अशाच एका रविवारच्या सकाळी मी आणि मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक असलेले माझे एक मित्र मिसळ खात होतो आणि त्या मिसळीइतक्याच गरम, तिखट साहित्यिक गप्पा चालू असताना ते मला काहीसे वैतागून म्हणाले, ‘‘आता तू पाककृतींच्या पुस्तकांची समीक्षा करायची म्हणतोयस? ते काय साहित्य आहे?’’ आणि मी तेव्हा जरी हसत विषय पालटवत गप्पा पुढे नेल्या, तरी इथे आज मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. ते उत्तरही आणखी प्रश्नांना सोबत घेऊन आलं आहे. पहिला प्रश्न हा : समीक्षा ही केवळ साहित्याचीच करायची असते की भाषेचीही? भाषेच्या वापराचीही? आणि दुसरं म्हणजे- नित्य तडाखेबंद विक्री होणाऱ्या पाककृतींच्या पुस्तकांत साहित्यिकता- लिटररीनेस- हा गुण असतो का?
‘रुचिरा’पासून ‘शेफ रेसिपीज्’पर्यंतची पुस्तकं आत्ता माझ्या टेबलावर पसरलेली आहेत आणि मी त्यातली भाषा पाहतो आहे. त्या भाषेला स्वत:चं असं एक निश्चित वळण आहे- एक स्वत:चं भाषिक ‘रजिस्टर’ आहे. साधी साधी भाषिक वैशिष्टय़ं मी बघतो आहे. या संहितेचा मजकूर हा पहिल्या प्रथम अल्पाक्षरत्व राखणारा आहे. छोटी, सुस्पष्ट, मोजके शब्द असलेली वाक्यं इथे आहेत. (नपेक्षा पाककृती फसेल, हे नक्की!) आणि क्रियापदेही बव्हंशी आज्ञार्थी वळणाची आहेत- डायरेक्ट ऑर्डर्स! हे बघा ना : ‘‘डाळ शिजवून घ्यावी. पाणी राहू देऊ नये.’’ यामधला ‘देऊ नये’वरचा जोर कोण नजरेआड करेल? किंवा सगळ्या वाक्यांच्या शेवटची ही क्रियापदे अशी मला दिसताहेत : (टोमॅटो) घालावे, परतावे, उकळू द्यावे, चिरावे, घोटावे, उतरवावे! आणि या काही ‘मॉडर्न’ रेसिपीज्.. इंग्रजीची अवेळी, अस्थानी लागण झालेल्या : ‘‘मेलन स्कूपरने कलिंगडाचे स्कूप काढून घ्यावे. सवर्हग बोलमध्ये हे बॉल्स अ‍ॅरेंज करावेत.’’ मला या लेखिकेला इतकंच सांगायचं आहे मजेत- की कम ऑन.. निदान ‘अ‍ॅरेंज करावेत’ या शब्दप्रयोगासाठी मराठीत ‘आकर्षकरीत्या मांडावेत’ असे शब्द आहेत! पाककृतींच्या पुस्तकांमधली भाषा ही खरोखरच समीक्षेने- साहित्यिक समीक्षेने- भाषाशास्त्रीय निकषांवर तपासायला हवी. शेवटी अन्नसंस्कृती ही भाषेला किती जवळ असते! कानामागून येऊन कुणी ‘तिखट’ होते, तोंडात ‘साखर’ पडते, आयुष्य ‘अळणी’ असतं, किंवा पार ‘नासून’ जातं!
पण नुसत्या भाषिक स्तरावर नव्हे, तर समीक्षेच्या अनेक कोनांमधून ही पुस्तकं तपासता येऊ शकतात. स्त्रीवादी साहित्याची मांडणी केवळ कवयित्रींच्या कवितांमध्ये बघणं हे अपुरं असतं! एक काळ असा होता की, स्त्रिया स्त्रियांसाठी अशी पुस्तकं लिहायच्या. ‘रुचिरा’ हे त्याचं चांगलं उदाहरण. (जाता जाता : कमलाबाई ओगल्यांच्या पदार्थाच्या व्याप्ती बघितल्याने मी पुडिंग सेट व्हावं तसा थिजलोच आहे!) मग आताचा एक काळ आहे. जिथे पुरुष शेफ- उदा. विष्णू मनोहर हे मुख्यत: बायांसाठी आणि उत्साही पुरुष वाचक असल्यास त्यांच्यासाठीही पुस्तकं लिहीत आहेत. पण १९९५ मध्ये निघालेलं स्नेहलता दातार यांचं रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेलं पुस्तक मला स्त्रीवादी आणि समाजशास्त्रीय मांडणीवरही निराळं वाटतं, महत्त्वाचं वाटतं. त्याचं शीर्षकच मुळी पुरेसं बोलकं आहे- ‘पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र’! १९९५ चा तो जागतिकीकरणाचा आरंभकाळ! झपाझप संख्येने अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेला तरुण विद्यार्थीवर्ग! तिथे उटाह किंवा सिअ‍ॅटलच्या थंडीत येणाऱ्या भाकरी, भाज्या, भाताच्या आठवणी! आणि त्या पाश्र्वभूमीवर खास लाडावलेल्या भारतीय मुलांना निदान थोडंफार रांधता यावं, हा हेतू बाळगणारं हे पुस्तक! त्याच्या ब्लर्बवरची ही ओळ मला समानतेच्या दिशेने जाणारी वाटते- ‘‘पुरुष असो वा कोणी शिकाऊ स्त्री- स्वयंपाकाची जुजबी माहिती नसल्याने साधे पदार्थ करण्यासाठीही ते कचरत राहतात.’’ या विधानात पुरुषही स्त्रियांसोबत स्वाभाविक तऱ्हेने आले, हे पथदर्शी असं परिप्रेक्ष्य आहे. आणि त्याबद्दल मुळात अशा पुस्तकाची संकल्पना ज्यांनी लेखिकेपुढे मांडली त्या रोहन प्रकाशनच्या कै. मनोहरपंत चंपानेरकर यांचंही प्रकाशक म्हणून निदान स्त्रीवादी समीक्षकांनी तरी अभिनंदन करायला पाहिजे!
केवळ स्त्रीवादी नव्हे, तर समाजशास्त्रीय नजरेनं पाककलांची किंवा पाकशास्त्रासंदर्भात लिहिली जातात ती पुस्तकं बघितली जायला हवीत. शाहू पाटोळे यांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे पुस्तक मला स्मरतं आहे. त्यांच्याच शब्दांत : ‘‘अभिजन किंवा दलितेतर सोडा, दलित लेखकांनी वा दलित साहित्याबद्दल आस्था बाळगणाऱ्यांनी दलितांच्या खाद्यजीवनाबद्दल सविस्तर मागोवा घेणारं किंवा संशोधनपर लिहिल्याचं दिसलं नाही.’’ एखादं साधं वाक्य अख्ख्या पुस्तकाचा पोत ठरवतं, तसं हे वाक्य आहे. आणि खेरीज ते ‘साधं’ही नाही; काही अदृश्य जखमा बाळगणारं ते वाक्य आहे. गंमत म्हणजे दुर्गा भागवतांनी ‘खमंग’ नावाचं पाककृतींचं पुस्तक लिहिलं आहे! हो! त्यांना तसं पुस्तक लिहिण्यात काहीच लाज वाटली नाही; जी तत्कालीन अनेक अभिजनांना वाटली असावी. तर या ‘खमंग’चा फोकस हा पाटोळ्यांना अपेक्षित असलेला दलित खाद्यजीवन असा थेट नसला तरी तो लोकसंस्कृतीचाच फोकस आहे. दुर्गाबाई काहीशा मिश्कीलपणे म्हणतात की, ‘‘मी जर तऱ्हेतऱ्हेचे खमंग, उच्चभ्रू पदार्थ देत राहिले तर ते चोखंदळांना आवडेल. परंतु आज पाककलावंत स्त्रिया बहुतेक वृत्तपत्रांतून आपले कुशल पदार्थ प्रसिद्ध करत असतात. माझी त्यांच्याशी स्पर्धा नाही.’’ त्यातला ‘उच्चभ्रू’ हा शब्ददेखील मला वाटतं पुरेसा बोलका आहे आणि (लेखिका अभिजन असतानाही) लोकसंस्कृतीमधल्या खाद्ययात्रेची निदान दखल घेऊ बघणारा आहे!
पण ‘ते काय साहित्य आहे?’ हा माझ्या स्नेह्यंचा प्रश्नही आपण सोडवायला हवा. ज्या अर्थाने कविता, कथा, कादंबरी हे साहित्यात मोडतात, तशा अर्थाने पाककलांची पुस्तकं मोडली जाणार नाहीत, हे उघडच आहे! पण आजकालचे ‘फूड ब्लॉग्ज’ बघताना जाणवतं की, त्यात थोडीफार साहित्यिक मूल्येही असतात. सायली राजाध्यक्ष यांचा मराठीमधला (हे महत्त्वाचं!) ‘अन्न हेचि पूर्णब्रह्म’ नावाचा ‘फूड ब्लॉग’ हा नुसत्या ‘रेसिपी’च्या पुष्कळच पुढे जातो. त्यातला आत्मकथनाला जवळ जाणारा भाग हा त्या संहितेला साहित्यिकता प्राप्त करून देतो. नुकताच ‘जागतिक लोणचं दिना’निमित्त सायली राजाध्यक्ष यांनी जो ब्लॉग लिहिला आहे त्यात ‘लोणच्यां’ची माहिती तर आहेच, पण जेव्हा लेखिका मधेच लिहिते, ‘‘माझ्या आजीकडे बीडला सुट्टीत गेलं की जेवताना मला अगदी जुनं झालेलं, काळं पडलेलं लोणचं खायला आवडायचं..’ तेव्हा मग आपलंही उन्हाळी सुट्टय़ांमधलं बालपण डोळ्यांसमोर येतं. आज्यांच्या पदराच्या हलत्या आठवणी डोळे पाणावतात आणि लोणच्याइतकीच मुरलेली एखादी जुनी आठवण अस्तित्वाभोवती फेर घालू लागते! सायली राजाध्यक्ष यांचं समृद्ध, रसिक व्यक्तिमत्त्व; मराठवाडा ते साहित्य सहवास- मुंबई हा दीर्घ प्रवास, त्या प्रवासामधलं व्यक्तिगत आणि खाद्यसंचित हे सारंच त्या लेखनाला साहित्याच्या जवळ नेत राहतं! खरं तर अनेक नव्या लेखकांनी, लेखिकांनी (दोघांनीही हे पुन्हा अधोरेखित करतो.) आपली सर्जनशीलता गंमत म्हणून तरी एखादा ‘फूड ब्लॉग’ लिहून तासून घ्यायला हवी! रियाजच होऊ शकतो तो त्यांच्या लेखनसाधनेतला! मी एकदा गंमत म्हणून फेसबुकवर सॅलॅडची पाककृती लिहिताना म्हटलं होतं : ‘आणि रेसिपी येणेप्रमाणे!’ त्या इंग्रजी शब्दापाठोपाठ आलेला जुनापाना मराठी शब्द इतका अनपेक्षित तऱ्हेने आला, की कविता लिहिताना अन्वयार्थ सांगणारा शब्द सापडावा आणि झकास वाटावं तसंच मला वाटलं. कालच मी आणि माझी फे.बु.वरची रसिक मैत्रीण अवंती कुलकर्णी चॅट करीत होतो. तिने एक जुन्या काळच्या भाषेतली पाककृती पाठवली. ‘‘१ रुपया भार तुपात १ मासा मिसळून घ्यावा..’’ असं वाक्य वाचल्यावर मला हसूच आलं. ‘१ रुपया भार म्हणजे एक सपाट चमच्याचं प्रमाण’ हे लगोलग अवंतीनं मला बजावलं. मग वाटलं, भाषेचा इतिहास व बदलत्या भाषेचा वेध घ्यायलाही ही पाककलांची पुस्तकं कालौघात केवढी तरी मोलाची ठरणार आहेत!
मग आठवल्या, मला आपल्या मराठी साहित्यातल्या अनेकानेक खाद्यप्रतिमा.. बोरकरांची मासळी, पु.लं.चा ‘गुलाश’ हंगेरीचा.. अन् अजूनही काय काय! आठवला मला ‘लयपश्चिमा’च्या निमित्तानं भेटलेला ‘‘we are struggling, fighting to eatम्हणणारा उपाशी सोमालियाचा केनान नावाचा गायक. जाणवत गेला मग समीक्षकांनी ‘ही’ अशी ‘बायकी’ पुस्तकं अव्हेरण्यामागचा हलका पुरुषप्रधानतेचा ठसा. दिसले मला मग आजच्या काळातही बायकोला ‘सव्‍‌र्ह’ करायला लावण्यात पौरुष जोखणारे नव्या पिढीतले जुन्याच मुशीतले
पुरुष. आणि ‘कुकिंग इज् बोरिंग’ म्हणणाऱ्या- अन् पर्यायानं जगण्याचं एक समृद्ध अंग नाकारणाऱ्या ‘मॉडर्न’ तरुणी! येल विद्यापीठामध्येही पाकशास्त्र पुस्तकांचं रसग्रहण साहित्याच्या वर्गात करतात, हे मी माझ्या ज्येष्ठ प्राध्यापक स्नेह्यंना सांगितलं. आणि मग खिन्नता दूर सारत उत्साहाने मिसळीचा घास तोंडात टाकला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. आशुतोष जावडेकर
ashudentist@gmail.com

डॉ. आशुतोष जावडेकर
ashudentist@gmail.com