतीचे अनेक तथ्य-पदर त्यात सुबोधपणे, रंजकपणे उलगडले आहेत. ही दोन्ही पुस्तके लालित्याकडे झुकत नाहीत. एका अर्थाने ते उचितच. ते विषयच काहीसे तसे आहेत. आणि हे अनिल अवचटांचं नवं ‘मुक्तांगणची गोष्ट’ हे पुस्तक तेवढय़ातच समोर येतंय. तेही एका अर्थाने तथ्याधिष्ठितच पुस्तक आहे. पण शीर्षकच सांगतंय, की त्यात केवळ व्यसनं, व्यसनाधीनता यांचे तपशील नसणार; ती मुळात ‘गोष्ट’ आहे. अवचटांचं बव्हंशी लेखन असं मधल्या वळणाचं. आणि इतक्या छोटय़ा जागेत आज मी त्यावर लिहीत नाही. अवचटांचं लेखन हा स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. पण त्यांचं पुस्तक डोळ्यासमोर आलं, कारण ते लेखन तथ्याधिष्ठित लेखनाची दुसरी पूर्वअट पुरी करतं. चांगल्या तऱ्हेनं मिळवलेल्या माहितीचं संकलन करणं, त्याची लेखनामधली क्रमवारी ठरवणं, अनावश्यक माहितीचा फापटपसारा ‘डिलीट’ करणं- ही ती दुसरी पूर्वअट! इथे लेखकाचा कस लागतो. त्याची स्वत:ची कायं ‘व्हिजन’ आहे, त्याला वाचकांपुढे काय आणायचं आहे, हे त्याला पक्कं ठाऊक असलं की मग हे विनासायास घडतं. मग येते पायरी माहितीच्या विश्लेषणाची! त्या सगळ्या माहितीला क्रमवारीने एकत्र मांडून चांगलं पुस्तक होईल; पण ती निर्मिती नसेल. त्या माहितीचं स्वत:च्या नजरेतून लेखक विश्लेषण करतो आणि मग ते लिखाण कसं जिवंत होतं! त्या माहितीपर लेखनामधल्या माहितीचा कंटाळा कसा दूर पळतो.
गळ
तो शब्द मला मागाहून आवडला.
Written by डॉ. आशुतोष जावडेकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-11-2016 at 01:14 IST
मराठीतील सर्व ‘वा!’ म्हणताना.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review