कवी ग्रेस म्हटलं की मला ‘फॅशन’ चित्रपटामधली कंगना रनावतची ‘एन्ट्री’ स्मरते. रॅम्पवर फॅशन शो सुरू होणार आहे. ग्रीनरूममध्ये जाणत्या आणि नव्या मॉडेल्सची लगबग चालू आहे. कंगना तिच्या नादात आहे. टीम मॅनेजर सगळ्यांना सूचना देते. कंगना आपल्या मस्तीत त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते आहे. एका हातात मद्याचा पेला आहे; एक हात मोबाइलवर व्यस्त आहे. फॅशन शो सुरू व्हायची वेळ आलीच. ही बया धडपणे चालू तरी शकेल का, अशी शंका येते आहे. ढकलतं मागून तिला कुणीतरी. चालू लागली आहे ती. अंधाऱ्या पॅसेजमधून स्टेजपर्यंत जाताना तिची चाल आपसूक तेज धारण करते. नजर क्षणात ग्रेसांच्या शब्दात ‘एकांतनादा’त जाते आणि तपस्वी देहाचं बळ पाजळू लागते! झालीच तिची ‘एन्ट्री’! लाइट्सही पडलेत. चालू लागते आहे ती- आणि कशी? वाघिणीसारखी! मगाचचं ते स्वकेंद्रित हरवून जाणं लोप पावलंय आता. थेट, आत्मविश्वासपूर्वक ती जणू एखाद्या नग्न सत्याला भिडते आहे. ग्रेसांच्या कवितेसारखीच! तशीच झळझळीत साहित्याच्या रॅम्पवर प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकत स्वत:च्या मस्तीत, तोऱ्यात, थाटात, ‘हू केअर्स?’ असं म्हणत निरंतर चालत राहणारी ग्रेसांची कविता नाहीये का? तो लयीचा सावध, हलका नाच, शब्दांचं अनवटपण, आशयाची गूढता, आई आणि प्रेयसी, गायी आणि संध्याकाळ, पुरुष आणि वैष्णवी, कंदील आणि दृष्टान्त. आणि या सगळ्यावर पांघरूण घालत असणारा- माझ्या ‘मुळारंभ’मधला जिंदीया म्हणतो तसा- ‘की फर्क पैंदाये?’ असं आत्मविश्वासाने म्हणणारा, गुंजणारा अॅटिटय़ूड! ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’मध्ये तो अॅटिटय़ूड फडर्य़ा इंग्रजीत कविता वाचण्याआधी वाचकाला बजावत सांगतो, ‘‘जे कोण माझ्यापाशी येणार आहेत त्यांनी नीट ध्यानात घ्यावं की, माझ्यापाशी येणं हे ‘डेंजरस’ आहे. ‘Your old arrangements will be disturbed.
आणि खरंच आहे ते. ग्रेसांची कविता वाचली आणि माणूस क्षणार्धात आपल्या कामाला लागला असं होत नाही. कविताच कशाला, त्यांची झालेली गाणीही! खरं तर जनसामान्यांपर्यंत ग्रेस हे या गाण्यांमुळेच पहिल्यांदा पोचले. त्यांच्या कवितेत आर्त, वाहतं गाणं होतंच. सम होती. तिय्या होता. नादाचं आवर्तन तर होतंच. हृदयनाथांसारख्या तितक्याच अवघड संगीतकारानं ते आतलं गाणं मुखरीत केलं. तसं करताना दोन सर्जकांची प्रतिभा जणू एकवटली. ‘घर थकलेले संन्यासी’ असो, नाहीतर ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस..’ असो; ती गाणी आपल्याला खोलवर नेतात. आपल्या आतलं जे गुपित असतं ते जणू त्या गाण्यांना कळतं. ग्रेसांवर दुबरेधतेचा शिक्का असताही ही गाणी अगदी जनसामान्यांनाही आवडण्याची कारणं दोन.. पहिलं- ते गहिरं संगीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे- जो माझा लाडका मुद्दा आहे- की ग्रेसांच्या कवितेमधील एक-एक ओळ हीदेखील अनेकदा स्वतंत्र कविता असते. त्या कवितेमधल्या सगळ्या चरणांचं ‘एकसमयावच्छेदे’ अर्थ लागणं हे दुस्तर आणि क्वचित प्रसंगी अशक्यही होतं. पण त्यामधली एकेक चरणं ही स्वयंपूर्ण कवितेसमान असतात. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ ही ओळ जर त्यातील प्रत्येक शब्द स्वतंत्र ओळीत लिहून मुद्रित केली तर ती एक अख्खी, स्वतंत्र, नवीन कविता ठरू शकेल. ग्रेसांच्या दुबरेधतेकडे जाताना वाचक या तऱ्हेने बघू शकतो आणि मग ती वाट थोडी सुकर होऊ शकते. अरुणा ढेरे यांच्याशी खूप पूर्वी गप्पा मारताना त्यांनी केलेलं एक विधान माझ्या अद्याप स्मरणात आहे. ‘‘बाकी कवी पटातलं घटात आणतात, ग्रेस घटातलं पटात नेतात,’’ असं त्या म्हणाल्या होत्या. आणि ते पदोपदी ग्रेस वाचताना जाणवतं. अर्थात ती दुबरेधता अपरिहार्य होती की नाही, यावर अनेकांचं दुमत आहे. राजीव काळे यांनी आपल्या एका लेखात फार उत्तम तऱ्हेनं म्हटलं होतं की, खाजगी, आतले अनुभव मांडताना ग्रेसांनी गूढतेचं कुंपण त्याभोवती घातलं. आणि मग गूढतेचं भलंथोरलं कुंपणच त्यांना विलक्षण प्रिय होत गेलं.
ग्रेसांचा रॅम्प!
टीम मॅनेजर सगळ्यांना सूचना देते. कंगना आपल्या मस्तीत त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते आहे
Written by डॉ. आशुतोष जावडेकर
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-04-2016 at 01:01 IST
TOPICSमराठी कवी
मराठीतील सर्व ‘वा!’ म्हणताना.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet and writer kavi grace