जगभरच्या साऱ्या लोकांना जशी संगीताची भाषा उमगते, तशीच सगळ्यांना समजणारी एक नवीन भाषा उदयाला येते आहे. मग तुम्ही मराठीभाषक असा वा मँडरीनभाषक; ही नवी भाषा- चिन्हांची, इमोटीकॉन्सची भाषा- तुम्हाला सारखीच समजणार. हे बघा. त्या चिन्हवलयांकित नवभाषेचं पहिलं अक्षर- विसर्गापुढे हा ठेवलेला कंस आणि त्याकडे तिरकं पाहिलं की दिसणारं चेहऱ्यावरचं हसू. हे ‘स्माइली’चं चिन्ह १९८२ साली जेव्हा स्कॉट फॉलमन या संगणक अभियंत्यानं तयार करून त्या विवक्षित अर्थानं वापरलं तेव्हा त्याला पुढे तीसेक वर्षांत या चिन्हाचा बोलबाला एवढा होणार आहे, किंवा लोकलमध्ये उभं राहिल्या राहिल्या त्या स्माइलींचा सडा माणसं आपापल्या फोनवरून दुसऱ्याच्या फोनवर पाडणार आहेत, इत्यादी अंदाज आले नसावेत! पण केवळ स्माइलीच नव्हे, तर इतरही अनेक चिन्हं आज माणसं व्यवहारात वापरत आहेत. दु:ख, उदासीनता, नैराश्य, गळून जाणं, अश्रुपात, वाईट वाटणं, मनाला लागणं या निरनिराळ्या अर्थच्छटांसाठी एकच ‘सॅड’चं सिम्बॉल आता पुरतं आहे. ‘मी प्रेम करतो’ एवढे तीन शब्दही न वापरता ‘हार्ट’ किंवा ‘किस’चं चिन्ह आता वापरता येतं आणि कशाचंही कौतुक करताना वेळ आणि शब्दांची कमाल बचत करीत माणसं उंचावलेल्या अंगठय़ाचं ‘लाइक’चं चिन्ह पाठवीत आहेत!
आणि म्हणूनच या चिन्हभाषेची समीक्षा होणं हे अत्यंत अगत्याचं आहे. मुदलात ही ‘भाषा’ आहे का? ही चिन्हं भाषेमधल्या शब्दांचा संकोच करीत आहेत का? या चिन्हांमुळे जगभरच्या भाषा संकटात येतील का? की उलट या चिन्हांमुळे भाषेला पूरक असं अभिव्यक्त होण्याचं नवं साधन मिळालं आहे?.. हे आणि असे अनेक प्रश्न सध्या स्माइलीकडे बघता बघता मला पडत आहेत. केवळ भाषिक समीक्षाच नव्हे, तर नव्या, उगवत्या साहित्यामध्ये ही चिन्हभाषा असणार आहे का? असल्यास कशी? साहित्याला ती चिन्हं मदत करतील की अडसर ठरतील? या चिन्हांचे संदर्भ तर आता नव्या साहित्यात पदोपदी येताहेत. श्रुती आवटे किंवा गणेश मतकरी यांच्या कादंबऱ्यांमध्ये या चिन्हांचं स्वत:चं असं स्थान आहे. ‘खिडक्या अध्र्या उघडय़ा’चा शेवट हा त्या स्माइलीच्या प्रत्युत्तराने व्यामिश्र झाला आहे. ही नवी चिन्हभाषा तिच्यासमवेत असे सारे मुद्दे घेऊन नेट-तलावर अवतरली आहे!

या चिन्हांच्या भाषेकडे वळण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट आधीच सांगायला हवी. हे सारे ‘इमोटीकॉन्स’ हे नित्य संदर्भाधिष्ठित असतात. म्हणजे सोप्या भाषेत- कुठल्या संदर्भामध्ये ही चिन्हं वापरली जातात ते जास्त महत्त्वाचं ठरतं. साधं उंचावलेल्या अंगठय़ाचं ‘लाइक’चं चिन्ह बघू या. फेसबुकवर एखादी पोस्ट आवडली तर आपण ‘लाइक’चं चिन्ह दाबतो. हे आवडलं बुवा, हे बरं आहे, हे उत्तम आहे, असे अनेक अर्थ त्यातून बाहेर येतात. (म्हणूनच नुकतीच फेसबुकनं पर्यायी चिन्हंही सोबत आणली.) तरीही त्या चिन्हामागचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो. एखाद्या कवीनं- आणि हे उदाहरणच आहे- दुसऱ्या कवीची आपल्या पोस्टवर खिल्ली उडवली, त्या दुसऱ्या कवीवर आडवळणाने टीका केली, तर तो दुसरा कवी कदाचित वाद न घालता केवळ ‘लाइक’चं बटण दाबेल. तेव्हा त्या ‘लाइक’चा अर्थ ‘आवडलं’ असं न घेता ‘बघितलंय काय मी बच्चमजी!’ असाच घ्यायला हवा! म्हणजेच थोडक्यात, ही चिन्हं प्रत्यक्ष भाषेचा संकोच करताहेत. अनेक शब्द, शब्दांच्या छटा या चिन्हांमुळे वापरातून नाहीशा होतील अशीही शंका कुणाच्या मनात आली तर ती रास्त मानायला हवी. आणि निदान मराठीत थेट शब्दच गळतील; पण इंग्रजीत स्पेलिंगची एव्हाना दाणादाण उडाली आहे. नॉर्थ कॅरोलिनामधल्या किंवा ब्रायटनमधल्या इंग्रजीच्या निवृत्त प्राध्यापिका, शाळांच्या मुख्याध्यापिका त्यामुळे अश्रूही ढाळत असतील! (कुणी सांगावं, त्या एकमेकींना चॅट करताना अश्रूंचं चिन्हच आताशा पाठवीत असतील.) ‘यू आर’मध्ये ‘you are’ ऐवजी ‘u r’ जसं सध्या ‘टाइपलं’ जातं किंवा ‘ओके’मधला ‘ओ’ नाहीसा होऊन काहीसा केविलवाणा ‘के’ केवळ दिसतो आहे. (त्यानं बाकी काही अडत नाही; पण या चिन्हांच्या भाषेत मागच्या ओळीमधला ‘के’चा अनुप्रास आणि त्याची गंमत असणार नाही, हेही खरंच.) तरीही जगभरची आपण सारी माणसं ही चिन्हभाषा वापरण्यामागचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे वेळेचा अभाव! जगणंच जिथं धामधुमीचं आहे, तिथे भाषिक पसाऱ्याला वेळ नाही. आणि मग या चिन्हभाषेची सवय झाल्यावर वेळ असला तरी बहुधा अनेक कारणांमुळे माणसं ही चिन्हंच वापरीत आहेत. संगणकशास्त्र, मोबाइल विज्ञान यावर लेखन करणारा आमचा मित्र सुश्रुत कुलकर्णी म्हणतो तसं अनेकांची भाषिक क्षमताच मुळात मर्यादित असते, त्यांना या चिन्हभाषेचा आधार आहे. (डुबत्याला बुडत्याचा आधार?) आणि दुसरं म्हणजे सुश्रुतच्या मते, या चिन्हभाषेमुळे माणसं भरभरून गप्पा मारणंच विसरली आहेत!
पण या सगळ्या चित्राला दुसरीही बाजू आहे आणि तीही मला मांडायला हवी. ज्याची मूळ भाषा समृद्ध आहे तो माणूस चिन्हांचा वापर कल्पकपणे करू शकतो. अशा तऱ्हेने तो ती चिन्हं वापरू शकतो, जी मूळ वाक्याला पूरक ठरावीत. त्या विधानाचे जे अनेक अर्थ आहेत ते न हिरावता त्यामधला ‘मधला आशय’ ते चिन्ह बोलकं करू शकतं. अनेकदा चॅटवर बुद्धिमान माणसांशी संवाद साधताना मी हे अनुभवलेलं आहे. साधं स्माइलीचं उदाहरण घेऊ या. नेमकं वापरलेलं स्माइलीचं चिन्ह विनोद अधोरेखित करू शकतं, तिरकस टोमण्याची बोच कमी करू शकतं आणि कधी कधी तर थेट हल्ला चढवणाऱ्या विधानानंतर येऊन ते समोरच्या व्यक्तीला संभ्रमित करू शकतं. (‘प्रॅग्मॅटिक्स’मध्ये याला bald- on attack म्हणतात.) उदा. तोच आपला मघाचा कविमित्र खाजगी चॅट उघडून दुसऱ्या कवीला म्हणेल, ‘आपला संबंध संपला!’ पण मग त्यामागोमाग तो ते स्माइलीचं चिन्ह टाकेल आणि ते भांडण कसं सभ्यतेच्या कक्षेत राहील!
साहित्यामध्ये ही चिन्हं वापरली जातील असं आसपासचं नवं इंग्रजी साहित्य चाळतानाही ध्यानी येतं. मराठीतही निदान स्माइलीचं चिन्ह येईल अशी अटकळ आहे. गंमत म्हणजे हे चिन्ह अगदी पूर्वी रॉबर्ट हेरीक या इंग्रजी कवीनं वापरलं होतं- आणि त्यानं ते स्माइलीच्या अर्थानंच वापरलं होतं असं संशोधन नुकतंच पुढे आलं आहे. ‘I will sit upon my ruins’ यापुढे त्याने ‘smiling yet’ असं लिहिलं आहे. आणि मग ते स्मित-चिन्ह वापरलं आहे! जर आपल्या मराठी ‘मास्टर्स’ मंडळींच्या हातात हे चिन्ह असतं तर काय बहार येती! मला वाटतं, गंगाधर गाडगीळांनी हे स्माइलीचं चित्र वापरलं असतं! त्यांच्या विनोदाच्या धाटणीला ते साजेसंही आहे. पु. ल. देशपांडे यांचा विनोद इतका टण्टण् वाजणारा आहे, की त्याला स्माइलीची गरजच नाही. पण गाडगीळ खूपदा ब्रिटिश तऱ्हेचा ‘चीक-इन ह्य़ुमर’ मांडतात आणि तो सामान्य वाचकांच्या कधी कधी डोक्यावरूनही जातो. अशा प्रसंगी ही स्माइली कदाचित मूळ विधानाला पूरक ठरू शकते. रामदास भटकळांचं ‘जिव्हाळा’ हे पुस्तक आत्ता माझ्यासमोर आहे आणि गाडगीळांना गांधीचरित्र लिहायला त्यांच्या एका प्रकाशकानं सुचवलं, यावर ते म्हणताहेत, ‘‘गाडगीळ गांधीजींशी जमवून घेण्याची शक्यता कमी- हे बनहट्टींना माहीत असायला हरकत नव्हती.’’ मग मला गमतीत वाटतंय, या विधानापुढे एक स्माइलीचं चिन्ह असायलाही हरकत नव्हती! किंवा मंगला गोडबोले यांच्या विनोदाला स्माइलींची गरज नाही, पण गौरी देशपांडे किंवा थेट शकुंतला परांजपे यांच्या आडवळणी विनोदाला स्माइलीची जोड असती तर कसं झालं असतं, हाही विचार मी करतो आहे.
लिखित भाषेपलीकडेही अनेक ‘डिस्कोर्स’ असतात. हाताची एखादी हालचाल, बोलताना उजळलेला चेहरा, बोलतानाची घुटमळणारी किंवा नजरेत नजर घालणारी दृष्टी असे अनेक घटक भाषिक संवादाला पूर्णत्व देत असतात. आपण मराठीत उद्गारवाचक चिन्ह (!) वापरतो तेव्हाही भाषेची मर्यादाच एक प्रकारे स्वीकारत असतो. स्माइली, लाइक्स ही नवी उद्गारवाचक चिन्हंच की! फक्त जरा जास्त ‘ग्राफिक’, जास्त आवाजी! शब्दांच्या मर्यादांवर ही चिन्हं कधी कधी नेमकं बोट ठेवतात हे खरं; परंतु सगळ्या मर्यादांसह शब्दाचं माध्यम आपल्याला कुठल्या कुठे उंच नेतं, हेही तितकंच खरं. महत्त्वाचा मुद्दा असा, की हे नवं जग आहे चिन्ह- भाषेचं. ते विस्तारणार आहे. आणि आपण त्याच्याकडे नीट ध्यान द्यायला हवं.
तूर्तास मी शांता शेळके यांनी केलेला कालिदासाच्या ‘मेघदूता’चा अनुवाद वाचतो आहे. ‘हात घालता सजण निरीला, सैल रेशमी वसन ओघळे’ ही ओळ माझ्या डोळ्यांपुढे आहे आणि त्या ओळीपुढे ‘किस’ किंवा ‘हार्ट’चा सिम्बॉल कसा शोभून दिसेल असा मिश्कील विचार मनामध्ये रेंगाळतो आहे!
डॉ. आशुतोष जावडेकर- ashudentist@gmail.com

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…

chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…

central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?

Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”

shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…

Mysterious Sanskrit text discovered in Germany
आश्चर्यच !…गूढ हिंदू मजकुराचा कागद जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये!