विनोदी साहित्य मला बेक्कार आवडतं. अर्थात ते ‘विनोदी’ असणं आणि ‘साहित्य’ही असणं या दोन छोटय़ा पूर्वअटी आहेत. त्यात उदात्त सामाजिक आशय किंवा करुण काव्य मागे लपून बसलेलं असलंच पाहिजे असं तर मला मुळीच वाटत नाही. तसंच कमरेखालच्या, वात्रट, वाह्य़ात ‘इनोदा’लाही माझी काहीच हरकत नसते. पण या सगळ्यामध्ये मुळात उत्तम, बुद्धिमान, खराखुरा विनोद असणं हे मला अपेक्षित असतं. आणि अनेकदा जी पुस्तकं विनोदी मराठी पुस्तकं म्हणून माझ्यासमोर येतात; ती ही साधी अपेक्षाही पुरी करू शकत नाहीत! बायकांची जाडी, पारशी म्हाताऱ्याचं मराठी, शहरी लोकांना कॉम्प्लेक्स द्यायच्या इराद्यानं पेटलेला कुणी खेडय़ातला पाटलाचा, पण आता शहरात असणारा मुलगा; झालंच तर बायकांचं ड्रायव्हिंग या सरधोपट फॉम्र्युल्यांचा कंटाळा येतो राव! आणि या लेखकांनी जरा पूर्वसुरींकडे नजर टाकली तर केवढय़ा तऱ्हेचे विनोद दिसतील त्यांना मराठीत! स्टेज गाजवायचंय? आधी आचार्य अत्रे आणि पु. लं. कोळून प्या! प्रादेशिक बोली वापरायची आहे विनोदाला? मच्छिंद्र कांबळींच्या नाटकांमधली खळखळती मालवणी ऐका! थोडं नॉन-व्हेज विनोदाकडे झुकायचं आहे का? वेल.. ‘ढगाला लागली कळं’सारखं इरसाल लिहिता येत नाही, तोवर प्लीज प्लीज लिहू नका! विनोदात कारुण्य पेरायचं आहे? हा बघा तुकोबा- ‘तुज मज नाही भेद/ केला सहज विनोद/ तू माझा आकार/ मी तो तूच निर्धार/’ कळलं? गाऽऽऽट इट्? आणि व्यासपीठावर हास्यकविता गाजवायची असेल तर ‘झेंडूची फुले’ ते अशोक नायगावकर हा अभ्यास आधी पुरा करा! विनोदी लिहिणं सोप्पं नसतं म्हाराजा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा